News Flash

वेबबाला : भारतीय अवतारातील क्रिमिनल जस्टिस

इंग्लंडमध्ये २००८ साली गाजलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेची अमेरिकन पुनर्निमिती ‘द नाइट ऑफ’ या नावाने करण्यात आली होती.

(संग्रहित छायाचित्र)

सुहास जोशी

एखादा गाजलेला चित्रपट किंवा मालिकेची दुसऱ्या भाषेत पुनर्निमिती (रिमेक) करताना मूळ कलाकृतीची पुण्याई बरोबर असली तरी दुसऱ्या भाषेतील कलाकृतीवर देखील स्वतंत्रपणे मेहनत घ्यावीच लागते. केवळ पूर्वपुण्याईवर ती कलाकृती इतर भाषिकांनादेखील आवडेलच याची खात्री देता येत नाही. अशी मेहनत हॉटस्टारवरील सध्या गाजत असलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेत दिसून येते. किंबहुना तिला चढवलेला भारतीय साज चांगलाच जमला असल्याने ती भारतीय मालिकाच वाटते. इंग्लंडमध्ये २००८ साली गाजलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेची अमेरिकन पुनर्निमिती ‘द नाइट ऑफ’ या नावाने करण्यात आली होती. तर सध्या मूळ नावानेच या मालिकेचे भारतीय पुर्ननिर्माण करण्यात आले आहे.

मध्यवर्गीय घरातील होतकरू तरुण आदित्य शर्मा याची ही कथा आहे. वडील आणि बहिणीचा नवरा दोघे मिळून अ‍ॅपआधारित टॅक्सी चालवत असतात. एके रात्री फुटबॉल सामन्यातील विजय साजरा करण्यासाठी आदित्य हीच टॅक्सी घेऊन निघतो. वाटेत काही प्रवाशांना टॅक्सीसेवादेखील पुरवतो. पण प्रवासी स्वीकारणे बंद करत असताना त्याच्या टॅक्सीत जबरदस्तीने बसलेल्या सनाया रथमुळे त्याच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ होते. श्रीमंताघरची लेक असलेली सनाया काही वर्षांपूर्वी अमली पदार्थाच्या आहारी गेलेली असते. कालांतराने त्यातून बाहेरदेखील पडते. पण त्या दिवशी ती पुरती त्रासलेली असल्याने अमली पदार्थाचे सेवन करते. या सर्व त्राग्यात टॅक्सीत विसरलेला भ्रमणध्वनी परत देण्यासाठी आदित्य तिच्या घरी जातो. सनाया त्याला दारू पिण्याचा आग्रह करते. त्याला अमली पदार्थदेखील देते आणि त्या दोघांमध्ये शरीरसंबंध होतो. रात्री उशिरा आदित्यला जाग येते तेव्हा सनायाचा खून झालेला असतो. आदित्य घाबरून घर सोडतो, त्याच गडबडीत त्याचा अपघात होतो आणि तो अलगद पोलिसांच्या तावडीत सापडतो. सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध असतानादेखील आदित्य गुन्हा कबूल करत नाही. त्यातूनच मग तुरुंग, कोर्टातील युक्तिवाद वगैरे लांबलचक गोष्टी सुरू होतात.

गुन्हे उकल, कोर्ट ड्रामा, तुरुंगातील अनागोंदी, न केलेल्या गुन्ह्यात गोवल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाला होणारा मानसिक त्रास अशा अनेक बाबींना एकाच वेळी ताकदीने मांडणारी मालिका केवळ गुन्हे उकल कथा न राहता अशा अनेक मुद्दय़ांवर प्रकाश टाकणारी कलाकृती ठरते. अशा अनेक बाबी गुंफत कथानक बांधताना एखाद्याच मुद्दय़ावर अडकून राहण्याने इतरांना योग्य न्याय मिळण्याची शक्यता कमी असते. पण येथे ही मालिका अनेक कसोटय़ा पार करते. अनेकदा नाटय़मयता निर्माण करण्याच्या नादात अतिशोयक्तीचादेखील अतिरेक होत असतो, पण या मालिकेत असे प्रसंग जाणीवपूर्वक टाळलेले दिसतात. थोडेफार कर्मधर्मसंयोग आहेत, पण ते खपून जातात.

प्रेक्षकांना पकडून ठेवण्याची ताकद कथानकात आहेच, पण येथे कलाकारांचे काम हादेखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पंकज त्रिपाठीची प्रतिमा ही बहुतांशपणे थंड डोक्याचा गँगस्टर वगैरे भूमिकांची आहे. पण येथे तो एक हुशार पण परिस्थितीने गांजलेला वकील साकारतो. हा बदल त्याने अतिशय ताकदीने स्वीकारून ते पात्र उभं केलं आहे. त्याचबरोबर जॅकी श्रॉफ हा या मालिकेच्या निमित्ताने वेबसीरिजच्या विश्वात प्रथमच अवतरला आहे. तुरुंगातील दादा त्याने बऱ्याच प्रमाणात चांगलाच वठवला आहे. त्याचे हे काम काही अगदी उत्तम वर्गवारीतले नसले तरी त्याचा हा प्रयोग दखल घ्यावा असा आहे. आदित्य शर्माची भूमिका साकारणारा विक्रांत मेसी याचा भूमिकेतील वावर तर अत्यंत सहज आहे.

सेक्स, दारू आणि शिव्या हा हल्ली वेबसीरिजचा टिपिकल फॉम्र्यूला म्हणून वापरला जाताना दिसतो. येथेदेखील त्या गोष्टींचे अस्तित्व आहे. ते केवळ कथेच्या गरजेपुरतेच असल्याने त्यामुळे अडखळायला तर होत नाहीच, पण त्यांचा नेमका परिणाम मात्र अगदी व्यवस्थित साधला जातो.

मालिकेचा कालावधी जरा लांबला आहे हे नमूद करायला हवे. मूळ मालिका केवळ पाचच भागांची होती. पण येथे त्यापेक्षा थोडय़ा कमी लांबीचे दहा भाग आहेत. त्यामुळे मधल्या काही टप्प्यांवर थोडंसं का होईना कंटाळवाणा प्रकार झाला आहे. तिग्मांशु धुलिया आणि विशाल फुरिया या दोघांनी ही मालिका दिग्दर्शित केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनातील फरक अनेक ठिकाणी खटकत राहतो. तसेच काही अनावश्यक प्रसंग, तर्काला वाव दिल्यास अतार्किक प्रसंग कमी करता आले असते तर ही मालिका आणखीनच प्रभावी ठरली असती. अर्थात सध्या जे काही पाहायला मिळते ते नक्कीच उत्तम आहे. मूळ मालिका भारतीय नसली तरी त्याचे पुनर्निर्मितीकरण सुखावणारे आहे हे नक्कीच. किंबहुना इतर वेळी मूळ कथानकाच्या नावाखाली काही तरी टपराट दाखवण्यापेक्षा तर ही मालिका नक्कीच उजवी आहे.

क्रिमिनल जस्टीस

ऑनलाइन अ‍ॅप – हॉटस्टार

सीझन – पहिला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 12:33 am

Web Title: article on criminal justice indian series
Next Stories
1 पुस्तकपाळ  आणि जगाचा अंत
2 चित्र चाहूल : हे प्रेम प्रेक्षकांचे..!
3 हा अभिनेता करणार ‘बिग बॉस मराठी २’चे सूत्रसंचालन
Just Now!
X