सुहास जोशी

वेब सीरिज हा प्रकार भारतात रुजू लागला तेव्हा अगदी एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच सीरिज काहीतरी वेगळं मांडताना दिसू लागल्या. तर काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म केवळ टीव्हीवरच्या त्याच त्याच रटाळ मालिकांचे वेब रूपांतरण करू लागले. नवं काही तरी मांडण्याचा नादात अनेकांनी तर अगदी मूलभूत बाबींना हरताळ फासून केवळ सेन्सॉरशिप नाही याचाच फायदा उचलायला सुरुवात केली. या सर्वामध्ये मराठी वेबसीरिज हा प्रकार तसा अगदीच प्राथमिक आणि मर्यादित पातळीवर होता. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डेट विथ सई’ या झी ५ वरील वेबसीरिजमुळे मराठीत काहीतरी चाकोरीबाहेरचं घडू शकेल याबद्दल आश्वासक वातावरण निर्माण केले आहे. डेट विथ सई ही निर्मिती अगदी थोर, महान, क्रांतिकारी वगैरे वर्गवारीत मोडणारी नसली तरी पठडीबाहेरचा एक चांगला प्रयोग म्हणून त्याची दखल नक्कीच घ्यायला हवी.

तसा या कथेचा जीव अगदीच छोटा आहे. पूर्ण लांबीच्या चित्रपटाचे कथानक एखाद तासभराने वाढवावे इतपतच. कथानकात सई ताम्हणकर सई ताम्हणकरचीच भूमिका करते. तिचे अपहरण होते. अपहरणकर्ता हा तिच्या नजीकच्या भूतकाळातील चांगलाच ओळखीचा असतो. त्याला तिच्याबरोबर एक चित्रपट करायचा असतो, पण त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे तो वेगळाच मार्ग अवलंबतो. तो सईच्या आयुष्यात नाव बदलून, सिंगापूर येथील बँकर म्हणून शिरकाव करतो. त्याचवेळी तो तिच्या आयुष्यातील सर्व प्रसंग छुप्या कॅमेऱ्याने, मोबाईलवर चित्रित करत राहतो. हे सर्व चित्रिकरण म्हणजे त्याच्या नाकारल्या गेलेल्या चित्रपटातील प्रसंगच असतात. पण हे उद्योग म्हणजे केवळ चित्रपट तयार करण्याची आस वगैरे प्रकारातील नसून त्यामागे एक विकृतपणादेखील असतो. त्यामुळेच त्याचे बिंग फुटते. जे सईलादेखील माहीत असते. मालिकेच्या पहिल्या दोन भागांतच हे सर्व स्पष्ट होते. तिच्या अपहरणानंतर अपहरणकर्त्यांच्या चित्रपटाची कथा, त्या दोघांमधील नजीकच्या भूतकाळातील प्रसंग आणि मालिकेची वर्तमानातील कथा असा एकत्रित प्रवास सुरू होतो. त्याचा अंत नेमका कसा होतो हे जाणून घ्यायला मालिका पाहावी लागेल.

गोष्ट सांगण्याची पद्धत हे या वेबसीरिजचे बलस्थान आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ याची सतत सांगड घालत कथानक पुढे सरकत राहते. त्यामुळे प्रत्येक भागाच्या अखेरीस पुढे काय होणार याची उत्सुकता टिकून राहते. गोष्ट सांगण्याची पद्धत बऱ्यापैकी गुंतवून टाकणारी आहे. रहस्य दडवून ठेऊ न त्याचा शोध घेण्यापेक्षा सर्व रहस्यं सुरुवातीलाच उलगडून दाखवून देखील गोष्टीतील उत्सुकता टिकवून ठेवणे दिग्दर्शक ज्ञानेश झोटिंग यांना जमले आहे. पण कथेच्या खोलात जाण्याचा विचार सीरिजकर्ता करत नाही हे येथे नमूद करावे लागेल.

मनोविकृतांच्या चित्रविचित्र उद्योगांवर हॉलीवूडमध्ये अनेक चित्रपट सतत येत असतात. त्यातील विकृतपणा, त्यातून होणारी टोकाची हिंसा, खून या सर्वाचे अगदी परिणामकारक चित्रीकरण त्यात असतेच. पण मराठीत हा विषय थेटपणे आजपर्यंत मांडलेला नव्हता. खलनायकाची विकृती यापूर्वी मांडलेली दिसते, पण येथे नायक आणि खलनायक अशा दोन्ही व्यक्तिरेखा एकाच व्यक्तीकडे आहेत. असा घटनाक्रम मराठीत सहसा पाहायला मिळत नाही. तो या मालिकेत बऱ्याच अंशी पाहायला मिळतो. पण त्याचबरोबर त्याचा म्हणावा तसा सखोल परिणाम होत नाही, कारण गोष्टीचा जीव अगदीच मर्यादित आहे.

सई ताम्हणकर ही या मालिकेत सई ताम्हणकरच दिसते हे या वेबसीरिजचे महत्त्वाचे वैशिष्टय़. एरवी कोणतीतरी भूमिका पडद्यावर साकारण्यापेक्षा एका चित्रपट अभिनेत्रीचीच भूमिका स्वत:च्याच नावाने साकारताना ती दिसते. मालिकेतल्या चित्रपटाची मागणी वास्तववादी असल्यामुळे असेल, पण सई या मालिकेत बऱ्यापैकी प्रभाव टाकताना दिसते. नायक-खलनायक हे एकाच वेळी साकारणारा रोहित कोकाटे भूमिकेत जीव ओतायचा प्रयत्न करतो. दोन भूमिकांमधील बदल तो जरी चांगल्या प्रकारे हाताळत असला तरी सतत कुठेतरी काहीतरी कमी पडल्याची जाणीव त्याला पाहताना होत राहते. त्याने केलेला प्रयोग दखलपात्र आहे.

चित्रपट, मालिकांच्या कथेत वास्तववादी प्रश्न, वाद उपस्थित करण्यात फारसं हशील नसतं. पण पठडीबाहेर, चाकोरीबाहेर जाताना वास्तववादी शंका उपस्थित होणार नाहीत याची काळजी घेणे हे सीरिजकर्त्यांचे काम असते. याबाबतीत मात्र मालिकेत अनेक उणिवा ठळकपणे उठून दिसतात. त्या टाळल्या असत्या तर मालिका आणखीन प्रभावी झाली असती. त्याचबरोबर गोष्टीची पकड पहिल्यापासूनच मजबूत असणे गरजेचे असते, पण येथे ही पकड उत्तरार्धात अधिक चांगल्या प्रकारे जमून आली आहे.

झी ५ या वेबपोर्टलने गेल्या काही महिन्यांत वेगवेगळ्या भाषांमध्ये वेबसीरिजची निर्मिती सुरू केली आहे. काही प्रादेशिक भाषांमधील मालिका हिंदीत आणल्या आहेत. वेब पोर्टलवर ते जागतिक ब्रॅण्डचे स्पर्धक म्हणावे अशी निर्मिती करत नसले तरी ‘डेट विथ सई’सारख्या वेब सीरिजमुळे त्यांच्याकडून भविष्यात आणखीन अपेक्षा करायला हरकत नाही.

डेट विथ सई

ऑनलाइन अ‍ॅप – झी ५

सीझन – पहिला