गेल्या आठवडय़ात दोन अभिनेत्रींची नावं व्हायरल झाली. त्यातल्या एकीच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यावर तिचं नाव समाजमाध्यमांवर फिरलं. तर दुसरीने वास्तवात चित्रपट प्रसिद्धीपलीकडे जात दाखवलेली सामाजिक बांधिलकी तिला व्यावसायिक पातळीवर भलतीच महाग पडल्याने तीही चर्चेची धनी ठरली. याच आठवडय़ात आणखी एक नाव चांगलेच चर्चेत आले. ते म्हणजे करीमलाला..  आलिया भटची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या नव्या चित्रपटाची घोषणा संजय लीला भन्साळी यांनी केली आहे. त्यामुळे आलियाच्या बरोबरीनेच ही गंगूबाई कोण? याचं कुतुहलही निर्माण होणं स्वाभाविकच होतं. आणि या प्रश्नाचे उत्तर करीमलालाशी जोडलं गेलं. तर दुसरीकडे जेएनयू भेटीने सरकारची नाराजी ओढवून घेणाऱ्या दीपिकाला आता त्याचे खरे धक्के जाणवू लागले आहेत.

कोण ही गंगूबाई?

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘ईन्शाह अल्ला’ या चित्रपटात आलिया काम करणार होती, मात्र सलमान खानबरोबरच्या तिच्या या चित्रपटाचा बेत भन्साळींनी तूर्तास डबाबंद केला आहे. आणि त्याऐवजी आलियालाच मध्यवर्ती भूमिकेत घेऊन ‘गंगूबाई काठियावाडी’ या नव्या चित्रपटाची घोषणा भन्साळींनी केली आहे. आता आलिया साकारणार गंगूबाई.. हे ऐकायला कितीही विचित्र वाटत असलं तरी त्यामुळे ही गंगूबाई कोण, याबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता मोठय़ा प्रमाणावर चाळवली गेली आहे. तर गंगूबाई काठियावाडी हे पात्रं भन्साळींना हुसैन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातून भेटलं आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह के ला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकललं. कामाठीपुरातच वेश्या व्यवसाय करत असताना गंगूबाईंचा अनेक गँगस्टरशी संपर्क आला. अशाच एका प्रसंगात त्यांची गाठ करीम लाला यांच्याशी पडली आणि त्यांनी त्याला राखी बांधली. आपल्या या बहिणीला मग करीम लालाने अवघा कामाठीपुराच हातात दिला, असे सांगितले जाते. गंगूबाईंनी हा व्यवसाय केला, मात्र त्यांनी कधीही कोणत्याही मुलीच्या इच्छेविरोधात तिला हा व्यवसाय करू दिला नाही. उलट, मुंबईतून वेश्या व्यवसायच काढून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न सुरू झाले तेव्हा त्या आंदोलनाचे नेतृत्वही गंगूबाईंनी केले होते. अशा गंगूबाईंची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे. आलिया पहिल्यांदाच चरित्रपटात भूमिका साकारणार आहे, शिवाय भन्साळींबरोबरचाही तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसणारा आलियाचा चेहरा अगदी नजरेत भरणारा असल्याने साहजिकच या चित्रपटाविषयी चर्चा होणारच होती. ती त्याच पद्धतीने होते आहे. आलिया आणि भन्साळी ही दोन नावं एकत्र आल्यामुळे गंगूबाई कोण होत्या, याचा इंटरनेटवरचा शोधही वाढला आहे. बाकी काही असो.. गंगूबाईंच्या भूमिकेत आलियाला पाहणं हीही मोठी पर्वणीच ठरणार आहे.

पण झाले भलतेच!

दीपिका पदुकोणची मुख्य भूमिका असलेला आणि मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’ चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र या चित्रपटापेक्षा दीपिका पदुकोणचीच चर्चा गेले दोन आठवडे रंगली आहे. दीपिकाने जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि देशभरात एकच हलकल्लोळ उठला. दीपिकाची जेएनयू भेट ही ‘छपाक’च्या प्रसिद्धीसाठीचा स्टंट होता इथपासून ते ती कशी इथली नागरिकच नाही आहे वगैरे वगैरे अनेक गोष्टींवर तोंडसुख घेतलं गेलं. मात्र तिच्या भूमिकेला पाठिंबा देत पहिल्यांदाच बॉलीवूडमधील तिचे सहकारी सगळे तिच्या बाजूने ठाम उभे राहिले. इतके असतानाही दीपिकाला आता त्याचे खरे धक्के जाणवू लागले आहेत. सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर व्यक्त होणे कलाकारांसाठी किती धोकादायक ठरू शकते हे दीपिकाच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणींपासून अनेकांनी दीपिकाच्या जेएनयूभेटीवरून तिच्यावर टीका केली आहे. त्यामुळे एकीकडे बॉलीवूडजनांनी तिला पाठिंबा दिला असला तरी दुसरीकडून व्यावसायिक पातळीवर मात्र तिची ही भूमिका फारशी रुचलेली नसल्याचेच चित्र दिसते आहे. त्यामुळेच की काय.. ती करत असलेल्या ब्रॅण्डच्या जाहिरातींची संख्या कमी झाली आहे. आघाडीची अभिनेत्री म्हणून मोठय़ा मेहनतीने लौकिक कमावल्यानंतर दीपिका सध्या २० ब्रॅण्ड्सचे प्रतिनिधित्व करते आहे. खाण्यापिण्याच्या उत्पादनांपासून ते बँक, सौंदर्यप्रसाधने अशा वेगवेगळ्या ब्रॅण्ड्सचा यात समावेश आहे. मात्र सध्या जोपर्यंत हा वादंग कमी होत नाही तोवर एक तर जाहिराती दाखवायच्या नाहीत किं वा त्यांची संख्या कमी करायची अशी भूमिका कंपन्यांनी घेतली आहे. दीपिकाच्या या वादामुळे कोणतेही आर्थिक नुकसान सहन करण्याची या मंडळींची तयारी नाही. त्यामुळे वादात पडण्यापेक्षा बाजूलाच राहणे त्यांनी पसंत केले आहे. या सगळ्याचा अप्रत्यक्षरीत्या दीपिकावर दबाव आला असल्याचीही चर्चा आहे. मात्र या वेळीही अनुराग कश्यप, विक्रम मोटवने यांसारख्या दिग्दर्शकांनी याही परिस्थितीत दीपिका ठामपणे उभी असल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे. आणि आपल्या चित्रपटावर परिणाम होईल, याची भीती असतानाही ती मागे हटली नाही. ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली आहे. हा वाद हळूहळू निवळेल आणि लवकरच दीपिकाच्या नव्या चित्रपटावर चर्चा सुरू होईल, अशी आशा करायला हरकत नाही.