निलेश अडसुळ

दैवी व्यक्तिमत्त्वावरील एखादी मालिका लोकप्रिय झाली म्हणजे तत्सम मालिका यशस्वी होतीलच असे नाही. पण हा समज खोटा ठरवत ‘कलर्स मराठी’वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेने सर्व रेकोर्ड मोडले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील दैवी पुरुष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदमापूरच्या बाळूमामांच्या भूमिके तून अभिनेता सुमित पुसावळे याने अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.

अभिनयाचे प्रशिक्षण, नाटकांची पार्श्वभूमी किंवा कुणाचा वरदहस्त नसतानाही सुमितने मेहनत आणि आत्मबलावर अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. नुसते ठेवलेच नाही तर स्वत:ची वेगळी ओळखही निर्माण केली. आज जरी सुमित बाळूमामांच्या भूमिकेत दिसत असला तरी छोटय़ा-मोठय़ा भूमिकांमधून अनेकदा तो आपल्या समोर आला आहे. तो कसा, याबाबत सुमित सांगतो, अभिनय हे काही माझे क्षेत्र नव्हते, पण चित्रपट पाहायची मात्र प्रचंड आवड होती. आजही आहे. मी मराठीच नाही तर हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि शक्य तितके वेगळे चित्रपट पाहात असतो. माझं शिक्षण हॉटेल मॅनेजमेंटमध्ये झाल्याने त्याच क्षेत्रात नोकरी सुरू होती. २०१५च्या दरम्यान कोल्हापूरला सयाजी हॉटेलमध्ये नोकरीला असताना अनेकांनी मला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. मग हेही करून पाहू या म्हणत मॉडेलिंग सुरू केलं. याच काळात मला एका चित्रपटासाठी विचारलं गेलं. ‘सरगम’ नावाच्या या चित्रपटात मी पहिल्यांदा अभिनय केला तोही नकारात्मक भूमिकेत. काही कारणास्तव तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही, पण चित्रपट क्षेत्रात त्या निमित्ताने पदार्पण झालं. पुढे नोकरी सुरू ठेवावी की अभिनयाकडे वळावं असा संभ्रम होता, पण स्वत:वर विश्वास ठेवत मी कलाक्षेत्राकडे वळलो, असे तो सांगतो.

कलाक्षेत्राचीच आवड असल्याने माझ्यासाठी शिकणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी स्वत:ला फक्त अभिनयाची मर्यादा घातली नाही. जे मिळेल ते केलं आणि त्यातून शिकत राहिलो. दरम्यानच्या काळात साहाय्यक दिग्दर्शक म्हणून चार चित्रपट केले. प्रियांका चोप्रा यांच्या ‘पर्पल पेबल’ निर्मिती संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. दिग्दर्शनाची बाजू भक्कम होत असतानाच दुसरीकडे अभिनयासाठी ऑडिशन देणं सुरूच होतं. यातूनच ‘झी मराठी’वरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेसाठी मला विचारलं गेलं. लष्करी प्रशिक्षणात आलेलं ‘सुम्या’ नावाचं हे नकारात्मक पात्र लोकांच्या चांगलंच लक्षात राहिलं. नंतर याच वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत ‘हरजी महाडिक’ यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सकारात्मक भूमिकेने माझी ओळख अधिकच स्पष्ट होत गेली, असे त्याने सांगितले.

बाळूमामा घडतानाच्या प्रवासाविषयी तो म्हणाला, हरजी महाडिक यांची भूमिका साकारत असतानाच ‘बाळूमामा’ मालिकेच्या ऑडिशनबद्दल समजलं. योगायोग असा की याच मालिकेत मी नागदेवतेची भूमिका साकारली होती. कदाचित तेव्हाच माझा चेहरा आमचे लेखक दिग्दर्शक संतोष अयाचित यांच्या लक्षात राहिला असावा. त्यांनी मला बोलावून माझी ऑडिशन, लूक टेस्ट आणि इतर तांत्रिक गोष्टींची पूर्तता केली आणि माझ्या रूपाने मालिकेला मोठे बाळूमामा मिळाले.

या यशामागे असलेली प्रेरणा माझ्या आजोबांची आहे असा उल्लेख तो आवर्जून करतो. शाळेत असताना कधीतरी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण करणं एवढीच काय ती आवड. त्यानंतर तीन वर्षे हॉटेल क्षेत्रात नोकरी, मग मॉडेलिंग आणि आता प्रमुख भूमिका. या प्रवासामागे माझ्या आजोबांचे म्हणजेच दाजीराम पुसावळे यांचे आशीर्वाद आणि तेच माझी प्रेरणा असल्याचे तो सांगतो. आजोबांचा किस्सा सांगताना तो म्हणाला, माझ्या आजोबांना नाटकाची प्रचंड आवड होती. घरची शेती आणि छोटंसं हॉटेल असतानाही आपण नाटकात काहीतरी करावं असं त्यांना कायम वाटे. गदिमांचे गाव म्हणजे माडगूळ हे गाव आमच्या गावापासून अगदी जवळ. एकदा आजोबा ग. दि. माडगूळकरांना भेटायला गेले आणि म्हणाले, मलाही या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. काही होऊ शकेल का? पण तेव्हा गदिमा म्हणाले, तुम्ही जे करताय ते उत्तम आहे तेच सुरू ठेवा. पण आजोबा थांबले नाहीत. गावाकडे येऊन त्यांनी ‘मरतड मल्हारी’ नावाचे नाटक बसवले. पश्चिम महाराष्ट्रात त्याचे ६०हून अधिक प्रयोग केले. हीच त्यांची जिद्द मला कायम प्रेरणादायी वाटते. या प्रेरणेसोबतच केलेल्या प्रत्येक कामातून मी शिकत आलो. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका करताना अमोल कोल्हे यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे ठरले. ऐतिहासिक भूमिकेचा पोशाख, बोलण्याची लकब, चाल, देहबोली सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडून शिकता आल्या. त्याच्या मते, प्रत्येक कामाकडे आपण डोळस पद्धतीने पाहिले तर आपल्याला बरेच काही शिकता येते.

