रवींद्र पाथरे

चित्रपट आणि टीव्हीच्या छोटय़ा पडद्यावरील मालिकांतून चमकणाऱ्या कलावंतांविषयी सामान्य प्रेक्षकांना प्रचंड कुतूहल असतं. त्यातून त्यांच्या पडद्यावरील प्रतिमेच्या प्रेमात पडून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल ही चाहते मंडळी काहीएक ठोकताळे मांडत असतात. कलावंतांना प्रत्यक्ष पाहण्याची, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी त्यांना मिळाली तर मग काही विचारूच नका. त्यांना आभाळच ठेंगणं होतं. कलावंतांनाही चाहत्यांचं प्रेम हवंहवंसं वाटतंच. त्यातून त्यांचा ईगो सुखावत असतो. केलेल्या परिश्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं. मात्र, या सगळ्या गोष्टींकडे तटस्थतेनं आणि त्रयस्थपणे पाहणं फारच थोडय़ांना जमतं. हे कलाकार चाहत्यांच्या प्रेमात वाहवत जात नाहीत किंवा अपयश पदरी पडल्यास नैराश्यानं वैफल्यग्रस्तही होत नाहीत. कारण त्यांना आपण काय आहोत, हे नेमकेपणानं माहीत असतं. कारकीर्दीतल्या चढउतारांकडे ते समतोल दृष्टीनं पाहू शकतात. त्यातून सहजगत्या बाहेर पडू शकतात.

परंतु प्रत्यक्षात कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्यातलं नातं नेमकं कसं असतं, या नात्याकडे पाहण्याचा उभयतांचा दृष्टिकोण काय असतो, हे समजून घेणं नक्कीच रोचक ठरू शकतं. ओंकार अरविंद कुळकर्णी लिखित आणि मंदार देशपांडे दिग्दर्शित ‘‘knock‘! ‘knock‘!  सेलिब्रिटी!!’ हे नाटक याच मुद्दय़ाला थेटपणे भिडतं. या नाटकाची खासियत ही, की कलाकारांना जवळून जाणून घेऊ इच्छिणारे चाहते आणि सिनेपत्रकार यांचा भिन्न दृष्टिकोन यात उत्तमरीत्या आलेला आहे. सिनेपत्रकार (व समीक्षक) हा केवळ कलाकाराची कारकीर्द जवळून पाहणारा नसतो, तर त्यांचं घडणं/ बिघडणं, सर्वोच्च पदाला पोहोचणं किंवा त्यांचा ऱ्हास अशा सर्वच घटना-घडामोडींचा तो साक्षीदार असतो. आपल्या व्यवसायानिमित्ताने कलाकारांना अत्यंत जवळून पाहण्याची, त्यांना वारंवार भेटण्याची संधी त्याला मिळत असल्याने त्यांच्याशी त्याचा सतत संवाद होत असल्याने क्वचित त्यांच्यात मैत्रीचं घट्ट नातंही निर्माण होतं. या सगळ्यातून कलाकाराच्या कारकीर्दीतील चढउतारांचं तटस्थ विश्लेषण करत त्यांची योग्य ती मीमांसा पत्रकार निश्चितपणे करू शकतो. (अर्थात तो नि:पक्षपाती व आपल्या पेशाच्या जबाबदाऱ्यांचं उत्तम भान असलेला असेल तरच!) हे सारं या नाटकात यथार्थतेनं आलं आहे. त्याकरता नाटककर्त्यां मंडळींचं कौतुक करावं तेवढं थोडंच. अन्यथा संबंधितांबद्दल ग्रह-पूर्वग्रह बाळगूनही हे नाटक लिहिता/ करता येऊ शकलं असतं. असो.

