News Flash

आवाज कोणाचा?

कधी नव्हे ते समस्येवर भाष्य केलं म्हणूनही कलाकारांना टीकेचे धनी व्हावं लागलं आहे..

(संग्रहित छायाचित्र)

 

देशातील महत्त्वाच्या सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर हिंदी-मराठी चित्रपटांतील कलाकार व्यक्तच होत नाहीत किंवा काही ठरावीक कलाकारच आपापल्या परीने संवेदनशील विषयांवर व्यक्त होताना दिसतात, असा आरोप केला जातो. मात्र या वेळी आपल्यापुढच्या समस्येचं गांभीर्य ओळखून ही मंडळी नुसतीच व्यक्त झाली असं नाहीत, तर काहींनी प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन आपला सहभागही नोंदवला. काही जण कवितेतून, काही चित्रांतून व्यक्त झाले. तर आपल्याच सहकाऱ्याच्या कृतीवर शंका घेतली जाते आहे हे पाहून एकवटलेली बॉलीवूड शक्तीही अनुभवायला मिळाली. कधी नव्हे ते समस्येवर भाष्य केलं म्हणूनही कलाकारांना टीकेचे धनी व्हावं लागलं आहे..

देशाची राजधानी दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर झालेल्या अमानुष हल्ल्याविरोधात विद्यार्थ्यांनी देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं करत या घटनेचा निषेध केला. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलनाची तार छेडली गेली आहे. यात तरुणाचा सहभाग हा मोठा होता, मात्र शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हल्ले करण्यात आल्याने देशभर संतापाची लाट उसळली. यात कधी नव्हे ते बॉलीवूडची मंडळीही सामील झाली आणि विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला चुकीचा होता, अशी भूमिका त्यांनी घेतली. गेले आठवडाभर दिल्लीत आणि त्यानंतर मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनाच्या निमित्ताने एकत्रित आलेल्या तरुणाईचे म्हणणे ऐकून घ्यायला अनेकांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. दिग्दर्शक अनुराग कश्यप नेहमीच संवेदनशील मुद्दय़ांवर जाहीर भूमिका घेत आला आहे. त्यानेही गेट वे ऑफ इंडिया येथे जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. अनुरागबरोबर सुशांत सिंगसारखी कलाकार मंडळी आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होती. मात्र ‘छपाक’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांच्या निमित्ताने दिल्लीत असलेल्या दीपिकाने जेएनयूमध्ये हजेरी लावली आणि एकच हलकल्लोळ उडाला.

खरं तर, दीपिका तिथे शांतपणे उपस्थित राहिली होती. तिने कुठलेही जाहीर भाष्य केले नव्हते, मात्र हा सारा प्रकार तिने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी केला असल्याची टीका करत तिच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी झाली. तिला चारित्र्यहीन म्हणून हिणवण्यात आले. आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य तिलाही आहे हे विसरलेला समाज तिच्यावर टीका करून थांबला नाही, तर तिच्यावर नाही नाही ते आरोप करण्यात आले. दीपिकावर झालेल्या टीकेला मात्र बॉलीवूडजनांनी एकत्र येऊन जे खरमरीत उत्तर दिले, त्याची प्रशंसाही झाली. सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात नागरिकाला आपली मतं व्यक्त करण्याचे स्वातंत्र्यही नाही का, असा सवाल कलाकारांकडून के ला गेला. तापसी पन्नू, आलिया भट, अनुराग कश्यप, स्वरा भास्कर, अनुपम खेर, सोनाक्षी सिन्हा, विक्रमादित्य मोटवानी, निखिल अडवाणी यांनी समाजमाध्यमावर आपला निषेध व्यक्त करत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घळा घोटणाऱ्या या कृतींबद्दल संताप व्यक्त केला. आलिया भटने भारताची प्रतिज्ञा उद्धृत करत विद्यार्थ्यांकडून काही तरी शिका, असा संदेश टाकला. दीपिकाला पाठिंबा देणं इतकाच या प्रतिक्रियांमागचा मर्यादित उद्देश नव्हता, तर जे घडले आहे ते चुकीचे आहे आणि त्यामुळे त्याचे समर्थन होऊ शकत नाही, अशी जाहीर भूमिका बॉलीवूडच्या तरुण फळीने घेतली.

