रेश्मा राईकवार

‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने चित्रपटगृहांमध्ये चित्रपटांची एकच गर्दी झाली असती तर तो वेगळाच गुलाबी विक्रम ठरला असता. प्रत्यक्षात ८ फेब्रुवारीलाच देशभरातील चित्रपट निर्मात्यांनी आपले चित्रपट प्रदर्शित केले आणि एकाच शुक्रवारी तब्बल ५२ चित्रपट प्रदर्शित झाल्याचा विक्रम नोंदवला गेला. या ५२ चित्रपटांत मराठी चित्रपटांचा आकडा सर्वाधिक होता. आता ही गोष्ट अभिमानाने घ्यायची की या बारा चित्रपटांच्या गर्दीत कोणालाच धड चित्रपटगृहात उभेही राहता आले नाही, या वास्तवाचा गांभीर्याने विचार करायचा यावरही गोंधळ आहे. मात्र गेले काही महिने सातत्याने एकाच आठवडय़ात ८-९ मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याचे प्रमाण वाढते आहे, या वर्षभरात असे विक्रम पुन्हा पुन्हा मराठीत नोंदवले गेले तर मराठी चित्रपट निर्मितीच्या बिघडत चाललेल्या गणिताचा मोठा आर्थिक फटका उद्योगाला बसेल, अशी भीतीही व्यक्त होतेय..

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट निर्मितीचा आकडा सातत्याने वाढतो आहे. मात्र एकाच शुक्रवारी दोन-तीन मराठी चित्रपट सातत्याने प्रदर्शित होत गेल्याने साहजिकच त्यापैकी एखाद-दोन चित्रपटांच्या आर्थिक नुकसानीची शक्यताही तितक्याच वेगाने वाढत गेली आहे. सध्या मराठी चित्रपटांना हिंदी चित्रपटांची नव्हे तर आपल्याबरोबर प्रदर्शित होणाऱ्या अन्य मराठी चित्रपटांचीच स्पर्धा जाणवते आहे, असे मत मराठी चित्रपटांचे मार्केटिंग सल्लागार विनोद सातव यांनी व्यक्त केले. वर्षांचे ५२ आठवडे आणि वर्षांला प्रदर्शित होणाऱ्या १२५ मराठी चित्रपटांचे समीकरण कुठल्याही पद्धतीने बसवता येणे शक्य नाही. त्यामुळे येत्या काळातही एका आठवडय़ात दोन-तीन मराठी चित्रपट प्रदर्शित करण्याशिवाय पर्याय नाही. पण या ५२ आठवडय़ांमध्येही एखादा हिंदी बिग बजेट चित्रपटांचा आठवडा, सणासुदीचा आठवडा यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीचे दिवस सातत्याने घटतच जातात. अशा वेळी चित्रपट निर्माते, वितरक यांनी नियोजित पद्धतीने प्रदर्शनाच्या तारखा निश्चित करून एका वेळी कमीतकमी दोन किंवा तीनच मराठी चित्रपट प्रदर्शित होतील, यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र अशा प्रकारे आधी नियोजन करून चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या निर्मितीसंस्था, वितरकांची संख्या मोजकीच आहे. इतर हौशी निर्मात्यांची संख्या जास्त असल्याने ते कुठलाही विचार न करता चित्रपट प्रदर्शित करतात आणि त्याचा फटका चांगल्या चित्रपटांनाही बसतो, असे सातव यांनी स्पष्ट केले.

