25 February 2021

News Flash

हिरो व्हायचंय मला!

इंटरनेटसारख्या माध्यमातून सध्या वेगवेगळ्या प्रकारची आशयनिर्मिती होत आहे. त्यातही वेबसीरिज हा सर्वात लोकप्रिय प्रकार.

(संग्रहित छायाचित्र)

स्वप्निल घंगाळे

अभिनेता (किंवा हिरो म्हणूयात हवं तर) म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काही साचेबद्ध गुणधर्म असणारे चेहरे उभे राहतात. नीट दाढी केलेले, सिक्स पॅक अ‍ॅब्स, उंची साडेपाच-सहा फुटांदरम्यान, मस्त हेअर स्टाइल, तो रुबाब वगैरे असं सगळच. त्यातही अभिनेत्री म्हटल्यावर गोरा रंग, नाकी डोळी सुबक, अगदी उंच, लांब केस वगैरे प्रकारातील आकृती डोळ्यासमोर उभी राहते. एकंदरीतच काय तर सामान्यांपेक्षा थोडं वरचढ वाटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजेच हिरो-हिरॉईन अशी व्याख्या मागील अनेक दशकांपासून चित्रपट क्षेत्रात आहे. मात्र आता हळूहळू चित्र बदलताना दिसतं आहे. आणि त्यासाठी प्रमुख कारण आहे इंटरनेटसारख्या माध्यमातून मोठय़ा पडद्यावर येणारे चेहरे. म्हणजे वेबसीरिजमुळे लोकांना आपल्यातलेच एका आहेत असे वाटायला लावणारे अनेक चेहरे अभिनेत्यांच्या रूपात वेबसीरिज आणि चित्रपटांतून दिसू लागले आहेत.

इंटरनेटसारख्या माध्यमातून सध्या वेगवेगळ्या प्रकारची आशयनिर्मिती होत आहे. त्यातही वेबसीरिज हा सर्वात लोकप्रिय प्रकार. वेबसीरिज ही नेटकऱ्यांसाठी काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. तरुणाईला साद घालणारे कथानक, त्यांच्या आवडीप्रमाणे हाताळले जाणारे विषय, विषयांची मांडणी या सर्वच बाबींबरोबर या वेबसीरिजमधून समोर येणारे कलाकारही या वेबसीरिजमागील यशाचे महत्त्वाचे कारण ठरले आहे. मुख्य प्रेक्षकवर्ग असलेल्या तरुणाईला आपल्यातलेच वाटावेत असे अनेक चेहरे वेगवेगळ्या वेबसीरिजच्या माध्यमातून समोर येत असतात. अनेकदा त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखाच त्यांची ओळख बनून जातात. याचे सर्वात उत्तम उदाहरण द्यायचे तर टीव्हीएफच्या ‘ट्रिपलिंग’मध्ये ‘चिंतवन’ची भूमिका साकारणाऱ्या अमोल पराशरला आजही अनेक जण ‘चिंतवन’ नावानेच ओळखतात. अमोलने याआधीच चित्रपट आणि जाहिरातींमधून काम करायला सुरुवात केली होती मात्र त्याला ओळख मिळवून दिली ती ट्रिपलिंगने.