या नाटकाची म्हणून काही वेगळी वैशिष्टय़ं आहेत. प्रथमत: त्याची रचना! हे दोन अंकी नाटक असलं तरी ते एकपात्री फॉर्ममध्ये रचलं गेलं आहे. पहिल्या अंकात मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील फूड मॉलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणारी नैना (क्षिती जोग) ही टीव्ही कलाकारांची फॅन असल्यानं त्यांच्याशी तिचं हृदयस्थ नातं आहे. त्यांच्याविषयीची तिची निरीक्षणं, त्यांच्यातलं तिचं गुंतणं, मनोमन त्यांच्याशी एकरूप होणं, त्यांच्याबद्दलचं गॉसिप करणं, फूड मॉलमधल्या इतर कामगारांना या कलाकारांबद्दल वाटणारं आकर्षण, मॉलमध्ये आलेल्या कलाकारांशी जवळीक साधण्यासाठी त्यांच्यात होणारी अहमहमिका, नैनाच्या नवऱ्याला तिचं हे कलाकार-वेड मंजूर असणं, त्यानं तिला प्रोत्साहन देणं.. आदी अजब गोष्टी नैना छान बैजवारपणे कथन करते. देशप्रेमावरील एका सीरियलमधील नायक महेश याला भेटायची नैनाला अचानक मॉलमध्ये संधी मिळते तेव्हा तर ती आपले होशोहवासच हरवून बसते. त्याच्यासोबत खेटून काढलेले सेल्फी ती नवऱ्याला पाठवते. नैनाला आपल्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. तिच्या स्वप्नातला राजकुमार जणू तिला भेटलेलो असतो. त्या आनंदात ती न्हाऊन निघते..

दुसऱ्या अंकात एक सिनेपत्रकार तथा समीक्षक (सुमीत राघवन) रोहन देसाई नामक अत्यंत लोकप्रिय टीव्ही कलावंताच्या आग्रहाखातर त्याची मुलाखत घ्यायला त्याच्या सीरियलच्या सेटवर जातो. परंतु हे महाशय तिथे उगवलेलेच नसतात. सेटवरचे सगळेजण ताटकळत त्याची वाट पाहत असतात. पत्रकार त्याला फोन करतो तेव्हा रोहन त्याला आपल्या घरीच यायला सांगतो. नाइलाजानं तो रोहनच्या घरी जातो, तर रोहन आरामात घरात बसलेला. ‘तुला एक महत्त्वाची न्यूज द्यायची आहे,’ असे सांगून तो आपण मनोरंजनसृष्टी सोडत असल्याचे त्याच्याकडे जाहीर करतो. लोकांचं आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी रोहनचा हा एक स्टंट असावा असं त्याला वाटतं. परंतु त्याच्या मनातले हे विचार वाचणाऱ्या रोहनने ‘यात कोणतीही स्टंटबाजी वगैरे नाहीए,’ याची त्याला ग्वाही दिली. या क्षेत्रातील पदार्पणास निमित्त ठरलेल्या या पत्रकार मित्राकडूनच आपल्या एक्झिटचीही बातमी लोकांना कळावी अशी रोहनची मनापासून इच्छा असते. म्हणूनच त्याने आपल्या कारकीर्दीचा साक्षीदार असलेल्या या पत्रकार मित्रास खास बोलावून घेऊन ही ‘एक्स्लुझिव्ह न्यूज’ दिलेली असते. नंतर त्या रात्री त्यांच्या अन्य विषयांवरही छान गप्पा रंगतात.

रोहन त्यानंतर मुंबई सोडून दूर निघून जातो. तो कुठे गेला, हे कुणालाच माहीत नसतं. एके दिवशी तो हिमालयात फिरत असताना त्याच्या आकस्मिक मृत्यूची बातमी येते. त्या बातमीने पत्रकाराला आपलं त्याच्यासोबत झालेलं शेवटचं बोलणं आठवतं. त्या रात्री रोहननं सांगितलेला एक गमतीदार किस्साही आठवतो. त्याने मनोरंजन क्षेत्र सोडण्यासाठी कारणीभूत ठरलेला तो किस्सा!

काय असतो तो किस्सा?

त्याबद्दल इथं वाच्यता न केलेलीच बरी.

