मानसी जोशी

‘ओटीटी’ म्हणजेच ‘ओव्हर द टॉप’ या नव्या माध्यमाच्या उदयामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक आजी-माजी कलाकारांना पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची उत्तम संधी मिळाली आहे. या ओटीटी माध्यमाने अनेक नव्या कलाकारांना जन्माला घातले, तसेच जुन्याजाणत्या कलाकारांनाही संधीची कवाडे खुली केली आहेत. एकविसाव्या शतकात या ओटीटी माध्यमाचे महत्त्व आणि ताकद जाणतानाच चित्रपटसृष्टीपासून काही काळ दूर गेलेले अभिषेक बच्चन, करिश्मा कपूर, लारा दत्ता, सुश्मिता सेन, अर्शद वारसी, आर. माधवन या कलाकारांनी वेबमालिकांद्वारे पुनरागमन केले. येत्या काही दिवसांत आणखी काही जुने चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

गेल्या पाच वर्षांत ओटीटीची पाळेमुळे भारतात चांगलीच रुजलेली आहेत. एका क्लिकसरशी जगभरातील प्रेक्षकांपर्यंत आपले काम पोहोचवणाऱ्या या नवीन माध्यमाची कलाकारांना भुरळ पडली नसती तर नवल.  आर. माधवन, मनोज वाजपेयी, अभिषेक बच्चन, लारा दत्ता, करिश्मा कपूर, अर्शद वारसी, के . के . मेनन अशा रुपेरी पडदा गाजवलेल्या कलाकारांनी आता वेबमालिकांमधून पुनरागमन केले आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणी या पारंपरिक माध्यमांना छेद देत ही कलाकार मंडळी नवीन माध्यमांचे तंत्र आत्मसात करू पाहत आहेत. चित्रपटांची व्यावसायिक समीकरणे, भूमिकांवर येणाऱ्या मर्यादा, सातत्याने येणारे नवीन कलाकार अशा अनेक कारणांमुळे फार कमी काळात मोठय़ा पडद्यापासून दूर झालेल्या या कलाकारांना ओटीटी माध्यमांमुळे पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. तर एकेकाळच्या आपल्या आवडत्या कलाकारांना वेगवेगळ्या भूमिका आणि आशयातून अनुभवणे हा प्रेक्षकांसाठीही आनंददायी अनुभव ठरला आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइमवर ‘ब्रेथ’ या वेबमालिके त पहिल्यांदा अभिनेता आर. माधवनला प्रेक्षकांनी पाहिले. दोन दशकांच्या अभिनय कारकीर्दीत अभिनयाचा कस पाहणाऱ्या भूमिका तशा त्याच्या वाटय़ाला फारशा आल्याच नाहीत. मात्र ‘ब्रेथ’मध्ये त्याने रंगवलेला आपल्या मुलाला गंभीर आजार असताना त्याचा जीव वाचवण्यासाठी इतरांचे जीव घेणारा हतबल तरी जिद्दी बाप प्रेक्षकांना खूप भावला. याच वेबमालिके च्या दुसऱ्या भागात चक्क अभिषेक बच्चनची वर्णी लागली. ‘‘गेले काही वर्ष मी नवीन कथेच्या शोधात होतो. ‘ब्रेथ २’ची कथा ऐकवल्यावर मी तात्काळ होकार दिला. ओटीटी माध्यमामुळे जगभरातील आशय प्रेक्षकांना पाहायला मिळतो, तसंच आपली भूमिकाही जगभरात पोहोचते त्यामुळे याची निवड केली,’’ असे अभिषेकने म्हटले आहे. माजी विश्वसुंदरी सुश्मिता सेनचेही डिन्से हॉटस्टारवरील ‘आर्या’ या वेबमालिके तून दर्शन झाले. आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर या संपूर्ण वेबमालिके त ती भाव खाऊन गेली. याच मालिके तून आणखी एक हरवलेला चेहरा लोकांसमोर आला तो होता अभिनेता चंद्रचूड सिंग याचा.. गुलजारांच्या ‘माचिस’सारख्या चित्रपटातून काम केलेल्या चंद्रचूडला मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये फारसे यश मिळाले नव्हते. काही चित्रपट के ल्यानंतर गायब झालेल्या चंद्रचूड सिंगने मुलाचा सांभाळ करण्यासाठी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडल्याचे सांगितले. एक कलाकार म्हणून ‘आर्या’ या वेबमालिके तील भूमिका आव्हानात्मक वाटली त्यामुळे भूमिका स्वीकारल्याचेही त्याने स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत लागोपाठ आलेल्या अनेक वेबमालिकांमधून जुन्या चेहऱ्यांना नव्याने प्रेक्षकांनी अनुभवले आहे.

