वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या दोघांची कौंटुबिक पार्श्वभूमी वेगळी आहे. वरुण सिनेखानदानी तर अनुष्काचा बॉलीवूडशी दूरदूरचा संबंध नव्हता. पण या दोघांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे प्रयोगशीलता. हिंदी चित्रपटसृष्टीच्या नव्या फळीतील हे दोघे ताकदीचे कलाकार. कल्पकतापूर्वक चित्रपटांची निवड, मुख्य चित्रपटांच्या प्रवाहात राहूनही वेगळ्या धाटणीचे चित्रपट करण्याची धाडसी वृत्ती या गोष्टी दोघांमध्ये समान आहेत. या दोघांचे विचार जाणून घेण्याची संधी ‘इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘एक्स्प्रेस अड्डा’च्या निमित्ताने मिळाली.

अनुष्काचा ‘रबने बना दी जोडी’पासून ते ‘परी’ चित्रपटांपर्यंतचा प्रवास पाहता तिने नेहमीच वेगळ्या भूमिका असलेले चित्रपट निवडले. आता ती ‘सुईधागा’ आणि नंतर ‘झीरो’ चित्रपटात दिसणार आहे. वरुणच्या घरातच विनोदी चित्रपटांचं वातावरण होतं, परंतु ‘स्टुडंट ऑफ द इयर’ ते ‘ऑक्टोबर’ चित्रपटापर्यंतच्या त्याच्या प्रवासतही विविधता आहे. ‘बदलापूर’ आणि ‘ऑक्टोबर’ चित्रपटांमुळे त्याने समीक्षकांची पसंती मिळवली. ‘माय नेम इज खान’ चित्रपटात वरुणने साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली आणि आता यशस्वी अभिनेत्यांच्या यादीत तो पोहोचला. तर अनुष्काने सैनिकी पार्श्वभूमी ते मॉडेल आणि आता यशस्वी अभिनेत्री अशी आपली कामगिरी उंचावत नेली. असे हे दोन कलाकार ‘सुई-धागा: मेड इन इंडिया’ चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

‘सुई-धागा’ चित्रपट ‘दम लगाके हैशा’नंतर लगेचच चर्चेत आला होता. कारण याचा लेखक, दिग्दर्शक शरत कटारिया आहे. ज्याच्या पहिल्याच चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. त्यानंतर अभिनेता, अभिनेत्री म्हणून वरुण आणि अनुष्का या जोडीचं नाव जाहीर झालं. त्यानंतर अजूनच उत्सुकता वाढली. नेमका काय आहे हा चित्रपट?  तर ही एका गावातली गोष्ट आहे, असं वरुण आणि अनुष्का सांगतात. याचं श्रेय ते  शरतलाच देतात. कारण कुठेही खोटेपणा वाटू नये म्हणून चित्रपट खऱ्याखुऱ्या चित्रीकरण स्थळांवर चित्रित करण्यात आला आहे. आणि आपल्या व्यक्तिरेखाही तितक्याच वास्तव वाटाव्यात यासाठी आम्हीही त्या गावचेच झालो, असं हे दोघेही सांगतात.

शिवणकाम करणारा मौजी वरुणने तर अनुष्काने यात विणकाम करणाऱ्या ममताची भूमिका साकारली आहे. आपल्याकडील या कौशल्याच्या आधारावर ते कोणती मोठी झेप घेऊ  पाहत आहेत. त्यांची तीथपर्यंत पोहोचायची धडपड म्हणजे सुईधागा हा चित्रपट.

पहिल्या चित्रपटानंतर नेमकं काय घडलं.. असं विचारल्यावर वरुण म्हणाला, पहिल्या चित्रपटानंतर आता मला संजय लीला भन्साळी, राजकुमार हिरानी यांचाच फोन येणार असं वाटतं होतं . पण प्रत्यक्षात श्रीराम राघवन यांचा फोन आला, बदलापूरमधील रघूच्या भूमिकेसाठी.. असं तो हसत सांगतो. मी माझा दुसरा चित्रपट म्हणून बदलापूर निवड केली, पण तो चौथा चित्रपट ठरला. कारण त्याआधी माझे ‘मै तेरा हिरो’ आणि ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. बदलापूरची निवड केली तेव्हा माझ्या वडिलांनी आणि करण जोहर यांनी मला वेड लागलंय का?, असं विचारलं होतं. पण मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. कुठेतरी तेव्हाच वाटलं होतं बदलापूर हिट होईल, असं वरुणने सांगितलं.

