गायत्री हसबनीस

दूरचित्रवाणीचे माध्यम घरोघरी पोहोचविणाऱ्या प्रत्येक मालिकेतून कलाकार आणि प्रेक्षकांमध्ये एक अतूट नाते तयार होते. प्रेक्षकही मालिकांमध्ये आणि त्यातील पात्रांशी सहज समरसून जातात. त्यामुळे मालिकेतून घरोघरी पोहोचलेल्या देसाई नाही तर सरंजामे कुटुंबातील गणपती, दिवाळीच्या सणापासून घटस्फोटापर्यंतच्या सगळ्या घटना जिव्हाळ्याने पाहिल्या जातात. हाच धागा पकडून सध्या नव्या-जुन्या मालिकांमध्ये मालिकेतील मुख्य जोडीला आणि कथानकाला वेग देण्यासाठी लग्न सोहळ्यांचा घाट घातला गेला आहे. हे लग्न सोहळे प्रेक्षकांना आवडतील अशा पद्धतीने करण्यासाठी अगदी लग्नाचा बस्ता बांधण्यापासून प्रत्यक्ष विवाहसोहळा रंगवण्यापर्यंतचे आव्हान लेखक, दिग्दर्शक, निर्माते, कलाकार मंडळींसमोर आहे..

‘सोनी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेतही एक वेगळा लग्न सोहळा पार पडणार असून तो मालिकेला वळण देणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याच वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतील श्रुती आणि कार्तिक ही जोडी लग्नाच्या बेडीत अडकली असून यामध्ये लग्नानंतरची गोष्ट आणि त्यांच्या आईचा गैरसमज दूर करतानाचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. ‘झी युवा’वरील ‘सूर राहू दे’ या मालिकेतही लग्न सोहळा पार पडला. या वाहिनीवरच नव्याने सुरू झालेल्या आणखी एका मालिकेतून असाच लग्न सोहळा प्रेक्षक अनुभवणार आहेत. ‘तू अशी जवळी राहा’ मालिकेतही हे शुभमंगल कथेला पुढचे वळण देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठी मालिकांमध्ये बऱ्यापैकी नायक आणि नायिका यांच्या लग्नाला प्राधान्य असते. मग लग्न हा केंद्रबिंदू धरून मालिका पुढे नेली जाते. त्यामुळे लेखकाच्या दृष्टीनेही हा लग्न सोहळा महत्त्वाचा असला तरी ते लग्न कशा पद्धतीने आणि किती दिवस दाखवायचे हा सर्वस्वी वाहिनीचा निर्णय असतो, अशी माहिती अभिनेता चिन्मय मांडलेकर याने दिली. तो सध्या ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेचे लेखन करतो आहे. लग्नाचे लेखनातले आणि चित्रीकरणातले किस्से सांगताना चिन्मय म्हणाला, ‘झी मराठी’वरील ‘तू तिथे मी’ ही मालिका केली होती. त्यात बावीस मिनिटांत लग्न आटोपले होते तर दुसरीकडे ‘कलर्स’ वाहिनीवरील ‘अस्सं सासर सुरेख बाई’ ही मालिका लेखक म्हणून केली तेव्हा त्यात नायक-नायिकेचे लग्न दोन तास रंगवण्यात आले होते. एखाद्या चित्रपटाप्रमाणेच; परंतु इथे मालिकेच्या कथेची मांडणी आणि गरज यावर लग्नाचे चित्रीकरण अवलंबून असते. लग्नात एखादी कथा असेल तर एक लेखक म्हणून मलाही तो लग्नाचा प्रसंग लिहायला मजा येते म्हणजे ज्याप्रमाणे ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेत कार्तिकच्या आईला श्रुती बॉक्सर आहे हे कळणार की नाही कळणार? मग ते लग्नातून कळले. या प्रक्रियेवर खूप काम झाले. असा प्रसंग रंगवताना लेखक म्हणून त्यातली आव्हाने पेलताना मजा येते. नायक-नायिकांची भिन्न संस्कृती, लग्नाआधीचा त्यांचा प्रवास आणि त्यानंतर त्यांचे एकत्र येणे, त्यांचे पुढे काय होईल, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आणि मालिका पाहण्याचा प्रेक्षकांचा हा उत्साह जी मालिका टिकवून ठेवते ती मालिका यशस्वी होते.

लग्न सोहळे मालिकांमधून रंगवणे ही जशी लेखकांची कसोटी असते तशीच किंबहुना त्यापेक्षा जास्त दिग्दर्शकासाठी हे आव्हान असते. आतापर्यंत अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेमकथा आणि त्यानंतरचे शुभमंगल रंगवण्यात हातखंडा असलेल्या दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्या मते लग्न खरं असो वा खोटं त्याची तयारी जय्यतच करावी लागते. प्रेक्षक अत्यंत बारकाईने मालिका बघतात. बरं त्यांनी अनेक लग्न सोहळे अनुभवलेले असल्याने लग्नातील विधी, परंपरा त्यांना तोंडपाठ असतात. त्यामुळे या विधींपासून ते साडय़ा, दागिने, सगळ्या तपशिलांवर त्यांचे लक्ष असते. मालिकेतला हा जोडा कसा उठून दिसेल, यासाठी त्यांची वेशभूषा, दागिने, लुक, सगळ्याची जय्यत तयारी करावी लागते. सध्या मी दिग्दर्शित करत असलेल्या ‘सूर राहू दे’ मालिकेत नायिका आरोहीसाठी वेगळे मंगळसूत्र बनवण्यात आले आहे. याआधी ‘होणार सून मी या घरची’ मालिकेत जान्हवीसाठी बनवलेले मंगळसूत्र असेच लोकप्रिय ठरले होते. मालिकेतला लग्न सोहळा खरा भासवण्यासाठी दिग्दर्शकाला लग्नात होणारे धार्मिक विधी, त्यांचा क्रम आणि इतर सोपस्कार हे पौरोहित्य करणाऱ्या गुरुजींकडून समजून घ्यावे लागतात. नवरा-नवरी कुठल्या घराण्यातले आहेत, त्यांची भौगोलिक आणि आर्थिक पाश्र्वभूमी काय आहे, याचाही विचार दिग्दर्शकाला करावा लागतो.