८ फेब्रुवारीला ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाचा उत्तरार्ध प्रदर्शित होणार, हे दोन महिने आधीच जाहीर झाले होते. शिवाय, या चित्रपटाला वायकॉम १८ सारखी निर्मितीसंस्था असल्याने त्यांना चित्रपटगृह मिळणार हे निश्चित होते. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून संजय जाधव यांचे नाव असल्याने त्यांचा ‘लकी’ चित्रपट आणि ‘रेडीमिक्स’सारखा चित्रपट ज्यात वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांसारखे नावाजलेले कलाकार होते. त्यामुळे या तीन चित्रपटांना पाहण्यासाठी सर्वसाधारणपणे प्रेक्षक येणारच. प्रत्यक्षात नऊ मराठी चित्रपट तेही पुण्यामुंबईतील चित्रपटगृहांमध्ये एका दिवशी प्रदर्शित होणार हा प्रेक्षकांसाठीही धक्काच होता, असे ‘सिटीप्राइड’चे सुगत थोरात यांनी सांगितले. पूर्वी दिवाळीत चित्रपट प्रदर्शित होत नव्हते, आता हिंदी चित्रपट मुद्दाम सणासुदीला प्रदर्शित केले जातात, मराठी चित्रपटांनीही धोका पत्करत अशा काळात चित्रपट प्रदर्शित करायला हवेत. सध्या चित्रपट निर्मितीचा आकडाच वाढला असल्याने एका आठवडय़ात दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणारच हे गृहीत धरायला हवे. पण त्यापेक्षा जास्त चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होऊ नये, यासाठी काहीएक नियंत्रण हवे. ते आपल्याकडे सध्या नाही, अशी खंतही थोरात यांनी व्यक्त केली. दक्षिणेत अशा प्रकारे एका वेळी दोन ते तीन चित्रपटच प्रदर्शित होतात. अगदी रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित होणार असेल तर त्या आठवडय़ात आणि त्यानंतरच्या आठवडय़ात इतर चित्रपट प्रदर्शित होणार नाहीत, याकडे तिथल्या संघटनेकडूनच लक्ष दिले जाते. मल्टिप्लेक्सनाही तशा सूचना दिल्या जातात आणि एखादे चित्रपटगृह किंवा निर्माता हे मानण्यास तयार नसेल तर त्यांना दंडही आकारला जातो. आपल्याकडेही मराठी चित्रपट महामंडळाने हे नियंत्रण आले तर योग्य होईल. अन्यथा अनेकदा निर्माते वितरकांचे म्हणणे फारसे मनावर घेत नाहीत, अशी माहिती चित्रपट वितरक अंकित चंद्रमणी यांनी दिली.

एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होण्यामागे वितरकांमध्ये समन्वय नाही, असेही बोलले जाते. मात्र प्रत्यक्षात सातत्याने चित्रपट वितरित करणारे आमच्यासारखे व्यावसायिक  एकमेकांच्या सतत संपर्कोत असतात. आणि आपल्याकडे आलेल्या चित्रपटांच्या तारखाही ते जाहीर करतात. निर्मात्यांना तशी कल्पनाही आमच्याकडून दिली जाते. मात्र जे छोटे वितरक आहेत ते कित्येकदा निर्मात्यांना एका दिवशी दोन-तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार असले तरी त्याची माहिती देत नाहीत. अशा प्रकरणांत निर्मात्यांची फसगत होते. तर अनेकदा निर्मात्यांनी आपल्या टीमबरोबर आधीच तारीख ठरवलेली असते किंवा त्यांच्या दृष्टीने तो चांगला मुहूर्त असतो. किंवा इतर चित्रपट प्रदर्शित झाले तर आम्हाला फरक पडत नाही, असाही दृष्टिकोन असतो. अशा वेळी आमच्याकडे चित्रपट त्याच तारखेला प्रदर्शित करण्यावाचून पर्याय उरत नाही, असे अंकित यांनी सांगितले. असा प्रकार अनेकदा पहिल्यांदाच चित्रपट निर्मितीत उतरलेल्या किंवा हौस म्हणून चित्रपट निर्मिती करणाऱ्या निर्मात्यांकडून जास्त घडतो. चित्रपट निर्मिती हा एक व्यवसाय आहे. चित्रपट पूर्ण झाला म्हणजे सगळ्या गोष्टी संपत नाहीत. तो योग्य वेळी प्रदर्शित झाला पाहिजे. तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची प्रसिद्धीही झाली पाहिजे. ज्या चित्रपटगृहांतून तो लागणार त्यांना व्यवसायही करता आला पाहिजे, अशा अनेक गोष्टींचा विचार व्हावा लागतो. मात्र हौशी निर्माते हा विचार, अभ्यास करत नाहीत, कुठलेही नियोजन न करता असे चित्रपट प्रदर्शित केले जातात  आणि त्याचा फटका त्याच्याबरोबरीने पान ६पान १ वरून  प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांनाही बसतो. जसे गेल्या आठवडय़ात झाले. नऊ चित्रपटांपैकी एकही चित्रपट चांगल्या पद्धतीने शो मिळवू शकला नाही, असे सातव यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले तर मल्टिप्लेक्स किंवा एकपडदा चित्रपटगृह असो कोणालाही शो देणे अवघड जाते. सध्या मराठी चित्रपटांचा विचार करता ज्या चित्रपटांचा आशय चांगला आहे ते चित्रपट चालणारच. पण मुळात चित्रपटांची माहिती तरी लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. तरच लोक चित्रपटगृहात संबंधित चित्रपट पाहण्यासाठी येतील. तसे प्रयत्न होत नाहीत. आणि मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्गच मर्यादित आहे. तो एका शुक्रवारी किती चित्रपट बघणार, हेही गणित आम्हाला लक्षात घ्यावे लागते, असे थोरात यांनी स्पष्ट केले. अंकित चंद्रमणी यांनीही हाच मुद्दा उचलून धरला. मल्टिप्लेक्समध्ये नियमाप्रमाणे मराठी चित्रपटांना शो देणे शक्य होते, मात्र एकपडदा चित्रपटगृहांना अडचणी येतात. अमेय खोपकर यांनी ‘रेडीमिक्स’सारखा चित्रपट केला आहे, तरीही या चित्रपटाला दादरमध्ये जास्त शो मिळणे शक्य झाले नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्यावर नियंत्रण आणणे हाच एकमेव उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वितरक समीर दीक्षित यांनीही या वाढत चाललेल्या चित्रपट निर्मितीवर आणि त्यांच्या प्रदर्शनावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. कित्येकदा निर्माते स्वत:च आमचा ग्रामीण चित्रपट आहे, तो या भागात चालेल अशा पद्धतीचे तर्क लावून नियोजन करताना दिसतात. अशा प्रकारचे नियोजन हे अखेर नुकसानदायीच ठरते, असे दीक्षित यांनी सांगितले.

