रेश्मा राईकवार

चित्रपटगृह सुरू होतील का? सुरू झाले तरी एरव्हीही मराठी चित्रपटांना फारसा न येणारा प्रेक्षकवर्ग करोनाकाळात मराठी चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात येईल का? चित्रपटगृह प्रदर्शन नाही तर किमान आपले चित्रपट ओटीटीवर जातील का? ओटीटीही नाही तर थेट सॅटेलाइट प्रदर्शन किंवा ‘पेपर व्ह्य़ू’सारखे जे नवीन पर्याय उभे राहत आहेत ते तरी आपल्याला फळतील का? असे अनेक ‘का’ सध्या मराठी चित्रपट व्यवसायासमोर आणि विशेषत: निर्मात्यांसमोर उभे आहेत. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या, पण कुठल्याच पद्धतीने प्रदर्शित न होऊ शकणाऱ्या मराठी चित्रपटांची या करोनाकाळात खरोखरच कोंडी झाली आहे.

चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेतला गेला तेव्हा प्रदर्शनासाठी तयार असलेले जवळपास ४० मराठी चित्रपट होते. त्यानंतर पोस्ट प्रॉडक्शन थांबलेले किंवा चित्रीकरणाचा काहीच भाग बाकी आहे असे २० ते २५ चित्रपट होते. आता चित्रीकरणावरचे निर्बंध उठले असल्याने हेही चित्रपट पूर्ण होतील. त्यामुळे केवळ प्रदर्शनासाठी वाट पाहणारे असे कमीत कमी ५० ते ६० मराठी चित्रपट आहेत. गेले पाच महिने अनेक मराठी चित्रपट निर्माते चित्रपटांचे प्रदर्शन कधी आणि कसे होणार, या चिंतेत आहेत. हिंदीतही अनेक चित्रपट या काळात रखडले होते, मात्र त्यातल्या अनेक चांगल्या चित्रपटांनी अ‍ॅमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स, डिस्ने-हॉट स्टारसारख्या मोठमोठय़ा ओटीटी प्लॅटफॉम्र्सचा आधार घेतला. हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चोखाळलेल्या ओटीटी वाटेने जाण्याचा मार्ग मराठी चित्रपट निर्मात्यांनीही चाचपडून पाहिला, पण मराठी चित्रपटांना त्यात फारसे यश आले नाही. या मधल्या काळात मराठी चित्रपटांसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉम्र्स निर्माण करण्याचे प्रयत्नही अखिल भारतीय चित्रपट महामंडळाबरोबरच काही खासगी कं पन्यांकडूनही सुरू झाले आहेत. मात्र ओटीटीच्या माध्यमातून जगभरात चित्रपट पोहोचवण्यासाठी त्या प्रकारचे सव्‍‌र्हर आणि तत्सम यंत्रणा वेगवेगळ्या देशांत उभी करणे गरजेचे ठरते. जगभरातील संपर्क यंत्रणा वाढवणे, सातत्याने नवनवीन आशय देत राहणे आणि जो आशय विकत घेतला आहे त्यासाठी तितको आर्थिक मोबदला देणे या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या पूर्ण करणे हे स्वतंत्रपणे उभ्या राहणाऱ्या ओटीटी माध्यमांसमोरचे आव्हान असणार आहे, असे मत जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी व्यक्त केले.

