नीलेश अडसूळ

वादळ वाऱ्यानंतर उसळणाऱ्या समुद्राने उद्रेक कुशीत घेऊन एखाद्या डोहासारखे शांत व्हावे तशीच शांतता घरात सुरू असलेले वाद शिथिल झाल्यानंतर मिळते. नात्यात भांडणे, रुसवे-फुगवे असावेच, त्याशिवाय नात्याची चव वाढणार कशी. पण त्या रुसव्यांना अंत हवा, मर्यादा हवी. वैरत्वापर्यंत गेलेला नात्यांचा प्रवास कुणासाठीच सुखावणारा नसतो. घराघरात घडणाऱ्या अशाच हुज्जतींचे प्रतिबिंब आपल्याला मालिकांमध्ये पाहायला मिळते. पण आजपर्यंत आपल्याकडे पाठ करून उभी असलेली माणसे अचानक आपल्या जवळ आली तर.. असाच विस्मयकारक धक्का येत्या आठवडय़ात आपल्याला मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहे. कथानकातील अशाच रंजक वळणाची ही शब्दवाट..

wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Sunetra pawar Statement About Ajit Pawar
‘अजित पवारांनी पक्ष चोरला’, या आरोपावर पहिल्यांदाच सुनेत्रा पवारांचं उत्तर, “लोकशाहीत…”

सुरुवात आपण प्रेमाच्याच नात्यांपासून करू या. म्हणजे ‘झी मराठी’वर सध्या दोन जोडय़ा भलत्याच गाजत आहेत. दोन जोडय़ा म्हटल्यावर ती नावेही तुमच्या डोळ्यांपुढे आली असतीलच. अर्थात ‘माझा होशील ना’ या मालिकेतील ‘सई आणि आदित्य’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील ‘ओम आणि स्वीटू’. यांच्या नात्यांमध्ये मागील दिवसांत बऱ्याच दुरावणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. म्हणजे ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत श्रीमंती आणि कर्तृत्वाचा टेंभा मिरवणारी मालविका स्वीटूला आणि तिच्या आईला, म्हणजे नलू मावशीला त्यांच्या गरिबीवरून खूप सुनावते. हीच सल मनात घेऊन नलू मावशी स्वीटूला खानविलकरांच्या बंगल्यात पुन्हा कधीही न पाठवण्याचा निश्चय करते. पण ओमच्या आणि त्यांच्या आईच्या, म्हणजे शकूच्या मनात असलेली तिच्याविषयीची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नाही. ते स्वीटूला आपल्या घरी आणण्यासाठी नाना प्रयत्न करतात. शेवटी ओमसाठी नवरी म्हणून मालविकाने निवडलेली ‘मोमो’ तिला घरी घेऊन येते. अर्थात हे सगळे जुळवून आणण्यात ‘रॉकी’ म्हणजेच मालविकाचा प्रियकर आहे. स्वीटू आपल्याला ओमच्या जवळ घेऊन जाईल असा गैरसमज मोमोच्या मनात असतो. पण स्वीटूच्या घरी येण्याने ओम आणि स्वीटूच जास्त जवळ येतील का हे पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल. एकीकडे असे असले तरी दुसरीकडे मालिकेतील खलनायक मोहित स्वीटूला पुन्हा एकदा मागणी घालतो. त्याच्या मागणीने नलू आनंदी होते खरी, पण स्वीटू मोहितचा स्वीकार करेल का आणि हे जर ओमला कळले तर ओम काय करेल? असा धक्क्यांवर धक्का देणारा पुढचा कथाभाग असेल.