‘जखमी विद्यार्थ्यांची छायाचित्रे पाहून अस्वस्थ वाटत नाही का? शांतपणे ही परिस्थिती पाहणे अशक्य आहे,’ असे सोनाक्षी सिन्हाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले. तर त्याच वेळी ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटाच्या प्रसिद्धी कार्यक्रमासाठी दिल्लीत असलेल्या वरुण धवननेही देशभरात अशा घटना घडतात तेव्हा शांत राहणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले. एक जमाव विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर हल्ला करतो ही घटना शांत बसू देणारी नाहीच, अशी भूमिका वरुणनेही घेतली. दुसरीकडे दीपिकावर टीका करण्यापेक्षा तिने आपल्या चित्रपटाच्या व्यवसायावर परिणाम होण्याचा धोका असतानाही प्रत्यक्ष आंदोलनाच्या ठिकाणी जाण्याचे धाडस दाखवले. ती खरी नायिका आहे, अशा शब्दांत दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी आणि निखिल अडवाणी यांनी तिचे कौतुक केले.

बॉयकॉट ‘छपाक’

दीपिकाने हल्ल्यात जखमी झालेल्या जेएनयूची विद्यार्थी प्रतिनिधी आयेशी घोष हिची विचारपूस केल्याने चर्चेला उधाण आले. भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदर सिंह बग्गा यांनी ‘दीपिकाने तुकडे आणि अफजल गँगला पाठिंबा दिल्याने या चित्रपटावर बहिष्कार घाला’ अशा आशयाचा संदेश ट्विटरवर प्रसारित केला. त्यामुळे ‘बॉयकॉट छपाक’ हा हॅशटॅग वाऱ्यासारखा पसरला. या दीपिकाच्या समाजात संमिश्र प्रतिक्रिया उमटली. एकीकडे   ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ‘बॉयकॉट छपाक’ हा हॅशटॅग लोकप्रिय होत होता, तर दुसरीकडे दीपिकाच्या कृतीचा अभिमान आहे, असे सांगत दिग्दर्शक अनुराग कश्यप, विशाल भारद्वाज आणि स्वरा भास्करसारख्या कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवणारे #आयस्टॅण्ड विथ दीपिका, #दीपिका वी प्राऊड ऑफ यू हे हॅशटॅग समाजमाध्यमावर लोकप्रिय केले.

या सगळ्या वादंगात आपल्या भूमिकेवर ठाम राहत दीपिकानेही आपले मत व्यक्त करण्याची भीती बाळगता कामा नये, असाच संदेश दिला. देशातील सर्व स्तरांतून लोक एकत्र येत आहेत आणि आपल्या भावना व्यक्त करत आहेत. दोन वर्षांपूर्वी ‘पद्मावत’ चित्रपटाच्या वेळी अशीच विरोधाची परिस्थिती अनुभवायला मिळाली होती, असे सांगत देशातील सद्य:स्थिती पाहून दु:ख होते, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

मराठी कलाकारही या वेळी मागे राहिले नाहीत. कवी कि शोर कदम, दिग्दर्शक समीर विद्वांस आणि अभिनेता आयुषमान खुराना यांनी कवितेच्या माध्यमातून भावनांना वाट मोकळी करून दिली. मुंबईतील आझाद मैदानावरील विद्यार्थी आंदोलनात कवी किशोर कदम उपस्थित होते. त्यांनी केलेली  ‘नकाबपोष’ ही कविता सद्य:स्थितीचे वर्णन करते. ‘बाला’, ‘ड्रीमगर्ल’ यांसारखे यशस्वी चित्रपट देणारा आयुषमान खुरानाची कविताही काळजाला भिडते.

