News Flash

विदेशी वारे : एक चांगली, एक वाईट..

रॉबर्ट हा आपल्या अभिनयाच्या जोरावरच लोकप्रिय ठरलेला कलाकार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रेश्मा राईकवार

गेल्या वर्षी ‘अ‍ॅव्हेंजर्स : एण्डगेम’मध्ये आयर्नमॅन धारार्तीथी पडला आणि संपलं सगळं.. म्हणत आयर्नमॅन ऊर्फ टोनी स्टार्क ऊर्फ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरच्या चाहत्यांनी घळाघळा आसवं गाळली. माव्‍‌र्हलपटात यापुढे आयर्नमॅन दिसणार नाही, यासारखं दुसरं दु:ख नाही हे खरंच आहे. अ‍ॅव्हेंजर्स चित्रपट मालिकेतील मुख्य हिरो ज्यात कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, हल्क, थॉर या सगळ्यांचीच गोष्ट ‘अ‍ॅव्हेंजर्स : एण्डगेम’मध्ये संपली. मात्र सगळ्यात मोठं दु:ख हे होतं की आता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरचा थोडासा धूर्त, तितकाच हुशार, प्रेमळ आणि तरीही सतत तिरकस बोलणारा टोनी स्टार्क दिसणार नाही. पण, माव्‍‌र्हलने या आपल्या आवडत्या सुपरहिरोला पुन्हा एका चित्रपटापुरता का होईना, प्रेक्षकोंसमोर आणायचं ठरवलं आहे, ही डाऊनीच्या चाहत्यांसाठीची चांगली बातमी आहे. आता चांगले पहिले सांगितल्यानंतर त्याच्याबद्दलची वाईट बातमीही सांगावीच लागणार. माव्‍‌र्हलच्या ‘आयर्नमॅन’ आणि ‘अ‍ॅव्हेंजर्स’ चित्रपट मालिकेतून बाहेर पडल्यानंतर रॉबर्ट डाऊनीचा पहिला चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला तो म्हणजे ‘डॉ. डुलिटिल’. रॉबर्ट हा आपल्या अभिनयाच्या जोरावरच लोकप्रिय ठरलेला कलाकार आहे. त्यामुळे माव्‍‌र्हलच्या बाहेर प्रदर्शित झालेल्या त्याच्या ‘डॉ. डुलिटिल’बद्दल उत्सुकता असणारच होती. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या डॉ. डुलिटिल या चित्रपटाचा रिबूट असल्यानेही त्याबद्दलची उत्सुकता ताणली गेली होती. एडी मर्फी या अभिनेत्याची मुख्य भूमिका असलेली ‘डॉ. डुलिटिल’ चित्रपट मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मात्र इतक्या वर्षांनी प्रदर्शित झालेला त्याचा नवा अवतार मात्र तिकीटबारीवर सपशेल आपटला आहे. विस्कळीत पटकथा, फसलेले अ‍ॅनिमेशन अशी अनेक कारणं यामागे आहेतच, पण रॉबर्ट डाऊनीचा अभिनयही या चित्रपटाला तारू शकेल, असा नसल्याने हा चित्रपट फसल्याची चर्चा आहे. चित्रपटाचं अपयश कोणाचं?, यावरून एकमेकांवर चिखलफेकही सुरू आहे. मात्र चित्रपटापोटी युनिव्हर्सल पिक्चर्सला शंभर दशलक्ष डॉलर्सचा फटका बसल्याचेही बोलले जाते आहे. त्यामुळे माव्‍‌र्हलबाहेरचा डाऊनीप्रयोग फसला असला तरी याच वर्षी पुन्हा एकदा माव्‍‌र्हलमध्ये त्याचे दर्शन होणार आहे.या वर्षी मेमध्ये माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा भाग असलेल्या ब्लॅक विडोचा स्वतंत्र चित्रपट प्रदर्शित होतो आहे. खरं तर एण्डगेममध्ये ब्लॅक विडोच्या कथेचीही अखेर झाली आहे, त्यामुळे स्वतंत्रपणे प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात तिची आधीची कथा दाखवण्यात येणार आहे. या प्रीक्वल चित्रपटात स्कार्लेट जॉन्सन आपल्या नेहमीच्या सुपररूपात प्रेक्षकांसमोर येणार असून रॉबर्ट डाऊनीही टोनी स्टार्क म्हणून चित्रपटात दिसणार आहे. अर्थात, ही आधीची कथा असल्याने डाऊनी फक्त टोनीच्या रूपात दिसणार की आयर्नमॅनच्याही अवतारात प्रेक्षकांसमोर येणार, याबद्दल संभ्रम आहे.

