29 September 2020

News Flash

‘हिरोगिरीच भारी’

सध्या तरी हिंदी चित्रपटांमध्ये हिरोगिरीच भारी पडते, असं आपलं स्पष्ट मत असल्याचं सलमान सांगतो.

 

हिंदी चित्रपटातील सुपरस्टार म्हणून एकदा नावलौकिक कमावल्यानंतर तो टिक वून ठेवणं हे या आघाडीच्या कलाकारांसमोरचं मोठं आव्हान ठरू पाहतं आहे. चित्रपटाचा सुपरस्टार आणि निर्माता अशा दोन्ही भूमिकांमधून हे कलाकार जेव्हा रिंगणात उतरतात तेव्हा तिकीटबारीवर शंभर, दोनशे कोटींची उड्डाणे घेणं त्यांच्यासाठी क्रमप्राप्त ठरतं. चित्रपटात अ‍ॅक्शनदृश्य करतानाच्या उडय़ा एवढय़ा अवघड नसतील जेवढी ही तिकीटबारीवरच्या कोटय़वधी कमाईच्या उडय़ांची समीकरणं गुंतागुंतीची असतात. त्यामुळे खूप प्रयोग न करता जास्तीत जास्त प्रेक्षकवर्गाला जे आवडतं तेच देणं हिरो म्हणून आजच्या काळाची गरज असल्याचे खुद्द ‘दबंग’ सलमान खानचं म्हणणं आहे. आणि सध्या तरी हिंदी चित्रपटांमध्ये हिरोगिरीच भारी पडते, असं आपलं स्पष्ट मत असल्याचं सलमान सांगतो.

कबीर खानसारखा दिग्दर्शक असूनही ‘टय़ूबलाईट’ चित्रपट तिकीटबारीवर सपशेल आपटल्यानंतर सावध झालेल्या सलमान खानने जाणीवपूर्वक अ‍ॅक्शनपटांवर भर दिला आहे. आणि त्याची प्रचीती सध्या प्रदर्शित झालेल्या ‘दबंग ३’वरून येते. त्याच्या मते हिरोगिरी म्हणजे नायिकेबरोबरचा प्रणय नव्हे. मी लहानपणी चित्रपट पाहायला जायचो आणि चित्रपटगृहातून बाहेर पडायचो तेव्हा त्या हिरोचा प्रभाव माझ्यावर असायचा. मीही हिरो व्हावं, अशी इच्छा मनात घर करायची. आता माझ्या चित्रपटांच्या बाबतीतही मी हाच फंडा वापरतो आहे, असे तो सांगतो. चित्रपटाचा हिरो जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी सगळ्याचा सामना करून पुढे जातो तेव्हा तो प्रभावी ठरतो आणि प्रेक्षकांवर सध्या तरी याच हिरोगिरीचा प्रभाव असल्याचे तो सांगतो.

‘दबंग ३’मध्ये त्याच्याही पुढच्या चित्रपटाबद्दलचा सूचक इशारा सलमानने दिला आहे. मुळात पहिल्यांदा ‘दबंग’ केला तेव्हा त्या चित्रपटाचा प्रस्ताव अरबाजने आपल्याकडे आणला होता, असं तो सांगतो. त्यावेळी ‘दबंग’चं कथानक हे थोडं गंभीर विषयावरचं होतं. इतका गंभीर विषय प्रेक्षकांना कदाचित रुचणार नाही, असं मला वाटलं. त्यावेळी दिग्दर्शक म्हणून अभिनव कश्यपला काही बदल आम्ही सुचवले. त्यानेही ते मान्य केले आणि हा चित्रपट अपेक्षेपेक्षाही यशस्वी ठरला. किंबहुना ‘दबंग’ यशस्वी ठरला म्हणून आम्ही ‘दबंग २’ केला. त्याचं दिग्दर्शन मात्र अभिनवला करणं शक्य नव्हतं, त्यामुळे आम्ही त्याच्याविना तो चित्रपट पूर्ण केला, अशी माहितीही सलमानने दिली. या तिसऱ्या भागात तर तो आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. ‘दबंग ३’ची कथा सलमानची आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘दबंग २’नंतर काय असा विचार करत असताना चुलबुलच्या आयुष्यात आधी काय घडलं असेल, याचा विचार आम्ही करत गेलो. मी आणि अरबाजने काहीएक संकल्पना ठरवली आणि हळूहळू विचारपूर्वक एकेक गोष्ट जोडत कथेचा विस्तार करत गेलो, असे त्याने सांगितले.

