भक्ती परब

छोटय़ा पडद्यावर येणाऱ्या नव्या मालिका आणि त्यामध्ये आठवडाभरात येणारी नवी वळणं यांची रंजक सफर म्हणजेच ‘चित्र’चाहूल. चैत्रचाहूल लागते तेव्हा वातावरण कसं मोहक आणि बहराचं असतं. तसंच वातावरण छोटय़ा पडद्यावर नेहमी पाहायला मिळतं. मालिकेत रोज नवी वळणं येत राहतात, एक मालिका बंद झाली तर त्याच जागी दुसरी तितक्याच उत्साहात दाखल होते. त्यामुळे छोटय़ा पडद्यावर येत्या आठवडय़ात काय घडणार आहे याची चाहूल घेणारं हे सदर..

*  सध्या मराठी वाहिन्यांवर एकूणच लग्नसराईचा मोसम आहे. त्यामुळे येत्या आठवडय़ात प्रामुख्याने तीच धामधूम पाहायला मिळणार आहे. विक्रांत सरंजामेंनी झेंडेंना सांगितलं होतं की, रणवीर-दीपिकापेक्षा एखाद्या भन्नाट जागी माझं आणि ईशाचं लग्न होणार. त्याप्रमाणे विक्रांत आणि ईशाचं लग्न लवकरच थाटामाटात पार पडणार आहे. मराठी प्रेक्षक सध्या मुलाकडचा आणि मुलीकडचा यांत विभागला गेला आहे. प्रेक्षकांचं हक्काचं मनोरंजनाचं ठिकाण असलेल्या या छोटय़ा पडद्यावर बरंच काही घडणार आहे, या आठवडय़ात. पण नेमकं काय घडणार आहे, त्यातलं काही मोजकं जाणून घेऊ  या.

*  सोनी मराठीवर अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचं दुसरं पर्व ७ जानेवारीपासून सुरू होतंय. ज्यात ज्येष्ठ दिग्दर्शक , अभिनेते महेश कोठारे मुख्य परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झालेल्या या वाहिनीने ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘जुळता जुळता जुळतंय की’, ‘भेटी लागी जिवा’ त्याचबरोबर ‘सुपर डान्सर्स’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’सारख्या कार्यक्रमांनी प्रेक्षकांना मनोरंजनाचं एक वेगळं दालन खुलं केलं.

*  स्टार प्लस वाहिनीवर तर आता प्रेमाचे वारे वाहणार आहेत. ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ ही मालिका वाहिनीवर प्रचंड गाजली होती. बरुण सोबती आणि सनाया इराणी यांच्या अफलातून केमिस्ट्रीला सहा र्वष झाली तरी प्रेक्षक विसरलेले नाहीत. ही मालिका आता स्टार प्लसवर ७ जानेवारीपासून संध्याकाळी ४ ते ५ या वेळात पुन्हा तासभर दाखवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. त्याचबरोबर २६ जानेवारीला आमिर खान दिग्दर्शित ‘रुबरू रोशनी’ नावाचा चित्रपटही स्टार प्लसच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. जोडीला ‘दिल तो हॅपी है जी’ ही मालिकासुद्धा लवकरच दाखल होणार आहे.

*  नेहमीच काही तरी भव्यदिव्य करण्यात मग्न असलेल्या कलर्स वाहिनीवर मोठा गाजावाजा करून सुरू झालेली ‘दास्तान- ए- मोहब्बत- सलीम-अनारकली’ ही मालिका अवघ्या तीन महिन्यांतच बंद होणार आहे. आधी या मालिकेची वेळ बदलली जाणार आहे, अशी खबर होती. त्यामुळे टीआरपीअभावी बंद करावी लागत असलेली ही मालिका ‘वूट’ या डिजिटल प्लॅटफॉर्मवर त्याच कलाकारांसहित रिलॉन्च करण्यात येणार असून त्याजागी ‘गठबंधन’ ही मालिका येणार आहे. या मालिकेत गुजराती पोलीस ऑफिसर मुलगी आणि मराठमोळा डोंबिवलीचा डॉन असलेला मुलगा अशी वेगळी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे.

*  गेले वर्षभर वाहिनीने ‘कुमकुम भाग्य’ आणि त्याच मालिकेवरून प्रेरित असलेली ‘कुंडली भाग्य’ या दोन मालिकांच्या जोरावर टीआरपीच्या स्पर्धेत टॉप ५ मध्ये झी टीव्हीने आपले स्थान कायम राखले होते. तरीही वाहिनीने आपला प्राइम एकदम कडक करण्यासाठी कंबर कसली असून ‘राजा बेटा’ नावाची मालिका वाहिनीवर दाखल होणार आहे.

*  सोनी टीव्हीवरही ‘कपिल शर्मा शो’ परत आल्यामुळे अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. शहरी प्रेक्षक, ऐतिहासिक आणि धार्मिक या गोष्टी ध्यानात घेऊ न वाहिनी सध्या मालिकांचे विषय ठरवते आहे. त्यात त्यांना यशही मिळतं आहे. ‘अँड टीव्ही’च्या ‘परफेक्ट पती’ मालिकेच्या बाबतीत मराठमोळ्या चाहत्यांसाठी धक्कादायक घटना अशी की, या मालिकेतून अभिनेत्री सायली संजीवने हिंदीत पदार्पण केलं खरं, पण आता तिला ही मालिका सोडावी लागणार असं दिसंतय. कारण सायलीला चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली आणि तिला आता काही महिने पूर्ण विश्रांती घेण्यास डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळे तिच्या जागी सना अमीन शेख ही अभिनेत्री येणार आहे. या अदलाबदलीसाठी मालिकेत खूपच रंजक वळण घेण्यात आलंय.

*  ‘झी युवा’वर ‘वर्तुळ’ मालिकेत जुई गडकरीच्या व्यक्तिरेखेत ‘ग्रहण’ मालिकेतील पल्लवी जोशीच्या भूमिकेचा अंश दिसतोय, अशी चर्चा आहे. तर ‘तू अशी जवळी रहा’ मालिकेत सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांची केमिस्ट्री सध्या चांगलीच रंगली आहे. ही मालिकाही वळण घेण्याच्या टप्प्यावर असून प्रोमोमधून याची झलक पाहायला मिळते आहे. राजवीरचं मनवावर ऊतू चाललेलं प्रेम आता खलनायकी वळण घेणार असं दिसतंय. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाली की त्याचा त्रास होतोच. तसंच काहीसं येत्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

*  दैनंदिन मालिकांमधून वेळ काढून वेगळं पाहावंस वाटलं तर एपिक वाहिनीवर ‘राजा रसोई और अंदाज अनोखा’चं दुसरं पर्व दाखल झालेलं आहे. त्याचबरोबर ‘द क्रिएटिव्ह इंडियन्स’, ‘रोडलेस ट्रॅव्हल’, ‘रेजिमेंट डायरीज’ या सीरिजही जरूर पाहण्यासारख्या आहेत.