News Flash

रिअ‍ॅलिटीचे वास्तव

रिअ‍ॅलिटी शो नावाचं पीक आपल्याकडे स्थिरावलं त्याला आता बराच कालावधी लोटला.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

रिअ‍ॅलिटी शो नावाचं पीक आपल्याकडे स्थिरावलं त्याला आता बराच कालावधी लोटला. हिंदी, मराठी आणि अन्य प्रादेशिक वाहिन्या मिळून अडीचशेपेक्षा जास्त वाहिन्यांवर संगीत, नृत्य, विनोद, अभिनय, साहस अशा वेगवेगळ्या संकल्पनांवरच्या रिअ‍ॅलिटी शोचा जल्लोष सुरू असतो. १९९३ साली ‘सॅनसुई अंताक्षरी’ आणि १९९५ मध्ये ‘सारेगमप’सारखे गाण्यांवरचे रिअ‍ॅलिटी शो आले. मात्र २००४ साली अमेरिकन आयडॉलच्या धर्तीवर ‘इंडियन आयडॉल’ आलं आणि रिअ‍ॅलिटी शोची समीकरणं बदलत गेली. त्या वेळी विजेता निवडताना पक्षपातीपणा केला जातो आहे इथपासून ते लहान मुलांना शोचा येणारा ताण याबद्दल अनेक वादविवाद झाले. मात्र आज आंतरराष्ट्रीय फॉर्मेटवरच्या शोपासून ते खास इथे बनवलेल्या शोपर्यंत सगळे रिअ‍ॅलिटी शो सुखाने नांदतायेत. हिंदी, मराठीसह प्रादेशिक वाहिन्यांवरही डान्स इंडिया डान्स, डान्स प्लस, सुपर डान्सर, मॅड ते द कपिल शर्मा शोसारखे वेगवेगळ्या शोच्या संकल्पनांपासून सादरीकरणापर्यंत सगळी जबाबदारी सांभाळणाऱ्या हेमंत रुपरेल आणि रणजित ठाकूर यांच्या मते रिअ‍ॅलिटी शो हे सर्वसामान्यांना प्रेरणा देणारं, त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारं माध्यम असल्याने त्याची लोकप्रियता वाढतच चालली आहे.