प्रत्यक्ष लग्नाचे चित्रीकरण करण्याआधी पंधरा ते वीस दिवस आधीपासून नवरा-नवरी, त्यांच्या कुटुंबीयांचे कपडे, लग्नाचे साहित्य, हॉल, मंडप डेकोरेशन, कॅटरर या सर्वाचे नियोजन दिग्दर्शक, वेशभूषाकार, कला दिग्दर्शक, निर्मिती प्रबंधक आणि मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमला करावे लागते. खऱ्या आयुष्यातल्या लग्नघरातल्या धावपळीसारखेच सेटवर वातावरण असते. वऱ्हाडी आणि नातेवाईकांसाठी शंभर-दीडशे ज्युनिअर आर्टिस्ट मागवले जातात. जवळजवळ चार ते पाच दिवस रोज १२ तास चित्रीकरण करून एक छानसा विवाह सोहळा प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळतो, असे ‘सूर राहू दे’ मालिकेचे दिग्दर्शक सागर खेऊर म्हणाले.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ मालिकेची नायिका गौतमी देशपांडे हिने सांगतले, मालिकेतील लग्नाचे चित्रीकरण ही आमच्यासाठी एक धमाल असते. लग्न म्हणजे घरोघरी जी गंमत असते ती सेटवरही अनुभवायला मिळते. लग्नातली फॅशन तरुणाईसाठी आकर्षणाचा  केंद्रबिंदू ठरते. कथेत लग्न सोहळ्याचे प्रसंग लिहिणे हे सोपे काम नाही, याचे सगळे श्रेय हे पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या लेखकांना आहे. लग्नातले विधी, हळद, मेंदी यांचे प्रसंग अगदी सहजपणे लग्नात होतात तसेच्या तसे लिहिणे हे आवश्यक आहे. याच मालिकेचा नायक हर्षद अतकरी म्हणाला, आतापर्यंत केलेल्या मालिकांमधील माझे हे तिसरे लग्न आहे. मालिकेतील लग्नाचे वातावरण अगदी खऱ्याखुऱ्या लग्नाच्या अनुभवाप्रमाणे असून ते सर्व अनुभवणेही तितकेच मजेशीरसुद्धा असते.

तर मालिकेची खरी गोष्ट ही लग्नानंतर घडणारी असल्याने लग्न सोहळा कथेची गरज ठरते. लग्नाच्या प्रसंगानंतरच आमच्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. मालिकेत ‘राजवीर मोहिते-पाटील’ हा स्वत: कापड उद्योगाचा मालक आहे. त्याचा स्वभावच मुळात महत्त्वाकांक्षी असल्याने त्याचा लग्नातला पोशाख ठरवताना तो फॅशनेबल कसा दिसेल या दृष्टिकोनातून ठरवण्यात आला असल्याचे ‘झी युवा’वरील ‘तू अशी जवळी रहा या’ मालिकेचा नायक सिद्धार्थ बोडके म्हणाला.

एक अभिनेत्री म्हणून नवऱ्या मुलीचे बदलत जाणारे मूड, तिचा उत्साह हे दाखवताना आणि स्वत: अनुभवतानाही मजा वाटते. या वेळी मला लाजायचंही होतं. त्यामुळे हे चार-पाच दिवस नटणं-मुरडणं, हसणं मी आनंदाने अनुभवलं. माझं स्वत:चं लग्न अजून झालं नसल्याने लग्नातील उत्साहाने भरलेली गंमत अनुभवते आहे. शिवाय या मालिकेत लग्न अगदी साध्या पद्धतीने होतं असल्याचे ‘सूर राहू दे’ या मालिकेची नायिका गौरी नलावडे म्हणाली.

या सर्वच मालिकांमधून लागोपाठ लग्न सोहळे अनुभवायला मिळणार असून प्रेक्षक दोन्ही घरचे वऱ्हाडी असणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतील लग्न सोहळ्याचं निमंत्रण कधी मिळणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून गुरू आणि शनाया यांच्या लग्नावरून अनेक नाटय़मय प्रसंग सुरू झाले आहेत. त्यामुळे इथेही लग्न सोहळा रंगतोय का आणि रंगणारच असेल तर तो राधिकाच्या आयुष्यात पुढे काय घेऊ न येणार? याचाही विचार लेखकांच्या आधी प्रेक्षकांच्या मनात घुमू लागला आहे.