सुहास जोशी

पँटमध्ये मागच्या बाजूला खोचलेले पिस्तूल, अंगात ठासून भरलेला माज, त्याला क्रूरतेची आणि हिंसेची मिळालेली जोड. त्यातून पावलागणिक माणसांचे खून आणि मग एकमेकांवर कुरघोडी. अशी कथानके गेल्या दहा वर्षांतील अनेक चित्रपटांत आणि काही प्रमाणात मालिकांमध्ये पाहायला मिळणे यात काही फारसे नावीन्य राहिलेले नाही. पण तरीदेखील अशी कथानकं लोकप्रिय होतात या गृहीतकावर वेबसीरिज बेतण्याचा मोह आवरता येत नाही. अ‍ॅमेझॉन प्राइमवर नुकतीच प्रदर्शित झालेली मिर्झापूर वेबसीरिज ही त्याचेच प्रतीक आहे.

उत्तर भारतातील बाहुबलींचे स्वत:च्या जिवापुरते मर्यादित साम्राज्य, त्यातून होणारे वाद आणि साम्राज्यांतर्गत होणाऱ्या कुरघोडी हा या वेबसीरिजचा पाया आहे. या बाहुबलींनी सारा प्रदेश आपापल्या पद्धतीने वाटून घेतलेला असतो. मिर्झापूर हे अखण्डा त्रिपाठीचे असते. त्याचे सारे काळे धंदे हे गालिच्याच्या व्यवसायाआड सुरू असतात, त्यामुळे तो कालिन भैय्या म्हणून देखील ओळखला जात असतो. मिर्झापूरमधील एका लग्नाच्या वरातीत त्याचा वाह्यात मुलगा मुन्ना दारूच्या नशेत हवेत गोळीबार करताना नवऱ्या मुलाचाच बळी घेतो. ती केस कोणताही वकील स्वीकारत नाही, पण रमाकांत पंडित ती स्वीकारतात. अर्थातच मुन्ना रमाकांत पंडितांच्या घरात घुसून दमदाटी करतो. परिणामी त्याची दोन्ही मुले गुड्डू आणि बबलू प्रतिकार करतात. त्या मुलांचा हा जोश पाहून कालिन भैय्या त्या दोघांना त्यांच्या व्यवसायात सामावून घेतात. या दोघांमुळे मुन्नाला बाजूला टाकल्याची भावना निर्माण होते. त्यातून पुढचे महाभारत घडते.

हे महाभारत म्हणजे मनात आले म्हणून केले जाणारे खून, अखण्डा त्रिपाठीच्या व्यवहारातील खाचाखोचा शिकत गुड्डू आणि बबलूची प्रगती, त्याच वेळी उत्तर प्रदेशातील राजकारणावर असणारा गुन्हेगारीचा प्रभाव आणि बेफाम अशी क्रूरता याचे चित्रण अशी साधारण या वेबसीरिजची व्याप्ती.

हे असे विषय गेल्या काही वर्षांत चित्रपटातून कैकवेळा येऊन गेले आहेत. किंबहुना मधल्या काळात तर आधी मुंबईचे गँगवॉर आणि नंतर उत्तर भारतातील गुन्हेगारी ही अनेक चित्रपटांतून दिसली आहे. अशा कथानकाला नायक नसतो. तेथे सारेचजण वेगवेगळ्या टप्प्यावर नायक असतात. वास्तवादी कथानक असेल तर ड्रामा कमी राहतो इतकाच काय तो फरक. मिर्झापूर वेबसीरिज पाहताना हे असे जुने संदर्भ सतत जाणवत राहतात. किंबहुना त्यापलीकडचे वेगळे असे काही तरी पाहायला मिळेल असे वाटत असताना ती अपेक्षा काही फलदायी ठरत नाही. त्यामुळे आजवरच्या चित्रपटांमध्ये आणि या कथानकातील फरक काय असेल तर तो दोन-अडीच तासांचा चित्रपट आणि सात-आठ तासांची वेबसीरिज इतकाच राहतो. त्यातही नेहमीप्रमाणे नायक सर्व दुष्टांचा सर्वनाश करतो असा नसल्यामुळे काहीशी वास्तववादाकडे झुकणारी आहे हे त्यातल्या त्यात वैशिष्टय़ म्हणता येईल.

अर्थात वेबसीरिज असल्यामुळे काही गोष्टी अगदी हमखास वापरल्या जातात तशा येथेदेखील आहेत. संवादात शिव्यांचा भडिमार हा पात्रांचे कार्यक्षेत्र पाहिल्यास वावगा वाटत नाही. पण एखाद्याचा खून केल्यानंतर त्या खूनाचे कारण असणारा शरीरातील तो भाग अगदी स्पष्ट दाखवलाच पाहिजे असा काही तरी पणच सीरिजकर्त्यांनी केला असावा असे वाटते. त्यामुळे अगदी पोटातील आतडी, मानेवरून सुरी फिरवतानाचा आवाज हे पाहताना तसे प्रसंग आजवर पडद्यावर पाहिले गेले नसले तरी येथे त्यातील नावीन्यापेक्षा किळसवाणे वाटू लागतात. कदाचित हिंसा म्हणजे रक्त आणि ते पाहणारी इंटरनेटवरील प्रजा अधिक असते अशा काही विश्लेषणांचा आधार येथे घेतला असावा.

कथानकाचा जीव खरं तर अगदीच छोटा आहे. त्यामुळे मग काही होणारी प्रेमप्रकरणं आणि काही होऊ  घातलेली प्रेम प्रकरणंदेखील यात आहेत. आणि ती नेहमीच्या योगायोग पद्धतीनेच होतात. अगदी शेवटच्या टप्प्यात गाणीदेखील आहेत. शेवटच्या प्रसंगातून पुढच्या सीझनचे सूतोवाचदेखील आहे.

असे अनेक मुद्दे असले तरी वास्तवतेच्या अंगाने जाताना लोकप्रिय फॉर्म्यूल्याचा आधार घेण्याची कल्पना हे याचे वैशिष्टय़ म्हणता येईल. उगाच दाखवायचा म्हणून झगमगाट न करता तो गरजेपुरताच वापरून बाकी मांडणी वास्तववादी करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी अगदी उठून दिसतो. विशेषत: अखण्डा त्रिपाठीचा व्यवसाय, त्याच्या विस्तारासाठी केले जाणारे उपद्वय़ाप मांडताना हे अधिक जाणवते. पण तरीदेखील सिरिजकर्त्यांना लोकप्रिय मुद्यांचा आधार सोडून देणे जमलेले नाही. मोजक्या कलाकारांच्या अभिनयामुळे काहीवेळा हे पाहणे सुस्’ होते. पंकज त्रिपाठी तर आत्ता थंड डोक्याचा पण क्रूर असा डॉन म्हणून अगदी फिट्ट झाला आहे. पण तो सोडता बाकीच्यांचा फारसा प्रभाव पडत नाही.

तुलना करायची नाही, पण नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्सला स्पर्धा म्हणून ही सिरिज केली असावी की काय असंच अनेक वेळा वाटत राहते. विशेषत: संवाद, सेक्सच्या दृश्यांमध्ये हे प्रकर्षांने जाणवते. पण अशी तुलना करायचीच ठरवलीच तर, इतर मुद्यांवर मिर्झापूर फारशी सरस ठरत नाही. मात्र अशा स्पर्धेतून हिंदी वेबसिरिजमधील स्पर्धा आणखीन व्यापक होऊ शकली आणि नवीन काही पाहायला मिळाले तर अंतिमत: प्रेक्षकांचा फायदा नक्की होईल.

मिर्झापूर

ऑनलाइन अ‍ॅप – अ‍ॅमेझॉन

सीझन पहिला.