निलेश अडसूळ

टाळेबंदीनंतर सुरु झालेला मालिकांचा प्रवास आता खऱ्या अर्थाने ‘न्यू नॉर्मल’ कडे जाऊ लागला आहे. हे पूर्ववत होणे मालिकांसाठी जरी पोषक असले तरी प्रेक्षकांच्या मेंदूवरचा ताण मात्र वाढू लागला आहे. एखाद दुसरा अपवाद वगळला तर ठराविक काळानंतर मालिकांची गाडी घसरून एकसुरी किंवा अतिरंजक नाटय़ाकडे वळतेच. अर्थात त्याच्या सीमा आशयानुरूप वेगळ्या. पण हल्ली अशाच घसरलेल्या गाडय़ा प्रेक्षकांच्या वाटय़ाला आल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्याला न आवडलेल्या आशयाची किंवा अतिरेकी दृश्यांची समाजमाध्यामावर प्रेक्षकांकडून थेट टर उडवली जात आहे. तर काही प्रेक्षक खरपूस शब्दांतही समाचार घेताना दिसतात. थोडक्यात संतोक्ती प्रमाणे ‘न देखवी डोळा’ अशी सद्य:स्थिती आहे.

एखाद्या माणसाने किती मरावे, कितीदा मार खावा, बायकोच्या अविश्वासाला किती तोंड द्यावे याचेही काही गणित असते. ती सगळी गणिते मोडून ‘झी मराठी’चा नायक राजबिंडा या अवस्थेतून थेट गलितगात्र अवस्थेत गेला आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचा आलेख तपासला तर एक वेळ लोकांना टीव्ही पुढून हलू न देणारी मालिका आता प्रेक्षकांना दुसऱ्या वाहिनीकडे वळण्यासाठी भाग पाडत आहे. राणा आणि अंजलीचा प्रेम प्रवास, संसार, मग लाडूचे येणे इथपर्यंत सगळे ठीक होते. पण त्यानंतर त्याचा झालेला मुत्यू, कर्नाटकी अवतारात पुन: प्रवेश, पोलिसात भरती ते आता आता सुरु असलेले राणा विरोधी षडयंत्र, हे स्वीकारणे काहीसे जडच. त्यातही राणाचे फसणे, त्याला मारण्यासाठी केला गेलेला खटाटोप आणि आता मालिकेत पुन्हा एकदा येणारी नवी बाई. हा मालिका वाढवण्याचा अट्टहास आता वाहिनीने सोडला तर प्रेक्षकांच्या जरा पचनी पडेल इतकंच. तर स्त्रियांचे लचांड कायमस्वरूपी मागे असलेल्या गुरुनाथच्या आयुष्यात आता पिंकी आली आहे. ‘गुरुनाथपासून पिंकीला जेव्हा मूल होईल तेव्हाच मालिका संपेल’ अशा शब्दांत या मालिकेची खिल्ली उडवली जात आहे. आपला बालपणीचा मित्र सौमित्र आपल्यासमोर मुलीचा वेश धारण करून येतो आणि आपण त्याला ओळखू नये, यासारखा निर्बुद्धपणा नसावा. गुरुनाथला धडा शिकवण्यासाठी असेच प्रयत्न सुरु राहिले तर उद्या आनंदलाही स्त्री वेशात जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेत सोहमला दिलेल्या महत्वावरून मालिकेचे नायक आसावरी-अभिजीत आहेत की सोहम याची स्पष्टता अद्याप आलेली नाही.‘कलर्स मराठी’ वाहिनीवर कोही वर्षांची उडी घेतलेल्या ‘स्वामिनी’ मालिकेत मोठय़ा रमाबाईंचा प्रवेश हा चर्चेचा विषय झाला होता. त्या कशा असतील, रमामाधव यांचे प्रेम कसे खुलेल, असे नाना उत्कंठावर्धक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होते. पण नव्या रमाबाईंच्या येण्याने प्रेक्षकांचा काहीसा भ्रमनिरास झाला आहे. मालिकेतील दर्जेदार व्यक्तीचित्रण आणि त्याला मिळालेल्या कलाकारांच्या न्यायामुळे नव्याने आलेले पात्र काहीसे फिके वाटत आहे. तर ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत सानवीचा पुन:प्रवेश झाला आहे. तेही तत्ववादी घराण्याची सून म्हणून. त्यासाठी तिला सिद्धार्थच्या चुलत भावाशी लग्न करावे लागले आहे तेही थेट अमेरिकेत जाऊन. असो.  वाईट असलेली माणसे अशी भसाभस चांगली होतात काय, अमेरिकेत जातात काय, तिथे अशीच व्यक्ती त्यांना भेटते काय.. इतके  योगायोग? पण प्रेमात, युद्धात आणि कौटुंबिक कुचाळ्या करण्यात सारे काही माफ असे म्हणून पुढे सरकायचे इतकेच. बाकी अमेरिकेला जाण्या-येण्याचे मार्ग इतके सुकर सगळ्यांसाठीच होवो ही प्रार्थना.

तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत घराघरातील गृहिणींचे दु:ख मांडले गेले. पतीकडून पत्नीला गृहीत धरले जाणे आणि अनावधाने तिची अवहेलना होणे इथपर्यंत चित्र बरे होते. पण अखेर मालिका ‘टिपिकल ट्रॅक’ म्हणजेच विवाह बा संबंधांवर घसरलीच. संजना आणि अनिरुद्धची मैत्री ते दहा वर्षांंचे प्रेम ही उद्घोषणाच मालिकेला धक्का देणारी होती. आपल्या नवऱ्याचे दहा वर्ष असलेले एका स्त्री सोबतचे संबंध पत्नीला ओळखू न यावेत ही बाब जरा खटकणारी वाटते. म्हणजे हल्ली एकमेकांमधली पारदर्शकता जरा कुठे हलली तरी प्रकरण सोडचिठ्ठी पर्यंत जाते. तिथे दहा वर्ष किमान संशय येऊ नये. बरं एकवेळ पत्नीला नसेल आला पण उंबऱ्याबाहेर पडून जग पाहणाऱ्या मुलांना तरी यावा. तेही नाही. त्यामुळे हा अंधारातला कारभार उजेडात येईस्तोवर अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या लग्नाची पन्नाशी आली नाही म्हणजे मिळवले. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘आनंदी हे जग सारे’ मालिकाही काहीशी ढेपाळलेलीच वाटते. आनंदीची आई गेल्यानंतर संहितेला लागलेली घरघर अद्याप प्रेक्षकांना धरून ठेवते आहे असे वाटत नाही. त्यात टाळेबंदीनंतर मालिकेने बदललेला काळ, माणसे, नवे प्रवेश तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. तर तरुणांसाठी आलेली ‘झी युवा’ आता तरुणांची उरली आहे का असे काहीसे वाटते. कारण तरुणांच्या मतानुसार ‘फुलपाखरू’ ही शेवटची स्मरणीय मालिका असल्याचे कळते. कदाचित जोमाने वाढत असलेल्या ओटीटीच्या पर्यायामुळे तरुण वर्ग तिथे अधिक आकर्षिला गेला असावा. तसे असले तरी ‘युवा’ हा त्या वाहिनीचा आत्मा असल्याने ते तिथे असणे अनिवार्यच.   मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज बराच बदलला आहे. प्रेक्षक जाणकार होतो आहे. आपण काहीही दाखवू आणि ते पाहतील असे आजचे वातावरण नाही. म्हणूनच कदाचित काही मालिका कमी वेळात गाशा गुंडाळतानाचे चित्र आज दिसते. सध्याचा प्रेक्षक मालिका डोक्यावरही घेतो, त्याचे समीक्षणही करतो आणि वेळप्रसंगी त्यागही करतो. त्यामुळे सावध ऐका प्रेक्षकांच्या हाका..