सुहास जोशी

मालिकेने पहिल्या सीझनमध्ये एक सुरेख लय पकडल्यानंतर तीच लय दुसऱ्या सीझनमध्ये टिकवून ठेवणं चांगलंच आव्हान असतं. कौटुंबिकच कथानक असलेली पण वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या ‘द माव्‍‌र्हलस मिसेस मीझल’ मालिकेचा नुकताच प्रदर्शित झालेला दुसरा सीझन पाहताना दिग्दर्शकाची ही धडपड बऱ्याच ठिकाणी सतत जाणवत राहते. मिसेस मीझल पहिल्या सीझनमध्ये ज्या भन्नाट पद्धतीने आणि तेवढय़ाच सहजसुंदरतेने भावते तशी दुसऱ्या सीझनमध्ये तेवढय़ाच तडफेने भिडत नाही. दुसऱ्या सीझनमध्ये मालिकाकर्ते रूपकात्मक, विरोधाभासात्मक पद्धतीने काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहे, असे सतत जाणवत राहते. पण तरी मालिका पूर्णपणे नीरस होत नाही, कारण मिसेस मीझलचा तोच सदाबहार उत्साही आणि धडपडय़ा स्वभाव येथेदेखील टिकून राहिला आहे.

हे सारं कथानक साठच्या दशकातील न्यूयॉर्कमधील आहे. पहिल्या सीझनमध्ये जोएल मीझल त्याची पत्नी मिरिअमला सोडून गेल्यानंतर, ती स्टॅण्डअप कॉमेडी प्रकारात मिरिअम स्थिरावू पाहते. वडिलांचा भक्कम आर्थिक आधार, घर असले तरी तिच्यात आजवर दडून राहिलेले कौशल्य तिला स्वस्थ बसू देत नाही. इतर स्टॅण्डअप कॉमेडीयन जोक्स वगैरे सांगून करमणूक करायचा प्रयत्न करत असतात तेथे मिरिअम स्वत:च्याच आयुष्यातील प्रसंग घेऊ न त्याचे सादरीकरण करत असते. त्यात वेगळेपणा असतो. एक उत्स्फूर्तता असते. आणि त्यात कोणत्याही प्रकारे सूड घेण्याचा वगैरे आविर्भाव नसतो. जोएलला पश्चताप होऊ न तो तिला परत नेण्यासाठी येतो, पण मिरिअमच्या सादरीकरणाने तो आणखीनच व्यथित होतो. दुसऱ्या सीझनची सुरुवात ही मिरिअमच्या आईने म्हणजेच रोझने न्यूयॉर्क सोडून पॅरिसला जाण्याने होते. आईच्या मनातील तगमग आणि त्यापाठोपाठ एकूणच पती-पत्नी संबंधांतील दुरावा आणि जवळीक यावरच कथेचा सुरुवातीचा भर राहिला आहे. नंतर तर सारे कुटुंब उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्षांनुवर्षे व्यतीत करत असलेल्या नेहमीच्याच रिसॉर्टमध्ये जातात. उच्चभ्रूंची उन्हाळी सुट्टी, त्यात घडणारे विविध टिपिकल प्रसंग असं बरंच काही कथेत घडत जातं. पण मिरिअमच्या नव्या सादरीकरणाने पुन्हा एकदा कथा वळण घेते आणि पुन्हा पहिला वेग पकडते.

पहिल्या सीझनमध्ये एकच धागा पकडून पुढे जाणारी ही मालिका येथे मात्र असंख्य वेगवेगळ्या टिप्पणी करताना दिसते. कितीही मुक्त असली तरी एक औपचारिक चाकोरीबद्ध जगण्याची पद्धत, त्यातून विचारांना आलेले साचलेपण, ते भेदण्यासाठीची धडपड असं बरंच काही यात दिसते. अगदी मिरिअमच्या आईला पॅरिसमध्ये राहून कलेच्या प्रांतात मुशाफिरी करायची असते. पण विद्वान आणि उच्चभ्रू नवऱ्याच्या संसारात ते सारं लोप पावलेलं असतं. पॅरिसमधले तिचे बहरणे आणि परत न्यूयॉर्कला आल्यानंतरचा तिचा प्रवास यातील बदल बरंच काही मांडणारा आहे.

उन्हाळी सुट्टीचे सारेच एपिसोड हे एकूणच त्या एका वर्गाच्या साचेबद्ध जगण्यावर प्रकाश टाकत जातात. उपहासातून विनोदनिर्मितीचा एक चांगला प्रयत्न त्यातून केलेला दिसून येतो. मुक्त वातावरण असले तरी लग्न, संसार, घर, समाज याची एक टिपिकल मांडणीदेखील त्यातून होत राहते. पण हे सर्वच भाग फारशी पकड घेत नाहीत. खरा वेग येतो तो मिरिअमच्या सादरीकरणाबद्दल तिच्या वडिलांना कळते तेव्हा.

मालिकेचा एकूण रोख हा मिसेस मीझलपेक्षा तिच्या अवतीभवतीच्या लोकांवरच अधिक आहे. प्लास्टिक वागणे आणि उत्स्फूर्तता यांचं द्वंद्वदेखील मांडण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेषत: एका प्रसिद्ध पण विक्षिप्त चित्रकाराची आणि मिरिअमच्या भेटीचा प्रसंग खूप काही दाखवून देणारा आहे. कलाकाराला जे काही सांगायचे असते त्यासाठीची धडपड त्यातून उत्तमप्रकारे मांडली आहे. त्याच वेळी एका प्रसिद्ध महिला कॉमेडियनच्या घरी गेल्यानंतर मिरिअमला याच्या अगदीच विरुद्ध असा साचेबद्ध प्रकार अनुभवायला मिळतो.

सीझनच्या शेवटाकडे जाताना मालिकाकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले आहेत हे नक्की. पण गोळीबंद पटकथा हा प्रकार या सीझनमध्ये नाही हे नक्की. पहिल्या सीझनमध्ये कॅमेरा जितका बोलका आहे तितका येथे दिसत नाही. कथेचा परिघ तसा मर्यादितच ठेऊ न हे असे बऱ्याच ठिकाणी भटकत जाणे काही वेळा भरकटण्याच्या जवळदेखील जाते. पण योग्य ते पंचेस वापरून पुन्हा गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न काही ठिकाणी यशस्वी होतो, तर काही ठिकाणी अगदीच फसतो. अर्थात असे गुण-अवगुण असले तरी पहिल्या सीझनच्या प्रभावात दुसरा सीझन एकदातरी पाहण्यासारखा होतो हे नक्की.

द माव्‍‌र्हलस मिसेस मीझल

सीझन दुसरा

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन