23 July 2019

News Flash

‘सशक्त कथा आणि भूमिका अभिनेत्यासाठी पर्वणी’

आव्हानं पेलण्यायाविषयी संदीप म्हणाले, अभिनेता म्हणून मुख्य भूमिकेत काम करताना आव्हान नव्हतं.

संदीप कुलकर्णी

‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘ट्रॅफिक सिग्नल’ या चित्रपटांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेते अभिनेते संदीप कुलकर्णी नेहमीच वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर आले. ‘अवंतिका’सारख्या मालिकांमधून छोटा पडदाही गाजवला. आता ते ‘डोंबिवली रिटर्न’ या आगामी चित्रपटात निर्माता आणि अभिनेता हे आव्हान एकत्रित पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत..

आव्हानं पेलण्यायाविषयी संदीप म्हणाले, अभिनेता म्हणून मुख्य भूमिकेत काम करताना आव्हान नव्हतं. तरीही त्याच्यासाठी वेगळी मेहनत आणि वेगळं लक्ष द्यावं लागत होतं. परंतु निर्माता म्हणून आव्हान त्यापेक्षा मोठं होतं. चित्रपटाच्या बजेटमध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत निर्मितीचं आव्हान होतं. पण वेगळं करून पाहण्याच्या प्रयत्नाने ते साध्य झालं. त्याला कलाकार आणि तंत्रज्ञांची चांगली साथ लाभली.

चित्रपटातील त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. माधव आपटेच्या भूमिकेत चित्रपटातील शेवटच्या प्रसंगाला ‘मला विंडो सीटजवळ बसवा, म्हणून त्याचं सांगणं’, ते दृश्यही कित्येकांच्या स्मरणात आहे, त्याविषयी संदीप कुलक र्णी म्हणाले, संवाद किंवा काही घटना-प्रसंग, भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहतात, याचं श्रेय अभिनेत्यापेक्षा लेखकाला द्यायला हवं. अशा सशक्तपणे लिहिलेल्या कथा आणि भूमिका अभिनेत्यासाठी एक पर्वणी असते. अशा भूमिका समर्थपणे साकारताना अभिनेत्याची कसोटी लागते. पण मुळात कथाच परिणामकारक नसली तर कितीही प्रसिद्ध अभिनेता असला तरी तो चित्रपट यशस्वी होत नाही. चित्रपटाचं लेखन आणि त्याचं सादरीकरण उत्तम झालं तर तो चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. ‘डोंबिवली रिटर्न’ हाही चित्रपट प्रेक्षकांच्या स्मरणात राहील, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

गेल्या आठवडय़ात अकरा मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित झाले, त्यानंतर हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांचं आव्हानही होतं ते वेगळंच. यामागे नेमकं काय कारण आहे, निर्माता म्हणून तुम्ही याकडे कसं पाहता, असं विचारल्यावर संदीप म्हणाले की निर्माता म्हणून काही गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. निर्मितीप्रक्रिया पार पाडताना सगळे सोपस्कार नीट व्हायला हवेत. आशय प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचवायला हवा, तुमची माध्यमं काय काय आहेत. चित्रपट प्रदर्शित होताना काम पाहणारा चमूही तितकच महत्त्वाचा असतो. वितरण करणाऱ्या चमूने योग्य प्रकारे काम केलं नाही, तर चित्रपट जास्तीतजास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना अडथळे येऊ शकतात.आमचा चित्रपट नोव्हेंबरमध्येच प्रदर्शनासाठी तयार होता. परंतु मराठीत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात चित्रपट एकापाठोपाठ एक येत होते. या गोष्टींचा विचार करून फेब्रुवारीतील तारीख निवडली. कारण आपलं नुकसान करायचं आणि दुसऱ्याचंही करायचं हे योग्य नाही, असं मत कुलकर्णी यांनी मांडलं. मराठीतील निर्मात्यांमधील संवादाच्या अभावामुळे हे घडतंय का, यावर ते म्हणाले, चित्रपट निर्मिती क्षेत्राचं ज्ञान नसणं हेच यामगचं कारण आहे. त्यामुळे निर्मिती करताना वरून त्या त्या क्षेत्राचं ज्ञान नसलं की नुकसान होतंच. म्हणून व्यवसाय करताना त्याविषयी माहिती असायला हवी. या मुद्दय़ाकडे त्यांनी लक्ष वेधले.

चांगला चित्रपट प्रेक्षकांना काहीना काही अनुभव देऊन जातो. किंवा तो आपल्यातली संवेदना जागवतो. विचार करायला लावतो. भावनेची तार छेडून जातो. कधी कधी साधा चित्रपट असतो, पण तो तुमच्या भावनेला साद घालतो. ‘विजय आनंद’ यांचे चित्रपट पाहायला मला अजूनही मजा येते. नागेश कुकनूर, नागराज मंजुळे यांसारख्या दिग्दर्शकांचे चित्रपट मला पाहायला आवडतात. याला मी चांगला चित्रपट म्हणतो असं कुलकर्णी म्हणाले. बाकी तांत्रिक गोष्टी सर्व स्तरातील प्रेक्षकांना कळतातच असं नाही. पण चित्रपटाने तुम्हाला छान अनुभव दिला असेल तुम्ही त्याविषयी इतरांना सांगता. पूर्वी असंच व्हायचं. ‘डोंबिवली फास्ट’, ‘श्वास’ हे चित्रपट यशस्वी झाले, कारण प्रेक्षकांना ते आवडले आणि त्याविषयी त्यांनी इतरांना सांगितले. प्रेक्षकांनी चित्रपट आवडल्यावर त्याबद्दल इतरांना सांगणं महत्त्वाचं आहे, तसंच  त्यांनी आजच्या तरुणाईलाही तो चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहा म्हणून सांगणंही आवश्यक आहे, असं संदीप म्हणाले.

‘डोंबिवली रिटर्न’ची कथा डोंबिवलीला राहणाऱ्या एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाची आहे. मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागात तो छायाचित्रकार आहे. सुखवस्तू माणूस आहे. त्याचं कुटुंब आहे. तो ते आयुष्य छान जगतोय. छोटय़ा छोटय़ा गोष्टींमध्ये आनंदी आहे. पण सगळं ठीक चाललेलं असताना त्याच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं ज्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात उलथापालथ होते, याची ही कथा आहे. ‘डोंबिवली रिटर्न’ हे नाव चित्रपटाला का देण्यात आले आहे, ते चित्रपट पाहिल्यावर लक्षात येईल. आणि तेच नाव सार्थ आहे, याचीही खात्री पटेल.

वेबसीरिज हे एक मुक्त आणि प्रभावी माध्यम आहे. कितीतरी चांगले लेखक, कलाकार या माध्यमात काम करताना दिसत आहेत. या माध्यमाला कुठल्या मर्यादा नाहीत, तुम्हाला चित्रपटगृह मिळणार का, वितरण नीट होईल का, अशी चिंता या माध्यमातील निर्मात्यांना नसते. उलट चांगल्या आशयाला प्लॅटफॉर्म मिळाला की तुमचं काम त्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं.

संदीप कुलकर्णी

First Published on February 17, 2019 1:08 am

Web Title: article on dombivli returns actor sandeep kulkarni