News Flash

आठवणीतील दिवाळी

दिवाळी सणाच्या आठवणी या इतर सणांपेक्षा जास्तच असतात. अशाच काही कलाकारांच्या मजेशीर आठवणी त्यांच्याच शब्दात..  

(संग्रहित छायाचित्र)

दिवाळीला सुरुवात झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दिव्यांच्या रोषणाईने आजूबाजूचा परिसर उजळून निघाला आहे. प्रत्येक सणाच्या आपल्या आठवणी असतात. दिवाळी सणाच्या आठवणी या इतर सणांपेक्षा जास्तच असतात. अशाच काही कलाकारांच्या मजेशीर आठवणी त्यांच्याच शब्दात..

प्रिया बेर्डे, अभिनेत्री

मागे वळून पाहताना

मी माहेरची कोल्हापूरकर, त्यामुळे लहानपणी दिवाळीची तयारी अतिशय जोमात चालायची. आई आणि आजीची लगबग खूप आधीपासूनच चालायची. चाळकऱ्यांची दिवाळी काय असते ती मी खूप वर्ष अनुभवली आहे. लहानपणी फक्त दिवाळीलाच तीन – चार जोड कपडे मिळायचे. तेच कपडे पुढे वर्षभर सणवार, शुभप्रसंगी घातले जायचे. त्यामुळे दिवाळीची मी आतुरतेने वाट बघायचे. लक्ष्मीकांत यांचा लक्ष्मीपूजन हा तिथीने जन्मदिवस असतो. त्यांच्या वाढदिवसाला मराठी चित्रपटसृष्टीतले सर्व कलाकार घरी यायचे. खूप मोठी पार्टी ठेवली जायची. लक्ष्मीकांत यांना स्वत:ला फटाके फोडायला खूप आवडायचे. त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. त्याचे चटके आपल्या मुलांना व पुतण्याना बसू नयेत म्हणून ते २५ ते ३० हजाराचे फटाके तेव्हा आणायचे. त्यांचा वाढदिवस आणि दिवाळी म्हणजे घरात खूप मोठा जल्लोषच असायचा. मला स्वत:ला दिवाळी हा सण खूप आवडतो. लहानपणापासून दिवाळीत करत आलेला जल्लोष अजूनही अविरत चालू आहे. दरवर्षी मी, अभिनय आणि स्वानंदी आम्ही तिघे मिळून पारंपरिक फराळ बनवतो. यंदाची अर्धी दिवाळी पुण्याला व अर्धी मुंबईला साजरी करतो आहोत.

ऋतुजा बागवे, अभिनेत्री

किल्ले आणि पोवाडे

माझे शालेय शिक्षण बोर्डिगमध्ये झाले. दिवाळीची आम्हाला पंधरा दिवस सुट्टी असायची. घरी जायला मिळणार या भावनेने मी दिवाळीची आतुरतेने वाट बघायचे. शाळेत असल्यापासून घरचा कंदील मीच बनवते. लहानपणी सोसायटीच्या आवारात आम्ही सोसायटीतले सर्व बालगोपाळ सदस्य एकत्र येऊन किल्ला बनवायचो. वातावरण निर्मिती करण्यासाठी मोठी मुले त्यांच्या घरून डीव्हीडी प्लेयर आणायचे आणि आम्ही महाराजांची गाणी व पोवाडय़ांची सीडी लावायचो. त्यातून एक चैतन्य निर्माण व्हायचं. आईला फराळ बनवायला मी नेहमीच मदत करायचे. एका दिवाळीत मी स्वत:हून काजुकतली बनवण्याचा घाट घातला. कोणाचीही मदत न घेता मी मिश्रण तयार केलं, पण काजुकतलीसाठी अपेक्षित मिश्रण झालेच नाही. अतिशय मऊ मिश्रण झाले मग अशा कठीण वेळी काय करायचे तर मी त्याचे रोल केले. ते घरी एवढे आवडले की तेव्हापासून आमच्याकडे काजू रोलच बनतात.

हार्दिक जोशी, अभिनेता

कंदील विकण्याची गंमत

माझा सर्वात आवडता सण म्हणजे दिवाळी. लहानपणीची दिवाळी मुंबईत अँटॉप हिलमध्ये गेली. तिथे लहानपणी मी व माझा एक मित्र आम्ही मिळून छोटे छोटे कंदील बनवायचो व ते पाच रुपयाला विकायचो. त्यातून मिळवलेल्या पैशातून पेप्सी कोला खायचो किंवा काहीतरी गोडधोड पदार्थ विकत घ्यायचो. लहानपणी मित्रांसोबत किल्ले बनवायचो. त्यासाठी माती, दगड, मावळे गोळा करण्यापासून तयारी असायची. तयार केलेल्या किल्लय़ात आम्ही एक झाड लावायचो. आईला फराळ बनवायला, घर साफ करायला मी दरवर्षी हमखास मदत करायचो. आता शूटिंगच्या व्यग्र कामकाजामुळे फक्त फराळ खायला मदत करतोय. मला आईच्या हातचे फराळाचे सर्व पदार्थ आवडतात. तब्बल सहा महिन्यांनी मी घरी दिवाळी साजरी करायला आलो आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ही फक्त कुटुंबासोबत साजरी करणार आहे.

