रेश्मा राईकवार

प्रत्येक शेवट हा नव्याची सुरुवात असते, असं म्हटलं जातं. जी गोष्ट सुरू झाली आहे ती कधी ना कधी संपणारच मात्र जिथे ती संपते तिथे अनेकदा नव्याची बीजं रुजलेली असतात. गोष्टीवेल्हाळ माणसांना आवडती गोष्ट कधीच संपावीशी वाटत नाही. अशीच काहीशी अवस्था सध्या ‘माव्‍‌र्हल’ प्रेमींची झाली आहे. माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स या संकल्पनेंतर्गत आपल्या सगळ्या लोकप्रिय सुपरहिरो व्यक्तिरेखांना एकत्र आणून माव्‍‌र्हलने ‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिका केली. या चित्रपटमालिकेतील तथाकथित अखेरचा भाग ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ नावाने या आठवडय़ात प्रदर्शित होत आहे. गेली दहा वर्ष सातत्याने ही मालिका लोकांच्या मनात ठसवली जाईल, अशा पद्धतीने एकेक सुपरहिरोपट, त्यांच्या फ्रँचाइझी आणि पुन्हा त्यांना एकत्र आणून के लेली चित्रपट मालिका हा घाट माव्‍‌र्हलने कसा जमवून आणला? यामागची प्री व्हिज्युलायझेशन पासून कलाकार, दिग्दर्शक ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंतची प्रक्रिया कशी होती? यावर व्हिज्युअलायझेशन आर्टिस्ट म्हणून काम केलेल्या प्रसाद कमळाकर नर्से यांनी टाकलेला प्रकाश..

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ आणि आता त्याचा दुसरा, अखेरचा भाग म्हणून चर्चा असलेला ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ या दोन्ही चित्रपटांबद्दल बोलताना मुळातच दहा वर्षांपूर्वी या सगळ्याची सुरुवात माव्‍‌र्हलने कोणत्या विचारातून केली, हा प्रश्न मनात डोकावतो. ‘२००८ साली माव्‍‌र्हलने ‘आयर्नमॅन’ हा चित्रपट प्रदर्शित केला होता. आयर्नमॅन ही माव्‍‌र्हलची आजवरची लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि सुपरहिरो फ्रँचाइझी आहे. पहिला ‘आयर्नमॅन’ प्रदर्शित झाला तोही क्रांतिकारीच म्हणता येईल. व्हीएफएक्स आणि अ‍ॅनिमेशन तंत्राचा उत्तम आणि प्रभावी वापर या चित्रपटात झाला होता’. ‘आयर्नमॅन’मध्ये पहिल्यांदाच त्याचा सूट तयार करण्यात आला. त्याचे हृदय यांत्रिक पद्धतीने बनवले गेले, आयर्नमॅनची प्रेयसी त्याच्या हृदयात हात घालून ते बसवून देते, असे वेगळे प्रसंग यात लोकांना पाहायला मिळाले. हा चित्रपट यशस्वी झाला. त्यामुळे मग ‘आयर्नमॅन २’ बनवला गेला. पण, या दोन चित्रपटांमध्ये आणि माव्‍‌र्हलनंतर आलेल्या चित्रपटांमध्ये खूप मोठा फरक होता तो म्हणजे प्री व्हिज्युअलायझेशन तंत्राचा, असं प्रसादने सांगितले.

या दोन चित्रपटांवेळी प्री व्हिज्युअलायझेशनचे तंत्र एवढे परिचित नव्हते, मात्र  २०११ साली आलेल्या ‘थॉर’ चित्रपटाने तंत्राच्या बाबतीत सगळ्या कमाल मर्यादा पार के ल्या होत्या. मुळात, थॉर या सुपरहिरोची गोष्ट मांडायची तर तो स्वर्गाचा अधिपती होता. एकीकडे सोनेरी स्वर्ग ही आजवरची कल्पना आणि अंतराळातील त्यांचं अस्तित्व मांडायचं म्हणजे अवकाशातील निळाई आणि सोनेरी स्वर्गाची संकल्पना पडद्यावरही तितक्याच बेमालूमपणे एकमेकांत सामावून गेलेली दिसणं गरजेचं होतं. त्यासाठी प्री व्हिज्युअलायझेशन तंत्राचा वापर केला गेला. २०११ मध्येच ‘कॅप्टन अमेरिका : द फर्स्ट अ‍ॅव्हेंजर’ प्रदर्शित झाला होता. तोपर्यंत आयर्नमॅन, थॉर, हल्क आणि खुद्द कॅप्टन अमेरिका या सगळ्याच सुपरहिरो व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या होत्या. कॅप्टन अमेरिकाचे चित्रीकरण सुरू असतानाच या सगळ्या सुपरहिरोजना एकत्र आणून अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिका करण्याची कल्पना पुढे आली होती. त्याची तयारी आधीपासूनच झाली होती. माव्‍‌र्हलचे कार्यकारी संचालक असलेल्या केव्हिन फेगी यांनी माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सची संकल्पना २००८ पासूनच सुरू केली होती. एकेक फ्रँचाइझी लोकप्रिय होत गेल्यानंतर त्यांनी आता कुठे थांबायचं नाही हे निश्चित केलं. आणि माव्‍‌र्हलच्या सगळ्या सुपरहिरोंना एकत्र घेऊन ‘माव्‍‌र्हल्स : द अ‍ॅव्हेंजर्स’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला, अशी माहिती प्रसादने दिली.

