एक टुमदार गाव होते. ही सुरुवात काही वर्षांपूर्वी कोणत्याही गोष्टीसाठी लागू पडत असे. ‘गॉडलेस’ या वेबसीरिजवर लिहिताना हेच वाक्य समोर येते. पण जेव्हा असे टुमदार गाव असते तेव्हा त्याच गावात अनेक घडामोडी होत असतात. दळणवळणाची साधने पुरेशी विकसित झालेली नसतात. घोडा हेच काय ते प्रवासाचे साधन असते. पण गावातील नैसर्गिक खनिजांसाठी शहरातून गुंतवणूकदारांची ये-जा असायची. मग आपसूकच चोर-दरोडेखोरांचे पण साम्राज्य निर्माण होत जाते. मग त्यांच्यातील हेवेदावे आणि त्याच वेळी त्या गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे निर्माण झालेले प्रश्न या सर्वाचा एक अनोखा पट तयार होतो. अर्थात, हा साराच पट जितका चित्तथरारक असतो तितकाच तो मानवी जीवनाच्या अनेक घटकांना स्पर्श करणारादेखील असतो. ‘नेटफ्लिक्स’वरील ‘गॉडलेस’ ही वेबसीरिज अशा अनेक घटकांना कवेत घेत प्रवास करते. हा प्रवास तुम्हाला जितका खिळवून ठेवतो तितकाच तो विचार करायलादेखील प्रवृत्त करतो.

१९ व्या शतकाच्या मध्यावर कोलोरॅडो प्रांतात घडणारी ही कथा आहे. जॅक ग्रिफीन हा एक कुप्रसिद्ध दरोडेखोर, त्याच्या मुलासारखा असणारा रॉय गुड त्याची साथ सोडून पळून जातो. त्यावेळी झालेल्या झटापटीत जॅक ग्रिफीनचा एक हातदेखील निकामी होतो. रॉय जाताना त्या रेल्वे लुटीतील सारी संपत्ती घेऊ न पसार होतो आणि ला बेला या छोटय़ाशा टुमदार गावाबाहेरील एका वाडीवर आश्रय घेतो. हे ला बेला म्हणजे चांदीच्या खाणीजवळ वसलेले गाव. दोन वर्षांपूर्वी या गावातील सर्व पुरुष (८३) खाणीतील अपघातात मृत्युमुखी पडलेले असतात. त्या गावात दोन-चार म्हातारे आणि एक तरुण सोडल्यास अन्य पुरुषच नसतो. रॉय गुड ज्या वाडीवर पोहोचतो तेथील महिला तिचा मुलगा आणि सासूबरोबर एकटीच राहत असते. जॅक ग्रिफीन रॉय गुडच्या मागावर असतो आणि ला बेलाचा शेरीफ रॉय गुड व जॅक ग्रिफीनच्या मागावर. तर दुसरीकडे मार्शल कुक हादेखी स्वतंत्रपणे जॅक ग्रिफीनच्या शोधात निघालेला. त्यानंतर सुरू होते ते एक पाठलाग नाटय़. पण केवळ या तिघा-चौघांभोवतीच हे कथानक फिरत न राहता ला बेलातील महिला आणि तेथे नव्याने आलेल्या खाण कंपनीमुळे होणारे बदल हेदेखील याच कथानकाचा भाग असतात. एकाच वेळी भावनिकता, आर्थिक गणिते, सूड भावना, प्रेम अशा साऱ्या गोष्टींना एकत्र घेत हे कथानक गुंफले जाते.

यात बेसुमार हिंसा आहे, म्हणजे अगदी सुरुवातीलाच एका रेल्वे लुटीमध्ये संपूर्ण गावच जाळून टाकले जाते. जो तो कायम कमरेला बांधलेल्या काडतूसाच्या पट्टय़ात पिस्तूल खोवून किंवा घोडय़ाच्या खोगीरात बंदूक खुपसून फिरत असतो. इतक्या हिंसक प्रकाराला कारुण्याची झालर पण असते आणि काही वेळा तर अव्यक्त प्रेमाची किनारदेखील. चित्रपटांमध्ये ज्याला वेस्टर्न जॉनर म्हणतात त्या प्रकारात मोडणारा हा प्रकार प्रदीर्घ अशा पण सात भागापुरत्या मर्यादित वेबसीरिजमध्ये मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

‘गॉडलेस’ ही पिरीअड कलाकृती आहे. त्यामुळे हा काळ उभे करणे हे त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणता येईल. त्यामध्ये दिग्दर्शकाने पूर्णपणे यश मिळवले आहे. पण केवळ काळ उभा करण्यातून सारं काही साधत नसते. त्यामुळे अनेक कथानकांना एकमेकांत गुंफणे हे या वेबसीरिजचे सर्वात मोठे यश आहे असे म्हणता येईल. केवळ रॉय गुड आणि जॅक ग्रिफीन याच्याभोवती ही कथा फिरत राहिली असती तर कदाचित तो केवळ सूडनाटय़ाचा विषय ठरला असता. पण ला बेला गावाची कथा ही यामध्ये सहजपणे मिसळून जाते. दोन र्वष पुरुषच गावात नसलेले केवळ महिलांचे गाव आणि त्याच वेळी एखाद्या खाणकंपनीमुळे त्यांना चार पैसे आणि पुरुष असा दोहोंचा लाभ होणे हे कथानक जगण्याची वेगळीच बाजू मांडते. तर रॉय आणि जॅकचे पूर्वायुष्य त्यांच्या सध्याच्या वर्तणुकीचे मर्म मांडते.

तुमच्याकडे कितीही थोर कथानक असले तरी त्याची मांडणी तुम्ही कशी करता यावर खूप काही अवलंबून असते. वेबसीरिज सुरू होते ती जॅक ग्रिफीनने पूर्णपणे जाळून उद्ध्वस्त केलेल्या गावापासून. तेव्हा तुम्हाला जॅक ग्रिफिन आणि रॉय गुड दोघांचीही पाश्र्वभूमी माहीत नसते. पण कथानकाच्या ओघात अतिशय मोक्याच्या क्षणी त्या दोघांचा इतिहास उलगडला जातो. फ्लॅशबॅकची करामत ही कथानक रंजक करण्यासाठी चांगली असते पण तिचा वापर केव्हा करायचा यावर प्रेक्षकांवरील प्रभाव अवलंबून असतो. हा प्रकार अतिशय सूचक पद्धतीने वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर कोलोरॅडो प्रांतातील राकट, काही प्रमाणात रासवट म्हणाव्या अशा निसर्गसौंदर्याला कॅमेऱ्यात पकडण्यातील कौशल्यामुळे त्या रुक्ष वातावरणाची देखील एक मोहिनी प्रेक्षकांवर पडते.

१९व्या शतकाच्या मध्यावरील कथानक म्हणजे आजच्या वेगवान युगात अगदीच संथ म्हणावे असे ठरू शकते. पण त्यातील सारे ताणेबाणे जर टिपता आले तर तेच कथानक आजदेखील पडद्यावर पाहायला आकर्षक दिसू शकते हे ‘गॉडलेस’मुळे जाणवते. त्यातच मर्यादित भागांची मर्यादा घालून घेतल्यामुळे त्यातील उत्सुकता नक्कीच टिकून राहते.

गॉडलेस

  • सीझन पहिला
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स