‘माझा होशील ना’ या मालिकेत ब्रह्मेंच्या वाडय़ात पहिल्यांदाच एक स्त्री राहायला आली आहे, ती म्हणजे सई. दादा मामा आणि तिच्यातील गैरसमज मिटून ती सून म्हणून घरात आली खरी, पण मुक्त विचारांची सई आणि चौकट आखू पाहणारे दादा मामा यांच्यात पुन्हा खडाजंगी सुरू झाली आहे. ‘सिंधू ब्रह्में म्हणजे दादा मामांच्या बायकोला सईने चोरून पैसे दिलेले दादा मामांना पटलेले नाही. त्यात घरात सत्यनारायण करायचे ठरते. पण प्रसादाचा शिरा मात्र कुणीही बनवलेला नसतो. आता सई आणि दादा मामा एकत्र शिरा बनवायला जातात. त्यामुळे शिरा करता करता त्यांच्या नात्यातला गोडवा कितपत वाढतोय हे लवकरच कळेल. विशेष म्हणजे लवकरच होळीचा सण येतो आहे. तेव्हा ब्रह्मेंच्या वाडय़ात नेमके कोणकोणते रंग बहरणार हे पाहण्यात मजा आहे.

‘स्टार प्रवाह’वरील प्रेक्षक प्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘मुलगी झाली हो’. मुलीचा आयुष्यभर तिरस्कार केलेल्या बापाला शेवटी मुलीचे महत्त्व कळते, तिची माया कळते. आणि तीच माया बापाच्या डोळ्यात दिसणारा यंदाचा आठवडा आहे. मालिकेतील ‘माऊ’चे तिच्या वडिलांनी जन्मापासून तोंडही पाहिलेले नसते, त्यात तिच्या मुकेपणातील संवेदनशीलता वारंवार समोर आली आहे. ही मुलगी आपली आहे हे तिच्या वडिलांना म्हणजे विलासला कळणार आहे. पश्चात्ताप झालेल्या बापाची अवस्था आणि लेकीसाठी तुटणारे त्याचे अंत:करण असा दुहेरी संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

तर ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत लग्न होऊनही नवरा बायकोचे नाते प्रस्थापित झालेले नाही अशी ‘अंजी आणि पशा’ची कथा आहे. अपरिहार्यता म्हणून केलेले लग्न आणि परस्परांविरुद्ध असलेले स्वभाव यामुळे दोघांमध्ये कायमच बाचाबाची होत आली आहे. पण त्यांना एकमेकांजवळ आणणारा प्रसंग येत्या आठवडय़ात घडणार आहे. सहलीनिमित्त मोरे कुटुंब बाहेर गेले असताना त्यात अडचणी आणण्यासाठी अवनीच्या कुटुंबातून अनेक प्रयत्न केले जातील, पण मोरे कुटुंबांची अतूट ‘दिलजमाई’ काय आदर्श ठेवतेय हे बघायला हवे. त्यातही एका प्रसंगी अंजी तरणतलावात पडते आणि तिला वाचवण्यासाठी पशा पाण्यात उडी घेतो. आता ही उडी त्याला प्रेमात पडायला भाग पडेल का, हे आगामी भागात कळेलच.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत तर विस्मयाचा डोंगर उभा राहणार आहे. प्रेक्षकांसाठी हा प्रसंग अत्यंत दुर्मीळ असा असेल. ज्या मंगलने आजवर सिद्धी आणि शिवा यांच्या नात्याचा तिरस्कार केला. सिद्धीचा छळ केला, तिच्या विरोधात कुरघोडय़ा केल्या तीच मंगल लष्करे म्हणजे सिद्धीची सासू आगामी भागात चक्क तिला मायेने जवळ घेताना दिसणार आहे. आत्याबाईंचे खरे रूप तिच्यासमोर आल्याने आपल्या मुलाच्या आणि सुनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे ती ठरवते. एवढेच नाही तर सोनी आणि सरकारचे लग्नही ती मोडते. अर्थात आत्याबाईंच्या आहारी गेलेला शिवा आपल्या आईवर विश्वास ठेवेल का, हाही रंजकतेचा भाग आहे. पण सिद्धीच्या डोहाळजेवणाच्या निमित्ताने मंगल आणि सिद्धी या सासू-सुनेमध्ये झालेली दिलजमाई डोळ्यात पाणी आणणारी आहे. आता सिद्धी आणि मंगल एकत्र येऊन शिवासमोर आत्याबाईंचे पितळ कसे उघडे पाडतील, हे पाहणे खरे लक्षणीय ठरेल.