कोणत्याही भूमिकेला अभ्यासाची जोड हवी असते. त्यातही ते पात्र कोण्या युगपुरुषाचे असेल तर अधिकच मेहनत घ्यावी लागते. या अभ्यासाविषयी तो सांगतो, ‘कलाक्षेत्राने मला प्रचंड वाचनाची आवड लावली. या भूमिकेबाबतही अनेक संदर्भग्रंथ वाचले, काही चित्रपट पाहिले आणि त्यातूनच बाळूमामा उलगडत गेले.’ ‘आज मला प्रेक्षकांनी बाळूमामा म्हणून ओळख दिली. कुठेही जातो तेव्हा लोक वय पाहत नाहीत, स्थळ पाहात नाहीत थेट येऊन पाया पडतात. मध्यंतरी बाळूमामा आजारी पडल्याचे प्रसंग दाखवण्यात आले होते, तेव्हा बाळूमामांना बरं वाटावं म्हणून कराडच्या एका आजीने उपवास केले होते. लोक मला बाळूमामा समजून त्यांच्या व्यथा सांगतात, आशीर्वाद मागतात. काही लोक माझी भेट घ्यायला अदमापूरहून सेटवर आले आहेत. त्यामुळे या भूमिकेशी प्रेक्षकवर्ग केवळ भावनेने नाही श्रद्धेने जोडला गेला आहे.’ अनेकदा कलाकारांना प्रसिद्धीचा किंवा लोकांच्या वागण्याचा त्रास होत असतो, पण सुमितच्या मते प्रत्येक कलाकार याचसाठी झटत असतो. मग जेव्हा ती प्रसिद्धी मिळते तेव्हा त्याचा त्रास व्हायचं काही कारण नाही. जेव्हा काम नसतं तेव्हा आपली नाराजी असतेच, पण मिळालेल्या कामासोबत या सगळ्या गोष्टी स्वीकारणं अनिवार्य आहे. रसिकांचं प्रेम हे कलाकाराला मिळालेलं आंदण आहे. किंबहुना बऱ्याचदा लोक घोळक्याने भेटायला येतात तेव्हा प्रत्येकाला मी पुरेसा वेळ देऊ शकत नाही याची खंत वाटते, असं तो सांगतो.

ओटीटी माध्यमाविषयी सुमित सांगतो, प्रत्येकालाच टीव्हीपुढे बसून कार्यक्रम पाहणे शक्य होत नाही. विशेषकरून तरुणांसाठी वेबसीरिज हे सोयीचं आणि उत्तम माध्यम आहे. ते तितकंच सशक्तही आहे. आज मलाही अनेक वेबसीरिजसाठी विचारलं जात आहे. पण अद्याप तरी त्या दिशेने वळण्याची माझी इच्छा नाही, कारण सध्या हाती असलेलं काम मला जास्त महत्त्वाचं वाटतं. लहान असताना आम्ही रामायण पाहायचो तेव्हा राम म्हणजे अरुण गोविल, हनुमान म्हणजे दारासिंग अशा प्रतिमा मनात घट्ट तयार झाल्या होत्या. त्यामुळे भविष्यात बाळूमामा म्हणताना लोकांना सुमित पुसावळेचा चेहरा आठवायला हवा अशी माझी इच्छा आहे आणि त्या भूमिकेला तितक्या उंचीवर नेण्याची माझी तयारी आहे, असे तो सांगतो. हे सांगत असतानाच मला दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे असेही तो म्हणतो.

* ऑडिशनने जग दाखवलं..

‘बाळूमामा’ ही मालिका मिळण्याआधी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वडिलांनी मला सहा महिने दिले होते. त्या काळात मी शक्य तितक्या ऑडिशन देत राहिलो. शक्य तितक्या म्हणजे रोजच नव्या ऑडिशन देत होतो. या काळात खरी परीक्षा आपल्या संयमाची असते. आपल्या कामावर निष्ठा ठेवून शांत राहिलो तरच इथे निभाव लागतो. अनेकदा आपली निवड होते आणि आदल्या रात्री नकाराचा फोन येतो. कुणीतरी वशिलेबाजीने ती भूमिका मिळवलेली असते. या क्षेत्रात कौशल्याइतकंच ओळखीला आणि सेटिंगला महत्त्व आहे हे कळायला आणि पचायला थोडा वेळ गेला. परंतु ज्याला कसलाही आधार नाही त्याला मात्र मेहनतीशिवाय आणि स्वत:ला सिद्ध केल्याशिवाय पर्याय नाही.

*  तरुणांना आवाहन.

या क्षेत्रात अनेक एजंट आहेत. तुम्हाला आम्ही काम देऊ म्हणत ते सर्रास पैसे उकळतात. विशेष म्हणजे हल्ली झटपट यश हवे असल्याने तरुण मंडळी या अडत्यांना चटकन बळी पडतात. अशी अनेक उदाहरणे आज मी जवळून पाहतो आहे. सुरुवातीला एक-दोन छोटय़ा भूमिका ते देतातही, पण एकदा पैसे मिळाले की कामही नाही आणि काहीच नाही. त्यामुळे सतर्क राहा. माहितीच्याच ठिकाणी ऑडिशनला जा. कदाचित थोडा जास्त संघर्ष करावा लागेल पण तुमच्यात सामर्थ्य असेल तर यश नक्की मिळेल.