स्वप्निल घंगाळे

मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये आणि वेबसीरिजमध्ये दिसण्याचे प्रमाण वाढले आहे. हा जसा अनोखा मिलाफ आहे तसेच सध्या ते रंगभूमीवरही तितक्याच ताकदीने वावरताना दिसतायेत. मात्र सध्या हे नावाजलेले कलाकार ज्या नाटकांमध्ये काम करतायेत त्या नाटकांची नावे हा सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. मराठी नाटकांमध्ये सहसा अन्य भाषेचा सहजी मिलाफ पाहायला मिळत नाही, पण रंगमंचावरचा हा भाषिक मिलाफ संहितेत नसून नावांमध्ये पाहायला मिळतो आहे. तुम्ही सहज मराठी नाटकाच्या जाहिरातींच्या पानांवर नजर टाकली तर इंग्रजी नावे असणाऱ्या मराठी नाटकांची संख्या जास्त दिसेल. नाटकांच्या नावावरील इंग्रजीच्या आक्रमणावर टाकलेली नजर..

आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये आपण अनेक इंग्रजी शब्द वापरतो. म्हणजे अनेक शब्दांसाठी आपण बोलताना पर्यायी मराठी शब्दांचा विचारच करत नाही. त्यामुळे आपण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये इंग्रजीमिश्रित मराठी बोलतो. या भाषेला ‘मिंग्लिश’ (म्हणजेच मराठी आणि इंग्रजीचा समावेश असलेली भाषा) असंही म्हटलं जातं. आता हाच मिंग्लिशचा फिव्हर मराठी नाटकांवरही चढलेला दिसून येतो आहे. मागील काही महिन्यांमध्ये रंगभूमीवर आलेल्या नाटकांच्या नावावर नजर टाकली तर इंग्रजी नावे असणाऱ्या नाटकांची यादी मोठीच तयार होईल, इतके इंग्रजी शब्दांचे आक्रमण वाढले आहे.

सध्या रंगभूमी गाजवत असलेली ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ (लेखिका- कल्याणी पाठारे), ‘व्हाय सो गंभीर?’ (लेखक- गिरीश दातार), अनेक वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर पुन्हा अभिनेता म्हणून सतीश राजवाडे ज्या नाटकात दिसतायेत ते ‘अ परफेक्ट मर्डर’ (लेखक- नीरज शिरवईकर), ‘एपिक गडबड’ (लेखक- मकरंद देशपांडे), ‘हॅम्लेट’, ‘गलती से मिस्टेक’ (लेखक- वैभव परब) या नाटकांची नावे इंग्रजाळलेलीच आहेत. याशिवाय मराठी रंगभूमीवर बऱ्याच काळानंतर अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांची जोडी ज्या नाटाकात दिसणार आहे ते ‘व्हॅक्यूम क्लीनर’ हे नाटकही यापैकीच एक. चिन्मय मांडलेकर लिखित नाटकाची सोशल मीडियावर जाहिरात करतानाही ‘ऑनलाइन मागवलाय नव्या वर्षांत येतोय’ असं हटके मिंग्लीश भाषेत प्रमोशन करण्यात आलं होतं. याशिवाय प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी वर्षां उसगावकर आणि किशोरी शहाणे या जोडीचे ‘पियानो फॉर सेल’ (मूळ लेखिका- मेहर पेस्तोनजी, मराठी रूपांतर- आशीष कुलकर्णी), ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस लांडगे’ (लेखक- सुरेश जयराम), ‘ऑपरेशन जटायू’ (लेखक- दिग्पाल लांजेकर), ‘वन्स मोअर’ (मूळ गुजराती लेखिका- स्नेहा देसाई, रूपांतर- निपुण धर्माधिकारी) या नाटकांच्या नावातही इंग्रजी शब्दांचाच प्रभाव दिसून येतो आहे.

