रेश्मा राईकवार

मुंबईतील गँगवॉर आणि पोलिसांच्या कारवाया, एके काळचे गुंडाराज संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेले प्रयत्न, त्यातून प्रसिद्धीला आलेले चकमकफे म अधिकारी हे सगळे इतिहासाचे धागे अनेकदा हिंदी चित्रपटांत रंगवलेल्या काल्पनिक कथांमधून अनुभवलेले आहे. ‘क्लास ऑफ ८३’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात याच इतिहासाची उजळणी झाली आहे, पण पुन्हा पुन्हा उगाळून झालेल्या गँगवॉर कथा लोकांसमोर आणणं हा या अतुल सभरवाल दिग्दर्शित चित्रपटाचा उद्देश नक्कीच नाही. पोलीस म्हणून प्रशिक्षण घेत असताना या गुंडांच्या टोळ्यांचं मूळ समजून घेत त्याचा नायनाट करण्याची ताकद बाळगणारे चकमकफेम अधिकारी कसे घडले असतील याची काल्पनिक (?) झलक हा चित्रपट दाखवतो. त्यानिमित्ताने चकमकींमागचे अनेक  चेहरे उलगडले गेले आहेत.

नाशिकच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेणारे पोलीस, कोणी वडिलांकडे बक्कळ पैसा असूनही जमलं तर होऊ या पोलीस नाहीतर दुसरं काहीतरी करता येईल या विचारापासून ते पोलीस का व्हायचं आहे, याचा यत्किंचितही विचार न करता प्रशिक्षण घेणारी तरुण मनं असे अनेक चेहरे यात दिसतात. ८३ साली पोलीस प्रशिक्षण घेणारी ही बॅच. या बॅचपैकी सतत कमी गुण मिळवणारे, कायम शेवटच्या बाकावर असणारे शुक्ला, सुर्वे, वर्दे, जाधव आणि अस्लम खान या पाच प्रशिक्षणार्थीकडे डीन विजय सिंग (बॉबी देओल) यांचे लक्ष जाते. प्रशिक्षणात मागे असले तरी त्यांच्यात प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारायची मानसिकता आहे, भलेही पोलिसी कर्तव्यांची फारशी जाणीव नसली तरी एक मेकांना जपण्याची आस आहे, एकमेकांप्रति निष्ठा आहे आणि काही प्रमाणात का होईना सत्याची चाड बाकी आहे हे लक्षात आल्यानंतर डीनला त्याच्या आयुष्याचा उद्देश सापडतो. डीनचाही एक वेदनादायी भूतकाळ आहे, कधीकाळी भल्याभल्या गुंडांना चीत करणारा डीन राजकारणाचा बळी ठरला आहे आणि या प्रशिक्षण केंद्रात शिक्षा म्हणून झालेल्या नियुक्तीवर आहे. या पाच जणांना नेहमीच्या प्रशिक्षणापेक्षा वेगळं घडवायचं हा डीनचा उद्देश काही अंशी सफल होतो. पण अर्थातच प्रत्येक गोष्ट आपण ठरवू त्यापद्धतीने होत नाही. इतरांपेक्षा वेगळं बाळकडू घेऊन निघालेले हे पाच जण फार लवकर पोलीस अधिकारी म्हणून नावारूपालाही येतात, मात्र इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यात काही ना काही बदल होतो. गुंडांना संपवणारे ते हिरो पोलीस आपल्याला माहिती असतात, पण ती प्रवृत्ती संपवता संपवता सत्ताकें द्राशी वेगवेगळ्या पद्धतीने आलेला संबंध, त्याला आपापल्या नीतिमूल्यांप्रमाणे त्यांनी दिलेला प्रतिसाद यातून वेगळंच काही घडत जातं.

हुसेन झैदी यांच्या ‘क्लास ऑफ ८३’वर आधारित असलेली ही काल्पनिक कथा आहे, असं चित्रपट सुरू होण्याच्या आधीच आपल्याला जाणवून दिलेलं असतं. त्यामुळे हे सत्य गृहीत धरून हा चित्रपट बघणाऱ्यांना त्या काळातील अनेक घटनांची जाणीव दिग्दर्शक ओघाओघात करून देतो. मुंबईवर गारूड करून असलेलं हे गुंडाराज कसं, कुठून निर्माण झालं असेल? त्याकाळची राजकीय, सामाजिक परिस्थिती काय होती याचा अंदाज देत हे धागे एकमेकांना वास्तव शैलीत जोडण्याचं चोख काम दिग्दर्शक म्हणून अतुल सभरवाल यांनी केलं आहे. काळसेकर आणि नाईक गँगचा उदय, कामगार नेते दत्ता सामंत आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात गिरणी कामगारांवरून रंगलेला संघर्ष, गिरण्यांच्या जागा हडपण्यासाठी राजकारणी नेते-मंत्र्यांनी गुंडांना हाताशी घेऊन केलेली खेळी आणि याच अस्तंगत झालेल्या गिरण्यांमधून जन्माला आलेल्या बेरोजगार तरुणांच्या गुंडटोळ्या.. हे सगळं कथेच्या ओघात दिग्दर्शक मांडत जातो. या संदर्भासाठी कृष्णधवल दृश्ये, काळाच्या संदर्भानुसार बदलते टोन या सगळ्यांमुळे हे चित्रण प्रभावी ठरले आहे. बॉबी देओलला खूप वर्षांनी न भूतो.. अशा भूमिके त पाहण्याची संधी या चित्रपटाने दिली आहे. क्वचित प्रसंगी हा डीन ढेपाळतोही मात्र बऱ्यापैकी ही भूमिका भाव खाऊन गेली आहे. त्याच्या जोडीला असलेल्या सगळ्या तरुण आणि नवोदित चेहरे असलेल्या कलाकारांनी बहार आणली आहे. मुंबईच्या इतिहासातला जुनाच चॅप्टर नव्या दृष्टीने बघण्याची संधी ‘क्लास ऑफ ८३’ने दिली आहे.

क्लास ऑफ ८३

दिग्दर्शक – अतुल सभरवाल

कलाकार – बॉबी देओल, जॉय सेनगुप्ता, अनुप सोनी, समीर परांजपे, पृथ्विक प्रताप, हितेश भोजराज, भूपेंद्र जडावत.