सुरुवातीपासून तीन टप्प्यांमध्ये माव्‍‌र्हलच्या एकंदरीत सगळ्याच फ्रॅंचाइझी चित्रपटांची निर्मिती होत होती. ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ हा या तिसऱ्या टप्प्याचा अखेरचा भाग मानला जातो. लोकप्रिय असल्या तरी इतक्या सुपरहिरो व्यक्तिरेखा, त्यांच्या गोष्टी एकत्र आणून एकामागोमाग एक येणाऱ्या चित्रपटातून त्याची कथा पुढे नेत जाणं, लोकांच्या अपेक्षा कुठेही फोल जाणार नाहीत, याची काळजी घेत अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिका करणं हे अजिबात सोपं नव्हतं, असं प्रसाद सांगतो. अ‍ॅव्हेंजर्सचा घाट घातल्यानंतर ‘गार्डियन ऑफ गॅलॅक्सी’ हा चित्रपट माव्‍‌र्हलने केला. मी स्वत: पहिल्यांदा या चित्रपटावर काम केलं, मात्र त्यावेळी गार्डियनचे हिरो अ‍ॅव्हेंजर्स एवढे प्रसिद्ध होतील, असं वाटलं नव्हतं. पण ते लोकप्रिय झाले आणि त्यांनाही वरून अ‍ॅव्हेंजर्समध्ये आणायचा विचार केला गेला. अडचण अशी होती की गार्डियनचे सगळे सुपरहिरो हे अंतराळात राहणारे होते. ते पृथ्वीवरच्या सुपरहिरोबरोबर एकत्र का आणि कसे येतील? मग डॉक्टर स्ट्रेंज, अँटमॅन असे वेगवेगळी वैशिष्टय़ असलेले सुपरहिरो आणले गेले. अशा पद्धतीने कथा एकमेकांत गुंफून चित्रपट करणे सोपे कधीच नव्हते. अ‍ॅव्हेंजर्सचे इन्फिनिटी आणि एंडगेम या दोन्ही भागांत मुख्य व्यक्तिरेखाच ३२ आहेत. त्यात पुढे तितक्याच महत्त्वाच्या उपव्यक्तिरेखा आहेत. म्हणजे इतके सगळे कलाकार, त्यांच्या तारखा, त्यांचे चित्रीकरण सांभाळणे या गोष्टी अवघडच असतात. आणि प्री व्हिज्युअलायझेशनसह सगळ्याच टीमला याचे भान ठेवून काम करावे लागते. अनेकदा कलाकार नसले तर त्यांच्या डमीज घेऊन चित्रीकरण पूर्ण करावे लागते, असं त्याने सांगितलं.

