ऑस्करचा फार्स खरं म्हणजे ज्या मंडळींच्या विधानांपासून सुरू झाला, त्याच मंडळींनी हे विसरून आम्ही पुढे चाललो आहोत, तुम्हीही पुढे व्हा.. अशा थाटातील संदेश देत ‘द एन्ड’ची पाटी लावून टाकली. त्यामुळे या छोटेखानी वादविवादावर काही तरी विचारमंथन होण्याआधीच रेहमानसारख्या कोणी तरी उरीचं शल्य व्यक्त केलं काय? त्यांचं दु:ख नेमकं काय आहे हे सांगणारा कपूरी खांदा काय मिळाला आणि रसूल पोकुट्टींनी तुम्ही जे म्हणताय तेच मी प्रत्यक्षात अनुभवलंय म्हणून अधिक विस्ताराने री ओढली काय.. अर्थात, यातून बॉलीवूडचं नेमकं  काय चुकलं आहे किंवा खरंच चुकलं आहे का? यावर किमान खल व्हायला होता. मात्र त्याउलट नेहमीप्रमाणे कंगना राणावतच्या टीमने या ऑस्करच्या वादालाही बॉलीवूडमधील घराणेशाहीचं इंजिन जोडताच मंडळींनी थेट रूळ बदलून आपला प्रवास पुढे न्यायचा निर्णय घेतला.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सध्या बॉलीवूडची पाठ सोडायला तयार नाही. त्याचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा चित्रपट गेल्या आठवडय़ात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जगप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभले आहे. एरव्ही जगभरात विविध गाणी, संगीत करण्यात व्यग्र असलेल्या रेहमानचे संगीत लाभलेली गाणी बॉलीवूडपटांमधून ऐकू  यावीत म्हणून चाहते आसुसलेले असतात. त्यामुळे इतक्या काळाने या चित्रपटातून आलेली रेहमानची गाणी म्हणून त्यांचं कौतुकच वेगळं.. पण रेहमान प्रेमात पुन्हा एकदा आकं ठ बुडायच्या तयारीत असतानाच त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मी चांगल्या चित्रपटांना कधीच नाही म्हणत नाही, पण मला वाटतं बॉलीवूडमध्ये एक गँग आहे जी माझ्याबद्दल सतत गैरसमज पसरवत असते, असं विधान करत आपल्याला हिंदी चित्रपटांचे कामच मिळत नसल्याची खंत खुद्द रेहमानने व्यक्त के ली आणि सगळ्यांचंच धाबं दणाणलं. दोन ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या संगीतकाराला बॉलीवूडमध्ये काम मिळत नसेल तर इतरांच्या व्यथेचा काय पाड लागणार? रेहमान यांनी उल्लेखिलेल्या गँगचा विचार करताना मग पुन्हा एकदा बॉलीवूडमधील घराणेशाही-कं पूशाही याबद्दल चर्चा सुरू झाली. मात्र त्याला ऑस्करची दिशा देण्याचं काम दिग्दर्शक शेखर कपूर यांनी केलं.

खुद्द शेखर कपूर यांच्या दोन हॉलीवूडपटांनी रंगभूषा आणि वेशभूषेसाठी ऑस्कर पुरस्कार मिळवला आहे. रेहमान यांना हिंदीत चित्रपट मिळत नाहीत याचे कारण म्हणजे त्यांना मिळालेला ऑस्कर पुरस्कार. तुम्हाला ऑस्कर पुरस्कार मिळाला म्हणजे तुमचं काम खूपच वरच्या स्तरावरचं आहे जे सर्वसामान्य हिंदी प्रेक्षकांना पचणार नाही, असा साधासरळ अर्थ काढला जातो आणि तुम्ही नेहमीच्या चित्रपटांपासून दूर होता, असं मत शेखर कपूर यांनी व्यक्त के लं आणि खरोखरच ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या कलाकाराबद्दल इंडस्ट्रीत अशी धारणा होत असावी का, यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेचा एक सूर असाही होता की, रेहमानसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांबद्दल समाजात कायमच काही ना काही गैरसमज रूढ होतात. रेहमान रात्री उशिरा गाणी रेकॉर्ड करतो, छोटय़ा-छोटय़ा सुरावटींसाठी गायकांना थेट चेन्नईत पोहोचावं लागतं, वाट पाहावी लागते, अशा चर्चा याआधीही होत होत्याच. अशा अनेक गोष्टी हिंदी चित्रपटसृष्टीतही सर्वोच्च स्तरावर असणारे कलाकार, गायक-गायिका यांच्याबद्दलही बोलल्या जातात. प्रसिद्ध पार्श्वगायक सोनू निगम यांनीही आपल्याला हवी तशी गाणी गायला मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त के ली होती आणि तेव्हाही सोनू निगमचे नखरे, त्याचा राग याचीच चर्चा जास्त झाली होती. त्यामुळे रेहमानच्या बाबतीतही असेच काही झाले असावे किंवा चेन्नईत एवढय़ा लांब जाऊन संगीत करून घेण्यापेक्षा स्थानिक स्तरावर त्यापेक्षा कमी किमतीत, पण दर्जेदार संगीत मिळणे शक्य असेल तर त्याला निर्माता-दिग्दर्शकांकडून प्राधान्य मिळणे हे नवीन गोष्ट नाही, असाही सूर व्यक्त झाला. मात्र शेखर कपूर यांनी म्हटलेला ऑस्करचा शाप आपण प्रत्यक्षात अनुभवला आहे अशी भावना ऑस्करविजेते ध्वनी अभियंता रसूल पोकुट्टी यांनीही व्यक्त केली. ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर मला कोणीही हिंदी चित्रपटात काम देईना. अनेक निर्मिती संस्थांनी आम्हाला तुझी गरज नाही, असं तोंडावर ऐकवल्याचंही त्यांनी सांगितलं आणि इंडस्ट्रीतील चुकीच्या प्रथांची पुन्हा एकदा उजळणी सुरू झाली.

