भक्ती परब

चित्रपटगृहात एकत्र जाऊन मस्त आरामात खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्याऐवजी चित्रपट रसिक कुटुंबासह घरी चित्रपट पाहणे पसंत करू लागले आहेत. याचे परिणाम मोठय़ा प्रमाणावर दिसू लागले आहेत. एखादा चित्रपट पहिल्यांदा दूरचित्रवाणीवर लागल्यावर टीआरपीचे कसे विक्रम रचले जातात हे गेल्या दोन वर्षांतल्या बार्कच्या अहवालावरून दिसतं आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मचे आव्हान असूनही टीव्हीवर चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने ही प्रेक्षकसंख्या आपल्याकडे वळवण्यासाठी वाहिन्यांनीही कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांत हिंदी-मराठी वाहिन्यांवर लोकप्रिय चित्रपटांच्या वर्ल्ड टेलीव्हिजन प्रीमिअरची एकच गर्दी होऊ लागली आहे अगदी सप्टेंबरच्या या शेवटच्या आठवडय़ातही ही चित्रपट स्पर्धा वाहिन्यांवर बघायला मिळणार आहे.

Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

हिंदी चित्रपट दाखवणाऱ्या २५च्या आसपास वाहिन्या आहेत. त्यातही स्टार गोल्ड, झी सिनेमा, सोनी मॅक्स, अ‍ॅण्ड पिक्चर्स, रिश्ते सिनेप्लेक्स, यू टीव्ही मूव्हीज यांसारख्या चित्रपट वाहिन्यांवर नवे चित्रपट सर्वात आधी दाखवण्याची चुरस लागली आहे. त्याचबरोबर स्टार प्लस, कलर्स, झी सिनेमा अशा हिंदी मनोरंजन वाहिन्यांवरही नवे चित्रपट दाखवले जातात. त्याला इतर मालिकांपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या मिळते. तर मराठी प्रेक्षकांना झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह आणि झी टॉकीज या वाहिन्यांवर नवे चित्रपट पाहण्याची पर्वणी मिळते आहे.

याविषयी झी मराठीचे व्यवसाय प्रमुख नीलेश मयेकर म्हणाले, यामध्ये दोन गोष्टी आहेत. चित्रपट कुठल्या वाहिनीवर दाखवला जातो आहे. एखाद्या मोठय़ा वाहिनीवर चित्रपट लागला तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे तो चित्रपट गाजलेला आणि दर्जेदार असला पाहिजे. म्हणजे एखादा चित्रपट चांगला होता, तो चित्रपटगृहात बघायला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे बघायचा राहिला आहे, अशी भावना प्रेक्षकांच्या मनात असते. तेव्हा तो आता चुकवू नये, या भावनेने ते बघतात. त्यामुळे वाहिनी महत्त्वाची, त्याचबरोबर तो चित्रपट कुठला हेही महत्त्वाचे आहे. नवा चित्रपट पहिल्यांदा लागतो तेव्हा नेमका कसा प्रतिसाद असतो हे बार्कच्या अहवालानुसार पाहिले तर त्या चित्रपटामुळे वाहिन्यांच्या प्रेक्षकसंख्येत सातत्याने वाढ झालेलीच दिसून येते.

या वर्षी जानेवारी ते सप्टेंबरचा पहिला आठवडा पाहता बऱ्याच हिंदी चित्रपटांनी चांगली प्रेक्षकसंख्या मिळवली. ‘पॅडमॅन’, ‘सोनू के टीट्टू की स्वीटी’, ‘हिचकी’, ‘रेड’, ‘परमाणु’, ‘बाघी २’, ‘व्हीआयपी २’, ‘फास्टर फेणे’ या चित्रपटांना टीव्हीवर चांगलाच प्रतिसाद मिळाला. परंतु चांगले मराठी चित्रपट येऊनही ते वाहिन्यांवर पाहायला मिळत नाहीत, अशी मराठी प्रेक्षकांची तक्रार आहे. सोनी मराठीचे प्रमुख अजय भालवणकर म्हणाले की, सोनी मराठीने १०० चित्रपटांचे सॅटेलाईट हक्क विकत घेतले असून ते चित्रपट वाहिनीवर दाखवायला सुरुवात केली आहे. ‘शेंटीमेंटल’ हा चित्रपट दाखवून आम्ही प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या ५० वर्षीय चित्रपट कारकीर्दीचा सोहळा साजरा करणार आहोत. त्यामुळे आठवडाभर अशोक सराफ यांचे गाजलेले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळतील असे त्यांनी सांगितले.

