नीलेश अडसूळ

वर्षांचा शेवट आणि नवीन वर्षांची सुरुवात हा प्रत्येक क्षेत्रातील महत्त्वाचा टप्पा असतो. म्हणजे कपडय़ांवर सवलती, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सवलती, ऑनलाइन माध्यमात मोठाले सेल वगैरे वगैरे. थोडक्यात सांगायचे तर नवीन वर्षांच्या निमित्ताने लोकांपर्यंत अधिकाधिक पोहोचण्याचा हा फंडा असतो. असेच तंत्र दरवर्षी मालिका जगतातही वापरले जाते. डिसेंबरअखेर जुन्या मालिकांना निरोप आणि नव्यांची नांदी किंवा आहे त्या मालिकांमध्ये नवे वळण हे सूत्र ठरलेले असते, तशी प्रेक्षकांनाही या बदलांची प्रतीक्षा असतेच म्हणा. असेच काही बदल येत्या काळात मालिका जगतात घडणार आहेत. काही नवीन विषय, नव्या कथा आणि बदल घेऊन वाहिन्या नवतेच्या उंबऱ्यात उभ्या आहेत..

मराठी माणसांच्या मनोरंजनासाठी पाच वाहिन्या असल्या तरी पाचही एका वरचढ एक ठरत आहेत. विशेष म्हणजे ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीची घोडदौड सध्या वाखाणण्या सारखी आहे. गेले आठ आठवडे या वाहिनीने सर्वाधिक टीआरपीचा झेंडा झळकावला आहे. ‘स्टार प्रवाह’वर नव्याने आलेल्या ‘सांग तू आहेस का’ या मालिकेत भयरंजन आणि प्रेम यांचा अनोखा मेळ साधला आहे. विशेष म्हणजे या मालिकेने रात्री १० च्या सत्रातल्या प्रतिस्पर्धी वाहिन्यांवरील कार्यक्रमांनादेखील मागे टाकले आहे. तर २१ डिसेंबरपासून ‘स्टार प्रवाह’वर ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही नवी मालिका सुरू होते आहे. अक्षया हिंदळकर आणि संचित चौधरी ही जोडी मालिकेतून पाहायला मिळेल. नेहमीप्रमाणे परस्पर विरोधी स्वभावाच्या दोन व्यक्ती याही मालिकेत असतील. साधीसरळ असलेली स्वाती लग्नासाठी नोकरी करणाऱ्या मुलाच्या शोधत आहे. पण काहीसा भाई प्रवृत्तीचा पण तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा रघू तिला भुरळ घालू शकेल का याची उकल मालिकेत होणार आहे.

‘आई कुठे काय करते’ ही मालिका घराघरातली सदस्यच झाली आहे. केवळ वाहिनीच नाही तर यु-टय़ूब आणि हॉटस्टारवर जाऊन देखील प्रेक्षक या मालिकेला पसंती दर्शवत आहेत. नवऱ्याच्या सोडून जाण्यानंतर पत्नीने खचून जाण्यापेक्षा कंबर कसून आलेल्या प्रसंगाला कसे तोंड द्यायचे याची प्रेरणा समस्त स्त्रीवर्गाला या कथानकातून मिळते आहे. पुढील भागात आई म्हणजेच अरुंधतीला शाळेतील नोकरी चालून येते. आईचे सक्षम होणे आणि अनिरुद्धची अवनती हा येत्या भागातील धागा असेल. ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत कीर्तीच्या शिक्षणाचे सत्य जीजी अक्कांसमोर आल्यानंतर शुभम आणि जीजी आक्कामध्ये फळी निर्माण झाली आहे. आता घरातील हा कलह आपल्या कौशल्याने कीर्ती कसा सांधेल हे आगामी भागात पाहायला मिळेल. ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’या मालिकेत आजवर प्रतीक्षेत असलेला प्रसंग आला आहे, तो म्हणजे मोठय़ा ज्योतीबांचा प्रवेश. ‘केदार विजय’ ग्रंथातील काही भागांना अनुसरून गुंफण्यात आलेल्या या मालिकेत ज्योतिबाच्या भव्यदिव्य रूपाचं दर्शन होणार आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अंजी- पश्या यांच्यात असलेले वाद आता संपले आहेत. एकमेकांवर असलेल्या प्रेमाची त्यांना जाणीव होते आहे. येत्या भागात पश्या अंजीला त्यांचा टेम्पो म्हणजेच ‘तात्या’ चालवायला शिकवणार आहे. यानिमित्ताने त्यांच्यातील नातेही खुलत जाईल. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखांची जंत्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘काय घडलं त्या रात्री’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या दोन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. वर्षांचा शेवट म्हणजेच ३१ डिसेंबरला ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका येते आहे. विशेष म्हणजे अभिनेत्री मानसी साळवी यानिमित्ताने १३ वर्षांंनी मालिका जगतात पदार्पण करणार आहे. सिनेजगतातील एका प्रतिथयश अभिनेत्याच्या हत्येचे गूढ उलगडणारे हे कथानक असेल. पोलीस अधिकाऱ्याच्या वर्दीत मानसी साळवी दिसतील. यापूर्वी लठ्ठपणावर भाष्य करणारी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका ‘कलर्स मराठी’वर आली आहे. त्याच पद्धतीचे भाष्य करणारी पण वेगळ्या आशयाची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका ४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. यातली महत्त्वाची बाब म्हणजे सासूच्या भूमिकेत शुभांगी गोखले असून त्यांच्या मिश्कील स्वभावाने सासू-सुनेचे वेगळेच नाते प्रेक्षकांना अनुभवता येईल, तर ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