टेलीव्हिजन इंडस्ट्रीत कामाचा अनुभव घेतल्यानंतर हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर या जोडगोळीने फ्रेम्स प्रॉडक्शन ही स्वत:ची कंपनी सुरू केली. हिंदीत सध्या सुरू असलेले बरेचसे नृत्य, संगीत आणि विनोदी रिअ‍ॅलिटी शोज हे फ्रेम्स प्रॉडक्शनचे आहेत. ‘डान्स इंडिया डान्स’ हा आमचा पहिला रिअ‍ॅलिटी शो होता. मुळात देशभरातील टॅलेंट शोधणं हे आमचं मुख्य काम आहे. शोजच्या बाबतीत सांगायचं तर वेगवेगळ्या संकल्पनांवरचे रिअ‍ॅलिटी शो डिझाईन करण्यापासून, त्याचा फॉर्मेट बनवणं, वाहिनीला देणं, मग परीक्षक – सूत्रसंचालक यांची निवड, सेट तयार करणं ते प्रत्यक्ष शो टीव्हीवर सादर होईपर्यंतची प्रत्येक जबाबदारी ही आमची असते, असं हेमंत सांगतो. आपल्याकडे रिअ‍ॅलिटी शो हे आजही सेलेब्रिटींवर अवलंबून आहेत. त्यामुळे शोमधल्या स्पर्धकांमध्ये कितीही गुणवत्ता असली तरी त्याचे परीक्षक कोण, हे बघून प्रेक्षक शो पाहायचा की नाही हे ठरवतात. त्यामुळे पहिला प्रोमोही टीव्हीवर परीक्षकांचाच जातो, अशी माहिती हेमंतने दिली. सध्या टेलीव्हिजनवर अनेक शोज सुरू आहेत आणि तरीही या प्रत्येक शोला चांगला टीआरपी आहे. यामागचं कारण स्पष्ट करताना रिअ‍ॅलिटी शोजमधून सर्वसामान्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांच्या प्रेरणादायी कथा लोकांसमोर येतात. सेलेब्रिटींचा वावर शोमध्ये महत्त्वाचा असला तरी त्यांच्या कथा प्रेक्षकांना रुचत नाहीत. मात्र गावातून आलेला एखादा तरुण जेव्हा गायक किंवा नर्तक बनण्यासाठी जे प्रयत्न करतोय ते लोकांना दिसतं तेव्हा ते सहज त्याच्याशी जोडले जातात. हा करू शकतो, मग मीही करू शकेन, हा एक विश्वास त्यांना मिळतो. मुंबई-पुण्याबाहेर अनेकांसाठी एक तर टीव्हीवर येणं ही एक मोठी गोष्ट या शोमधून साध्य होते. दुसरं म्हणजे इंडियन आयडॉलचा विजेता गायक किंवा सारेगमपचा विजेता हा लौकिक त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे एक तर प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि प्रेरणादायी कथा या दोन्हीमुळे रिअ‍ॅलिटी शो लोकांना जास्त भावतात, असे मत रणजीतने व्यक्त केले. अनेकदा रिअ‍ॅलिटी शोजची प्रक्रिया ही सगळी आधीच ठरवलेली असते, असा आरोप होतो. मात्र शोचा फॉर्मेट निश्चित असतो, त्यात जे घडतं ती प्रत्येक गोष्ट ठरवून केली जात नाही, असं दोघंही ठामपणे सांगतात. शोमधून काय नेमकं प्रेक्षकांसमोर ठेवायचं आहे याचा विचार आम्ही केलेला असतो. अमुक एक स्पर्धक असेल, त्याची काही भावनिक गोष्ट असेल तर ती लोकांसमोर आणणं, त्याच्या आईवडिलांना त्याच्यासमोर उभं करणं या गोष्टी जाणीवपूर्वक शोमध्ये केल्या जातात. मात्र त्यानंतर जे घडतं ते लिहिलेलं कसं असू शकेल, असा सवाल हेमंत करतो. या शोमध्ये येणारे स्पर्धक हे काही अभिनेता-अभिनेत्री नाहीत. त्यामुळे त्यांना संवाद लिहून देऊच शकत नाही. या शोमधली सगळ्यात किचकट प्रक्रिया ही त्यातलं नाटय़ कसं काढायचं, याचीच असते, असं हेमंत सांगतो, तर एकदा आज शोमध्ये काय दाखवायचं आहे हे ठरल्यावर चित्रीकरणाची जी प्रक्रिया असते ती सगळ्यात सोपी असते, असं रणजीत म्हणतो.

रिअ‍ॅलिटी शोज कधी फसतात, असा प्रश्न विचारल्यावर एक तर शोच्या मूळ संकल्पनेत न बसणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या तर तो फसू शकतो, असं हेमंत म्हणतो. परीक्षकांच्या बाबतीत ही गोष्ट प्रामुख्याने घडते. तुम्ही गाण्याचा शो असेल तर त्यात कुशल असलेली व्यक्तीच परीक्षक म्हणून बसवायला हवी. मग तो चेहरा सेलेब्रिटी नसला तरी प्रेक्षक स्वीकारतात. आम्ही रेमो डिसूझाला परीक्षक केलं तेव्हा लोक त्याला फारसे ओळखत नव्हते; पण त्याचं नृत्यकौशल्य वादातीत होतं. तेच नंतर धर्मेश येलांडेच्या बाबतीत झालं. आम्ही त्याची निवड मॅडसाठी केली होती. मॅडमध्ये तो चांगला बोलतोय हे लक्षात आल्यानंतर डान्स प्लसमध्ये परीक्षक म्हणून आणलं. त्यालाही लोकांनी प्रतिसाद दिला. चुकीचा माणूस परीक्षक म्हणून निवडल्याने शो फसला आहे याची कित्येक उदाहरणे आहेत. त्याचं अगदी जवळचं उदाहरण हे चेतन भगतला ‘नच बलिए’चा परीक्षक म्हणून नेमल्यामुळे जी टीका झाली ते सांगता येईल, असं हेमंत म्हणतो. प्रेक्षक खूप बारकाईने शो बघतात. त्यांना परीक्षक पटले नाही तर ते संपूर्ण शो पाडतात, असं रणजीतने सांगितलं.

