रुपेरी पडद्यावर एखादी चरित्र भूमिका रंगवायची तर कलाकारांचा कस लागतो. ज्याची व्यक्तिरेखा आपण रंगवतो आहोत ती हयात असेल तर कलाकारासमोरचे आव्हान आणखी मोठे असते. त्या कलाकाराच्या लुकपासून, त्याची देहबोली, त्याचे प्रत्यक्ष बोलणे-चालणे हे सगळे हुबेहूब त्याप्रमाणे आहे की नाही, याची प्रेक्षकाच्या चष्म्यातून काटेकोर तपासणी होत असते. त्यातही जर ती भूमिका एखाद्या राजकीय व्यक्तीची असेल तर..

सध्या हिंदी-मराठी चित्रपटांत चरित्रपटांची एकच लाट आली आहे. त्यातही लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर असल्याने एकीकडे राजकीय पटांनाही एकच उधाण आले असताना अनेक बॉलीवूड कलाकार राजकारण्यांच्या भूमिकांत दिसताहेत. किंबहुना एकाच नेत्याची भूमिका वेगवेगळ्या चित्रपटांत वेगवेगळे कलाकार साकारताना दिसताहेत. त्यामुळे सध्या कोणता कलाकार  त्या नेत्याच्या भूमिकेत चपखल बसला आहे, कोणता नाही, अशा चर्चा सगळीकडे रंगताना दिसताहेत.

‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ आणि ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आणि कलाकारांनी साकारलेल्या अशा अनेक राजकीय व्यक्ती पडद्यावर पाहायला मिळाल्या. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणून काम पाहिलेल्या संजय बारू यांच्या ‘अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला असल्याने साहजिकच मनमोहन सिंग, राहुल गांधी, सोनिया गांधी अशा अनेक व्यक्तिरेखा पडद्यावर दिसणार होत्या. मनमोहन सिंग यांची भूमिका अभिनेता अनुपम खेर यांनी केली आहे. मनमोहन सिंग यांच्या लुकपासून त्यांची हळुवार बोलण्याची ढब अशा अनेक बारीकसारीक गोष्टी अनुपम खेर यांनी अचूक पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ हा रूढार्थाने चरित्रपट नाही, पण सर्जिकल स्ट्राइकची घटनाच मुळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाडसी निर्णयामुळे ओळखली जाते. या चित्रपटात त्यांची भूमिका अभिनेता रजित कपूर यांनी केली आहे. या चित्रपटापाठोपाठच नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटाची घोषणा झाली. यात मोदींची भूमिका अभिनेता विवेक ओबेरॉय करणार आहे. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांचे आहे. मोदींची भूमिका विवेक ओबेरॉय करणार हे आधी सांगितलं असतं तर त्यावर विश्वास ठेवणं जड गेलं असतं. मात्र मोदींसारखा त्याचा लुक तयार करून मग त्याची पोस्टर्स सगळीकडे झळकली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही. काही काही कलाकार अचूकपणे त्या भूमिकांमध्ये फिट बसतात. यात अर्थात रंगभूषाकारांची भूमिका महत्त्वाची ठरते. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेत अनुपम खेर आणि मोदींच्या व्यक्तिरेखेत विवेक ओबेरॉय अगदी चपखल बसले आहेत. याआधीही अशा काही राजकारणी व्यक्तिरेखा त्या त्या कलाकारांमुळे लोकांच्या लक्षात राहिल्या. अशा चित्रपटांचा विचार करायचा झाला तर ‘गांधी’ चित्रपटाशिवाय त्याची सुरुवात करता येत नाही.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या रिचर्ड अटेनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ चित्रपटात बेन किंग्जले यांनी महात्मा गांधींची भूमिका केली होती. आजवर गांधींची भूमिका म्हटली की या चित्रपटातील बेन यांचाच चेहरा नजरेसमोर येतो. त्यानंतर चरित्रपटातून नाही पण राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली गांधीजींची भूमिकाही लोकांना आवडली. त्याआधी अन्नू कपूर यांनीही गांधींची भूमिका केली होती, मात्र तरीही प्रभाव राहिला तो बेन किंग्जले यांच्या भूमिकेचाच. सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक व्यक्तिरेखा वेगवेगळ्या चित्रपटांमधून प्रेक्षकांनी पाहिल्या आहेत. परेश रावल यांनी १९९३ साली केतन मेहता दिग्दर्शित ‘सरदार द आयर्न मॅन’ या चित्रपटातून सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका केली होती. तोवर विनोदी, खलनायकी भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आलेल्या परेश रावल यांना सरदारांच्या भूमिकेत पाहणे ही प्रेक्षकांसाठीही पर्वणी होती. नजीकच्या काळात पंडित नेहरूंच्या भूमिकेत लक्षात राहिलेला चेहरा हा अभिनेता दिलीप ताहिल यांचा होता. त्याआधी नेहरूंची भूमिका बेंजामिन गिलानी यांनी चपखल केली होती. राकेश मेहरा यांच्या ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटात दिलीप ताहिल यांनी नेहरूंची भूमिका केली होती. आणि आता ‘भाई- व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या उत्तरार्धातही दिलीप ताहिल पुन्हा एकदा नेहरूंच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत.

‘ठाकरे’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होईल. या चित्रपटात पहिल्यांदाच बाळासाहेबांच्या भूमिकेत हिंदीत नावाजलेला कलाकार नवाजुद्दीन सिद्दीकी दिसणार आहे. बाळासाहेबांचा लुक, त्यांची देहबोली, संवादफेक सगळे हुबेहूब वठवण्यासाठी नवाजने खूप परिश्रम घेतले आहेत. बाळासाहेबांची भूमिका करणे हे अजिबात सोपे नव्हते असे नवाजुद्दीन म्हणतो. पण सबंध देशाचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या नेत्याची भूमिका साकारण्याची चालून आलेली संधी सोडणेही त्याच्यातील कलाकाराला शक्य नव्हते. त्यामुळेच त्याने ही भूमिका स्वीकारली. अर्थात, हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने मराठीत बाळासाहेबांसारखी प्रभावी संवादफेक जमली नाही तर चित्रपटावर परिणाम होईल म्हणून त्याने मराठीत आपला आवाज दिलेला नाही. योगायोग म्हणजे ‘भाई व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटातही बाळासाहेब ठाकरे यांचा संदर्भ असल्याने त्यांची छोटेखानी भूमिका दिसते. या चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका सारंग साठय़े या अभिनेत्याने केली आहे.

मधुर भांडारकर दिग्दर्शित ‘इंदु सरकार’ चित्रपटात दोन राजकीय व्यक्तिरेखांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. यात इंदिरा गांधींची भूमिका अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी केली होती. तर याच चित्रपटात संजय गांधींची भूमिका अभिनेता नील नितीन मुकेशने केली होती. मराठीत जब्बार पटेल दिग्दर्शित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटात बाबासाहेबांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता माम्मूटी यांनी केली होती. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील आणखी दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वं रुपेरी पडद्यावर दिसली. ‘यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची’ या चित्रपटातून महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांची भूमिका अभिनेता अशोक लोखंडे यांनी केली होती. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची भूमिका ‘तू महानायक वसंत तू’ या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर याने केली होती. या वर्षभरात आणखी काही कलाकारांना अशा राजकारणी व्यक्तिमत्त्वांच्या भूमिकेत पाहण्याची संधी मिळेल, यात शंका नाही.