रेश्मा राईकवार

चित्रपट : मुळशी पॅटर्न

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
South Superstar Allu Arjun Pushpa 2 The Rule makers spent 60 crore on Gangamma Thalli jatara scene
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २: द रुल’ चित्रपटातील ‘या’ सीनसाठी खर्च केले ६० कोटी रुपये! एक-दोन नव्हे तर ‘इतके’ दिवस लागले शूटिंगसाठी
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

विकास हा सर्वासाठीच असायला हवा. एकाचा विकास दुसऱ्याच्या विनाशावर उभा राहतो तेव्हा कुठल्याही समाजात विकासाची नाही विनाशाचीच बीजे पेरली जातात. खरे तर  सामाजिक-आर्थिक विकास आपल्या आजूबाजूने उभा राहात असताना त्याच्या मागे दडलेल्या गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, कधीतरी उघडय़ा डोळ्यांनी पाहिलेल्याही असतात. पण जोवर त्याची झळ आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोवर आपण निश्चिंत राहतो. मात्र आपण डोळे बंद केले म्हणून घडणारे बरेवाईट परिणाम थांबत नाहीत. ते घडलेले असतात आणि एका क्षणाला भय वाढवणाऱ्या या घटनांचे एक दुष्टचक्र निर्माण झाले आहे हेही आपल्या लक्षात येते. मुळशी पॅटर्न नावाने सांगितलेल्या या गोष्टीत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी अधिक वास्तवतेने या दुष्टचक्राच्या मुळाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच लेखकाचे एक वाक्य आहे. शहरे कशी वाढली आहेत हे शहरात राहून नाही कळत. त्यासाठी वरून पाहायला हवे. आणि त्याच वेळी कॅमेरा आपल्याला वरून घेतलेली दृश्ये दाखवतो. एकेकाळी हिरव्यागार शेतीने खुललेली जमीन दुसऱ्याच क्षणाला अंगाखांद्यावर फक्त इमारतीच्या इमारती आणि त्याच्या आजूबाजूने कधी मध्येच निळ्या-काळ्या ताडपत्र्यांनी रंगवलेली झोपडपट्टी घेऊन उभी दिसते. वेगवेगळ्या कंपन्या किंवा मोठमोठाल्या अपार्टमेंट्सची नावे घेऊन उभ्या राहिलेल्या इमारती आणि झोपडपट्टय़ा म्हणजे विकास म्हणण्याचे धाष्टर्य़ आपणही करू शकत नाही. पण हे वास्तव आहे आणि हे फक्त कोणा मुळशी तालुक्याचे वास्तव नाही. किंवा पुण्या-मुंबईचेही नाही. देशभरात जिथे जिथे गावे जाऊन तथाकथित शहरे आली त्या प्रत्येकामागे हाच पॅटर्न दडलेला आहे. मुळशी तालुक्यातल्या गावातले पाटील कुटुंब. जमीन विकून आलेला पैसा उडवल्यानंतर स्वत:चे घर सोडून अशाच कुठल्यातरी झोपडपट्टीच्या वळचणीला आलेले पाटील (मोहन जोशी) आणि त्यांचा मुलगा राहुल (ओम भूतकर) हमाली करतायेत.

शेतीची जमीन विकण्याची केलेली चूक पाटलांच्या लक्षात आली आहे पण त्यांनी जमीन विकली नसती तरी त्यांना मारून किंवा धमकावून जमीन बळकावली गेली असती, हे वास्तव दुर्लक्षित करता येत नाही आणि हेच वास्तव राहुलच्या डोक्यात पक्के बसले आहे. आपली जमीन बळजबरीने बळकावून घेणाऱ्या नन्याभाईवर (प्रवीण तरडे), विकासक शिंदे, व्यवस्था, सरकार अगदी जमीन विकून आपल्या आई-बहिणीला धुणीभांडी करायला लावणाऱ्या बापावर प्रत्येकावर त्याचा राग आहे. याच रागाच्या उद्रेकातून राहुलचा प्रवास राहुलभाईपर्यंत होतो. पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेला, आई-वडिलांच्या नजरेतून उतरलेला गुन्हेगार मुलगा आणि पुन्हा पैशासाठी धरलेल्या भाईगिरीच्या मार्गातून स्वत:च ओढवून घेतलेले मरण असा हा राहुलचा प्रवास आपण याआधी पाहिलेला नाही, असे नाही. मात्र हे दुष्टचक्र कसे निर्माण होते आहे, त्याचे परिणाम हे फक्त कोण्या एका राहुल किंवा पाटलांच्या कुटुंबावर होत नाहीत. तर शेतकऱ्यांची पिढीच्या पिढी नष्ट होते आहे. शेतजमीन नावालाही शिल्लक नाही. उभी राहिलीत आहेत ती सिमेंटची जंगले.. यावर दिग्दर्शकाने नेमकेपणाने बोट ठेवले आहे. या परिस्थितीचा नात्या नात्यांवर होणारा परिणामही काही प्रसंगातून दिग्दर्शकाने उत्तम रंगवला आहे. खासकरून वडील-मुलाचे नाते, तत्त्वांची लढाई या गोष्टीही ओघाने पण प्रभावीपणे चित्रपटात येतात.

अर्थात, प्रवीण तरडे यांच्या रोखठोक शैलीप्रमाणेच चित्रपटाची मांडणीही थेट आणि अंगावर येणारी आहे. मात्र हा विषयही तितकाच गंभीर असल्याने ही मांडणी योग्य ठरते. महेश लिमये यांचा कॅमेराही प्रत्येक गोष्ट तितक्याच जिवंतपणे टिपतो. ओम भूतकरसारख्या तरुण कलाकाराबरोबरच मोहन जोशी, महेश मांजरेकर यांच्या भूमिका उत्तम वठल्या आहेत. पोलिसांचीही एक वेगळी बाजू या चित्रपटात आहे. आणि जशी राहुलची गोष्ट आहे तशीच त्याच परिस्थितीतून बाहेर येऊन चांगला मार्ग पत्करणाऱ्या उदयभाऊ, पोलीस इन्स्पेक्टर कडू यांचीही बाजू दिग्दर्शकाने मांडली आहे. उपेंद्र लिमये, उदयभाऊंची भूमिका करणारे सुरेश विश्वकर्मा यांनीही उत्तम काम केले आहे. कोणत्याही गोष्टीला बऱ्यावाईट दोन्ही बाजू असतात. त्या वेळीच लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपली वाट निवडायला हवी हे संयतपणे मांडण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न चित्रपटाला वास्तवाच्या जवळ नेऊन ठेवतो. मुळशी पॅटर्न म्हणूनच प्रत्येकाने अनुभवायला हवा.. कारण ती फक्त शेतकऱ्यांची गोष्ट नाही..

दिग्दर्शक – प्रवीण विठ्ठल तरडे

कलाकार – ओम भूतकर, मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, क्षितिज दाते, सुरेश विश्वकर्मा, मालविका गायकवाड, सविता मालपेकर.