पुन्हा एकदा मॅट्रिक्स!

जुन्याच चित्रपटांचे नव्याने होणारे प्रदर्शन हे नेहमीच सुखावणारे असते असे नाही, पण काही चित्रपटांची मात्र आतुरतेने वाट पाहिली जाते. ‘द मॅट्रिक्स’ हे त्यातलंच एक नाव . हॉलिवूडच्या साय-फायपटांपैकी गाजलेला एक अशा ‘द मॅट्रिक्स’चा चौथा अवतार या वर्षी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. माणूस आणि मशीन्सचे युद्ध खूप हुशारीने मांडणारा हा चित्रपट तिकीटबारीवरही लोकप्रिय ठरलाच, पण तो लोकांनाही खूप आवडला होता. मशीन्सनी पसरलेल्या जाळ्यात अडकलेल्या माणसांची कथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे ‘द मॅट्रिक्स’, ‘द मॅट्रिक्स रिलोडेडे’ आणि ‘द मॅट्रिक्स रिव्हॉल्यूशन’ असे तीन चित्रपट आले आणि तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ‘द मॅट्रिक्स ४’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून या चित्रपटाच्या दिग्दर्शक, कलाकारांची जुनीच टीम नव्याने लोकांसमोर येत आहे. लॅन व्ॉचोवस्की दिग्दर्शित ‘द मॅट्रिक्स ४’ मध्ये या चित्रपट मालिकेची मुख्य जोडी अभिनेता कीनू रीव्हज आणि अभिनेत्री कॅरी अ‍ॅन मॉस हे दोघेही आपापल्या नीओ आणि ट्रिनिटी या व्यक्तिरेखांमध्ये परतले आहेत. त्यांच्याबरोबर लॉरेन्स फिशबर्नही आपल्या भूमिकेत परतले आहेत. मात्र एजंट स्मिथच्या भूमिकेतील अभिनेता ह्य़ुगो विव्हिंग हे चित्रपटात दिसणार नाही आहेत. त्याचीच सध्या समाजमाध्यमांवर चर्चा सुरू आहे. ह्युगो विव्हिंग यांनाही इतर कलाकारांप्रमाणेच ‘द मॅट्रिक्स ४’ या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण त्यांच्या तारखा जुळत नव्हत्या. तारखांवर गेले काही महिने सातत्याने काम सुरू होते. तारखांची जुळवणूक व्हावी यासाठी हरएक प्रयत्न करत असतानाच लॅन व्ॉचोवस्कीने आपला विचार बदलला, असे सांगत दरम्यानच्या काळात आपण ‘द व्हिजिट’ या नाटकाचा प्रस्ताव स्वीकारला होता, असे ह्युगो यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे एजंट स्मिथ या त्यांच्या भूमिकेत आता आपल्याला नवा चेहरा पाहायला मिळेल. गेले काही दिवस कीनू रीव्हजबद्दलही चर्चा सुरू होती. अतिशय शांत, संयमी, हरहुन्नरी, अष्टपैलू आणि तरीही विनम्र अशा कीनू रीव्हजचा नवा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये होतीच. रुपेरी पडद्यावर आशय आणि लोकांच्या प्रेमाचे मॅट्रिक्स साधणारा हा चित्रपट पुन्हा एकदा चाहत्यांना वेगळे काही देईल, अशी अपेक्षा आहे. ‘द मॅट्रिक्स’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित होऊन आता २० वर्षे झाली आहेत. विशी पार करणाऱ्या या खास वर्षांत त्याचा नवा अध्याय सादर करणं यासारखी आनंदाची गोष्ट नाही, असे दिग्दर्शक लॅनने म्हटले आहे. तोच आनंद प्रेक्षकांपर्यंतही त्याच उत्तम पद्धतीने पोहोचावा, हीच मायबाप रसिकांचीही अपेक्षा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2020 4:30 am

Web Title: article on dr dolittle robert tony stark movie abn 97
Next Stories
1 दीपिकाचे कपडे घातले का? कपड्यावरून रणवीर पुन्हा ट्रोल
2 वरुण धवनचा ‘डान्स’ कंगनावर पडला भारी
3 ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर
Just Now!
X