इंसानियत से बडा कुछ नही

धर्म नही, सियासत नही

धन नही विरासत नही

किसी की हो सोच नई

हो अलग तो अलग सही

पर तुझे उस सोच को नेचने का हक नही

यही भारत का लोकतंत्र हे

ओर इसमे किसी को पाक नही

दीपिकाच्या बरोबरीने झोया अख्तर, संगीतकार स्वानंद किरकिरे, फरहान अख्तर यांनीही जेएनयू येथे भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. या वेळेस स्वानंद किरकिरे यांनी ‘बावरा मन’ हे गाणे गायले. ‘जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला त्याचा मी निषेध करतो. एक सभा सुरू असताना प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारण्यात आले. देशात आणि जगभरात जेव्हा विद्यार्थ्यांची आंदोलने होतात तेव्हा विद्यार्थ्यांचा आवाज दडपणे सरकारसाठी अवघड होते. देशात मोठय़ा प्रमाणावर होणारी आंदोलने हे मोठय़ा क्रांतीचे द्योतक आहे,’ असे अभिनेता सुशांत सिंग यांनी सांगितले. गायिका मोनिका डोग्रा, नंदिता दास आणि कुणाल कामरा यांनीही हजेरी लावली होती.

नागरिकत्व कायद्यावरून देशभर सुरू झालेल्या आंदोलनाला या तरुण कलाकारांनी इतका उत्स्फूर्त आणि मोठय़ा प्रमाणावर दिलेला पाठिंबा पहिल्यांदाच अनुभवायला मिळाला. त्यामुळे यापुढे कलाकार कधीच बोलत नाहीत किंवा भूमिका घेत नाहीत, असे सरसकट विधान करणे चुकीचे ठरेल.

नकाबपोष

जाणवत नाहीत जे नकाबपोष

त्या सगळ्यांना आता ओळखायला हवं

फाडायला हवेत त्यांच्या चेहऱ्यावर

न दिसणारे बुरखे

 

बुरखेधारी येतात रिकाम्या हातांनी

नि चढवतात चेहेऱ्यावर बुरखे नेमक्यावेळी

पोकळ शब्दांच्या मागे उभे राहून

 

आपल्या आसपासच आहेत असतात

राजरोस सभासमारंभांतून आपल्याच

टेबल्सवर बसून बेगडी मांडत राहतात काही

बरळत राहतात कला संस्कृती राजकारण

आरक्षण निरीक्षण त्यांच्या चष्म्यातलं

देशविदेशातलं जात र्धम देव नास्तिकपण

पण घरी जाऊन कुणी कुणी काढतात देव

कपाटात लपवून ठेवलेले पूजतात

चार भिंतींतल्या आस्तिकतेने

आपल्या डावीकडे उजवीकडे

पुढे मागे जरा पलीकडे नजर फिरवा

बघा नीट दिसतील कदाचित

ओळखू येणार नाहीत जाणवतील

त्यांच्या एखाद्या वाक्यातून प्रतिक्रियेतून

कळतील न कळतील मुद्दाम राहतील

संदिग्ध निर्विकार तटस्थ स्थितप्रज्ञ

 

त्यांच्याकडे लक्ष द्या बोला त्यांच्याशी

साधा संवाद करा प्रश्न उपस्थित

मांडा बाजू दाखले द्या सांगा उलगडून

इतिहास कसा कुणी कुठे का बदल्ला

 

कसं फुटलं हे वर्तमानाचं मोहोळ

हळूहळू पाण्यावरल्या तवंगासारखा एक

झिरझिरीत बुरखा उमटू लागेल त्यांच्या चेहेऱ्यावर

तो फाडा आधी विवस्त्र करा त्यांना विचारांनी

त्या बुरख्याखालच्या डोक्यात

त्यांनी दडवली असतील जी शस्त्रं बहुजनांत वाटण्यासाठी

 

ती काढून घ्या अंगावर घेऊ  नका शिव्या

त्यांच्या त्यांना परत द्या

 

मग करा सुरुवात एका निष्फळ प्रार्थनेला

सुफळ होण्यासाठी कळोत म्हणा

त्यांच्या त्यांना घोषणा

दिसोत सारी जम्ख्मी शहरं

येवोत ऐकू आकांत मनामनांत गुदमरले

घशाघशात घुसमटते आक्रोश फुटोत

त्यांच्या मनात उठोत करुणांचे स्तोत्र

 

गळून पडोत त्यांचे बुरखे न दिसणारे

आणि स्वच्छ होवोत त्यांचे चेहेरे काचेसारखे

– सौमित्र

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2020 4:44 am

Web Title: article on bollywood celebrities on comment on the problem
Next Stories
1 ‘कभी ईद कभी दिवाली’
2 पुन्हा कलगीतुरा!
3 नाट्यरंग : झुंडबळी.. मीडियातला!
Just Now!
X