रेश्मा राईकवार

आयुष्य हे त्या सारिपाटावरच्या डावासारखं आहे, एकदम अनपेक्षित. माणसं ही या सारिपाटावरच्या सोंगटय़ांसारखी.. दैवाचे फासे पडतात तसं ही माणसं आपापल्या मतीप्रमाणे, नीतीप्रमाणे पुढे पुढे सरकत राहतात. त्यांच्यासमोर आलेल्या परिस्थितीला त्यांच्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे तोंड देत पुढे जात राहतात. शेवटी सगळ्यांनाच घरात जायचं आहे आणि डाव संपवायचा आहे. आता या सारिपाटावर असताना ते जे काही वागले त्याला कर्माचा हिशोब जोडायचा की त्यांच्या कर्माना पाप-पुण्याच्या गणितात बसवायचं.. नपेक्षाही सारिपाटाच्या खेळाचा नियम लक्षात घेत एकमेकांना मारत, वाचवत घरापर्यंत पोहोचणाऱ्या सोंगटय़ांचा प्रत्येक वेळी रंगणारा डाव तटस्थपणे पाहायचा.. हे दिग्दर्शक आपल्यावर सोपवतो. मुळात ‘ल्यूडो’ या चित्रपटाची सुरुवातच दिग्दर्शकाने या खेळाचा आयुष्याशी संबध जोडत केली आहे. खूप साऱ्या व्यक्तिरेखा, त्यांच्या कधी एकमेकांना समांतर जाणाऱ्या गोष्टी, तर कधी एकमेकांच्या गोष्टीतली घुसखोरी. दिग्दर्शक फासे टाकत राहतो आणि आपण या डावात गुंतून जातो.

इतक्या सगळ्या व्यक्तिरेखांना एकत्र आणायचं, त्यांच्या वेगवेगळ्या कथांना एकाच खेळात अडकवून लोकांसमोर चित्रपट रंगवण्याचं काम अनुराग बासूसारखा दिग्दर्शकच करू शकतो. दिग्दर्शकाने रंगवलेल्या या ‘ल्यूडो’च्या खेळात वरवर पाहता चार मुख्य सोंगटय़ा आहेत. पहिली सोंगटी म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असलेला हरहुन्नरी कलाकार आकाश चौहान (आदित्य रॉय कपूर) आणि त्याची माजी प्रेयसी श्रुती (सान्या मल्होत्रा)जिचा पाच दिवसांत एका श्रीमंत कुटुंबातल्या तरुणाशी विवाह होणार आहे. दुसरा आहे तो कधीकाळी गुंड असलेला आणि आता त्याच गुंड साथीदारांच्या मदतीने एक छोटंसं हॉटेल चालवणारा अलोक ऊर्फ आलू (राजकुमार राव). आलूचं शाळेपासूनच पिंकीवर (फातिमा सना शेख) प्रेम आहे, पण त्याच्या प्रेमाला कायम वाटाण्याच्या अक्षता लावणारी पिंकी चार वर्षांपूर्वीच विवाहबद्ध झाली असून सध्या ती छोटय़ा बाबूची आई आहे. तिसरं पात्र आहे ते बिट्टूचं(अभिषेक बच्चन). गुंडगिरी सोडून संसारात रमलेल्या बिट्टूला त्याचा बॉस एका गुन्ह्य़ात अडकवून तुरुंगात धाडतो. दरम्यानच्या काळात बिट्टूच्या बायकोने त्याच्याच मित्राशी लग्न के ल्याने बायकोही नाही आणि मुलगीही नाही या अवस्थेत तो भिरभिरतो आहे. तर या कथेतलं सगळ्यात गरीब पात्र आहे तो गावातून नोकरीसाठी आलेला राहुल (रोहित सराफ). घर घेण्याएवढी ऐपत नसल्याने राहुल मॉलमध्ये नोकरी करतो आणि तिथल्या सुरक्षारक्षकाला फसवून तिथेच रात्री झोपतो, आंघोळ करतो आणि पुन्हा कामाला लागतो. या चार पात्रांना नाचवणारा किं वा त्यांच्या आयुष्यात गोंधळ घडवणारा एक मोठा फासा आहे तो म्हणजे डॉन सत्तूभैया (पंकज त्रिपाठी). सत्तूभैयाच्या गुन्हेगारी अड्डा हा या खेळाचा मुख्य बिंदू आहे. इथून खेळ सुरू होतो आणि मग या चौघांच्या आपापल्या कथांना घेत डाव शेवटापर्यंत रंगत जातो.