‘द गॉन गेम’ या वेबमालिके तून अभिनेता संजय कपूर,  एकविसाव्या शतकातील पालकांची कहाणी सांगणाऱ्या ‘मेंटलहूड’मधून करिश्मा कपूर, लारा दत्ताने ‘हंड्रेड’ या वेबमालिके तून काम केले. ‘लाइफ इन मेट्रो’, ‘३ इडियट्स’मधील भूमिकेने प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेला शर्मन जोशी याने एकता कपूरची निर्मिती असलेल्या ‘बारीश’ या वेबमालिके च्या दोन्ही पर्वात काम केले. तर एरव्ही विनोदी भूमिकांमधून दिसणारा अभिनेता अर्शद वारसी पहिल्यांदाच ‘असूर’ या वेबमालिके तून एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिके त दिसला. सध्या ‘आश्रम’ या बॉबी देओलच्या वेबमालिके बद्दलही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या वेबमालिके आधी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘क्लास ऑफ ८३’ या वेबपटातूनही तो झळकला आणि त्याच्या भूमिके चे कौतुकही झाले. अभिनेता अक्षय कु मार आणि हृतिक रोशनही लवकरच ओटीटी माध्यमांवर दिसणार आहेत. त्यामुळे हे या कलाकारांचे पुनरागमन म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मत ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त केले.

‘‘ओटीटीमुळे एक नवे आणि मोठे माध्यम कलाकारासांठी खुले झाले आहे. चित्रपटातील अभिनय कारकीर्दीला पर्याय म्हणून ते ओटीटीकडे वळले आहेत, असेही अजिबात म्हणता येणार नाही. आधी कलाकार चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा दोन्ही माध्यमांत काम करत होते. आता ओटीटीच्या उदयानंतर त्यांना आणखी एक माध्यम खुले झाले आहे ज्याचाही ते स्वीकार करताना दिसत आहेत. शेवटी कलाकार म्हणून त्यांनी कोणत्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने काम करायचे या संदर्भातील निवडीचे पर्याय आता त्यांना उपलब्ध झाले असल्याने त्यांना वैयक्तिक निवडीसाठीही वाव मिळाला आहे,’’ असे मत तरण आदर्श यांनी मांडले.

तर कु ठे तरी बॉलीवूडमधील नावाजलेल्या कलाकारांच्या ओटीटीवरच्या आगमनामुळे ओटीटी आणि मुख्य प्रवाहातील चित्रपट ही दोन्ही माध्यमे वेगळी आहेत हा समज गळून पडतो आहे. सध्या करोनाकाळात चित्रपटगृहे बंद असल्याने अनेक कलाकारांचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. अनुष्का शर्मा, शाहरूख खानसारख्या मोठमोठय़ा कलाकार मंडळींनी वेबमालिकांच्या निर्मितीत रस दाखवला आहे. वेबमालिका किंवा वेबचित्रपट अशा विविधांगी पद्धतीने आशयनिर्मितीचे प्रयोग या माध्यमावर ते करत आहेत. हे पाहता चित्रपट आणि ओटीटी माध्यम यातला फरकच नाहीसा होत चालला आहे, असे मत निर्माता अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी व्यक्त केले. अतुल कु लकर्णी, उदय टिके कर अशी मराठमोळी कलाकार मंडळीही वेबमालिकांमधून वेगळ्या भूमिका करत लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीसुद्धा एका वेब मालिकेत दिसणार असून प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांनी आदित्य सरपोतदार यांच्या ‘द रायकर केस’ या वेबमालिके तून या नव्या माध्यमात पदार्पण केले आहे. ओटीटी माध्यमातून मिळणारे आशयनिर्मितीचे स्वातंत्र्यही कलाकारांना खुणावू लागले असल्याने मोठय़ा प्रमाणावर कलाकार वेबमालिकांच्या निर्मितीपासून अभिनयापर्यंत वेगवेगळ्या भूमिकोंत रस घेताना दिसू लागले आहेत.  चित्रपट आणि ओटीटी माध्यमांनी आपापले सहअस्तित्व मान्य केले असून माध्यमांपेक्षाही आशयनिर्मितीवर भर दिला जात असल्याचे मत जाणकार व्यक्त करतात.

पुनरागमन केलेले कलाकार

करिश्मा कपूर – मेंटलहूड

सुश्मिता सेन – आर्या

अभिषेक बच्चन – ब्रेथ २

अर्शद वारसी – असूर

नेहा शर्मा – क्रूक

पीयूष मिश्रा – ईलीगल

मनोज वाजपेयी – द फॅमिली मॅन

अश्विनी भावे – द रायकर केस

जॅकलीन फर्नाडिस – मिसेस सीरियल किलर

संजय कपूर – द गॉन गेम

बॉबी देओल – आश्रम

दिनो मोरिया – हॉस्टेजेस २

लारा दत्ता – हंड्रेड