आशयमांडणी, दिग्दर्शनाची शैली यात सातत्याने प्रयोग व्हायला हवेत आणि हे सर्जनशील मंथन फक्त लेखक-दिग्दर्शकांपुरती मर्यादित न राहता कलाकारही त्यात सक्रिय सहभाग घेतात. तेव्हा या घुसळणीतून जन्माला येणाऱ्या कलाकृती आपलं एक वैशिष्टय़ घेऊन येतात. ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झालेला ‘छलांग’ हा असाच वेगळेपणा घेऊन आलेला आहे. हंसल मेहता यांनी पहिल्यांदाच दिग्दर्शित केलेली ‘स्कॅम १९९२’ ही वेबमालिका सध्या लोकांचं लक्ष वेधून घेते आहे. आत्तापर्यंत दहशतवादापासून आर्थिक घोटाळ्यांपर्यंत सातत्याने गंभीर विषय चित्रपटांतून मांडणाऱ्या हंसल मेहतांनी पहिल्यांदाच खेळावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अर्थात, खेळाच्या माध्यमातून आयुष्याबद्दल काही सांगू पाहण्याचा प्रयत्न ही मेहतांची शैली याही चित्रपटात दिसून येते आणि तरीही त्यांच्या नेहमीच्या धाटणीपेक्षा पूर्ण वेगळा अनुभव देणारा असा हा चित्रपट आहे.

‘छलांग’ची कथा तशी सर्वसामान्य आहे. हरयाणातील एका छोटय़ाशा गावातील शाळेत पीटी शिक्षक म्हणून मुलांना खेळाचे प्रशिक्षण देणे सोडून हरकाम करणारा तरुण महिंदर ऊर्फ मोंटूची ही कथा आहे. एक चांगला मित्र, सतत त्याच्याबरोबर सावलीसारखे असणारे मार्गदर्शक कम मित्र शुक्ला सर, प्रेमळ आई-वडील आणि छोटा भाऊ या सगळ्यांच्या छायेत सुरक्षित असलेला, कोणतेही काम गांभीर्याने न घेता आहे त्यात सुखीसमाधानी असलेल्या मोंटूच्या आयुष्यात दोन व्यक्तींमुळे वादळ येतं. शालेय शिक्षणात पीटी हा सक्तीचा विषय झाल्याने मोंटूच्या डोक्यावर आणून बसवलेले वरिष्ठ पीटी प्रशिक्षक सिंग आणि मुलांना कॉम्प्युटर शिकवण्यासाठी नव्याने नियुक्त झालेली नीलिमा. पाहताक्षणी नीलिमाच्या प्रेमात पडलेल्या मोंटूला तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची लवकरच जाणीव होते. वरवर पाहता सगळं ठीक दिसत असलं तरी मुळात मोंटू कुठलंच काम जबाबदारीने करत नाही आहे, याची जाणीव त्याला नीलिमा करून देते. पहिल्यांदाच आपल्या उणिवांशी सामना करणाऱ्या मोंटूला दुसरा धक्का बसतो तो सिंगचा. मुलांना गांभीर्याने खेळाचे प्रशिक्षण देणारे सिंग आणि मोंटू यांच्यात संघर्ष सुरू होतो. आणि या संघर्षांतूनच मोंटूला स्वत:ची खरी ओळख होते, अशी या चित्रपटाची सर्वसाधारण कथा आहे. खेळ हा या चित्रपटाचा महत्त्वाचा भाग आहे कारण, दोन प्रशिक्षकांमध्ये योग्य कोण हे ठरवण्यासाठी तीन खेळांची निवड होते. कबड्डी, धावणे आणि बास्केटबॉल. या तिन्ही खेळांमध्ये दोन्ही प्रशिक्षकांनी निवडलेली मुलांची आपापली टीम, त्यांचे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष स्पर्धा हा सगळाच भाग दिग्दर्शक हंसल मेहता यांनी खूप तपशिलात आणि छान रंगवला आहे. दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेता राजकुमार राव ही आत्ताची यशस्वी आणि वेगळे चित्रपट देणारी जोडगोळी आहे. या जोडगोळीने आत्तापर्यंत जे चित्रपट केले आहेत, त्यापेक्षा ‘छलांग’ वेगळा आहे.

इथे या जोडीला निर्मात्याच्या भूमिकेत अजय देवगणसारख्या कलाकाराचे बळ मिळाले असल्याने निर्मितीमूल्यातही चित्रपट कुठेच कमी पडत नाही. पण अजयसारखा मोठा कलाकार निर्माता म्हणून या चित्रपटाशी जोडला गेला असला तरी त्याने दिग्दर्शनाच्या शैलीत काडीचाही फरक पडलेला नाही. त्यामुळे ‘छलांग’ची गोष्ट कितीही सर्वसामान्य असली तरी त्याची वास्तव मांडणी, हरयाणातल्या छोटय़ाशा गावचे प्रतिबिंब सहजी उमटेल अशा पद्धतीचे कथालेखन आणि दिग्दर्शन यामुळे चित्रपटाचा निश्चितच सकारात्मक प्रभाव पडतो. इथे नायिकेलाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, तिचे विचार आहेत. एखाद्या व्यक्तीवर प्रेम जडले, म्हणून आंधळेपणाने त्याच्या दोषांशी तडजोड न करता ते त्याला दाखवून देणारी, व्यावहारिक जगाचे भान ठेवून वावरणारी आणि त्याच्यातली बदलाची तयारी दिसल्यावर त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी नायिका यात दिसते. काळ आणि वास्तवाचे भान ठेवून केलेली मांडणी यामुळे हा चित्रपट वेगळा ठरतो. हरयाणवी संवाद, त्याचे सहज उच्चारण यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनत यामुळे चित्रपट अधिक रंगत जातो. रूढार्थाने काळे-पांढरे अशा व्यक्तिरेखा यात नाहीत. शाळेच्या मुख्याध्यापिका आणि शुक्ला सर यांच्यातील प्रगल्भ नातेसंबंध, एरव्हीही कठीण परिस्थितीत अशा नात्यांना आजमावण्याचा केला जाणारा प्रयत्न हे खूप सहज आणि तितक्याच बारिकीने दिग्दर्शकाने मांडलं आहे. राजकुमार रावने त्याच्या सहजशैलीत ही भूमिका रंगवली आहे. मात्र त्याच्याबरोबरीने झालेली कलाकारांची निवडही चित्रपटासाठी अधिक महत्त्वाची ठरली आहे. सौरभ शुक्ला, सतीश कौशिक, ईला अरुण ही जुनीजाणती मंडळी यात आहेत. शिवाय, मोहम्मद झीशान अय्युबसारखा उत्तम कलाकार यात आहे. त्यामुळे एका क्षणी राजकुमार राव आणि झीशान अशा दोन तगडय़ा कलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी यात पाहायला मिळते. पण हा संघर्ष हे चित्रपटाचे मुख्य कथानक नाही. त्यामुळे इथे या जुगलबंदीलाही वेगळे परिमाण मिळाले आहे. उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय, उत्तम पटकथा, चुरचुरीत संवाद या सगळ्यांच्या जोरावर मारलेली ही ‘छलांग’ सकारात्मक आणि सुखद अनुभव आहे.

छलांग

दिग्दर्शक – हंसल मेहता

कलाकार – राजकुमार राव, नुसरत भरूचा, मोहम्मद झीशान अय्यूब, सतीश कौशिक, सौरभ शुक्ला, ईला अरुण, नमन जैन, गरिमा कौर, बलजिंदर कौर.