चाळीसेक वर्षांपूर्वी पतंग दोन पैशाला मिळायचा. अर्धा पेला दूध दहा पैशांत मिळे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये वीस पैशांना अवीट स्वादाच्या बटाटावडय़ाची पुडी मिळत असे. शाळेला जाता-येताना ‘बेस्ट’ प्रवासाला चाट देऊन पायी गेलं की खिशात उरलेल्या वीस पैशांत तेव्हा गावसकर, विश्वनाथ आदी क्रिकेटपटूंचे छान छान रंगीत फोटो संग्रहाकरता मिळत. एवढंच काय, आमच्या गावी बाबी वाण्याच्या दुकानात शंभर ग्रॅमची खमंग शेवेची पुडी अवघ्या ३० पैशांत मिळे. म्हणजे किती स्वस्ताई होती बघा! पण कनिष्टवर्गीय आयुष्य जगणाऱ्यांना हा खर्चही तेव्हा सहजी परवडत नसे. आज त्या पिढीची माणसं हॉटेलात वडा-चहाच्या नाश्त्याकरता आपली मुलंबाळं शंभरेक रुपये सहज मोजताना पाहतात तेव्हा त्यांना आपले जुने दिवस आठवतात. वाटतं, एवढय़ा पैशांत त्याकाळी आपला दहा-बारा दिवसांचा घरखर्च भागे. आज माणसाकडे पैशाचा महापूर आलाय. पैशाला किंमत उरलेली नाही. घराबाहेर पडलं की शंभराची नोट कशी उडाली, कळतदेखील नाही.
साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या ‘पै पैशाची गोष्ट’ या कथेत या बदललेल्या काळाचं, त्यातल्या स्थित्यंतरांचं आणि वर्तमानातील पैसाकेन्द्रित व्यवहाराचं मागच्या पिढीच्या एका वृद्ध स्त्रीच्या नजरेतून केलेलं सिंहावलोकन पाहायला मिळतं. विपुल महागावकर यांनी विजयाबाईंच्या या कथेवर आधारित त्याच शीर्षकाच्या रंगाविष्काराचं दिग्दर्शन केलं असून, अभिनेत्री इला भाटे यांनी त्याचं मंचीय सादरीकरण केलं आहे.
ही गोष्ट पैशाच्या झपाटय़ानं झालेल्या अवनतीची जशी आहे, तशीच ती बदललेल्या माणसांच्या दर पिढीची अन् पैशाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचीदेखील आहे. काळाबरोबर माणसं, त्यांचं जगणं बदलत जातं. गेल्या पंचवीसेक वर्षांत- जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाच्या स्वीकारानंतर तर माणसाच्या जगण्याला इतका प्रचंड वेग आलेला आहे, की आकाशपाळण्यात गरगरणाऱ्या त्याला कशाचंच भान उरलेलं नाही. कष्टांनी परिसीमा गाठली आहे. त्याच्या मोबदल्यात बक्कळ पैसाही हाती येतोय. गरज आणि चैन यांच्यातल्या सीमारेषा पुसल्या गेल्या आहेत. हव्यासाने कळस गाठलाय. आणि या बदल्यात त्याच्या हाती लागलं काय? तर कशानंच माणसाचं समाधान होईनासं झालं आहे. त्यानं आपलं मनस्वास्थ्य गमावलं आहे. भौतिक सुखोपभोगाच्या व्हच्र्युअल जगात मश्गुल झालेल्या, परंतु त्यातून सुख-शांती न मिळाल्यानं सतत अस्वस्थता आणि बेचैनीच वाटय़ाला आलेल्या या माणसांना नेमकं हवंय तरी काय, हेच त्यांचं त्यांना कळेनासं झालं आहे. सतत स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. तिनं त्यांचं जगणं हराम करून टाकलंय. सभोवतालच्या जीवघेण्या स्पर्धेत उतरायचं नाही असं कुणी कितीही ठरवलं तरी त्यांना जबरदस्तीनं त्यात ढकललं जातंय. अन्यथा, इतरांपेक्षा मागे पडण्याची, संपून जाण्याची सनातन भीती त्यांनाही भेडसावतेच. मागच्या पिढीकडे मूलभूत गरजा भागवण्याइतपतही पैसा नव्हता. आजच्या पिढीकडे चैनीपल्याडही अमाप पैसा आला आहे. मात्र, त्या पैशाचा उपभोग घेण्याकरता त्यांच्यापाशी सवड नाही. तेवढा निवांतपणा नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत तरी तो मिळेल की नाही याचीही शाश्वती नाही. कारण मृगजळामागे धावणाऱ्यांना ते प्राप्त होणं अशक्यच असतं. पण ना याची त्यांना जाणीव आहे, ना ते मृगजळ आहे असं त्यांना वाटत! हे सगळंच भयकारी आहे. भीषण आहे. उतारावरून सुसाट दरीत कोसळणाऱ्या धोंडय़ाकडे कसलाच पर्याय असू नये, तसंच काहीसं.