अभिनेता असो किंवा अभिनेत्री वेबसीरिजचे अनेक विषय हे नवीन कलाकारांना वाव देणारे आणि त्यांना जनमानसात ओळख निर्माण करून देणारे ठरत आहेत. गेली काही वर्षे सातत्याने मराठी नाटक, चित्रपटांमधून आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशीलाही या व्यासपीठाने जगभरात लोकप्रिय केले आहे. म्हणजे जितेंद्रची ओळख मराठी लोकांना होतीच मात्र नेटफ्लिक्सवर आलेल्या ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘हवालदार काटेकर’च्या भूमिकेमुळे तो सध्या जगभरात पोहोचला आहे. त्याच्या ‘ट्विटर’ अकाऊ ण्टवरील चाहत्यांचे टिवट्स पाहून त्याच्या वाढलेल्या लोकप्रियतेचा अंदाज सहज बांधता येईल. अर्थात आता जितेंद्र मराठीमध्ये अनेक वर्षे काम करतोय, पण त्याला या वेबसीरिजने जगभरात पोहचवले. मात्र जितेंद्रसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबरोबर नवीन कलाकारांना हे वेबसीरिज प्रकरण महत्त्वाचे व्यासपीठ ठरले असून याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे चित्रपटसृष्टीला फायदाच होताना दिसत आहे.एक काळ होता जेव्हा दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून कलाकार मोठय़ा पडद्यावर येत असत. हा इतिहास अगदी शाहरुख खानपासून काही वर्षांपूर्वी आलेल्या सुशांत सिंग राजपूतपर्यंतचा आहे. यामध्ये अगदी विद्या बालन, आर. माधवन, राजीव खंडेलवाल, साक्षी तन्वर, प्राची देसाई, यामी गौतम अशा अनेक नावांचा समावेश होतो. त्यानंतर कल आला तो रिअ‍ॅलिटी शोमधून चित्रपटात झळकणाऱ्यांचा.. आयुषमान खुराना सारखा ‘रोडीज’मधून आलेला चेहरा असो किंवा ‘लाफ्टर चॅलेंज’मधून आलेला कपिल शर्मा असो. प्रत्येकाने इथे आपलं नाणं खणखणीत वाजवलं. या दोन्ही माध्यमांमधून चित्रपटात कलाकार येत आहेत, तरी आता चित्रपट क्षेत्राला भुरळ पडलीय ती नेटकऱ्यांनी वेबसीरिजच्या माध्यमातून घराघरात लोकप्रिय केलेल्या वेबस्टार्सची.

सुमित व्यास म्हणजे वेबसीरिजच्या जगतामधील सर्वात मोठय़ा नावांपैकी एक आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘परमनन्ट रूममेट्स’ या वेबसीरिजमधील ‘मिकेश चौधरी’च्या भूमिकेने सुमितला स्वत:ची ओळख मिळवून दिली. या वेबसीरिजआधी ‘इंग्लिश विंग्लिश’ आणि ‘औरंगजेब’मध्ये छोटय़ा भूमिका साकारणाऱ्या सुमितला आता मात्र ‘पार्च्ड’, ‘गोलू की गन’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘हायजॅक’ अशा चित्रपटांमधून भूमिका मिळाल्या आहेत. ‘परमनन्ट रूममेट्स’मधून आपल्या अभिनयाची चमक दाखवणाऱ्या निधी सिंगने त्यानंतर ‘ब्रिज मोहन अमर रहे’ आणि ‘दिल जंगली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ‘हॅपण्ड इन हाँगकाँग’मध्ये झळकत असलेली आहाना कुमरा ही आगामी ‘अ‍ॅक्सीडेन्टल प्राइम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटामध्ये दिसणार आहे. विकी कौशलचा भाऊ  आणि ‘ऑफिशियल चुक्यागिरी’ या वेबसीरिजमध्ये झळकलेल्या सनी कौशलने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण के ले आहे. तर ‘लव्ह यू जिंदगी’मध्ये आलिया भट्टच्या मैत्रिणीच्या भूमिकेत झळकलेली यशस्विनी दयामा ही वेबसीरिज पाहणाऱ्यांसाठी ओळखीचा चेहरा आहे. ती झोया अख्तरच्या आमागी ‘मेड इन हेवन्स’मधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ट्रिपलिंग्स’मध्ये चंचल ही बहिणीची भूमिका साकारणारी मानवी गागरू पीकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटली. टीव्हीएफच्याच ‘पिचर्स’मध्ये झळकलेला नवीन कस्तुरीयासारखा चेहरा वेबसीरिजमुळे जगासमोर आला. २०१५ साली आलेल्या ‘पिचर्स’आधी नवीनने काही चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. ‘पिचर्स’मध्येच ‘मंडल’च्या भूमिकेत दिसलेला अभय महाजनही लवकरच मराठी सिनेमातून मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे. सोनाक्षी सिन्हाचा बेस्ट फ्रेण्ड म्हणून ‘नूर’ चित्रपटात दिसलेला कनन गिलसुद्धा इंटरनेट सेलेब्रिटीच आहे. या सर्व नावांबरोबरच अंगीरा धार (‘बँड बाजा बारात’, ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’), सपना पाबी (‘द रियुनियन’), वीर राजवंत सिंग (‘वॉट द फोक्स’, ‘द रियुनियन’) नवीन पॉलीशेट्टी (‘एआयबी’) यातलेही काही चेहरे चित्रपटांमध्ये झळकले आहेत तर काही त्या मार्गावर आहेत.