‘राजा रानीची जोडी’ या मालिकेत सत्याची कास धरणारा रणजीत आणि अल्लड अशी संजू यांच्या नात्यात खोटेपणामुळे मोठी दरी पडली आहे. रणजीत आणि विभामध्ये घडलेल्या प्रसंगानंतर संजूने केलेला खोटेपणा ही नकळत झालेली चूक असते हे रणजीतला उमगू लागते. हळूहळू त्यांच्या नात्यातील दुरावा संपतो आहे. आता संजूला पोलिसात भरती करण्यासाठी रणजीत तिची पूर्वतयारी घेणार आहे. या कसरतींच्या दरम्यान दोघांच्या नात्यातली कसरत थांबून प्रेमाची रुजवात होईल का, हे पाहण्यासाठी मात्र थोडा धीर धारावा लागेल.

अरुणा आणि अनन्या या निरागस सासू-सुनेची जोडी दाखवणारी मालिका म्हणजेच सोनी मराठीवरील ‘श्रीमंताघरची सून’. या मालिकेत केवळ मुलाने मनाविरुद्ध लग्न केले म्हणजे सासू-सुनेच्या नात्यात हा दुरावा आलेला असतो. अथर्व आपल्या आईमधील आणि अनन्यामधील नातेसंबंध पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण एकामागून एक घडणाऱ्या घडामोडींमुळे ते साध्य होत नाही. अनन्या मात्र अरुणाला आपलेसे करण्याचे सर्व प्रयत्न करताना दिसतेय. येत्या होळी विशेष भागात सोसायटीत होणाऱ्या सासू-सून पुरणपोळी स्पर्धेत अरुणा-अनन्या एकत्र भाग घेतात. ही स्पर्धा या सासू-सुनेमधला दुरावा दूर करून यांना एकत्र आणेल का, पुरणपोळीसारखेच नातेही खमंग होईल का, हे होळी विशेष भागात दाखवले जाईल.

‘झी’ युवा मालिकेत नचिकेतच्या आई, इरा आणि सईचे आजोबा, आप्पा केतकर यांचे आजवर कधीही पटले नाही. पण त्या दोघांचेही लक्ष्य एकच असल्याचे त्यांच्या लक्षात आलेले आहे. ते म्हणजे सई आणि नचिकेतचे लग्न होऊ द्यायचे नाही. आता हे उद्दिष्ट  साध्य करण्यासाठी दोघेही एकत्र येतात. आता चुकीच्या कामासाठी केलेली ही दिलजमाई टिकेल का, त्याचे खरे रूप समोर येईल का हे आगामी भागात कळेल.

‘डॉक्टर डॉन’ या मालिकेत डॉक्टर मोनिका आणि देवा डॉन यांच्यातील प्रेम आपण पाहिले आहे. त्यांचे लग्न होणार असे वाटत असतानाच मोनिकाचा मित्र विक्रांत मालिकेत येतो आणि त्यांच्या लग्नाचे चौघडेही वाजायला लागतात. या सगळ्या प्रकारात देवाला हे सहन होईल का, मोनिकाचा हात तो विक्रांतच्या हातात पडू देईल का ही मेख आहे. त्यामुळे मोनिका आणि देवाची दिलजमाई होण्यासाठी नेमके काय दिव्य देवा पार करेल यांची उत्कंठा प्रेक्षकांना आहे. एकूणच येते काही दिवस हे या मालिके तील जोडय़ांच्या दिलजमाईचे आहेत हे लक्षात आलं असेलच.