संतोष पाठारे

केंद्र सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेला ४९ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) नुकताच गोव्यात पार पडला. चित्रपट रसिकांच्या यादीत जे महोत्सव आवर्जून पाहावेत असा उल्लेख असतो त्यात हा महोत्सव अग्रणी आहे. इथे आंतरराष्ट्रीय चित्रपटांपेक्षा देशभरातील विविध भाषिक चित्रपट पाहण्यासाठी गर्दी होते..

१९५२ साली सुरू झालेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता पन्नाशीला आला आहे. भारतीय कलांना आणि कलावंतांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूंच्या पुढाकाराने जी धोरणं राबविण्यात आली त्यापैकी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन हे एक होतं. या महोत्सवाच्या निमित्ताने जगभर निर्माण होणारा चांगल्या दर्जाचा चित्रपट आणि ते निर्माण करणारे दिग्दर्शक भारतीयांच्या परिचयाचे झाले. त्यांच्या शैलीचा प्रभाव आपल्याकडील काही दिग्दर्शकांवर पडला, त्यातून भारतात अभिजात कलाकृती निर्माण झाल्या. ऐंशीच्या दशकात या महोत्सवात भारतीय चित्रपटांचा एक स्वतंत्र विभाग समाविष्ट करण्यात आला. भारतीय पॅनोरमामुळे स्वतंत्रपणे चित्रपटनिर्मिती करणाऱ्या दिग्दर्शकांना प्रोत्साहन मिळालं. सत्तरच्या दशकात निर्माण झालेल्या समांतर चळवळीला भारतीय पॅनोरमामुळे अधिक उभारी आली. जगातल्या चित्रपट रसिक प्रतिनिधींसमोर भारतीय चित्रपटाचं प्रदर्शन करण्याच्या या संधीमुळे खऱ्या अर्थाने भारतीय चित्रपट जागतिक झाला, वेगवेगळ्या देशात पोहोचला.

१९८२ साली प्रथमच भारतीय पॅनोरमा विभागात एकवीस चित्रपट दाखवण्यात आले. तीच परंपरा आजही कायम आहे. यावर्षी सव्वीस पूर्ण लांबीच्या चित्रपटांचा आणि एकवीस लघुपट माहितीपटांचा समावेश भारतीय पॅनोरमामध्ये करण्यात आला होता. या सव्वीस चित्रपटांमध्ये प्रतिमा जोशी दिग्दर्शित ‘आम्ही दोघी’ आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा’ हे दोन मराठी चित्रपट होते. वर्षांला शंभरहून अधिक मराठी चित्रपट निर्माण होत असताना भारतीय पॅनोरमामध्ये केवळ दोनच चित्रपटांचा समावेश झाल्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण निर्माण झालं. मात्र इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की भारतीय पॅनोरमा विभागात चांगल्या आणि प्रातिनिधिक भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात येतो. इथे कोणतंही भाषिक आणि प्रादेशिक आरक्षण अपेक्षित नसतं. गेल्या वर्षी दहा मराठी चित्रपट या विभागात होते. यावर्षी केवळ दोन, पण हे भाषिक आणि सांख्यिक प्रमाण बाजूला ठेवून आपण महोत्सवात भारतीय चित्रपट पाहणार आहोत याचं भान प्रेक्षकांनी बाळगायला हवं. हे चित्रपट महोत्सवातील देशी, विदेशी प्रेक्षक पाहणार असतात, त्यांच्या समोर भारतीय चित्रपटसृष्टीचं एक सर्वसमावेशक चित्र या चित्रपटांच्या निमित्ताने उभं राहणार असतं. त्यामुळे ‘पद्मावत’, ‘टायगर जिंदा है’ यासारखे व्यावसायिक चित्रपट देखील या महोत्सवाचा भाग असतात हे आपण जाणून घ्यायला हवं. यावेळी महोत्सवात एकही कोकणी किंवा गुजराती चित्रपट नव्हता, मराठी केवळ दोन चित्रपट होते. मात्र यावर्षी प्रथमच जसारी या बोली भाषेतील सिंजर, तुळु भाषेतील पड्डाची आणि लडाखी भाषेतील ‘वॉकिंग विथ विंड’ यांचा समावेश केला गेला. प्रवीण मोरचाले दिग्दर्शित ‘वॉकिंग विथ द विंड’ ला आयसीएफटी युनेस्कोचा गांधी पुरस्कारही देण्यात आला.