अनेकदा लोकप्रिय चित्रपट कितीही जुने झाले तरी टीव्हीवर टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असतात, असे बार्कचा अहवाल सांगतो. ‘सूर्यवंशम’ चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाल्यापासून हक्काचा प्रेक्षकवर्ग टिकवून आहे. या वर्षी बार्कच्या २१व्या आठवडय़ाच्या टीआरपी आकडेवारीनुसार हिंदी चित्रपट वाहिन्यांमधील पहिल्या पाच चित्रपटांमध्ये तो पहिल्या क्रमांकावर होता, तर ग्रामीण भागातील चित्रपट वाहिन्यांच्या आकडेवारीनुसारही तो पहिल्या क्रमांकावर होता.

या वर्षी स्टार गोल्डने नवे चित्रपट दाखवण्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी करार केला आहे. स्टार इंडियाचे हिंदी चित्रपटांचे व्यवसायप्रमुख हेमल झवेरी यांनी हिंदी वाहिन्यांवर दाक्षिणात्य प्रेक्षकसंख्या मोठय़ा प्रमाणात असली तरी हिंदी चित्रपटांनाच जास्त प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. या वर्षीचे काही गाजलेले हिंदी चित्रपट आणि येत्या वर्षांतील काही हिंदी चित्रपट यांचे एकत्रित मिळून सॅटेलाईट हक्क विकत घेतले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मालिका या सवयीने पाहिल्या जातात तर चित्रपटासाठी खास वेळ काढून प्रेक्षक तो बघतात. चित्रपटादरम्यान दैनंदिन मालिकांचे प्रोमोज दाखवले जातात. त्यातून काही प्रेक्षक पुढे त्या वाहिनीवरील कार्यक्रम पाहण्यासाठी वळतात. नवा चित्रपट दाखवणे ही कुठल्याही वाहिनीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण त्यात प्रेक्षक वाहिनीकडे खेचून आणण्याची क्षमता असते. भालवणकर पुढे म्हणाले की, नवा चित्रपट दाखवताना त्यासोबत त्यातले कलाकार दिग्दर्शकांचे चित्रीकरणाचे अनुभवही जाहिराती दरम्यान सांगत असतात, हीसुद्धा प्रेक्षकांसाठी एक अनमोल भेट असते.

नीलेश मयेकर यांच्या मते चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क (अधिकार) वाहिनीने खूप आधीच विकत घेतलेले असतात. त्यामुळे तो कधी लावायचा, हाच प्रश्न असतो. त्याचबरोबर नवे चित्रपट जास्त पाहिले जातात यामागे आर्थिक गणिते आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, एखादा चित्रपट कागदावर असताना विकत घेतला तर तो वाहिनीला अत्यंत स्वस्तात मिळू शकतो, पण प्रदर्शित होऊन गाजल्यावर विकत घ्यायला गेलो तर स्वाभाविकच त्याची किंमत खूपच असते. त्यामुळे साहजिकच चित्रपट निवडीवर मर्यादा येतात. हे जसं वाहिनीचं गणित आहे तसं प्रेक्षकांचंही खर्चाचं गणित यामागे आहे. एका कुटुंबातील काही जण चित्रपटगृहात गेले, तर आज ते त्यांना परवडू शकत नाही. ३०० ते ५०० पर्यंत चित्रपटाचे तिकीट आहे. कुटुंबातील पाच-सहा लोक एकत्र गेले तरी अडीच-तीन हजार रुपये खर्च होतात. तिथे मग खाणे-पिणे आले. अगदीच नाही म्हटले तरी हजारापर्यंत जाते. एका सर्वसामान्य कुटुंबाला ५०० रुपये खर्च करावे लागतात. जो माणूस महिन्याला २०-२५ हजार कमावतो, तो चित्रपटातून तीन तासांचा आनंद मिळवण्यासाठी २५ टक्के कमाई त्याला घालवावी लागते. तेव्हा मग इथे कशाला, काही दिवसांनी दूरचित्रवाणीवर आला की पाहू, असा विचार करून बरेच प्रेक्षक थांबतात, असे मयेकर यांनी सांगितले.

एकंदरीत नवा चित्रपट दूरचित्रवाणीवर जास्तीत पाहिला जातो ही वाहिन्यांच्या दृष्टीने सुखावह बाब आहे. मात्र मराठी वाहिन्यांना अजूनही हे सुख मिळवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. मराठी चित्रपट वेगवेगळ्या भाषांमध्ये डब झाले तर त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यादृष्टीने सोनी मराठीचे प्रयत्न सुरू आहेत. चित्रपट वाहिन्यांवर सर्वात जास्त चित्रपट पाहिले जातात याची आकडेवारी चित्रपटगृहात पाहिल्या जाणाऱ्या प्रेक्षकसंख्येच्या तिप्पट आहे. त्यामुळे छोटा पडदाच मोठा झाला असून त्याने चित्रपटगृहालाच आपल्यात सामावून घेतले आहे, असे दिग्दर्शक निखिल अडवाणी म्हणाले.

बॉलीवूड छोटय़ा पडद्यावर सिनेप्रचार आणि प्रसारासाठी अवलंबून आहे. त्याची ताकदही ते जाणून आहेत. त्याचप्रकारे मराठी चित्रपट निर्मात्यांनीही छोटय़ा पडद्याच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेण्यासाठी पुढे यायला हवे, याबाबतीत प्रयत्न होताना दिसतात, पण याचा फायदा मोजक्याच चित्रपटांना न होता संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला व्हायला हवा.

‘उत्सुकता आहेच..’

अनेकदा कलाकारांमुळेही या चित्रपटांची उत्सुकता असते. ‘शेंटिमेंटल’ हा अशोक सराफ यांची मुख्य भूमिका असलेला चित्रपट पहिल्यांदाच सोनी मराठी या नवीन वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. अशोक सराफ यांच्या मते प्रेक्षक तुमच्याशी अजूनही जोडलेला आहे याचा आनंद आपले चित्रपट टीव्हीवर दाखवले जातात तेव्हा होतो. आजही माझे जुने चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. सोनी मराठी वाहिनीवर माझे गाजलेले चित्रपट दाखवले जाणार आहेत, त्यामुळे ‘शेंटीमेंटल’ या नव्या चित्रपटाला आणि माझ्या चित्रपटांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बाहुबली २’चा विक्रम

गेल्या वर्षी ‘बाहुबली २’, ‘दंगल’, ‘रईस’, ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘जॉली एलएलबी २’, ‘टय़ुबलाईट’, ‘काबील’, ‘एम. एस. धोनी : अनटोल्ड स्टोरी’ शिवाय ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ यांसारखे हिंदी चित्रपट दाखवण्यात आले. पण या चित्रपटात ‘बाहुबली २’ने सर्वात जास्त प्रेक्षकसंख्येचा विक्रम केला. गेल्या वर्षी बार्कच्या ४१व्या आठवडय़ाच्या अहवालानुसार ‘बाहुबली २’ हा चित्रपट सोनी मॅक्स, स्टार विजय (तमीळ) आणि स्टार मा या वाहिनीवर तेलुगूमध्ये दाखवण्यात आला. या तिन्ही वाहिन्यांवर त्याने प्रेक्षकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. ‘बाहुबली २’ने ‘प्रेम रतन धन पायो’चा विक्रम मोडीत काढला. ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाला २ अब्ज ५१ कोटी एवढी प्रेक्षकसंख्या लाभली होती, तर ‘बाहुबली २’ला २ अब्ज ६० कोटी इतकी प्रेक्षकसंख्या लाभली. जी आजवर कुठल्याही चित्रपटाला मिळवता आलेली नाही.