आदिनाथ कोठार, अभिनेता

दुधी हलवा करंजीची लज्जत

लहानपणी दिवाळी म्हटली की सोबतीला कुडकुडणारी थंडी असायची. कुडकुडत आईकडून तेल-उटणे लावून अभ्यंगस्नान करून फटाके फोडायचे आणि त्यानंतर प्रत्येकाच्या घरी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला जायचे, ही एक अंगवळणी पडलेली वार्षिक सवय होती. त्याची मजाच काही और असते. मला आईच्या हातचे फराळाचे सर्वच पदार्थ आवडतात पण त्यातल्या त्यात आईने केलेली दुधी हलव्याची बेक करंजी मला मनापासून आवडते. अजूनही मी या करंजीसाठी दिवाळीची वाट बघतो. यंदाची दिवाळी अतिशय साधेपणाने पण पारंपरिक ठेवा जपत त्या सणातला आनंद कुठेही कमी न करता साजरा करतो आहे. माझं एका प्रोजेक्टचं शूटिंग चालू आहे. त्यासाठी माझं डाएटही सुरू आहे, त्यामुळे मला फराळावर ताव मारता येत नाही आहे. डाएट संपल्यावर मात्र मी आईला सर्व फराळ पुन्हा बनवायला लावणार आहे आणि निवांत खाणार आहे.

आरोह वेलणकर, अभिनेता

फटाका फुटला पाठीवर

लहानपणी घरी मोजकेच फटाके आणले जायचे. आणि त्या फटाक्यांच्या भावंडांमध्ये वाटण्या व्हायच्या. मला फटाके फोडायला फार आवडतात. लहानपणी आम्ही आमच्या गल्लीत आमचेच फटाके विकायचो आणि त्यातून मिळालेले पैसे जमवून एक छोटीशी पार्टी करायचो. फटाका हातावर लावून तो फेकून फोडणे म्हणजे आयुष्यातला फार मोठा थरार असे सर्वच लहान मुलांना वाटत असे. एकदा हा थरार माझ्यावरच उलटला. माझ्या एका मित्राने फटाका हातात घेऊन त्याची वात पेटवली व अंदाज न घेता पेटता फटाका फेकला. ज्या दिशेने फेकला नेमका तिथेच मी दुसरा फटाका लावत होतो जे त्याला काळोखात कळलेच नाही.आणि तो फटाका माझ्या पाठीवर येऊन फुटला. आणि माझी पाठ चांगलीच भाजली. फटाक्यांच्या बाबतीत असे अनेक किस्से आहेत. आमच्या सोसायटीत रांगोळीच्या स्पर्धा व्हायच्या. सोसायटीच्या मोकळ्या जागेत स्पर्धकाने रांगोळी काढणे बंधनकारक असायचे. स्पर्धा चालू असतानाच आम्ही तिथे जायचो. आम्हाला खेळण्यावरून त्रास दिलेल्या, ओरडलेल्या लोकांच्या रांगोळीच्या आजूबाजूला जाऊन फटाके फोडायचो. भुईचक्र लावायचो आणि वचपा काढायचो. यंदाची दिवाळी खास आहे कारण आम्ही लवकरच दोनाचे तीन होणार आहोत. यंदाच्या दिवाळीत मी एक संकल्प केला आहे. माझ्या  आसपासच्या स्थानिक कलाकारांच्या कलाकृती मी माझ्या समाजमाध्यमांवर पोस्ट करून त्यांना मार्केटिंगसाठी स्वत:हून मदत करणार आहे. टाळेबंदीमुळे बसलेल्या आर्थिक फटक्यातून त्यांना सावरण्यासाठी अशा पद्धतीने मदत करणार आहे.

संकलन : मितेश रतीश जोशी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 12:03 am

Web Title: article on marathi celebrity memorable diwali abn 97
Next Stories
1 मालिकांचा दीपोत्सव
2 माध्यम स्वातंत्र्य हवेच!
3 मूळ गोंधळ बरा होता..!
Just Now!
X