व्हॅलेंटाइनचे गणित चुकले!

आपल्याकडे ‘आयपीएल’ सामने, परीक्षा अशा काळात चित्रपट पाहिले जात नाहीत, या समजूतीने चित्रपट प्रदर्शित केले जात नाहीत. मग त्याच्या आधी किंवा नंतर येणाऱ्या तारखेलाच चित्रपटांची ही गर्दी होती. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ातही हाच प्रकार घडला. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने हिंदीत ‘गल्ली बॉय’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आणि ‘आनंदी गोपाळ’ही याच आठवडय़ात प्रदर्शित होणार ही माहिती निर्मात्यांना समजली होती. त्यामुळे व्हॅलेंटाइनच्या आठवडय़ात प्रदर्शित न करता त्याच्या एक आठवडा आधी चित्रपट प्रदर्शित केले तर तो आठवडा आणि व्हॅलेंटाइनचा आठवडाही मिळेल, असा विचार निर्मात्यांनी केला. त्यामुळे ‘प्रेमरंग’, ‘प्रेमवारी’, ‘उनाडमस्ती’ असे चित्रपटही ८ फेब्रुवारीला घाईघाईत प्रदर्शित झाले. प्रत्यक्षात मुंबई-पुण्यात ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ (उत्तरार्ध), ‘लकी’, ‘रेडीमिक्स’ हे तीन चित्रपट आणि पाठोपाठ ‘आसूड’सारखा चित्रपट वगळता अन्य चित्रपटांना शोच मिळाले नाहीत, अशी माहिती अंकित चंद्रमणी यांनी दिली.

चित्रपट महामंडळाचे प्रयत्न

चित्रपट प्रदर्शनाच्या संख्येवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने केले आहेत. सेन्सॉरचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्या तारखांनुसार ते प्रदर्शित करण्याचा प्रयत्नही करून पाहिला. मात्र त्याने हा गुंता सुटणारा नाही हे आमच्या लक्षात आले, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी दिली. वाढती चित्रपट निर्मिती आणि प्रदर्शनाचा हा ताळमेळ घालण्यासाठी सध्या तरी चित्रपटगृहांची संख्या वाढवणे हाच योग्य उपाय आहे. त्यासाठी अगदी हजार-बाराशे आसनक्षमता असलेल्या चित्रपटगृहांची गरज नाही. तर अगदी तीन-चारशे लोक बसू शकतील, अशी तालुकास्तरावर छोटी चित्रपटगृहे असायला हवीत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा छोटेखानी चित्रपटगृहांसाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिल्या तर पुढचे प्रयत्न महामंडळ करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्राथमिक स्तरावर म्हणून ज्या ज्या गावांमध्ये एसटी स्थानक आहे तिथेच उपलब्ध असलेल्या जागेत जर चित्रपटगृहे उभी राहिली तर प्रेक्षकही मिळतील आणि व्यवसायही होईल.  त्यामुळे जागा जर उपलब्ध झाली तर महामंडळ पुढाकार घेऊन चित्रपटगृह उभारण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.