निलेश अडसूळ

९५च्या सुमारास गिरणगावातील भयाण वास्तवावर भाष्य करणारं ‘अधांतर’ हे नाटक रंगभूमीवर आलं आणि नाटकातल्या मंजू धुरी या पात्राने प्रेक्षकांच्या मनामनात घर केलं. पुढे त्याच मंजूने म्हणजेच मंजूची भूमिका साकारणाऱ्या लीना भागवत यांनी एकामागोमाग एक नाटकांची रांग लावत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. एवढेच नव्हे तर नाटक करताना चित्रपट आणि मालिका जगतातही स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

आज जरी त्या मालिका आणि चित्रपटांतून पुढे येत असल्या तरी मी नाटय़वेडी आहे असं त्या आवर्जून सांगतात. त्यांच्या नाटय़ानुभवी प्रवासाविषयी त्या सांगतात, अभिनयाची बीजं महाविद्यालयीन जीवनातच रोवली गेली. आयएनटी, मृगजळ, उन्मेष यांसारख्या स्पर्धाचं व्यासपीठ मिळाल्याने ती आवड पुढे अधिकच वाढत गेली. अभिनय क्षेत्रात आल्यानंतर अनेकांना आवड आणि व्यवसाय यात तडजोड करावी लागते, पण याबाबतीत मी स्वत:ला भाग्यवान समजते, कारण मला आवड असलेलं क्षेत्रच व्यवसायासाठी निवडता आलं. हे सांगतानाच त्या म्हणतात, माध्यम कोणतेही असो अभिनय हा अभिनय आहे, त्यातला प्रामाणिकपणा सगळीकडे सारखाच असतो. त्यामुळे कोणतेही माध्यम मला वर्ज्य नाही. ज्या मालिका, चित्रपटांच्या संहिता मला आवडतात त्यात मी आवर्जून काम करते.

कलाकारांची जडणघडण करणारी पहिली पायरी प्रायोगिक रंगभूमी असली तरी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणे हे प्रत्येक कलाकारासाठी महत्त्वाचे असते. त्याविषयी लीना सांगतात, गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘हाच खेळ उद्या पुन्हा’ या प्रायोगिक नाटकातून काम करत असताना खूप जणांशी ओळख झाली. त्या दरम्यान कॉलेज आणि नाटक अशी दुहेरी कसरत सुरू होती. पण ‘आधी शिक्षण आणि मग नाटक’ अशी तंबी घरच्यांनी आधीच देऊन ठेवल्याने पदवी शिक्षण प्राधान्याने पूर्ण केले. मंगेश कदम आणि मी, आम्ही ‘हाच खेळ’मध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे ‘अधांतर’ नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणताना त्यांनी मंजूच्या भूमिकेसाठी माझी निवड केली. व्यावसायिक रंगभूमीवर पडलेलं हे पहिलं पाऊल पुढे विस्तारत गेलं. पण व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असताना मी प्रायोगिकलाही तेवढंच महत्त्व दिलं, ‘इंदू काळे सरला भोळे’, ‘मादी’ यासारखे महत्त्वाचे विषय आविष्कारच्या माध्यमातून प्रायोगिकवर हाताळता आले, असं त्या अधोरेखित करतात.

याच नाटय़ प्रवासातून लीना भागवतांचे दिग्दर्शक मंगेश कदम यांच्याशी मनोमीलन झाले. पुढे लगीनगाठही जुळली. त्याविषयी लीना सांगतात, ‘हाच खेळ उद्या पुन्हा’च्या संचात सर्व कलाकारांमध्ये मी लहान असल्याने माझी विशेष काळजी घेतली जायची. त्या दिग्गजांच्या काळजीसोबत मंगेशही माझी काळजी घेत होते. पण त्या काळजीचा अर्थ मला नंतर उलगडू लागला. नाटक हा एकमेव ध्यास दोघांमध्ये समान असल्याने एकत्र येण्याला सबळ कारण होते. पुढे आवडीनिवडी जुळत गेल्या आणि सहजीवनाला सुरुवात झाली. पण प्रेमाचं समीकरण जुळून आल्यावर लगेचच आम्ही एकत्र काम करणं थांबवलं, असं त्या सांगतात. ‘यांच्यात काही वेगळं नातं आहे म्हणून हिला काम मिळतं,’ ही शेरेबाजी मला नको होती. मला जे मिळवायचं होतं ते स्वत:च्या क्षमतेवर मिळवायचं होतं आणि मी मिळवलं, असं त्या म्हणतात.