अशाप्रकारे मराठी नाटकांच्या नावांमध्ये इंग्रजी शब्द वापरण्याची ही काही पाहिलीच वेळ नाही. मात्र आता या इंग्रजी शब्दांचा दबदबा अंमळ वाढताना दिसतो आहे हे मात्र नक्की. याआधीही इंग्रजी नावे असलेल्या नाटकांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अगदी ‘सखाराम बाइंडर’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’पासून ते ‘ऑल द बेस्ट’पर्यंत इंग्रजी शब्द असणारी मराठी नाटके रंगमंचावर चांगलीच गाजली. मात्र आता इंग्रजी शब्द असणाऱ्या नाटकांचे प्रमाण मागील वर्षभरामध्ये वाढलेले दिसते. मागील एक-दीड वर्षांच्या कालावधीमध्ये रंगभूमीवर आलेल्या अशा इंग्रजी नावांच्या नाटकांची यादी करायची झाल्यास ‘ऑल दि बेस्ट २‘, ‘चॅलेंज’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’, ‘दोन स्पेशल’, ‘यु-टर्न’, ‘वेलकम जिंदगी’ या नाटकांची नावे घेता येतील.

इंग्रजी नावं कशाला?

आता इतक्या सगळ्या नाटकांना इंग्रजी नावे का देण्यात येत आहेत किंवा अशाप्रकारे इंग्रजीचा प्रभाव नाटकांच्या नावांमध्ये का वाढलेला दिसतो आहे, असे प्रश्न उपस्थित केल्यास त्याला अनेक कारणं उत्तरं म्हणून समोर येतात. पहिलं कारण म्हणजे नाटकाचं नाव हटके असेल तर प्रेक्षक नाटकाकडे आपोआपच आकर्षित होतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे नाटकाचा विषय हलकाफुलका असेल तर उगाच क्लिष्ट नावं देण्याऐवजी प्रेक्षकांना आपलेसे वाटणारे आणि रोजच्याबोली भाषेतील शब्दांचा वापर करून नाव देणे सोयीस्कर ठरते. त्यामुळे नाव जरी इंग्रजीत असले तरी नाटकाच्या विषयाचा आणि आशयाचा अंदाज सहज बांधता येतो आणि प्रेक्षकांचा गोंधळ होत नाही.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकांचे विषय. या इंग्रजी नावं असणाऱ्या नाटकांचे विषय पाहिलेत तर ते एकदम ‘मॉडर्न’ असतात.

वरीलपैकी कोणतंही नाटक घ्या त्यामधील विषय हे त्या काळातील म्हणजेच समकालीन विषय असल्यामुळे ते आधुनिक भाषा वापरूनच प्रेक्षकांसमोर मांडले गेले पाहिजेत, असा मुद्दा नाटय़कर्मी मांडतात. ‘अगदी शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकापासून ते ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ या सगळ्याच नाटकांच्या बाबतीत त्या त्या काळातील विषय मांडणारी ही नाटके असल्याने साहजिकच नावातून विषय चटकन पोहोचेल असाच प्रयत्न करण्यात आला आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर नुकतेच आलेले ‘व्हाय सो गंभीर?’ या नाटकातील कुटुंबाचे आडनाव गंभीर असल्याने नाटकाच्या नावात सीरियसऐवजी गंभीर शब्द वापरण्यात आला आहे. अर्थात ही नावातली गंमत तुम्हाला नाटक पूर्ण पाहिल्याशिवाय कळत नाही. पण नावामुळे प्रेक्षक नाटकापर्यंत पोहोचतो हेही तितकंच खरं आहे. काही नावं ही नाटकाच्या विषयाबद्दल चर्चा सुरू व्हावी याही हेतूने दिली जातात. उदाहरणार्थ ‘दादा, एक गुड न्यूज आहे’ मधून ही भावा-बहिणीच्या नात्यांची गोष्ट आहे हे लक्षात येतं, तर ‘गलती से मिस्टेक’ हे विनोदी नाटक असल्याचा अंदाज त्याच्या नावावरून सहज बांधता येतो. त्याशिवाय ‘ऑपरेशन जटायू’ हे नाटक लष्कराशी संबंधित असल्याचेही नावावरूनच समजते.

त्यामुळे नाटकांची नावं ही इंग्रजी आहेत की मराठी आहेत यापेक्षाही ते विषयाबद्दल बोलकं असावं असा त्यामागचा तर्क असल्याचे नाटय़कर्मीशी साधलेल्या संवादातून लक्षात येतं. हा कल पाहता भविष्यामध्येही अशाच नावांची नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नाटक हे वर्तमान परिस्थितीमध्ये डोकावण्यास भाग पाडतं आणि वर्तमानात आपण मराठी किंवा इंग्रजी वापरण्यापेक्षा ‘मिंग्लिश’च जास्त वापरतोय हेही तितकचे खरे!