प्रभुदेवाचे दाक्षिणात्य शैलीतील चित्रपट सुपरहिट आहेत. आपल्याला अपेक्षित असलेला हिरो, त्याच्यासाठीची अ‍ॅक्शन आणि गाणी-नृत्य, खटकेदार संवाद हे सगळं व्यवस्थितपणे मांडणी करत चित्रपट कसा करायचा हे त्याला चांगले माहिती आहे. त्यामुळे ‘दबंग ३’च्या दिग्दर्शनाची धुरा त्याच्यावर सोपवल्याचेही सलमानने सांगितले. या चित्रपटात त्याच्या दोन नायिका आहेत. अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर हिने या चित्रपटातून अभिनेत्री म्हणून पदार्पण केले आहे. सईविषयी बोलताना ती एक चांगली अभिनेत्री असल्याचे सलमानने सांगितले. चित्रपटाची कथा पूर्ण झाल्यानंतर क लाकारांच्या शोधात असताना सईला पाहिले होते. तिला पाहिल्यानंतर चित्रपटातील खुशीची भूमिका ती उत्तमपणे करू शकेल, असे वाटल्यानेच तिची चित्रपटासाठी निवड केल्याचे सलमानने सांगितले. या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीला सलमानने संधी दिली आहे. ‘लव्हयात्री’ चित्रपटाची नायिका वारिना हिने ‘दबंग ३’मध्ये ‘मुन्ना बदनाम हुआ’ हे आयटम साँग केले आहे. या आयटम साँगसाठी आम्ही कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीला निवडणारच होतो. वारिनाचं काम आम्ही पाहिलं होतं, त्यामुळे तिची या गाण्यासाठी निवड करणं सोपं होतं, असं त्याने सांगितलं. या वर्षभरात चित्रपटांच्या मोठय़ा घोषणा, नंतर ते चित्रपट पुढे ढकलले जाणे किंवा रद्द होणे या प्रकारांमुळे त्रासलेला सलमान सध्या तरी आपल्या पद्धतीने चित्रपटांची निवड करत पुढे जात असल्याचे दिसून येते.

‘दबंग ३’नंतर तो आता ‘राधे’ या चित्रपटात दिसणार आहे. याही चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले असून या जोडगोळीच्या ‘वाँटेड’ या चित्रपटाचा हा सिक्वल असल्याचे बोलले जाते. पाठोपाठ साजिद नाडियादवालाच्या ‘किक’ सिक्वलमध्येही तो पुढच्या वर्षी दिसणार आहे. सध्या तरी चुलबुल पांडे आपल्या ‘दबंग’ हिरोगिरीवर खूश असून पडद्यावर त्याची किती कमाल दिसून येते, याच्या प्रतीक्षेत आहे.

‘मेहनतीला पर्याय नाही’

‘दबंग 3’ चित्रपटाद्वारे अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई हिने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. ‘दबंग 3’ चित्रपटातील खुशी या साध्या- सरळ गोड स्वभावाच्या मुलीची भूमिका सईने केली आहे. पहिल्याच चित्रपटात सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळालेल्या सईची त्याच्याशी पहिली भेट ही वास्तव चित्रपटाच्या सेटवर झाली होती, असे सांगितले. त्या वेळी आपण पुढे चित्रपट क्षेत्रातच येणार असा काही विचार केला नव्हता, असं ती म्हणते. त्यामुळे सलमान खान हा सहकलाकार होण्याआधी माझ्या वडिलांचा जवळचा मित्र म्हणून माहिती होता, असे तिने सांगितले. मांजरेकर ‘नटसम्राट’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना मला पहिल्यांदा माझा कल अभिनयाकडे असल्याची जाणीव झाली, असं ती म्हणते. माझा हा विचार आणि या क्षेत्राची आवड या दोन्हीबद्दल मी आई-वडिलांना सांगितले. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी तू निवडलेल्या क्षेत्राबद्दल ठाम आहेस का?  असा प्रश्न मला विचारला. माझा निर्णय पक्का झाला आहे, हे लक्षात आल्यानंतरच त्यांनी संमती दिली, असं सई सांगते. अर्थातच, हिंदी चित्रपटसृष्टीत येताना महेश मांजरेकरांची मुलगी असले तरीही मेहनतीला पर्याय नसल्याचा कानमंत्र वडिलांनीच दिल्याचेही ती मनमोकळेपणाने सांगते. पदार्पणातच सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हासारख्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, हीच मोठी गोष्ट असल्याचे सई मांजरेकरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 4:44 am

Web Title: article on action movies dabang 3 abn 97
Next Stories
1 नाटक पुनरुज्जीवित करताना..
2 शयनगृहातून पडद्यावर..
3 ऐतिहासिक पटांसाठी हा योग्य काळ  -रोहित शेलटकर
Just Now!
X