रेश्मा राईकवार

नाळ

Ram Navami 2024 Shubh Yog
२०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Fry Vang Batata Rassa Bhaji Recipe In Marathi
सर्वांच्या आवडीची लग्नामध्ये पंगतीत वाढली जाणारी झणझणीत फ्राय वांग बटाटा रस्सा भाजी; ही घ्या रेसिपी
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

काही भावना अशा असतात, ज्यांना स्पर्श करू म्हटले, तर त्या हातून निसटण्याची भीती असते. अशा वेळी ती व्यक्ती, ती भावना, ती गोष्ट ज्या परिस्थितीत घडते ते संयमाने पाहत आपली भूमिका ठरवणे खूप अवघड जाते. आई आणि मुलाच्या नात्यात तर हा थकवणारा आणि तितकाच टोकाचा आनंद देऊन जाणारा अनुभव वारंवार येतो. जन्म देते ती आई की जी ममत्वाने सांभाळ करते ती आई, असा कुठलाच मापदंड नसतो खरा. पण ही अशी गणिते लहानग्यांच्या मनाला चटकन उमजत नाहीत. ती सहजतेने सगळीकडे प्रेमाचा शोध घेत असतात. आपले-परके असे भेद करायचेच नसतात कदाचित त्यांना.. पण तरीही त्या नादात ती मायेची नाळ तुटली तर, ही भीती आई-वडिलांचा जीव कासावीस करत राहते.

एका लहानशा गावात घडणारी चैतूची ही गोष्ट खूप काही सांगून जाते. आई-वडिलांच्या छोटय़ाशा विश्वात रमलेला चैतू. सकाळी उठायचे, कोंबडय़ांना टोपलीखालून बाहेर काढायचे, नदीवर पोहायला जायचे, शाळेतल्या गमतीजमती आणि मग घरी येऊन पुन्हा आईच्या मागे मागे करत लाड पुरवून घ्यायचे. आजीच्या कुशीत गोष्ट ऐकत झोपी जायचे. इतके सुंदरसहज, साधेसेच जीवन जगणाऱ्या या छोटय़ाच्या विश्वात एक दिवस अनाहूतपणे आलेल्या पाहुण्याच्या गप्पांनी गोंधळ उडतो. अचानक आपली आई आपली वाटेनाशी होते. तिची मायाच नाही आपल्यावर ही भावना घर करते आणि आपल्याला माहीत नसलेल्या आपल्या आईसाठी, तिच्या प्रेमासाठी त्याचा शोध सुरू होतो. यात त्याचा भाबडा उत्साह आहे, निष्पाप प्रेम आहे. एकीकडे ही आपली आई नाही हे खोटे ठरवण्याचेही त्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि दुसरीकडे त्या आईचाही शोध त्याला घ्यायचा आहे. या शोधासाठी म्हणून तो ज्या गमतीशीर धडपडी करतो त्यातून या चित्रपटाची कथा उलगडत जाते.

सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे आणि दिग्दर्शनही केले आहे. नाळ हा देखणा चित्रानुभव आहे यात शंका नाही. सुधाकर रेड्डी यांनीच छायाचित्रणही केले आहे. त्यामुळे त्यांच्या कॅ मेऱ्यातून दिसणारे गाव, त्यातील माणसे ही प्रथमदर्शनी प्रेमात पडावीत अशीच आहेत. उगाचच नात्यांमधला पीळ दाखवण्याच्या भानगडीत दिग्दर्शक पडलेला नाही. चैतूच्या मनातला ताण हा त्या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे खरा! एरवी आई आणि मुलाच्या नात्याचे भांडवलच केले जाते. मात्र इथे ही माणसे इतकी साधी आहेत की त्यांनी परिस्थिती आहे तशी स्वीकारली आहे. ती उगाचच ओढून ताणून अवघड करण्यापेक्षा त्यातून होता होईतो मार्ग काढण्याचाच प्रयत्न ते करतात. त्यामुळे जन्मदात्री असो वा नसो ती आपले दु:ख उगाळताना दिसत नाही. ते कढ ती आतल्या आत रिचवते. तर दुसरीही त्यातून मार्ग काढण्यासाठी अतातायी प्रयत्न करत नाही.

नाळची साधी-सुंदर कथा आणि त्याची त्याच पद्धतीने झालेली मांडणी या चित्रपटाला अधिक अर्थ देऊन जाते. या चित्रपटाचा सगळ्यात मोठा भार हा चैतूची भूमिका साकारणाऱ्या श्रीनिवास पोकळे या बालकलाकाराने पेलला आहे. श्रीनिवासचा सहज अभिनय आणि बोबडे बोल यांनी हा पूर्ण चित्रपट बोलका केला आहे. बाकी सगळ्याच व्यक्तिरेखा आणि त्यातले कलाकार अगदी नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, ओम भूतकर आणि आजीची भूमिका साकारणाऱ्या सेवा चव्हाण यांनी आपल्या भूमिका इतक्या चोख बजावल्या आहेत की कुठेही नाव ठेवायला जागा उरत नाही. चित्रपटात नेमके संवाद आहेत तेही नागराज मंजुळे यांनी लिहिले आहेत. नागराजच्या सरळ, थेट चित्रणशैलीचा प्रभाव असला तरी सुधाकर रेड्डी यंकट्टी यांची स्वत:ची स्वतंत्र शैली जाणवल्याशिवाय राहत नाही. गोष्टीच्या ओघात का होईना गावातली सद्य:परिस्थिती, वाहतुकीची समस्या, बैलगाडीतला प्रवास अशा अनेक वास्तवांकडे दिग्दर्शक जाता जाता लक्ष वेधतो. अद्वैत नेमळेकरचे पाश्र्वसंगीत चित्रपटाला प्रवाही ठेवते. मात्र पूर्वार्धात अनेक ठिकाणी चित्रपटाची कथा काहीशी रेंगाळताना दिसते. उत्तरार्धात त्या तुलनेत गोष्टी वेगाने घडतात. रेंगाळलेपण कमी झाले असते तर त्याचा प्रभाव आणखी वाढला असता. मात्र नाळची कथा, दिग्दर्शन, अभिनय या सगळ्यातला साधेपणा आणि सच्चेपणा यातूनचा हा एक सुंदर चित्रानुभव ठरला आहे.

* दिग्दर्शन – सुधाकर रेड्डी यंकट्टी

* कलाकार – श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी, ओम भूतकर, सेवा चव्हाण.