मालिकेच्या प्रवासाविषयी त्या सांगतात, १९९५ साली ‘आवड आपली आपली’ मालिकेतून मालिका विश्वात प्रवेश केला. त्यानंतर एकामागोमाग एक अनेक मालिका केल्या, पण ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘होणार सून मी ह्य़ा घरची’ या मालिकांमधल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. यातली कोणती भूमिका अधिक जवळची आहे, या प्रश्नावर त्या म्हणतात, मी जे काम करते ते जीव ओतून करते त्यामुळे प्रत्येक भूमिका माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. आताही तब्बल चार वर्षांच्या अंतराने मी ‘आनंदी’ ही मालिका करते आहे, कारण ही भूमिका फक्त गोडगोड बोलणाऱ्या आजीची नसून स्वमग्नतेने ग्रासलेल्या आपल्या नातीने त्यातून बाहेर पडावं, यासाठी धडपडणारी ती आजी आहे. ती देवभोळी असली तरी तितकीच स्पष्टवक्ती आहे. पण स्पष्टवक्ती असली तरीही खलनायिका नाही याचं भान बाळगूनच ती आजी साकारायची आहे, असे लीना सांगतात.

‘गोष्ट तशी गमतीची’, ‘के दिल अभी भरा नही’, आणि आता आलेल्या ‘आमने सामने’ या तिन्ही नाटकांमधून लीना-मंगेश यांनी नात्यांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण माणूस म्हणून तुटलो गेलो आहोत, एकमेकांसमोर बसूनही आपण एकमेकांशी बोलत नाही. सतत फोनच्या विश्वात वावरत असतो. एकत्र असूनही संवाद होत नाही, वाद होत नाही आणि पर्यायाने विचारांची देवाणघेवाण होत नाही. त्यामुळे आपण नात्यांपासून लांब चाललो आहोत. म्हणून नात्यांची वीण घट्ट करण्यासाठी असा आशय रंगभूमीवर येणे गरजेचे असल्याचे लीना भागवत यांनी सांगितले.

लीना भागवतांच्या नाटकांमध्ये तरुण कलाकारांचाही सहभाग असतो. शशांक केतकर, रोहन गुजर, मधुरा देशपांडे, अद्वैत दादरकर, मिहीर राजदा, आशुतोष गोखले अशा तरुण कलाकारांचं कौतुक करताना त्या म्हणतात, या मुलांमध्ये कमालीची ऊर्जा आहे. थकणे हा शब्द त्यांच्याकडे नाही. मालिका, चित्रपट, प्रयोग सगळ्यांचं व्यवस्थापन त्यांनी अचूक बसवलं आहे.

व्यावसायिक नाटकांचा २५ वर्षांचा धांडोळा घेताना त्या म्हणतात, २५ वर्षांत रंगभूमीने अनेक आयाम बदलले. तंत्रज्ञान, नेपथ्य, प्रकाश, कपडे यातील बदलासोबतच विषय बदलले. नवनवीन विषयांचा कलाकार आणि प्रेक्षकांकडून स्वीकार होत गेला, जी बाब कौतुकास्पद आहे. तर स्त्रियांवरील नाटकांविषयी त्या सांगतात, स्त्री म्हणजे केवळ तिचं खंडन होणं, तिचा संघर्ष, होणारा अन्याय नव्हे. त्या त्या काळाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रिया नाटकातून समोर येत गेल्या. काळानुसार स्त्री बदलली त्यामुळे नाटकातही ‘तिचा’ विषय बदलला. आताच्या काळातले ‘ठष्ठ’, ‘सेल्फी’सारखे नाटक याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.

‘अधांतर’ साकारताना

पदवीनंतर मिळालेलं ‘अधांतर’ हे पहिलंच व्यावसायिक नाटक. मी तशी मध्यमवर्गीय कुटुंबातली, सुखवस्तू घरातली, रामरक्षा, अथर्वशीर्ष म्हणणारी अशी साधी सरळ २१-२२ वर्षांची मुलगी होते. तेव्हा, गिरणगावातील जीवनमान, तिथलं वास्तव याबाबत मी पूर्णत: अनभिज्ञ होते. ‘आपल्याच घरातल्या माळ्यावर आपला भाऊ तलवार लपवतो आणि ती घेऊन तो अर्वाच्च शिव्या देत जातो,’ हे सगळं माझ्या कल्पनेपलीकडचं जग होतं. भाषा स्वच्छ, शुद्ध असावी याकडे माझा विशेष कल असतो. पण या नाटकाची भाषा मालवणी लहेजातली आणि टिपिकल गिरणगावातली असल्याने शुद्ध बोलायला लागले की मंगेश आवाज द्यायचे, ‘भागवत..’ आणि मग लक्षात यायचं नाटकातलं विश्व. विशेष म्हणजे नाटकातलं पहिलंच वाक्य मी उच्चारायचे. ‘मोहन ऊठ रे’ पण ते तसं नसून ‘मोअन उट रे’ असं उच्चारायचं. याचे धडे जयंत पवारांनी दिले आणि त्यातूनच गिरणगावातली मस्तवाल, चढय़ा आवाजाची मंजू धुरी साकारली गेली. गिरणी कामगारांच्या कुटुंबाची झालेली ही वाताहत आणि त्याचं चपखल दर्शन घडवणारं नाटकाचं नेपथ्य, कपडेपट, भाषा सगळं असं अंगावर यायचं. प्रयोगांनंतर काही वेळ फक्त नाटकातून बाहेर पडायला जायचा. ज्योती सुभाष, राजन भिसे, संजय नार्वेकर, अनिल गवस, आशीष पवार आणि मी असा दमदार कलाकारांचा संच जरी रंगमंचावर वावरत असला तरी याचं सर्व श्रेय लेखक जयंत पवार, दिग्दर्शक मंगेश कदम आणि त्यांच्या मेहनतीला जातं.