इतक्या सगळ्या व्यक्तिरेखा असलेले चित्रपट करताना आणखी एक आव्हान असते ते म्हणजे यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला कमीतकमी २० टक्के तरी पडद्यावर काम असले पाहिजे. नाहीतर त्यांचे चाहते दुखावले जाण्याची शक्यता असते. शिवाय, हे सगळे सुपरहिरो आहेत म्हणून ते जगावेगळे असे न दाखवता सर्वसामान्यांना तो आपला, आपल्यातला वाटला पाहिजे, अशा पद्धतीनेच त्याची मांडणी करणे गरजेचे ठरते. तुमच्या व्यक्तिरेखा फक्त हिरोगिरी करणाऱ्याच असतील तर लोकही काही काळाने कंटाळतात. म्हणून अ‍ॅव्हेंजर्स असो वा गार्डियनमध्येही प्रत्येक छोटय़ा व्यक्तिरेखेला आपले एक वैशिष्टय़ दिले गेले आहे, हे सांगताना त्याने स्पायडरमॅनचे उदाहरण दिले. टोबी मॅग्वायरने साकारलेला पहिला स्पायडरमॅन जो होता तो प्रगल्भ, अनुभवी तरुण होता, पण अ‍ॅव्हेंजर्सच्या टीमचा विचार करता स्पायडरमॅन हा त्यांच्यात सगळ्यात वयाने लहान असलेला सुपरहिरो आहे. त्यामुळे त्याच्यात लहान मुलांचा अल्लडपणा असणे गरजेचे होते हा विचार करून नंतर आलेल्या स्पायडरमॅन फ्रँचाइझीत अभिनेता टॉम हॉलंडची निवड केली गेली. टॉम लहान असल्यामुळे तो आता स्पायडरमॅनच्या भूमिकेत अगदी फिट बसला आहे. कॅप्टन हा इतरांपेक्षा गंभीर, तत्त्ववादी आहे. तर आयर्नमॅन हा जिद्दी, मुत्सद्दी आहे. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत नसला तरी आपल्याला त्याला सांभाळून काम करावे लागते, त्याच पद्धतीने या व्यक्तिरेखा मानवी स्वभावानुसारच वागतात. म्हणून त्या सर्वसामान्यांना जास्त आपल्याशा वाटतात. हा विचार घेऊन, त्यानुसार मेहनत करून या व्यक्तिरेखा आणल्यानेच माव्‍‌र्हलपट यशस्वी ठरले, असं प्रसाद ठामपणे सांगतो.

व्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून ‘अ‍ॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’अशा दोन वेगवेगळ्या चित्रपटांवर आम्ही काम केले नव्हते. आमच्यासाठी तो एकच चित्रपट होता. त्याचं अशा पद्धतीने नियोजन केलं गेलं होतं की इन्फिनिटीचं काम संपवून आम्ही एंडगेमच्या कामाला कधी सुरुवात केली हे आम्हालाही कळलं नाही, असं प्रसाद सांगतो. प्री व्हिज्युअलायझेशन करताना व्यक्तिरेखा आणि ते साकारणारे कलाकार यांचाही विचार करावा लागतो, असं तो म्हणतो. थॅनॉस ही व्यक्तिरेखा कथेत नमूद केल्याप्रमाणे आठ फूट उंच आहे. तो अवाढव्य आहे, पण खूप अ‍ॅक्शन करणारा नाही. त्याची भूमिका करणारा अभिनेता जॉश ब्रॉलिन हा कमी उंचीचा आहे. अशा वेळी मोशन कॅप्चर सूटच्या आधारे आम्ही प्रत्येक कलाकाराची अ‍ॅक्शन रेकॉर्ड करतो. चित्रपटाच्या सुरुवातीलाच प्रत्येक कलाकाराची बॉडी स्कॅन करून त्यांची संगणकीय प्रतिमा तयार केलेली असते, ज्याला आम्ही पपेट म्हणतो. या पपेटमध्ये त्या अ‍ॅक्शन बसवून प्रसंग चित्रित केले जातात. अ‍ॅव्हेंजर्सच्या चाहत्यांना आयर्नमॅन साकारणाऱ्या रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा हा अखेरचा चित्रपट असल्याचे माहिती आहे, कारण ते आधीच जाहीर करण्यात आले आहे. अशा वेळी अन्य कलाकारांना घेऊन या व्यक्तिरेखा पुढे जातात. प्री व्हिज्युअलायझेशन टीमला नव्या कलाकारांच्या शरीराचे स्कॅनिंग करून त्यांच्या प्रतिमा बनवून घ्याव्या लागतात. मात्र अशा वेळी आर्टिस्ट, कलाकार आणि सगळ्याच टीमला वाईट वाटत असते. अर्थात, शो मस्ट गो ऑन या न्यायाने पुढचे काम सुरूच राहते, असं प्रसादचे म्हणणे आहे.

