सुहास जोशी

साधारण दहा एक वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये मुंबईचे गुन्हेगारी विश्व, गँगवॉर यातील सत्यकथांवर आधारित चित्रपटांचा एकापाठोपाठ एक रतीब घातला गेला. कथानकांचा बाज बहुतांशपणे एकसारखाच असायचा. काही तरी कारणाने एखादा तरुण गुन्हेगारी विश्वाकडे ओढला जाणे, नंतर त्याने एखाद्या गँगमध्ये वर्चस्व गाजवणे, मग अंतर्गत कुरबुरी, त्यातून निर्माण होणारे प्रसंग आणि दुसऱ्या गँगशी भिडणे. पोलीस, राजकारणी आणि गुन्हेगारी विश्वाचे साटेलोटे वगैरे नेहमीचे प्रसंग. नंतर याच पठडीतून जात या सत्यकथांवर आधारित चित्रपटांना उत्तरेतील गुन्हेगारी विश्वाचा आधार मिळाला. हरयाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथील गुन्हेगारी जगताच्या कथा पडद्यावर झळकू लागल्या. आज वेबसीरिजच्या पडद्यावर हेच सूत्र पुन्हा एकदा उगाळले जाताना दिसते आहे. ‘रंगबाज’ ही उत्तरेतील गुन्हेगारी विश्वावरील वेबसीरिज याच वाटेने जाणारी आहे. नावीन्यच म्हणायचे तर तुलनेने छोटे साम्राज्य असणारा पण स्वत:च्याच जोरावर बरीच मजल मारण्याची ताकद असणाऱ्या गुन्हेगाराची ही कथा आहे. त्याला जातीय समीकरणाची फोडणी मिळते हा आणखीन एक पैलू. तर हल्ली मुक्ततेच्या नावाखाली वेबसीरिजमधील अनावश्यक अशी अहिंसा आणि सेक्सचा वापर यात नाही ही जमेची बाजू. बाकी त्यातून फार काही नवीन पदरी पडत नाही.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील एका सज्जन शिक्षकाचा मुलगा शिवप्रकाश शुक्ला हा बहिणीची छेड काढल्याने एका गल्लीगुंडाशी नडतो आणि त्या गुंडाचा खून होतो. आपसूकच तेथील ब्राह्मण आमदार शिवप्रकाशला आपल्या पंखाखाली घेतो आणि पुढे जाऊ न शिवप्रकाश आमदारासाठी आणखीन खून करत सुटतो. पण त्याला असलेल्या महत्त्वाकांक्षेपायी तो अन्य राज्यांतील गुंडांशीदेखील संधान साधतो, त्यातून आणखीनच गुंता वाढत जातो. परिणामी जे व्हायचे तेच होते. पोलीस  शिवप्रकाशच्या मागावर लागतात. त्याला पकडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो वगैरे वगैरे.

कथेचा जीव इतकाच छोटा आहे. त्यापलीकडे कथा वाढूच शकत नाही. सीरिजकर्त्यांनी ती फारशी वाढवली देखील नाही हे सुदैवच म्हणावे लागेल. कथा मांडताना थोडेफार वेगळे प्रयत्न झाले आहेत. कथेची सुरुवात ही वर्तमानात होऊन नंतर फ्लॅशबॅकमधून भूतकाळ उलगडणे हा प्रकार तसा बरा वाटतो. पण कथेच्या मांडणीमध्ये हा प्रकार गेल्या काही सीरिजमध्ये अनेकांनी हाताळला आहे. त्यामुळे त्यात नावीन्य उरलेले नाही. मात्र वर्तमानकाळात होत असलेला पाठलाग उत्कंठा वाढवणारा आहे हे नक्की.

ही संपूर्ण कथा मागील शतकातल्या शेवटच्या दशकात घडलेली आहे. तो काळ उभा करण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. अशा वेळी मात्र काही बाबींकडे आवर्जून ध्यान द्यावे लागते. तसे लक्ष बऱ्याच ठिकाणी दिले आहे, पण काही ठिकाणी ते फसले देखील आहे. त्यावेळी मोबाइलचा अगदी नुकताच वापर सुरू झालेला होता. त्यामुळे त्याचे अप्रूप आणि त्यातील मर्यादा याचा उपयोग सीरिजकर्ते करताना दिसतात. पण त्याच्या वापरातील अमर्यादपणा, उपलब्धता या गोष्टी जरा अतिशोयक्तीकडे जाणाऱ्या वाटतात. सभेतील फ्लेक्सचा वापर हा देखील काळानुरूप दिसत नाही. असो, मनोरंजनात असे दोष काढण्यात अर्थ नसतो, पण काळानुरूप मांडणी गरजेची असते.

या वेबसीरिजमधून एका पैलूवर मात्र चांगलीच थेट मांडणी झाली आहे. ती म्हणजे राजकारण, गुन्हेगारी यातील ब्राह्मण आणि ठाकूर यांच्यातील वाद, ईर्षां. या मुद्दय़ावर तसे थेट भाष्य फारसे होत नसते. येथे मात्र अगदी थेटपणे ही गटबाजी, मतांचे राजकारण यातून अगदी उठून दिसते. उत्तरेतील काही राज्यांमध्ये आजही या मुद्दय़ांचे वर्चस्व टिकून आहे. ही मांडणी निश्चितच प्रभावी म्हणता येईल अशी आहे.

वेबसीरिजनी हिंदीत प्रवेश केल्यानंतर बहुतांश मालिकांचा कल हा गुन्हेगारी विश्वावरच राहिला आहे. त्याचा प्रभाव ‘झी ५’च्या मालिकेवरपण दिसून येतो आहे. यापलीकडे जात काही तरी वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न या नव्या माध्यमाने करायला हवा असे सतत जाणवत राहते. ‘रंगबाज’मुळे ते पुन्हा एकदा अधोरेखित होते इतकेच.

रंगबाज

सीझन – पहिला

ऑनलाइन अ‍ॅप – झी ५