टेलीव्हिजनचा प्रेक्षक हे अजब मिश्रण आहे आणि त्याची आवडनिवड, मतं समजून घेत शो सांभाळणं ही या शोच्या कर्त्यांसाठी तारेवरची कसरत असते, असं दोघंही आवर्जून सांगतात. प्रेक्षकांचं खूप बारीक लक्ष असतं. एकदा परीक्षकाने अमुक एका कोटावर याच रंगाचा बो का लावला आहे, म्हणून टीका झाली होती, तर एकदा रेमोने ब्लेझर उठून दिसण्यासाठी काहीएक पक्ष्याचं प्रतीक लावलं होतं. ते पाहिल्यानंतर निवृत्त सेना अधिकोऱ्याने ते प्रतीक अमुक एका पदावर पोहोचलेल्या सेना अधिकाऱ्यालाच लावण्याचा मान आहे. तुम्ही त्याचा वापर कसा केला, अशी तक्रार करत स्टार प्लस वाहिनीवर दावा ठोकला. त्या वेळी व्हीएफएक्स करून रेमोच्या ब्लेझरवर दिसणारं ते प्रतीक काढून टाकावं लागलं होतं. असे अनेक प्रसंग वेळोवेळी शिकवून जातात, असं रणजीत हसत हसत सांगतो. रिअ‍ॅलिटी शोजचे सेट घडवतानाही अनेक गोष्टी होतात. कधीकधी एका रात्रीत सेट उभा करावा लागतो, मात्र अशा वेळी टीमवर्क खूप महत्त्वाचं ठरतं असल्याचं हेमंत सांगतो. सध्या बिग बॉस, इंडियन आयडॉल असे काही मोजके आंतरराष्ट्रीय शो सोडले तर अनेक शो हे आपल्या देशात बनवले गेलेले आहेत. मात्र या शोजचे बौद्धिक संपदा हक्क (आयपी) शोच्या कर्त्यांना आपल्याकडे ठेवता येत नसल्याने हे शोमागचे चेहरे कायम लाइमलाइटच्या मागे राहतात, असे या दोघांनी सांगितले. सध्या ही जोडी रिअ‍ॅलिटी शोबरोबरच मराठी चित्रपटनिर्मिती आणि टेलीव्हिजनवरच्या फिक्शन शो निर्मितीकडे वळली आहे. डिजिटल किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मचे वेड अजून तरी रिअ‍ॅलिटी शोमध्ये शिरलेलं नाही. त्यामुळे टीव्ही आणि रिअ‍ॅलिटी शोचं हे समीकरणच सध्या महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

बौद्धिक संपदा हक्क मिळवण्याचे आव्हान

आंतरराष्ट्रीय शोजच्या फॉर्मेटचे बौद्धिक संपदा हक्क (आयपी) हे त्या शो बनवणाऱ्या कंपन्यांकडेच असतात. त्यामुळे वर्षांनुवर्षे ती कंपनी हे शो करू शकते. आपल्याकडे मात्र शो वाहिनीकडे गेल्यावर त्याचे हक्कही त्यांना द्यावे लागतात. त्यामुळे तुम्ही शो बनवला तरी दुसऱ्या सीझनला तो वाहिनीला आणखी कोणाला द्यावा लागला तर त्यात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, अशी माहिती हेमंतने दिली. आयपीची ही प्रक्रिया गेली वीस वर्षे इंडस्ट्रीत स्थिरावलेली असल्याने हे हक्क कोणाकडे असावेत, त्याचा फायदा काय-तोटा काय, ही प्रक्रिया समजून घेऊन मुळातून बदलणं हेच सध्या आव्हान असल्याचं रणजीत ठाकूर यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2018 12:31 am

Web Title: article about reality shows reality
Next Stories
1 ‘तरण्यासाठी वेगळं करण्याची तयारी हवी’
2 ‘अशी ही बनवाबनवी’ची तिशी ..
3 गवसेन मी नव्याने!
Just Now!
X