मे आय कम इन मॅडम? या मालिकेमुळे नेहा पेंडसे या अभिनेत्रीचे नाव हिंदीतील प्रेक्षकवर्गाला नव्याने कळले. पण त्याआधी या अभिनेत्रीने विविध भाषिक चित्रपटात केलेले काम मात्र काहीसे विस्मृतीत गेले होते. नेहाने आजवर हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगु, मल्याळम, कन्नड यांसारख्या दाक्षिणात्य  चित्रपटातून अभिनय केला आहे. मराठीत तिने अग्निदिव्य, शर्यत, दुसरी गोष्ट, प्रेमासाठी कमिंग सून, बाळकडू, नटसम्राट यासारख्या चित्रपटातून काम केले आहे. १९९५ ते २०१८ या काळात १३ हिंदी-मराठी मालिकांतून तिने विविधांगी भूमिका साकारल्या. इतकं तिचं अभिनयाचं नाणं खणखणीत असताना तिला मात्र अजून आपली ओळख तेवढी निर्माण झाली नाही, याची खंत वाटते. या एकाच कारणासाठी सध्या नेहाने हिंदी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.

गेली तेवीस र्वष मी सातत्याने अभिनय क्षेत्रात असूनही माझा या क्षेत्रात तितका मोठा मित्रपरिवार नसल्याचे तिने लोकसत्ताला सांगितले. अलिकडे मे आय कम इन मॅडम ? या मालिकेच्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यावरून तिच्यावर टीका झाली. त्यानंतर पोल डान्समुळे ती चर्चेत आली. या गोष्टी तिला बिग बॉसमध्ये घेऊन आल्या, अशी हिंदी वर्तुळात तिच्याविषयी चर्चा आहे. मराठमोळ्या नेहाला मराठीतही तेवढी लोकप्रियता मिळाली नाही. गेल्या काही वर्षांतील बिग बॉसची र्पव बघितल्यावर सातत्याने ही गोष्ट अधोरेखित झाली आहे की इथे सहभागी होणाऱ्या चेहऱ्यांना नवी ओळख मिळते. त्यामुळे अनेक स्पर्धक या शोकडे प्रसिध्दीचे माध्यम म्हणूनच बघतात. याविषयी नेहा म्हणाली की मला तसं फारसं कुणी जवळून ओळखत नाही. त्यामुळे माझ्या चाहत्या वर्गाला, अभिनयक्षेत्रातील मंडळींना नेहा नेमकी कशी आहे, हे माहितच नाही. त्यामुळेच बिग बॉसच्या रुपात मिळालेली ही संधी स्वीकारल्याचं नेहाने सांगितलं. या शोतून आपला खरा चेहरा लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपल्याला ओळखही मिळेल, असा विश्वास नेहाला वाटतो आहे.

अभ्यास केलास की नाही घरात टिकून राहण्यासाठी, यावर नेहाचं उत्तर असं होतं की जुने काही भाग पाहिले आहेत. पण मा्झ्याबरोबर सहभागी होणारे स्पर्धक वेगळेच असणार आहेत. त्यामुळे त्याचा फारसा उपयोग होईल असं वाटत नाही. असं ती म्हणाली. बिग बॉसच्या घरात येणाऱ्या आव्हानांना मी पुरुन उरणार आहे. आणि खरी नेहा कशी आहे, हे दाखवून देणार आहे. त्यामुळे मी गवसेन नव्याने असा एकदंरीत नेहाच्या बोलण्यावरून खूप काही तिला या बिग बॉसच्या पर्वात करायचे असल्याला तिचा निर्धार दिसला.