माव्‍‌र्हलचे यश हे त्यांचे निर्माते, दिग्दर्शक यांच्या विचारसरणीतही आहे, असे त्याला वाटते. सुपरहिरोपट साकारताना त्याचा जमेल तितक्या बाजूंनी विचार केला जातो. अशा वेळी व्हिज्युअलायझेशन करणारी आमची टीम कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांच्यापैकी कोणीही सूचना दिली तर त्याचा विचार केला जातो.अगदी पहिले काही शॉट्स डिझाइन झाल्यानंतर अगदी निवडक जाणकारांना तो दाखवून त्यांच्याही प्रतिक्रिया घेतल्या जातात. या चित्रपटांच्या निर्मितीसाठी लागणारा पैसा, लोकांच्या अपेक्षा यांची सांगड घालताना हे जबाबदारीचे भान अगदी इतर देशांमध्ये व्हीएफएक्सचे काम करणाऱ्या टीममधील आर्टिस्ट, तंत्रज्ञांनाही असते, असं प्रसादने सांगितले.

‘अ‍ॅव्हेंजर्स : एंडगेम’ या चित्रपटाच्या नावातच एंड किंवा शेवट सूचित केलेला आहे, मात्र माव्‍‌र्हलचे एकूणच दूरदृष्टी असलेले धोरण पाहता हा शेवट आणखी नवे काही घेऊन येणारा असेल, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला काहीच हरकत नसावी..!

प्री व्हिज्युअलायझेशन तंत्राची किमया

चित्रपटाच्या कथेवर पहिल्यांदा काम करणारा चमू हा प्री प्रॉडक्शनचा असतो. शब्दांत उतरवलेल्या कथेला पडद्यावर चित्ररूप देताना त्या त्या व्यक्तिरेखा कशा दिसतील, त्यांच्या आजूबाजूचे वातावरण क से असेल आणि कसे दिसेल. त्यानंतर मग प्रत्येक प्रसंग कसा चित्रित केला जाऊ शकतो, लाइट कोणत्या पद्धतीचा असेल, अ‍ॅक्शन, संवाद कशा पद्धतीने यायला हवेत, अशा बारीकसारीक तपशिलांचा विचार करून गोष्टीत रंग भरण्याचे काम प्री व्हिज्युअलायझेशन चमू करतो. या चमूने दिलेल्या संकल्पचित्रावर मग दिग्दर्शकाचा विचार सुरू होतो आणि त्यानंतर प्रत्यक्ष कलाकारांकडून त्या पद्धतीने काम करून घेतले जाते. ही पद्धत माव्‍‌र्हलच्या आधीच्या चित्रपटांना नव्हती. त्यामुळे एके क चित्रपट यायला उशीर होत होता. प्री व्हिज्युअलायझेशन तंत्रामुळे एकाच वेळी तीन तीन चित्रपटांवर काम करणे शक्य झाले.

सुपरहिरो आणि कलाकार

संगणकीय तंत्रज्ञान हाताशी असले तरी या व्यक्तिरेखांमध्ये जान आणण्याचे, त्यांना आपले वैशिष्टय़, आवाज देण्याचे काम हे कलाकारांचेच असते. कलाकार या भूमिका अक्षरश: जगतात. त्यामुळे एखादी व्यक्तिरेखा त्या कलाकाराला जेव्हा सोडावी लागते तेव्हा तोही हळहळल्याशिवाय राहत नाही, असे तो म्हणतो. ह्य़ु जॅकमन या अभिनेत्याने ‘लोगन’ हा सुपरहिरो यशस्वी केला. ‘एक्समेन’ चित्रपट मालिकेतील ही व्यक्तिरेखा जॅकमनसाठीच लक्षात राहील, मात्र या कलाकारांचे वय लक्षात घेऊन त्यांच्याशी करार केलेले असतात. करार संपले की त्यांना भूमिकेला निरोप द्यावाच लागतो. जे ह्य़ु जॅकमनच्या बाबतीतही घडले. असाच काहीसा अनुभव अ‍ॅव्हेंजर्सच्या चाहत्यांनाही घ्यावा लागणार असल्याचे सूतोवाचही प्रसादने केले.

‘माव्‍‌र्हल’स कथा!

माव्‍‌र्हलचे एकूणच कथाविस्ताराचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. माव्‍‌र्हलच्या लोकप्रिय चित्रपटांचा दबदबाच इतका आहे की अ‍ॅव्हेंजर्सनंतर ब्लॅक पँथर, अँटमॅन, थॉर रॅग्नारॉकसारखे एकेक फ्रँचाइझी चित्रपट आले तरी त्या चित्रपटांना आणि त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखांना तोच आदर मिळतो. अगदी आम्ही आर्टिस्टही प्रत्येक छोटी व्यक्तिरेखा असली तरी तितक्याच प्रेमाने, आदराने डिझाइन करतो