वयाच्या मर्यादेवरून फिस्कटलेले संजू आणि रणजितचे नाते पुन्हा एकदा खुलण्याचा प्रसंग ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजाराणीची गं जोडी’ या मालिकेत येणार आहे. सध्या रणजितने संजूशी पुन्हा लग्न केले असले तरी संजूपासून हात राखून वागण्यातच रणजित धन्यता मानतो आहे. पण येत्या भागांत असे काही घडेल ज्यामुळे रणजितला संजूच्या प्रेमाची जाणीव होईल. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत मात्र मंगल निवासाचे म्हणजे लष्करे कुटुंबाचे दोन तुकडे होताना दिसणार आहेत. मंगलच्या अहंकारामुळे शिवाने घराचे दोन भाग केले आहेत. सध्या सिद्धी गरोदर असण्याची गोड बातमी घरात असली तरी घराच्या ताटातुटीमध्ये सुखावरही दु:खाचे सावट आहे. तर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील सज्जन हे पात्र चांगलेच लोकप्रिय झाले होते. लतिका आणि अभिमन्यूच्या लग्नानंतर पुन्हा सज्जनरावांची किमया मालिकेत दिसू लागली आहे. कर्जाच्या बदल्यात अभिमन्यू लतिकाला सोडणार होता, परंतु दिवसेंदिवस अभिमन्यू आणि लतिका एकमेकांना नव्याने जाणून घेत आहेत. त्यामुळे जाडेपणाचा तिरस्कार करणारा अभिमन्यू लवकरच लतिकाच्या प्रेमात पडताना दिसेल. तर २८ डिसेंबरपासून ‘जय जय स्वामी समर्थ’ ही नवी मालिका ‘कलर्स मराठी’वर भेटीला येते आहे.

‘चांदणे शिंपित जा’ ही नवी मालिका २८ डिसेंबरला ‘सोनी मराठी’वर दाखल होणार आहे. ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेतील अमृता या मालिकेत गाडय़ांची डागडुजी करताना दिसणार आहे. सर्व कुटुंबाचा भार स्वत:वर पेलणारी ‘चारू’ असे तिचे पात्र असेल. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत मात्र मोठे बदल घडताना दिसत आहेत. शिवबांची भूमिका स्वत: डॉ. अमोल कोल्हे साकारात असून जिजाऊंच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांचा प्रवेश झाला आहे. आता खऱ्या अर्थाने मालिकेतील कथानक उत्कंठावर्धक होईल असे दिसते. तर ‘सावित्रीजोती’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. शेवटच्या भागांमध्ये ‘विधवा पुनर्विवाह’ यावर आधारलेले कथानक असेल. दोन आठवडय़ांपूर्वी आलेल्या ‘असं माहेर नको गं बाई’ या मालिकेने सध्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्वानंदी टिकेकर, पुष्कराज चिरपूटकर, सुप्रिया पाठारे, राजन भिसे अशा दिग्गजांची मांदियाळी असलेल्या या मालिकेत सासरी कंटाळलेल्या मुलीला माहेरचा माहेरवास कसा जड होतो हे कळणार आहे. त्यामुळे ‘सोनी मराठी’ही सध्या नावीन्यपूर्ण कथानकात बाजी मारताना दिसत आहे.

तर ‘झी युवा’ वाहिनीवरील ‘डॉक्टर डॉन’ मालिकेत देवाच्या एका चुकीमुळे मोनिकाला डीन पदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे आता ते कसे आणि कुठे भेटणार हा प्रश्न सत्याला सतावतो आहे. जर देवा-डॉलीमध्ये संवादच घडला नाही तर त्यांच्यातल्या प्रेमाची त्यांना जाणीव कशी होणार.. यावर सत्या एक भन्नाट कल्पना शोधून काढतो. सत्या स्वत:च हॉटेल थाटण्याचा घाट घालतो. अनुभव नसल्याने ग्राहकांशी कसे बोलायचे कळत नसल्याने तसेच चांगले, संयमी कसे वागायचे हे शिकण्यासाठी सत्या एका मॅनेजरची नेमणूक करतो. ती मॅनेजर म्हणजे मोनिका श्रीखंडे. कॅफेच्या निमित्ताने देवा-मोनिका एका छताखाली रोज भेटू लागतात. त्यांच्यातला संवाद वाढू लागतो. आता पुढे नेमके काय घडणार, देवा-मोनिका पुन्हा एकत्र येणार का?  हे आगामी भागात कळेल. मालिकांच्या जगतात कथानकांमध्ये बदल घडणे रोजचेच असले तरी, वर्षांखेरीस प्रत्येक वाहिनीवर नवीन मालिका तेही नव्या कथानकासह येणे हे वर्षांचा शेवट गोड करणारे आहे.