कलाकार आणि त्यांचे ड्रीम रोल ही गोष्ट न संपणारी आहे. अमुकच एक भूमिका करायची असा काही माझा विचार नाही, असं सांगणारे अनेक कलाकार कधी ना कधी तरी आपल्याला तशी भूमिका मिळाली पाहिजे, असं हमखास बोलून जातात. मात्र ज्यांची भूमिका करायची आहे, त्यांच्यासमोरच ही इच्छा व्यक्त करायचं धाडस करणारे कलाकार विरळाच. सध्या हे धाडस हृतिक रोशनने केलं आहे. पोलिसांनाच त्याने सांगून टाकलं की मला पोलिसांची भूमिका करायची आहे, पण तशी भूमिकाच कोणी देत नाही.

गेल्या वर्षी हृतिक रोशनच्या दोन चित्रपटांनी तिकीटबारीवर चांगली कमाई केली आणि लोकांच्याही पसंतीस ते उतरले. त्यामुळे साहजिकच त्याचा भाव पुन्हा वधारला आहे. हृतिकला ‘सुपर ३०’मध्ये लोक स्वीकारणार नाहीत, तो अ‍ॅक्शन हिरो आहे किंवा त्याला ओढूनताणून आनंद कुमारसारखे दिसावे यासाठी रंग चढवण्यात आला आहे, अशी खूप टीका झाली. प्रत्यक्षात हा चित्रपट चांगला चालला. आणि पाठोपाठ तो त्याच्या अ‍ॅक्शन हिरोच्या भूमिकेत ‘वॉर’मधून लोकांसमोर आला. इथे त्याची जोडी टायगर श्रॉफबरोबर जमवून आणली होती, मात्र याही चित्रपटात हृतिकच टायगरपेक्षा भाव खाऊन गेला. आता हृतिकला पोलिसांची भूमिका करण्याची इच्छा आहे. त्याच्या वीस वर्षांच्या कारकीर्दीत त्याने कधीही पोलिसांची भूमिका साकारलेली नाही. एरव्ही त्याच्या पीळदार, बांधेसूद शरीरयष्टीचं कौतुक होतं, मात्र तरीही त्याच्या वाटय़ाला पोलिसांची भूमिका आलेली नाही. त्यात तो पोलिसांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सादरीकरण करत होता. कार्यक्रम करता करता मनातली खंत ओठावर आली आणि त्याने चक्क पोलिसांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

अर्थात, आत्ताच्या हिरोंना एक संधी आहे ते म्हणजे आपल्याला हव्या तशा भूमिका मिळत नसतील तर स्वत:साठी तशा भूमिका निर्माण करायच्या. आताचे कलाकार आपल्याच चित्रपटात सहनिर्माते असतात, त्यामुळे त्यांना हे शक्य होते. मग हृतिकही यात कसा मागे राहणार? त्याने आपल्या दिग्दर्शक-लेखक मित्रांना त्याच्यासाठी पोलिसांची भूमिका असलेले कथानक लिहायला सांगितले आहे. अर्थात, ही माहितीही त्यानेच या जाहीर कार्यक्रमात दिली आहे. त्यामुळे लवकरच तो पोलिसांच्या भूमिकेत लोकांसमोर येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

आणखी एक दाक्षिणात्य नायक..

दक्षिणात्य नायकांचा बॉलीवूडमध्ये येण्याचा सिलसिला कायम आहे. नव्या पिढीतील कलाकार बॉलीवूडमध्ये वेगळे काही करण्याच्या सातत्याने प्रयत्न करत आहेत, मात्र त्यात अजून फारसे कोणाला यश मिळालेले नाही. राणा डुग्गुबातीने हिंदीत आपले एक स्थान निर्माण केले आहे. त्यापाठोपाठ आलेल्या धनुषनेही ‘रांझना’मधून आपला ठसा उमटवला, त्यानंतर मात्र तो कोणत्या मोठय़ा हिंदी चित्रपटात दिसला नाही, पण त्याचे बॉलीवूडला कौतुक आहे हे लपलेले नाही. रामचरण तेजाचा बॉलीवूड प्रवेश फसला. त्यानंतर प्रभास ‘बाहुबली’तून देशभर पोहोचला, पण ‘साहो’ने त्याला फार हात दिला नाही. त्यामुळे त्याचा भव्यदिव्य बॉलीवूड पदार्पण चांगलेच फसले. त्यापाठोपाठ अभिनेता डुलकेर सलमान याने ‘कारवाँ’मधून पदार्पण केले. गेल्या वर्षी डुलकेरने तर ‘द झोया फॅ क्टर’मधून अभिनेत्री सोनम कपूरबरोबरही काम के ले. तोही चित्रपट तिकीटबारीवर फार चालला नाही. ही यादी वाचण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे एवढे सगळे असूनही आणखी एक नवा दाक्षिणात्य चेहरा बॉलीवूडमध्ये दाखल होतो आहे तो म्हणजे विजय देवेरकोंडा.

दक्षिणेतील आघाडीच्या तरुण फळीतील कलाकारांमध्ये सध्या विजय देवेरकोंडा हे लोकप्रिय नाव आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटामुळे हे नाव घरोघर पोहोचले आहे. याही चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी त्याला विचारणा झाली होती, मात्र माझ्या लोकप्रिय दाक्षिणात्य चित्रपटांच्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यात मला फार रस नाही, असे त्याने स्पष्ट सांगून टाकले होते. मात्र तरीही त्याची दक्षिणेतील लोकप्रियता नजरेत भरणारी असल्याने त्याला बॉलीवूडमध्ये आणणे गरजेचे झाले होते. तर अखेरीस या प्रयत्नांना यश आले असून तो लवकरच हिंदी चित्रपटात दिसणार आहे. बॉलीवूडमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात करण जोहर हे नाव अग्रेसर आहे. त्यामुळे विजयचे पर्दापणही ‘धर्मा’नेच होणार आहे. विजयच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटाच्या रिमेकचेही हक्क करणने विकत घेतले आहेत. मात्र आधी सांगितलं तसं विजयने त्याच्या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये काम करायला नकार दिला असल्याने त्याच्यासाठी आता स्वतंत्र हिंदी चित्रपटाचा घाट घातला गेला आहे.

त्याच्या या नव्या चित्रपटाचे नाव ‘फायटर’ असे असणार आहे, त्यात विजयबरोबर राम्या कृष्णन आणि रोनित रॉय यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. बाकी चित्रपटासाठी विजयचीही कडक तयारी सुरू झाली होती. पण या चित्रपटाची नायिका कोण हे निश्चित नव्हतं. सुरुवातीला विजयबरोबर नायिका म्हणून करणने जान्हवी कपूरचेच नाव जाहीर केले होते. मात्र जान्हवीकडे तारखा नसल्यामुळे पुन्हा एकदा नायिकेचा शोध सुरू झाला. मग हा मोर्चा करणनेच पुढे आणलेल्या आणखी एका नायिकेकडे वळला. ती म्हणजे अनन्या पांडे. अनन्याने या चित्रपटासाठी होकार दिला आहे. अनन्या स्वत: विजयची चाहती असल्याने तिने आनंदाने हा चित्रपट स्वीकारला आहे. आता विजय आणि अनन्याची जोडी ‘फायटर’मधून लोकांसमोर येणार आहे. दक्षिणेत लोकप्रिय झालेला हा चेहरा तरी हिंदीत लोकप्रिय होतो का बघायचं..