खरं तर रेहमान, रसूल पोकुट्टी या दोन दिग्गज व्यक्तींच्या तोंडून निघालेला हा सल ऐकल्यानंतर खरोखरच अशा पद्धतीने हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलं जातं का? आणि असं होत असेल तर त्या गोष्टी सुधारायच्या कशा? यावर हिंदी चित्रपटसृष्टीत नाही तर किमान संगीत क्षेत्रात तरी चर्चा व्हायला हवी होती; पण त्याआधीच कं गनाच्या टीमने ‘मणिकर्णिका’च्या प्रदर्शनादरम्यान रसूलने कंगनाशी संपर्क साधून आपल्याला आलेल्या या अनुभवाविषयी सांगितले होते, अशी पोस्ट टाकली. इतकंच नाही तर हा वादही बॉलीवूडच्या घराणेशाहीशी कसा जोडलेला आहे, याचे दाखले सुरू झाले. ही चर्चा पुन्हा एकदा भलत्याच गोष्टीकडे वळते आहे हे ध्यानात आलेल्या रसूल पोकुट्टी यांनी स्वत:च हा वाद संपवला. रेहमान यांनी तर त्यांचे विधान व्हायरल झाल्या-झाल्याच आपण हा वाद संपवून पुढे जात असल्याचे जाहीर केले होते. तोच कित्ता गिरवत रसूल पोकुट्टी यांनी वास्तव स्वीकारूनही आपल्यावर विश्वास ठेवून काम करणाऱ्या इंडस्ट्रीतील काही लोकांचे उदाहरण देत आपण या इंडस्ट्रीवर भरभरून प्रेम करत असल्याचे सांगितले. मला हॉलीवूडमध्ये सहज जाता आले असते, मात्र मला आपल्या इंडस्ट्रीतच काम करायचे होते. कुठल्याही क्षेत्रात गेलात तरी लोक तुम्हाला खाली खेचण्यासाठी प्रयत्न करतातच, पण मला इतर कोणाहीपेक्षा माझ्या लोकांवर विश्वास आहे, अशी भावना शेखर कपूर यांच्या ट्विटर पोस्टला उत्तर देताना व्यक्त केली. नंतर कधी तरी मी माझ्या अ‍ॅकॅ डमीतील सहकाऱ्यांशी बोललो तेव्हा त्यांनी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक कलाकारांना याचा सामना करावा लागला आहे, याची कल्पना दिली. मात्र, हा सगळा वाद आता संपला आहे. ज्या दिशेने घराणेशाहीची ही चर्चा सुरू आहे ती मला न पटणारी आहे. मला चित्रपटात न घेतल्याबद्दल मी कोणालाही दोष देत नाही आहे, असे स्पष्ट करत रसूल पोकुट्टी यांनीही या वादावर पडदा टाकला आहे.

त्यामुळे एकू णच एका वादातून जन्मलेल्या या वादाने मूळ पकडण्याआधीच नांगी टाकली आणि आठवडय़ाभराचा हा ऑस्कर फार्सच म्हणायला हवा.. असं हे प्रकरण संपुष्टात आलं आहे. या वादामुळे उडालेल्या ठिणग्या थोडय़ा इथे, थोडय़ा तिथे आणखी काही काळ आग निर्माण करतीलही, पण बॉलीवूड मंडळींचा कमालीचा थंडपणा हा निखारा विझवायला पुरेसा आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.