एकापाठोपाठ एक हिंदी आणि अगदी हॉलीवूडमध्येही चित्रपटातून यश मिळत असताना अचानक इरफान खान आजारी पडला आणि उपचारांसाठी लंडनला निघून गेला. आजारामुळे गेली दोन वर्ष रुपेरी पडद्यापासून दूर राहिलेला इरफान आता ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आला आहे. मात्र या वेळी मी तुमच्याबरोबर असेनही आणि नसेनही.. अशा शब्दांत त्याने आपल्या भावना चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी व्यक्त केल्या होत्या. चित्रपट प्रदर्शित झाल्याचा आनंद आपल्या मनात आहे, त्यापलीकडे नेमकं मनात आता काय चाललं आहे हे शब्दात सांगणं कठीण आहे, असं म्हणणाऱ्या इरफानच्या या नव्या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. तो मात्र एकाच वेळी या सगळ्याशी जोडलेला असला तरी त्यापासून अलिप्तही असल्याचं सांगतो.

इरफानने आपल्या आजारपणाविषयीच्या भावना कधीही लपवून ठेवल्या नाहीत. उलट, तो सातत्याने त्याविषयी बोलत आला आहे. त्यामुळे ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाच्या निमित्ताने बोलतानाही चित्रपटापेक्षा तो या दोन वर्षांच्या काळात कोणत्या अनुभवातून गेला आहे, त्याविषयी भरभरून बोलताना दिसतो. मी खूप व्यग्र होतो कामात.. इतका मी माझ्या दोन्ही मुलांना मोठं होताना पाहिलेलंच नाही. वेळ मला कायमच कमी पडत आला आहे, मात्र यातला विरोधाभास असा की वेळ कमी पडणं म्हणजे नेमकं काय याचा खरा अर्थ मला आता कुठे कळतो आहे.. त्यामुळे सध्या मी फक्त आशीर्वाद आणि माझ्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रार्थना यांचाच विचार करतो आहे, अशा शब्दांत इरफानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटात इरफानने आपल्या मुलीचं परदेशी शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊन धडपडणाऱ्या वडिलांची भूमिका केली आहे. ही भूमिका आणि त्याचा वास्तवात सुरू असलेला झगडा यातले साम्य सांगताना त्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मरणाच्या भीतीपेक्षा दुसरं वाईट काय असू शकतं? जगायचं आहे की मृत्यू जवळ करायचा आहे..? अत्यंत अशक्य परिस्थितीशी सामना करताना जे जे प्रयत्न केले जातात त्या सगळ्या गोष्टी मला जवळच्या वाटतात, त्या मी समजू शकतो. चमत्कारांवर माझा विश्वास आहे, न हरता चिकाटीने केलेल्या प्रयत्नांतून अशक्य ते शक्य करता येतं, यावर माझा विश्वास आहे. या चित्रपटात आपल्या मुलीसाठी काहीही करणाऱ्या वडिलांची व्यक्तिरेखा आहे ती अशीच जिद्द दाखवून देते.. असं त्याने सांगितलं.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
chatura article on immoral relations, immoral relations in marathi
अनैतिक संबंधांना न्यायालयीन संरक्षण देता येणार नाही…
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Children Questions
मुलं सतत प्रश्न विचारून भंडावून सोडतात? प्रश्नांच्या गुंत्यातून त्यांना बाहेर काढायचं की, गुरफटू द्यायचं?

त्याने याआधीही अनेकदा वडिलांची भूमिका साकारली आहे, मात्र ती प्रत्येक भूमिका वेगळी होती म्हणून त्या मी केल्या. प्रत्येक व्यक्तिरेखेची गोष्ट, त्याच्यासमोर असलेली परिस्थिती यात फरक आहे. आणि त्या परिस्थितीत लढणारा प्रत्येक बापही वेगळा आहे, तसा वेगळेपणा त्यात नसता तर मी या भूमिका केल्याच नसत्या, असंही तो स्पष्टपणे सांगतो. प्रत्यक्षातही तो दोन मुलांचा पिता आहे. आजारपणामुळे तो आता कुटुंबीयांबरोबर जास्तीत जास्त वेळ आहे, मात्र याआधीही मी जेव्हा जेव्हा घरी असेन तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर वेळ घालवत होतो, असं तो म्हणतो. मी नेहमी मुलांशी वडिलकीच्या नात्याने वावरत असताना पारंपरिक चौकटी बाजूलाच ठेवल्या होत्या, मी कधीही त्यांच्याशी खूप कडक शिस्तीत वागलेलो नाही. मी त्यांच्यावर भरपूर प्रेम करत आलो आहे, त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा करायची नाही हे माझं धोरण मी कायम ठेवलं आणि मला आनंद वाटतो की, आज या सगळ्याची चांगली फळं मला अनुभवायला मिळत आहेत, असं तो सांगतो.

नेहमी भवतालात काय घडतं आहे याबद्दल एक माणूस म्हणून जागरूक राहणारा इरफान सध्या आपण स्वत:चाच नव्याने शोध घेण्यात रमलो आहोत, असं सांगतो. मी हळूहळू पूर्वपदावर येतो आहे, मात्र सध्या काही फारसं वाचत नाही. बघण्यावर माझा जास्त भर असतो, असं त्याने स्पष्ट केलं.

इरफानच्या ‘अंग्रेजी मीडियम’ या चित्रपटानंतर येत्या दोन वर्षांत इरफानची मुख्य भूमिका असलेले अनेक चित्रपट थांबलेले आहेत. यात दीपिका पदुकोणबरोबरचा विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘सपन दीदी’, होमी अडजानियाचाच ‘तकडम’, सलमान खानची निर्मिती असलेला ‘लायन्स ऑफ द सी’ असे चार ते पाच चित्रपट आहेत. यातल्या नेमक्या कुठल्या चित्रपटातून इरफान पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार हे सांगणं सध्या तरी कठीण आहे. पण सध्या तरी तो स्वत:ही या विचारांमध्ये अडकण्यापेक्षा जो चित्रपट प्रदर्शित झाला आहे त्याचा आनंद मोठा याच न्यायाने पुढे जातो आहे.

हिंदी चित्रपट अभिनेत्यांसाठी कायमच तिकीटबारीवरचं यश महत्त्वाचं ठरत आलं आहे. एक काळ असा होता की, त्यावेळच्या इरफानला नाव, पैसा आणि प्रसिद्धी या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या होत्या. हळूहळू हे गणित बदलत गेलं. आता चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत राहणं, त्या क्षणात जगणं, आपल्या आठवणी निर्माण करणं.. हे महत्त्वाचं ठरतं आहे. शुक्रवारी तिकीटबारीवर चित्रपटाचं काय होतं आहे हे ओझं आम्ही खूप काळ अंगावर वागवलं आहे. पण चित्रपटाचं यश ही एवढी एकच गोष्ट आयुष्यात नसते, अर्थात त्याचे परिणाम होतातच. एकदा चित्रपट प्रदर्शित झाला की तुम्ही त्यातली कुठलीही गोष्ट बदलू शकता का? नाही ना.. त्यामुळे जे घडतं आहे त्याबरोबर जगता आलं पाहिजे ही गोष्ट एकदा लक्षात आली की सगळं व्यवस्थित होत.

इरफान खान