हे सर्व चेहरे अगदी सर्वसामान्यांप्रमाणे दिसणारे आहेत. त्यांच्या पडद्यावरच्या भूमिकांशी आपण सहज जोडले जातो कारण ते आपलाच मित्र, भाऊ, मैत्रीण असावी असे वाटतात. त्यांच्यात तथाकथित स्टार हिरोप्रमाणे कुठलेही ग्लॅमरस गुण नसले तरी वेबसीरिजमुळे त्यांना मिळणारी लोकप्रियता ही स्टार्सपेक्षा कमी नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. त्यात हे कलाकार पडद्यावर अगदी सहजतेने वावरताना दिसतात. त्याबरोबर त्यांचे अभिनयकौशल्य आणि कथा यामुळे वेबसीरिजच्या माध्यमातून पुढे आलेले हे चेहरे भविष्यात अनेक बडय़ा भूमिकांमध्ये दिसल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.

मराठी कलाकारही जोमात..

या वेबसीरिजमधून चित्रपटात जाण्याच्या ट्रेण्डमध्ये काही मराठी नावेही आहेत. त्यात प्रामुख्याने मिथिला पालकरचे नाव घेता येईल. जरी ‘कट्टीबट्टी’मधून मिथिलाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले असले तरी २०१६ साली आलेल्या ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसीरिजच्या यशानंतरच तिने ‘मुरांबा’सारख्या मराठी तर ‘कारवाँ’सारखा मोठय़ा चित्रपटांमध्ये झळकली. निपुण धर्माधिकारी हा चेहराही असाच. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘नौटंकी साला’सारख्या चित्रपटांमधून त्याने छोटय़ा भूमिका केल्या होत्या. मात्र निपुणला खरी ओळख मिळाली ती ‘भाडिपा’च्या ‘कास्टिंग काऊच’मुळे. त्यानंतर निपुण ‘हायजॅक’ आणि ‘कारवाँ’सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून झळकला. निपुणचा जोडीदार अमेय वाघ हाही अशा प्रकारे एकाच वेळी वेबसीरिज आणि चित्रपटांमधून दिसणारा चेहरा आहे. तर ‘भाडिपा’चाच सारंग साठय़े टीव्हीएफ ‘ट्रिपलिंग’मध्ये जुगाडूच्या भूमिकेत दिसला होता. सारंगने ‘उबंटू’, ‘नटसम्राट’, ‘हाय जॅक’ आणि ‘कारवाँ’ या चित्रपटांत काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 12:33 am

Web Title: article about new upcoming actor in industry
Next Stories
1 # MeToo : साजिद आऊट, फरहाद सामजी करणार ‘हाऊसफुल ४’ दिग्दर्शन
2 नाना पाटेकरांची नार्को चाचणी करा, तनुश्री दत्ताचा पोलिसांकडे अर्ज
3 # MeToo : ऑडीशनच्या नावाखाली साजिदने कपडे उतरवायला लावले – सिमरन कौर
Just Now!
X