अनुष्का म्हणाली की, १४ वर्षांची असताना मी मॉडेलिंगला सुरुवात केली. एकीकडे अभ्यास आणि दुसरीकडे जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी प्रयत्न. असं माझं आयुष्य होतं. पण अभिनेत्री व्हायची इच्छासुद्धा होतीच, त्यामुळे अभ्यासातली हुशारी या बळावर आईवडिलांनी मुंबईला यायला पाठिंबा दिला. पण अपघाताने अभिनेत्री झाले, असं तिने सांगितलं. कारण एक ऑडीशन दिली. नंतर मला बोलावण्यात आलं. माझी निवड होणं हे सगळं स्वप्नवत होतं. यशराजसारखी निर्मितीसंस्था, शाहरुखसारखा सुपरस्टार अभिनेता यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही. पण खरा संघर्ष पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर सुरू झाला, असं तिने सांगितलं. आता माध्यमांचा विस्तार एवढा वाढला आहे की खूप दबाव असतो कलाकार म्हणून. घरातून बाहेर पडल्यावर छायाचित्रकारांचा लखलखाट सुरू होतो. सतत कुणाचीतरी आपल्यावर पारखी नजर आहे, असं वाटत राहतं. पण आता अशाही परिस्थितीत कसं वागायचं हे हळूहळू शिकते आहे, असं तिने सांगितलं.

कलाकार म्हणून प्रेक्षकांना आमचं आयुष्य नेमकं कसं आहे हे नेहमी सांगावंसं वाटतं, पण त्याचा अर्थ कसा काढला जाईल हे माहिती नाही. त्यामुळे आम्ही शांतच राहतो, असं दोघेही म्हणाले. आव्हानं खूप असतात ती बोलून दाखवता येत नाहीत. पण अनुष्कासारख्या अभिनेत्री आता बॉलीवूडमध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते पाहता हा बदल खूप चांगला वाटतो. अभिनेता आणि अभिनेत्री समान पातळीवर असले पाहिजेत, असं वरुण म्हणाला. अनुष्काच्या निर्माती होण्याच्या निर्णयाचंही त्याने यावेळी कौतुक केलं. त्याला विनोदी अभिनेता म्हणून गणलं जात होतं, तेव्हा खऱ्या आयुष्यात चांगले चित्रपट करायला मिळावेत यासाठी तो धडपडत होता. त्यामुळे चित्रपटात हसणारा मी प्रत्यक्षात दु:खी होतो, पण प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हसू आणणं कठीण जायचं, असं त्याने सांगितलं. कलाकारांनाच नाही तर सर्वसामान्य माणसालाही आजच्या तांत्रिक युगात आपण पटकन कुठल्यातरी गोष्टीत ओढले जातो, पटकन प्रसिद्धीच्या झोतात येतो असे अनुभव येतात. पण हे योग्य नाही. कारण आम्हाला प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवायची आहे. सेल्फीच्या स्वरूपात त्यांच्या फोनमध्ये नव्हे, असं दोघांनाही सांगितलं.

अनुष्कानेही आपल्या आजवरच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना, मला पंजाबी बबली गर्लच्या प्रतिमेतून बाहेर पडायचं होतं आणि मी तशी चित्रपटांची निवड क रत त्यातून बाहेर पडले, असं सांगितलं. आजचा हिंदी चित्रपटसृष्टीतला काळ हा दिग्दर्शकांचा काळ आहे. त्यामुळेच नवोदित कलाकार खूप छान छान भूमिका साकारताना दिसतात यावर दोघांचंही एकमत झालं होतं. कारण आता आशयाला जास्त महत्त्व आलं आहे. वेगाने विस्तारणाऱ्या या चित्रपटसृष्टीत तोच कलाकार टिकू शकतो, जो काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात बाळगून आहे, असं सांगत दोघांनीही गप्पा आटोपत्या घेतल्या. एकूणच सब बढीया है.. आपणच विचारपूर्वक सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत असा सूर या दोघांसोबतच्या संवादातून जाणवला.