महोत्सवात सव्वीस लघुपटांपैकी आठ लघुपट मराठी होते हे विशेष. या लघुपटांच्या तरुण दिग्दर्शकांना महोत्सवामुळे प्रेक्षकांची दादही मिळाली आणि पूर्ण लांबीचे चित्रपट करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. आई शपथ (दिग्दर्शक – गौतम वाजे), भर दुपारी (दिग्दर्शक – स्वप्निल कापुरे), हॅपी बर्थ डे (दिग्दर्शक – मेघप्रणव पोवार), खरवस (दिग्दर्शक – आदित्य जांभळे), ना बोले वो हराम (दिग्दर्शक – नितीन पाटणकर), पॅम्पलेट (दिग्दर्शक – शेखर बापू रणखांबे), सायलेंट स्क्रीम (दिग्दर्शक – प्रसन्ना पोंडे), यस आय अँम माऊ ली (दिग्दर्शक – सुहास जहागीरदार) या लघुपटांना प्रेक्षकांनी गर्दी केली. चाकोरीबाह्य़ विषयांची निवड, संवादापेक्षाही बोलक्या प्रतिमा आणि परिणामकारक ध्वनी संयोजन याच्या मेळातून या दिग्दर्शकांनी आपल्या भवतालची सामाजिक, राजकीय परिस्थिती तसंच त्यांचा मानवी नातेसंबंधांवर आणि विचारांवर होणारा परिणाम, अनिष्ट रूढींमुळे होणारी मानसिक घुसमट याचं प्रत्ययकारी चित्रण केलं होतं.

शेखर बापू रणखांबेच्या ‘पॅम्पलेट’मध्ये अंधश्रद्धेच्या जोखडामुळे एका निरागस, स्वच्छंदी मुलाचा होणारा भावनिक कोंडमारा, त्यातून येणारी       हतबलता चित्रित केली गेलीय. ‘भर दुपारी’मधील स्नेहा आणि ‘खरवस’मधील आसावरी या दोन्ही नायिका स्वत:च्या दु:खावर मात करून नव्या आव्हानांना सामोरं जाताना दिसतात. या लघुपटांनी शेवटाला सोपी उत्तरे देण्याचे टाळून सर्वसामान्यांच्या आयुष्यातील नैतिक पेच प्रभावीपणे मांडलेत. पुढील काळामध्ये या दिग्दर्शकांकडून चांगले चित्रपट निर्माण होतील असं आश्वासक वातावरण निर्माण व्हायला या महोत्सवाने मदत केलीय.

भारतीय पॅनोरमाच्या फिचर फिल्म विभागात यावेळी मल्ल्याळम चित्रपट अधिक संख्येने होते. शाजी करुण यांचा ‘औलु’ हा चित्रपट एक जिप्सी मुलगी आणि चित्रकार यांच्या अद् भुत प्रेमाची गोष्ट सांगतो. ई मा यो (दिग्दर्शक लियो जोस पेल्लीसरी), भयानकम (दिग्दर्शक – जयराज), मकन्ना (दिग्दर्शक – रहिम खादर), पूमारम (दिग्दर्शक – अब्रीद शाईन), सुदानी फ्रॉम नायजेरिया (दिग्दर्शक -झकारिया) या मल्ल्याळम चित्रपटातील विविधांगी आशयाने केरळमधील सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीचा विस्तृत पट प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. ‘ई मा यो’ चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी चेंबन विनोद याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. ‘टू लेट’ या चेझियान रा दिग्दर्शित चित्रपटात आयरी क्षेत्रात काम करणाऱ्या या नायकाला स्वत:चं घर मिळवण्यासाठी येणाऱ्या दाहक अनुभवाचं चित्रण होतं. ‘धप्पा’ या निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित मराठी चित्रपटात सार्वजनिक गणेशोत्सवात सादर करण्यासाठी लहान मुलं बसवत असलेल्या पौराणिक नाटकाला काही राजकीय गुंडांनी केलेला विरोध, हा आशय आजच्या कलाजगतात होत असलेले राजकीय हस्तक्षेप आणि त्यावरील निष्पाप लोकांची प्रतिक्रिया यावर नेमकं बोट ठेवणारा होता.

या महोत्सवात जगभरात मान्यता पावलेल्या ज्यॉ लुक गोदाई, जाफर पनाही, हिरोकाजू कोरुदा, गॉस्पर नोई यांच्या चित्रपटांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत असतानाच प्रेक्षक भारतीय चित्रपटांना देखील हाऊ सफुल्ल गर्दी करत होते, दिग्दर्शकांशी चर्चा करत होते, हे दृश्य भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आशादायक आहे. चित्रपट प्रदर्शनाबरोबरीनेच विविध तज्ज्ञांकडून घेतले जाणारे मास्टर क्लास, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज् ऑफ इंडिया या संस्थेकडून आयोजित केलेल्या ओपन फोरममध्ये चर्चेसाठी घेतलेले महत्त्वपूर्ण विषय आणि बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अनिल कपूर, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा, दिग्दर्शक मेघना गुलजार यांसारख्या बॉलीवूडच्या ताऱ्यांची उपस्थिती यामुळे हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव लक्षणीय झाला.