मराठीसाठी स्वतंत्र पर्याय उभे राहण्याच्या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यादरम्यान प्रस्थापित ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठीचे प्रयत्न निर्मात्यांकडून सुरू आहेत; पण त्यातही मोठय़ा बजेटचे आणि चांगले कलाकार असलेले चित्रपट या प्रस्थापित ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर जातीलही. लहान बजेट असलेल्या चित्रपटांना मात्र हा पर्याय उपलब्ध नाही, अशी खंत दिग्दर्शक मुन्नावर भगत यांनी व्यक्त केली. त्यांचा ‘गाव पुढे आहे’ हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. त्यासाठी चित्रपटाचा ट्रेलर जवळपास शंभर चित्रपटगृहांतून दाखवण्यात आला. केवळ त्यासाठी ७ लाख रुपये इतका खर्च आला. मुद्रित-इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरातींवर ३ ते ४ लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र ऐन वेळी चित्रपटगृहांवर बंदी आली आणि हा सगळा खर्च वाया गेला आहे, असे भगत यांनी सांगितले. चित्रपटगृह पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, पण करोना अद्याप संपलेला नसताना चित्रपटगृहात मराठी चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक येणार का, हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. ‘पे पर व्ह्य़ू’सारखा पर्यायही छोटय़ा चित्रपटांसाठी जास्त लाभदायक नसल्याचे भगत सांगतात. ‘पे पर व्ह्य़ू’मध्ये जेवढे प्रेक्षक चित्रपट पाहतील त्यांच्या ४० टक्के  रक्कम निर्मात्यांना मिळणार आहे. यातून निर्मितीखर्चही सुटू शकणार नाही. चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाला तरच काही फायदा होऊ शकतो, मात्र त्यासाठी अजून किती काळ वाट पाहावी लागणार याची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. मराठीत छोटय़ा बजेटच्या चित्रपटांची संख्या अधिक असल्याने भगत यांच्यासारख्या अनेक दिग्दर्शक-निर्मात्यांना आपल्या चित्रपटांची चिंता सतावते आहे.

मराठीतील काही चित्रपट ‘अ‍ॅमेझॉन प्राइम’सारख्या ओटीटी प्लॅटफॉम्र्सवर प्रदर्शित झाले आहेत, पण त्यातील अनेक चित्रपट हे शेअरिंग तत्त्वावर दाखवले जात आहेत. त्यांना अपेक्षित असे उत्पन्न विक्रीतून मिळालेले नाही. मुळात ओटीटीवर चित्रपट पाहण्याची मराठी प्रेक्षकांना सवय नाही. त्यामुळे सहजतेने ते त्या माध्यमाकडे वळणार नाहीत आणि प्रेक्षक नाहीत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉम्र्सही मराठी चित्रपट विकत घेण्यात फारसा रस दाखवत नाहीत, असे मत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी व्यक्त केले. ओटीटी कं पन्यांनीही मराठी चित्रपटांची त्यांच्या माध्यमातून जाहिरात करणे आवश्यक आहे, असे ते सांगतात. सध्या सॅटेलाइट हक्कही विकले जात नाहीत त्यामागे सॅटेलाइट कं पन्यांचे आर्थिक नुकसान हे जसे कारण आहे तसेच सॅटेलाइटवर किंवा ओटीटीवर चित्रपट आधी प्रदर्शित झाले तर आपल्याला अनुदान मिळणार नाही, अशी शंका काही निर्मात्यांच्या मनात आहे. मात्र हे साफ चुकीचे आहे. चित्रपटगृह बंद असल्याने तुम्ही आधी ओटीटी किंवा सॅटेलाइटवर चित्रपट दाखवला आणि मग नियमानुसार चित्रपटगृह सुरू झाल्यावर चित्रपट प्रदर्शित के ला तरी तुमचे चित्रपट अनुदानास पात्र ठरतात, असे भोसले यांनी स्पष्ट केले. सध्याच्या काळात कमीत कमी खर्चात प्रेक्षकवर्ग मिळवून देणारे ओटीटी हे एकच माध्यम असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. चित्रपटगृह प्रदर्शन सुरळीत होऊन व्यवसाय पूर्ववत व्हायला आणखी काही महिने जावे लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत मराठी चित्रपटांनी वेगवेगळे पर्याय अजमावून पहायला हवेत, असा एक सूर निघतो आहे, तर जाणकार मात्र चित्रपटगृह सुरू होऊन व्यवसाय पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे आणि तोवर आपण संयम दाखवला पाहिजे, यावर ठाम आहेत.