News Flash

‘मुहूर्तावर मुहूर्त’

‘मुहूर्ताच्या लाटे’चे गांभीर्य(?) आले..

मीनाक्षी शेषाद्री, दिलीपकुमार, लॉरेन्स डिसूझा अशाच एका चित्रपटाच्या मुहूर्तातील एक क्षण. 

त्या आठवडय़ात हिंदी चित्रपटसृष्टीला बॉलीवूड असे म्हणण्याची आणि मानण्याची सुरुवात झाली नव्हती तेव्हाच्या म्हणजे साधारण ८०-९० च्या दशकातील चित्रपटांविषयीच्या गमती-जमती, किस्से सांगणारे हे सदर.

चार-सहा नव्हे हो, एकदम साठ-सत्तर हिंदी चित्रपटांच्या ‘मुहूर्ताच्या बातमी’ने १९९०चा १ जानेवारी उजाडला.. हिंदी चित्रपटाच्या संस्कृतीमध्ये एके काळी ‘मुहूर्त’ (‘महुरत’ हा प्रचलित शब्द) म्हणजे केवढी शान व आनंद सोहळा असे की काही विचारू नका. ‘मजनून’, ‘कर्मा’, ‘खुदा गवाह’, ‘शनाख्त’, ‘टाइम मशीन’ अशा चित्रपटांचे मुहूर्ताचे क्षण म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातील लघुकथाच! (यापैकी ‘कर्मा’ व ‘खुदा गवाह’ फक्त झळकले.)

१९८९च्या ३० व ३१ डिसेंबर रोजी असे काय बरे घडले की, एकाएकी ‘घे नारळ, फोड शुभेच्छा देत’! चित्रनगरीतील निर्माता सुधाकर बोकाडे यांच्या ‘इज्जतदार’पासून ते जुईच्या एका बंगल्यातील शिबू मित्रा दिग्दर्शित ‘इज्जत की रोटी’ मुहूर्तापर्यंत नुसती ‘धावाधाव’.

आम्ही सिनेपत्रकार व छायाचित्रकारदेखील त्यात सामील. तो दिवसच तसा होता. अचानक ही ‘मुहूर्ताची लाट’ का बरे? नवीन वर्षांतही ‘फिल्मी ज्योतिषां’कडून ‘चांगला मुहूर्त’ काढून ‘आनंदाचा क्षण’ साजरा झाला असता ‘मुहूर्ताचा पेढा’ अधिकच गोड लागतो असा अनुभव देता-घेता आला असता.

चित्रपट निर्मात्यांची संस्था ‘इम्पा’ यांनी एक ‘फतवा’ काढला, कोणत्याही कलाकाराने एकाच वेळी बारापेक्षा जास्त चित्रपटांतून ‘भूमिका’ साकारायची नाही. कारण काय, तर बडे कलाकार एकदम ढीगभर चित्रपटांतून कार्यरत राहिल्याने तारखांचा सतत गोंधळ उडतो, बऱ्याच चित्रपटांच्या पूर्णतेचे नियोजन कोलमडते. निर्मात्याचे आर्थिक नुकसान होते व बऱ्याचशा तक्रारी इम्पाकडे येतात.

अरे बापरे, तर मग चला, नवीन वर्षांत नवीन धोरण राबवण्यापूर्वी आपल्या चित्रपटाचा मुहूर्त करून.. म्हणजे गोविंदाच्या नावावर ‘एकदम छप्पन्न’ अथवा जॅकी-अनिल एकदम बावीस-चोवीस चित्रपटांतून भूमिका करताहेत हे ‘मागील वर्षां’तले गणित समाजायचे, बरं का?  प्रत्यक्षात त्या ढीगभर मुहूर्तापैकी जेमतेम अर्धेच चित्रपट पूर्ण झाले.. ते काही असो, एखाद्या नवीन वर्षांची ‘चित्रपटाच्या जगा’ची सुरुवातच ‘मुहूर्तावर मुहूर्त’ या बातमीने व्हावी ही खूपच आनंदाची गोष्ट हो..

आपल्या चित्रपटाचा मुहूर्त झाल्याच्या क्षणापासून या जगतातील अनेकांच्या ‘देहबोली’मध्ये फरक दिसतो. यातून या ‘मुहूर्ताच्या लाटे’चे गांभीर्य(?) आले..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2016 2:38 am

Web Title: article on 80 90s bollywood movies and their stories
टॅग : Bollywood,Movies,Stories
Next Stories
1 ऋषी कपूरचे आगळे रूप!
2 ‘लॉर्ड ऑफ शिंगणापूर’ चित्रपट
3 शिंदे पिता-पुत्र म्हणतायत ‘आवाज वाढव डीजे, तुला आईची शप्पथ हाय!’
Just Now!
X