मुळात चार व्यक्तिरेखा, त्यांच्या स्वत:च्या चार गोष्टी त्यामुळे त्यांच्या गोष्टीतली पात्रं वेगळीच. शिवाय या चार गोष्टींना एकत्र घेऊन धावणारी आणखी एक  स्वतंत्र गोष्ट, त्यांचीही वेगळी पात्रं ही सगळी फौज सांभाळून कु ठेही कथा फसू न देणं हे एक मोठं कसब आहे. इथे हे कसब कथा-पटकथा लेखक म्हणून खुद्द अनुराग यांनीच सांभाळलं आहे. पटकथेतच चोख असलेला हा चित्रपट त्यामुळे कु ठेही फसत नाही. या चौघांच्या कथा व्यवस्थित आपल्यासमोर येतात. यात कोणा एकालाच वाव मिळाला आहे किं वा अमुक गोष्ट रंगतच नाही, असंही कुठे घडत नाही. अर्थात गोष्टी आणि व्यक्तिरेखांची लडच्या लड असल्याने चित्रपट थोडा लांबलचक झाला आहे, पण म्हणून तो कुठेही कंटाळवाणा झालेला नाही. या चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा सत्तूभैया आणि त्याच्या व्यक्तिरेखेनुसार त्याला भगवानदादांच्या चित्रपटातील गाण्याची दिलेली जोड यामुळे डॉन असूनही ही व्यक्तिरेखा अंगावर येत नाही. ‘किस्मत की हवा कभी नरम.. कभी गरम..’ या गाण्याच्या तालावर आपणही सत्तूभैयाच्या नशिबाने मांडलेला खेळ आणि त्या खेळात हललेल्या या चार सोंगटय़ांच्या आयुष्यात रमून जातो.

दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘अंधाधून’ या चित्रपटाने असाच थरारक अनुभव दिला होता. अचानक-अनपेक्षितपणे घडत जाणाऱ्या घटना आणि त्यातून घडणारा अक्षरश: अंधाधुंद गोंधळ जसा पाहायला मिळाला होता, तसाच ‘ल्यूडो’ या नावाप्रमाणे रंगवलेला खेळ इथे पाहायला मिळतो. प्रीतमचं संगीत, गाण्यांचाही कथा प्रवाही करण्यासाठी के लेला वापर आणि याला सगळ्या उत्तम कलाकारांची मिळालेली जोड.. अनुराग बासूंच्या चित्रपटात या सगळ्या गोष्टींची पर्वणी असते. ती ‘ल्यूडो’मध्येही आहे. पंकज त्रिपाठींची अभिनय एक्स्प्रेस सध्या वेगाने धडाडते आहे, सत्तूभैया हा त्यातला तितकाच ताजा आणि नवीन अध्याय. राजकु मार रावने रंगवलेला असाहाय्य प्रेमी हा त्याच्या लुकसह भलताच आवडून जातो. आदित्य रॉय कपूर आणि सान्या मल्होत्रा यांची प्रेमकथाही आजच्या काळाशी जोडून घेतल्याने लक्षात राहते. अभिषेक बच्चनची भूमिका पाहणे हीच सध्या चाहत्यांसाठी मोठी संधी आहे. या सगळ्यांच्या बरोबरीने छोटय़ा भूमिके त भाव खाऊन गेलेल्या अनेक व्यक्तिरेखा आहेत. नर्स लता कु ट्टीच्या भूमिके तील शालिनी वत्स, श्रीजाच्या भूमिके तील अभिनेत्री पर्ल, राहुलच्या भूमिके तील अभिनेता रोहित सराफ. रोहितच्या वाटय़ाला संवादही नाहीत, के वळ नजरेतून आणि देहबोलीतूनही त्याने आपली दखल घ्यायला लावली आहे. नशिबाचा खेळ, दैवाचे फासे या सगळ्या कल्पनांची अप्रतिम कथारूप अनुभूती दिग्दर्शक अनुराग बासू यांनी ‘ल्यूडो’तून दिली आहे. कधी नरम, कधी गरम, कधी नरम-गरम असा हा सारिपाटाचा खुशखुशीत रंगलेला डाव आहे.

ल्युडो

दिग्दर्शक – अनुराग बासू

कलाकार – राजकु मार राव, आदित्य रॉय कपूर, अभिषेक बच्चन, पंकज त्रिपाठी, रोहित सराफ, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, आशा नेगी, शालिनी वत्स, अनुराग बासू.