या गोष्टीतल्या आजीबाईंनाही हीच भीती घेरून राहिलीय. आपण पैशांच्या ढिगाऱ्याखाली गाडले जातो आहोत असे सतत तिला भास होतात. १९३०-३२ पासून- म्हणजे तिचा जन्म झाल्यापासून कळत-नकळत तिचं व्यवहाराशी नातं जडलंय.. ते आजपर्यंत. आज जरी ती तिच्या मुलाकडे सुखात आयुष्य जगत असली तरी वर्तमानातील पैशाच्या महापुरानं ती भयचकित होते. अस्वस्थ होते. लक्ष्मीची चंचलता तिला चांगलीच ठाऊक आहे. आज पैशांच्या राशीत लोळणाऱ्या तरुण पिढीलाही याची जाणीव असली तरी ती काहीशी बेसावध आहे असं तिला उगीचच वाटत राहतं. म्हणूनच ती सारखी मुलाला खर्चाच्या बाबतीत सावध करू बघते. पण त्याच्याशी बोलल्यानंतर तिला जाणवतं, की या पिढीला वास्तवाचं भान आहे. त्यादृष्टीनं त्यांनी योग्य ती तजवीजही केली आहे. तरीही आपल्यावेळचं जगणं आणि आजचं वास्तव यांची तुलना जुन्या पेटाऱ्यातील एकेक वस्तू बाहेर काढताना तिच्या मनात सतत होत राहते. आईनं जपून ठेवायला दिलेलं त्यावेळचं धन.. म्हणजे शे-सव्वाशे रुपयांच्या नाण्यांचा बटवा तिनं जीवापाड जपलाय. त्यातली नाणी आज व्यवहारात कवडीमोलाची असली तरी आईनं मोठय़ा कष्टानं पै-पै गोळा करून साठवलेले ते धन तिच्या लेखी अनमोलच आहे. जादुगाराच्या पोतडीतून निघणाऱ्या एकेका अजबगजब वस्तूंसारखंच त्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर पडतं. जुन्या लग्नपत्रिका, लग्नखर्चाच्या याद्या, वडिलांनी पै-पैशांचा ठेवलेला हिशेब, मुलांचे लहानपणीचे फोटो, आपल्या संसारातील खर्चाच्या हिशेबाच्या वह्य़ा.. असं खूप काय काय. त्या चाळत असताना एकेक प्रसंग आठवत जातात. जुन्या आठवणी उफाळून येतात. त्यांत रमतानाही तिचं वर्तमानाचं भान मात्र सुटत नाही. कुठल्याच स्त्रीला ते कधी सोडून जात नाही. त्याकाळचं आपलं आणि आपल्या भोवतालच्या माणसांचं खडतर आयुष्य आणि आज सर्व सुखं हात जोडून उभी असतानाही आपल्या मनाला लागून राहिलेली अनामिक हुरहूर.. काय अर्थ काढायचा याचा? तिला प्रश्न पडतो.
