निलेश अडसूळ

करोनाकाळात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपल्या कल्पकतेने मालिकांची मदार समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या लेखकांची गोष्ट..

शिथिलीकरणानंतर मनोरंजन विश्वातील सर्वात पहिला मार्ग खुला झाला तो मालिकांचा. भले त्यात अनेक मार्गदर्शक तत्वांचा खो घातला गेला, परंतु काम सुरु होणे हेच अधिक महत्वाचे होते ते सुरु झाले. आता चित्रीकरण स्थळी निर्माते – दिग्दर्शक आपली खिंड लढवत आहेत खरी, पण पडद्यामागे म्हणजेच घरी बसून मालिकांच्या कथेला आकार देणारे लेखकही युद्धच खेळत आहेत. कल्पनांशी, विचारांशी आणि शब्दांशी.

पूर्वी लेखन करताना त्यांना स्वातंत्र्य होते, कल्पनाविस्ताराची मुभा होती. आता मार्दर्शक तत्वांमुळे त्याच मुक्ततेवर मार्यदा आली आहे. कुटुंबात लहान मुले, आजीआजोबा नसतील तर जसा रितेपणा येतो तसाच रितेपणा लेखकांना मालिकेत वरिष्ठ कलाकार आणि बालकलाकार नसल्याने वाटतो आहे. एवढेच नाही स्थळांची मर्यादा, माणसांची मर्यादा, करोनाकाळात येणाऱ्या वैद्यकीय अडचणी, पात्रांची बदली, मुख्य कलाकाराचे नसणे अशा नाना भानगडी झेलून ते लेखन करत आहेत. याविषयी लेखिका रोहिणी निनावे सांगतात, ‘पात्र खूप जवळ नको, पात्राचे वय अमुकच हवे, स्थळ कोणते असेल या सर्व बाजूंचा विचार करून भाग लिहावे लागतात. सध्या आम्ही सेटवर जाऊ शकत नसल्याने तिथे काय अडचणी येतील याचीही कल्पना नसते. त्यामुळे लेखन अधिक प्रयोगशील झाले आहे. पुनर्लेखन करताना तर पात्र, घटना सगळ्याचा फेरविचार करावा लागतो. इच्छा असूनही बरेच प्रसंग टाळावे लागतात.’ विशेष म्हणजे पूर्वीसारख्या भेटी होत नसल्याने ऑनलाईन कामातही मर्यादा येत असल्याचे त्या नमूद करतात. त्यांच्या मते, पूर्वी सगळे भेटून मालिकांचे भाग, पात्र, कथा यावर चर्चा करायचे. त्यामुळे लिखाणापूर्वी घडणारे दृश्य डोळ्यांपुढे असायचे. आता तसे राहिले नाही. ऑनलाईन भेटीत प्रत्येक गोष्ट समजावून सांगता येतेच असे नाही किंबहुना आपल्यालाही समोरच्यापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे कलात्मक कामाला औपचारिकता आल्याचा भास होतो, असे त्या सांगतात.

गर्दीचे प्रसंग नकोत या अटीमुळे मालिकांमध्ये बरेच बदल झाले आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेचे लेखन करताना मालिकेतील शेवटचे घटना समितीच्या बैठकांचे प्रसंग कमी माणसांसोबत चित्रित करावे लागले. त्या प्रसंगात चाळीत ते पन्नास लोक अपेक्षित होते. पण चार ते पाच कलाकार आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून तो प्रसंग पूर्ण केला. करोनामुळे कथा सांगणे बदलले नाही, परंतु ती मांडणे आव्हानात्मक झाले आहे, असा अनुभव लेखिका अपर्णा पाडगावकर यांनी व्यक्त केला. ‘गेले काही महिने मालिका, मनोरंजन बंद असल्याने लोक मनोरंजनासाठी आतुर आहेत, त्यातही करोनाकाळात प्रत्येकाला नात्यांची उकल नव्याने झाली आहे. हाच हळवेपणा पडद्यावर पाहून लोक अधिक सुखावले जात आहेत. नातेवाईक, गोतावळा याची ओढ मनात निर्माण व्हावी यासाठी सध्या बऱ्याच मालिकांमध्ये लग्नाचे सत्र सुरु झाल्याचे दिसते. लोकांचा तणाव या आनंद सोहळ्याने काहीसा निमावेल. विशेष म्हणजे झालेला आशय बदल, जो होणे स्वाभाविक आहे. कारण दैनंदिन जीवनाचा भाग असलेल्या मालिकांमध्ये या संघर्षांच्या काळाचे प्रतिबिंब उमटणे नैसर्गिक आहे’, असेही त्यांनी सांगितले.

लेखक शिरीष लाटकर सांगतात, ‘मालिका सुरु ठेवणे महत्वाचे. जे लेखक कसोशीने करत आहेत. मी लिहित असलेल्या मालिकेत एकाच वेळी अनेकांना बाधा झाली, चित्रीकरण थांबले. संग्रहातील भागांवर काही दिवस काढले परंतु पुढे काय करायचे असा प्रश्न होता. त्यातले काही कलाकार अमूक एका तारखेला येणार म्हणून संपूर्ण तयारी केली, भाग लिहिले पण अचानक त्यांचे येणे लांबले. त्यामुळे ऐनवेळी नव्या पात्रांचे लेखन, नव्या भांगांचे लेखन करावे लागले. एका रात्रीत साडे तीन भाग लिहून पूर्ण केले. कथानकात बदलही करायचा आहे, पण मूळ कथनाला धक्काही लागता कामा नये. अशी संवेदनशील परिस्थिती आहे’. तर ‘अग्गं बाई सासूबाई’ मालिकेत काही दिवसांपूर्वी निवेदीता सराफ यांना करोनाची बाधा झाली. तेव्हा मात्र ‘झी मराठी’ने ही गोष्ट आहे त्या वस्तुस्थितीसह प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची ठरवली. त्यानुसार लेखक किरण कुलकर्णी आणि पल्लवी करकेरा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. ‘निवेदिता सराफ यांची विलागीकरणातील बाजू आणि  त्यांच्याविना मालिकेत निर्माण झालेली पोकळी याचा उत्तम मेळ साधण्यात आला. शिवाय शूटिंगदरम्यान आलेले वेगवेगळे अनुभव आणि जवळपास तीनशे भागांच्या प्रवासात घडलेले महत्त्वाचे टप्पे दाखवण्यात आले. लोकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. लेखक म्हणून आमच्यासाठीही हा एक वेगळा अनुभव होता’, असे किरण आणि पल्लवी यांनी सांगितले.

करोनाची बाधा कोणालाही सांगून किंवा ठरवून होत नाही. त्यामुळे सारेच अकल्पित आहे. अशा परिस्थितीतही विचारांची आणि कल्पनांची मोट बांधून लेखक हा रथ समर्थपणे पुढे नेत आहेत. म्हणूनच करोना काळातील मालिकांची पालखी लेखकांच्या खांद्यावर आहे ,असे म्हटले तर वावगे ठरणार आहे.

तक्रार नाही, जबाबदारी घेऊ

मालिकांचे चित्रीकरण सुरु झाले तेव्हा मार्गदर्शक तत्वानुसार पूर्वलिखित भांगांमध्ये बरेच बदल करावे लागले. केवळ भागांमध्येच नाही तर माझ्या दोन मालिकांच्या मूळ कथाही काहीशा बदलाव्या लागल्या. एखाद्या मालिकेचा ट्रॅक रातोरात बदलणे हे कोणत्याही लेखकासाठी दुर्दैवीच आहे. परंतु या परिस्थितीत लेखकाला थकून चालणार नाही. मालिकांना परवानगी मिळाली हीच मोठी बाब आहे. त्यामुळे आव्हाने असतील तरी तक्रारीविना आपण आपल्या कल्पकतेने ही जबाबदारी पार पाडायला हवी.

चिन्मय मांडलेकर. लेखक— दिग्दर्शक

पुनर्लेखन वाढले..

करोनामुळे बऱ्याच मालिकांचे चित्रीकरण ग्रामीण भागात होऊ लागले. त्यामुळे नवीन मालिका येणार असेल तर सेटचा अंदाज नसतो. त्यात कधी काय होईल सांगता येत नसल्याने आपण लिहू तेच अखेरचे असेल असे नसते. वेळप्रसंगी भागच काय तर ट्रॅकही बदलण्याची वेळ येते. त्यामुळे लेखनापेक्षा पुनर्लेखानाचे काम अधिक झाले आहे, आणि मालिका पुढे घेऊन जाणे महत्वाचे असल्याने लेखक ती जबाबदारी लीलया पेलत आहेत. काही ठिकाणी पात्र बदलण्यापर्यंतचे प्रसंग ओढवले आहेत. त्यामुळे नवीन पात्र आले की नवे आव्हान असते.

रोहिणी निनावे, लेखिका 

कथेत रंजकता महत्त्वाची..

सध्या मालिकेत सुरु असलेल्या गोष्टीला कुठेही धक्का लागणार नाही ही सर्वात मोठी जबाबदारी झाली आहे. त्यामुळे करोना काळात काय घडू शकते याचा अंदाज ठेउनच लेखन करावे लागते. आपल्याकडे पर्याय नाही, कारण मनोरंजन आणि दक्षता यांचा मेळ घालून चित्रीकरण करायचे आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ अंतिम टप्प्यात असतानाच करोनाचे प्रस्थ वाढले. पात्रांवर मर्यादा आली. पण तुमच्या कथानकात रंजकता असेल तर प्रेक्षकांना किती पात्र आहेत याचा फरक पडत नाही हे तेव्हा लक्षात आले. सध्या प्रेक्षकांच्या मनावर ‘करोना’ची दहशत आहे त्यामुळे ती टाळून मालिका कशा खुलवता येतील याकडे माझा कल आहे.

प्रल्हाद कुडतरकर. लेखक

वेळेच्या आधी लेखन

पूर्वी मालिका सुरळीत चित्रित होत असल्याने लेखक आणि चित्रीकरण यांच्यात समांतर वेळ असायची. सध्याच्या वातावरणामुळे ती वेळ बदलून लेखकांना चित्रीकरणाच्या आधी आशयचा मोठा संचय करावा लागतो आहे. कधीही कोणत्याही वास्तवाला सामोरे जावे लागू शकते. लेखकांचे भाग लिहून तयार असतील तर चित्रीकरणावेळी दिग्दर्शक— निर्माते आलेल्या अडचणींवर तोडगा काढून ते चित्रीकरण करू शकतात. लेखक तत्पर असेल तर पुढचे काम अधिक वेगाने मार्गी लागू शकते.

अपर्णा पाडगावकर. लेखिका

मालिका म्हणजे वचनबद्धता.

चित्रपट किंवा नाटकाच्या बाबतीत चित्रीकरण मागेपुढे झाले, सराव मागेपुढे झाला तर प्रक्षेपणाची तारीख पुढेमागे करता येते. पण मालिकांच्या बाबतीत तसे होत नाही. ही एक वचनबद्धता आहे. रोज अमूक एका वेळी ती मालिका प्रेक्षकांसमोर जाणे अनिवार्यच आहे. फक्त करोनाकाळात लेखकांच्या हातातील स्थळ, पात्र अशी काही संसाधने कमी झाली त्यामुळे कथा रंजक करणे आव्हानात्मक झाले. कल्पना विस्तारावर मर्यादा आली, आणि सतत काही तरी बदल करावा लागत असल्याने मालिका सुरू ठेवण्यासाठी रोज नव्या युक्त्यांची सांगड घालावी लागत आहे.

शिरीष लाटकर. लेखक