घरघरमें नाटक..

*   मंगेश आणि मी आम्हा दोघांचं प्रेम नाटक असल्याने घरातही नाटकावर चर्चा सुरू असतात. अगदी कोणत्याही वेळी आम्हाला नाटकातल्या गोष्टी सुचू शकतात याचा प्रत्यय आम्हाला आला आहे. कधी तरी आम्हाला ठरवावं लागलं की, ‘पुढचा एक तास नाटकाविषयी बोलायचं नाही म्हणजे नाही’. अनेकदा भविष्याविषयी बोलतानाही नाटक मध्ये डोकावतं, कारण पुन्हा दोघांचंही भविष्य नाटकच आहे. आमच्या भांडणाचेही विषय नाटकाशीच निगडित असतात. कौटुंबिक विषयावरून भांडल्याचं मला फारसं आठवत नाही. त्यामुळे अशा भांडणातून दरी निर्माण होण्याऐवजी आम्ही एकमेकांना अधिकच उलगडत जातो.

अभिनय हा अभिनयच..

*  अनेकदा नाटक, चित्रपट, मालिका अशा माध्यमांमुळे अभिनयातही श्रेष्ठता ठरवण्याची परिमाणं सुरू झाली आहेत, पण हा समज लीना भागवत साफ खोडून काढतात. त्यांच्या मते, अभिनय हा अभिनय आहे. इथे कमी जीव ओतला आणि तिथे जास्त असं होत नाही. तुम्ही रंगमंचावर जा किंवा कॅमेऱ्यासमोर जा, तुमचा अभिनय लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात जीव ओतूनच काम करावं लागतं. फरक इतकाच आहे की, कॅमेऱ्यासमोर तुम्ही क्षणात कैद होता आणि रंगमंचावर मात्र प्रत्येक प्रयोग रंगवण्याची नवी संधी तुम्हाला मिळते.

नव्या पिढीचे नवे फंडे

*  नव्या पिढीवर ताशेरे ओढण्यापेक्षा नवी पिढी किती बहुआयामी आहे याकडे लक्ष द्यायला हवे. जरी त्यांचे वाचन कमी झाले असले तरी करण्यासारख्या अनेक गोष्टी त्यांच्या हातात असतात आणि ते करतात. पूर्वी महिना महिना तालमी चालायच्या. आता मालिका, चित्रपट सांभाळून नवीन मुलं आठ दिवसांत सादरीकरणासाठी सज्ज होतात. शिवाय प्रवासातच त्यांचा अर्ध्याहून अधिक वेळ खर्च होतो, त्यामुळे त्यांना दोष देणे अत्यंत चुकीचे आहे. फक्त त्यांनी प्रसिद्धीच्या मागे लागून या क्षेत्रात येऊ नये. लोक फोटो काढतात, प्रसिद्धी मिळते म्हणून वाहवत जाणं सहज शक्य आहे, पण ती कला आहे, ती देवता आहे आणि तिची सेवा प्रामाणिकपणे व्हायला हवी एवढीच अपेक्षा आहे.

नवे विषय येतील, पण वेळ लागेल..

*  रंगभूमीवर नवे विषय नक्कीच येतील, पण थोडा वेळ लागेल असे  सांगतात. त्यांच्या मते, एखाद्या काळात घडलेल्या घटना, प्रत्यक्ष घडून त्याचे समजावर साद-पडसाद उमटायला वेळ लागतात आणि त्या पडसादातून कलाकृती जन्माला येते. घटना आज घडली आणि उद्या रंगभूमीवर आली अशी अपेक्षा करणे चूक आहे. आजही अनेक बदल समाजात घडत आहेत पण त्यांचे परिणाम जाणवायला थोडा वेळ लागेल. ते जाणवू लागले की त्यांचे प्रतिबिंब नाटकातही उमटेल आणि नवीन विषय येतीलच याची मला खात्री आहे, कारण नवी पिढी अत्यंत सहज आहे.

मी लेखिका

*  लीना भागवत यांना लेखनाचीही तितकीच आवड आहे. त्या सांगतात, वेळ मिळेल तसं मी व्यक्त होत असते. पूर्वी मालिकांचं लेखन केलं आहे, पण आता फारसं लिहिणं होत नाही. पण एक नाटक लिहून तयार आहे, अजून त्यावर बरंच काम करणं बाकी आहे. नाटय़लेखनाविषयी असं त्या म्हणत असल्या तरी मराठी रंगभूमीवर लीना भागवत लिखित नाटक लवकरच येणार हे मात्र नक्की.