..तिचा हा प्रवास प्रेक्षकालाही नकळत घडत जातो. मग ते तरुण असोत, वृद्ध असोत, लहानगे असोत.. त्यांच्या त्यांच्या परिप्रेक्ष्यात त्यांना त्यातली आंदोलनं जाणवतात.. न जाणवतात. काहींना ते अद्भुतरम्य वाटतं. काहींना काल्पनिक. काहींचे डोळे गतस्मृतींनी पाणवतात. काहींसाठी सह-अनुभूतीचे पदर उलगडतात. इला भाटे यांनी आजीच्या या गतरम्य आठवणी इतक्या गोष्टीवेल्हाळ रीतीनं कथन केल्या आहेत, की प्रेक्षकांना आपली आज्जीच आपल्याला समोर बसवून जुन्या गोष्टी सांगते आहे असा भास होतो. या गोष्टी जरी पै-पैशाच्या असल्या, तरी त्यानिमित्तानं त्या काळातलं माणसांचं जगणं, त्यांचं आयुष्याशी झुंजणं, खडतर परिस्थितीतही त्यांनी अंतरंगात जपलेला माणुसकीचा खळाळ, जवळच्यांच्या जबाबदाऱ्या कर्तव्यनिष्ठेनं पार पाडणं, त्यासाठी स्वत:च्या हौसेमौजेला मुरड घालणं, संसाराचे तापत्रय सोसताना घडत गेलेले त्यांचे स्वभाव, काळानुरूप प्रत्येक पिढीचा या साऱ्याकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन.. असा प्रदीर्घ व्यापक पट ‘पै-पैशाची गोष्ट’मध्ये मांडलेला आहे. तीन पिढय़ांचं चित्रण यात आहे. त्यामुळे काळाचे, पिढय़ांचे अडसर दूर सारून प्रत्येक प्रेक्षकाला स्वत:ला त्यात पाहता येतं.. समजून घेता येतं.
इला भाटे यांनी हा कॅनव्हास केवळ आपल्या कथनातूनच नव्हे, तर अवघ्या देहबोलीतून उत्कटपणे रंगवला आहे. प्रेक्षकांना विश्वासात घेत त्यांनी आपली, आपल्या काळाची गोष्ट सांगितली आहे. दिग्दर्शकानं अनावश्यक मंचीय व्यवहार न देता त्यांना आवश्यक तेवढय़ा मोजक्याच हालचाली दिल्या आहेत. यात अनेक माणसं अप्रत्यक्षपणे आली आहेत. त्यांच्या लकबी, त्यांचं व्यक्तिमत्त्व इला भाटे संवोदाच्चार, हातवारे व लकबींतून छान व्यक्त करतात. भावभावनांची आंदोलनं त्यात फार वाहवून न जाता त्या दाखवतात. एक सजीव कथनानुभव त्यांनी या रंगाविष्कारातून दिला आहे.
अमर गायकवाड यांनी मोजक्या प्रॉपर्टीतून आजींचं घर, त्यातल्या अनेक गोष्टी आणि वेगवेगळी स्थळं निर्देशित केली आहेत. प्रबोध शेटय़े यांनी कथनाला उभार देईल इतपतच पाश्र्वसंगीत योजलं आहे. विनया मंत्री यांनी आजीला दिलेली वेशभूषा तिच्या सौम्य व्यक्तित्वाला साजेशी आहे. प्रदीप दर्णे यांच्या रंगभूषेनं त्यांच्यातलं साधेपण उठावदार झालंय.
‘पै-पैशाची गोष्ट’मधून एक छान गतकालीन सैर आपल्याला घडते आणि त्यानिमित्ते आपल्या जाणिवाही अधिक समृद्ध होतात.

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस