08 March 2021

News Flash

अस्तित्वाच्या मुळांशी जोडणारी कुळकथा

माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो कधी ना कधी आपल्या मुळाकडे परत येतो.

(संग्रहित छायाचित्र)

माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी तो कधी ना कधी आपल्या मुळाकडे परत येतो. आपली माती, आपली माणसे, आपला इतिहास त्याला खुणावू लागतो. अज्ञात अशा जगाविषयीची आपलेपणाची जाणीव माणसाला त्याच्या भूतकाळात घेऊन जाते. तिथे हाती लागतात त्या आठवणी, परंपरा आणि त्या काळात जगणाऱ्या प्रत्येकाचे आपापले दृष्टिकोन, त्यातून निर्माण झालेले समज-गैरसमज. भूतकाळाचा हा शोध माणसाला बौद्धिकदृष्टय़ा मागे नेत असला तरी भावनिकदृष्टय़ा अधिक समृद्ध बनवत असतो. प्रसाद कांबळी निर्मित आणि आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘सोयरे सकळ’ नाटकातूनही हाच समृद्ध अनुभव प्रेक्षकांना मिळतो. मराठी रंगभूमीवरील दर्जेदार आणि वेगळे नाटय़प्रयत्न अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ या उपक्रमाची मोहोर या नाटकावर उमटली आहे. भद्रकाली प्रॉडक्शनची ५६ वी नाटय़कृती असलेले ‘सोयरे सकळ’ हे नाटक २२ डिसेंबरपासून रंगभूमीवर दाखल झाले आहे. ‘संगीत देवबाभळी’ नाटकाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता या नाटकालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास निर्माता-दिग्दर्शकांनी व्यक्त केला. कथा, संवाद, संगीत, नेपथ्य, वेशभूषा अशा सर्व बाजूंनी सशक्त नाटय़कृती मंचावर आणण्याची परंपरा भद्रकालीने या नाटकातही कायम राखली आहे. हे नाटक येण्याआधीपासूनच त्याच्या पोस्टरची चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. यात पारंपरिक पेहेरावातील कलाकार दिसत असून ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही जोडी बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहे. वेगवेगळ्या काळातील तीन पिढय़ांची नाळ एकमेकांशी कशी जोडलेली असते हे ‘सोयरे सकळ’मधून दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोणत्याही वयोगटातल्या प्रेक्षकाला आपले वाटणारे हे नाटक म्हणजे एक उत्तम कौटुंबिक अनुभव आहे, असा विश्वास नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांनी व्यक्त केला. ‘लोकसत्ता संपादक शिफारस’ अशी मोहोर उमटलेल्या या नाटकाचे निर्माते प्रसाद कांबळी यांच्यासह दिग्दर्शक आदित्य इंगळे, कलाकार अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, आशुतोष गोखले यांच्याशी साधलेला संवाद.

‘माणसाच्या जाणिवांची पोतडी उघडणारे नाटक’

आपल्याला जर आपले मूळ माहीत नसेल, आपला उगम माहीत नसेल तर एक अनाथपणाची भावना निर्माण होते. पण भूतकाळातल्या काही गोष्टी जाणून घेतल्या तर ही भावना नाहीशी होते. मी भूतकाळात ऐश्वर्याचा भाऊ  आणि वर्तमानात नवरा अशा दोन भूमिका साकारत आहे. वर्तमानातली भूमिका एका अशा माणसाची आहे ज्याच्या मनात आपल्या परंपरांबद्दल, पूर्वजांबद्दल अढी आहे. म्हणून तो कायमचा अमेरिकेला निघून गेला आहे. काही गैरसमजांमुळे त्याचा आपल्या परंपरांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याचा मुलगा मात्र कुतूहलापोटी आपले मूळ शोधत भारतात येतो. माणसाच्या जाणिवांची पोतडी उघडणारे हे नाटक आहे.