लेखक ओंकार कुळकर्णी यांनी दोन व्यक्तींच्या कथनांतून हे ‘नाटक’ घडवलं आहे. वरवर पाहता ही दोन एकपात्री अनुभवकथनं वाटतात खरी; परंतु शेवटाकडे गेल्यावर त्यांच्यातला आंतरिक संबंध अलवारपणे उलगडतो आणि आपण दिग्मूढ होतो. लेखकानं आपल्या तल्लख निरीक्षणशक्तीनं ही व्यक्तिरेखाटनं वास्तवदर्शी केली आहेत. त्यांच्या तपशिलांमध्ये कोणतीच चूक काढणं शक्य नाही इतकी ती पारदर्शी उतरली आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दोन पात्रांसाठी त्यांनी योजलेली भाषा. ती पात्रागणिक वेगळी असणार, हे स्पष्टच आहे. परंतु तीही अस्सल उतरली आहे. नैनाचं खेडवळ बोलणं, त्यातून व्यक्त होणारा तिचा अघळपघळ स्वभाव, तिचं बोलकं व्यक्तिमत्त्व, लकबी हे सारं नैनाच्या कथनातून छान एन्जॉय करता येतं. याच्या उलट सिनेपत्रकाराचं व्यक्तिमत्त्व! मुळात तो बुद्धिजीवी पेशातला. सिनेपत्रकारिता गांभीर्यानं करणारा. त्यातली त्याची निपुणता. त्याचं सतत समोरच्या व्यक्तीचा थांग घेणं. रोहनच्या बाबतीत मात्र तो प्रथमच आपले ठोकताळे चुकल्याचं कबूल करतो. रोहनच्या प्रवासाबद्दलचं, त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाबद्दलचं त्याचं सिंहावलोकन एक ‘माणूस’ म्हणून त्याचं मूल्यमापन करणारं आहे. कलावंत आणि माणूस म्हणून आपण सरसकट सर्वावर अविचाराने शिक्के मारत जातो, ते योग्य नाही, याची जाणीव प्रथमच रोहन प्रकरणानं त्याला होते. एका अर्थाने हा त्याच्याही आत्मपरीक्षणाचा प्रवास ठरतो.

दिग्दर्शक मंदार देशपांडे यांनी ही नाटय़ात्म कथा तिच्या अंगभूत लयीत पेश केली आहे. तीत कुठंही पोझ घेण्याची मुभा त्यांनी कलावंतांना दिलेली नाही. सिनेसमीक्षकाच्या विचारांच्या आवर्तनांत कुठं एखादी पोझ डोकावत असेल तेवढीच. कलाकारांना मोकळ्या रंगावकाशात सोडून त्यांना त्यांच्या व्यक्तिरेखेनुसार त्यांनी प्रकट होऊ दिलं आहे. तथापि दिग्दर्शक या नात्यानं त्यांनी मूळ संहिता थोडी संपादित केली तर हा नाटय़ानुभव अधिक टोकदार होऊ शकेल.

प्रदीप मुळ्ये यांनी फूड मॉलचा भास निर्माण करणारं नेपथ्य प्रथमार्धात उभं केलंय, तर उत्तरार्धात कसलंच ठरावीक नेपथ्य न योजता प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीवर ते सोडून दिलंय. प्रकाशयोजनाही त्यांचीच आहे. पात्रांच्या कथनातलं ‘नाटय़’ अधोरेखित करण्यावर त्यांचा भर जाणवतो. राहुल रानडे यांनी पार्श्वसंगीताच्या तुकडय़ांतून यातलं नाटय़ अधिक धारदार केलं आहे. श्वेता बापट यांची वेशभूषा पात्रांना चेहरा देणारी आहे.

क्षिती जोग या एक अत्यंत गुणी अभिनेत्री आहेत. त्यांनी विविध भूमिकांतून आजवर हे सिद्ध केलेलं आहे. फूड मॉलमधली अघळपघळ बोलणारी, सेलिब्रिटींची प्रचंड फॅन असलेली आणि त्यांच्याबद्दल प्रचंड ‘ज्ञान’ बाळगून असलेली सफाई कामगार नैना त्यांनी मुद्राभिनय तसंच अवघ्या देहबोलीतून लाजवाबपणे समूर्त केली आहे.

सुमीत राघवन यांनी सिनेपत्रकारितेचाही गांभीर्याने विचार करणारा, या इंडस्ट्रीतले चेहरे व मुखवटे यांची पुरेपूर जाण असलेला, कलाकारांकडे तटस्थपणे, परंतु मानवीय दृष्टिकोनातून पाहणारा विचारी पत्रकार अप्रतिम वठवला आहे. त्यांच्यात सिनेपत्रकारापल्याडची एक शहाणीव जाणवते. त्यातून त्यांचं व्यक्ती निरखणं, त्या व्यक्तीबद्दलची पारदर्शी मतं बनवणं हे होतं. झापडबंद पत्रकारितेपलीकडे जात कलावंतांचं मूल्यमापन करण्याची लेखकीय वृत्ती त्यांनी साकारलेल्या सिनेपत्रकारात आढळते. सुमीत राघवन यांनी हे सारे कंगोरे समजून उमजून छान व्यक्त केले आहेत.

प्रदीर्घ कालखंडानंतर एक नितांतसुंदर कथानुभव पाहिल्याचं समाधान हे नाटक देतं. मराठी रंगभूमीच्या ‘प्रयोग’शीलतेचाही ते प्रत्यय देतं.