-अविनाश नारकर

‘तरुण पिढीला त्यांच्या मुळाशी जोडणारे नाटक ’

सध्याची तरुण पिढी आपल्या मुळांशी जोडलेली नसून कुठे ना कुठे आपल्या परंपरांपासून ती दुरावत चालली आहे. आधीच्या पिढय़ांनी मनापासून जोपासलेली एखादी परंपरा तरुण पिढीला मात्र आपलीशी वाटत नाही. कारण त्यांचे त्या गोष्टीशी कोणत्याही प्रकारचे भावनिक नाते निर्माण झालेले नसते. माझ्या या नाटकात दोन भूमिका आहेत. दोन्ही भूमिकांना आपापले असे पैलू आहेत. भूतकाळातली आई ही अतिशय खंबीरपणे संसार सांभाळणारी बाई आहे, तर वर्तमानातली तिची मुलगीही अनेक कठीण प्रसंगांतून गेल्यामुळे खंबीर बनली आहे. पिढय़ान्पिढय़ा चालत आलेल्या परंपरा जोपासणारी ही मुलगी आहे.

– ऐश्वर्या नारकर, अभिनेत्री

‘देवबाभळी’ नाटकानंतर एका सशक्त विषयाच्या शोधात होतो. तेव्हाच आदित्य इंगळे ‘सोयरे सकळ’ नाटकाची संहिता घेऊ न माझ्याकडे आला. मला एक प्रेक्षक म्हणून हा विषय भावला. चांगला विषय मांडणाऱ्या नाटकांना मायबाप रसिक प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात. ‘सुखांशी भांडतो आम्ही’, ‘नांदी’, ‘हा शेखर भोसले कोण आहे’ किंवा अगदी अलीकडे आलेले ‘संगीत देवबाभळी’ नाटक यामुळे प्रेक्षकांच्या मनात ‘भद्रकाली’ म्हणजे चांगले नाटक अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. ‘सोयरे सकळ’मधूनही एक चांगला विषय देऊन ‘भद्रकाली’ची परंपरा जोपासायची आहे. ‘सोयरे सकळ’ म्हणजे आपला कुटुंबकबिला, आपली माणसे. तीन पिढय़ांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांवर भाष्य करणारे हे नाटक असून जुन्या आणि नव्याचा मेळ साधण्याचा प्रयत्न यात केला आहे. कोणतीही कला हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. या नाटकातही आजच्या समाजाचे प्रतिबिंब उमटवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला असून मराठी भाषेचा एक वेगळा लहेजा यात पाहायला मिळेल.

–  प्रसाद कांबळी, निर्माता

‘दोन काळातील भिन्न व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव’

माझी भूमिका अमेरिकेतून आलेल्या तिशीतील तरुणाची असून त्याला त्याचे मूळ शोधायचे आहे. आपण कोण आहोत, आपले पूर्वज कोण होते याविषयी त्याला प्रचंड कुतूहल आहे. त्याला त्याच्या आत्याकडून भूतकाळातील एकेका व्यक्तीबद्दल माहिती मिळत जाते. भूतकाळात मी याच तरुणाच्या आजेमामाची भूमिका करत आहे. हा माणूस खूप हुशार असूनही त्याला आयुष्यात फारसे यश मिळालेले नाही. बालगंधर्वाच्या कंपनीत काम करण्यासाठी त्याने १३ व्या वर्षी घर सोडले आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांमध्ये बरेच साम्य आहे. आपला पूर्वज आपल्यातच परत येतो, हेच यातून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे.

– आशुतोष गोखले, अभिनेता

‘तीन पिढय़ांची कुटुंबकहाणी’

कोणीही स्वयंभू म्हणून जन्माला येत नाही. त्याला कोणाचा तरी आधार मिळालेला असतो. तो आधार आपण पुढच्या पिढय़ांना द्यायचा असतो. तीन पिढय़ांची ही कुटुंबकहाणी आहे. आयुष्यातली हतबलता आणि आनंदाचे क्षण या दोन्ही गोष्टी यात पाहायला मिळतील. यात एक सध्याचा काळ आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर असे दोन काळ दाखविले आहेत. एक सुश्राव्य अशी सशक्त मराठी भाषा यात ऐकायला मिळेल. मी या नाटकाच्या दिग्दर्शनासोबतच अभिनयही करतो असून आपल्या भूतकाळाशी तुटलेले नाते हे नाटक पाहून कोणाला पुन्हा जोडावेसे वाटले तर ते या नाटकाचे खरे यश असेल.

-आदित्य इंगळे, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:46 am

Web Title: article about soyare sakal drama
Next Stories
1 चित्र रंजन : फँटसीच्या अवकाशातला पोकळ प्रवास
2 एपिक गडबड मॅड कॉमेडी
3 महाभारतात आमिर साकारणार कृष्ण, शाहरूखची माहिती
Just Now!
X