निलेश अडसूळ

आपल्याला दहा कलाकारांची नावे विचारली तर आपण सहज सांगू शकतो पण दहा दिग्दर्शक सांगा म्हटलं की क्षणभर विचार करावा लागतो. याउलट अभिनेत्यांची आणि अभिनेत्रींची आपल्याला कायमच भुरळ पडत असते. त्यांचा एक स्वतंत्र चाहता वर्गही असतो. पण त्या कलाकारांचे पडद्यावर दिसणारे रूप घडवण्यामागे दिग्दर्शकांची अथक मेहनत असते याचा बऱ्याचदा आपल्याला विसर पडतो. म्हणजे अनेक कलाकृतींमधून समोर येणारा अभिनेता किंवा अभिनेत्री तीच असते. पण नवे पात्र, वागण्याबोलण्याची नवी ढब, नवे अवकाश आणि नव्याने आलेला वेगळेपणा यामुळे ते मनात घर करून राहतात. तोच वेगळेपणा साकारण्याचे काम दिग्दर्शक करत असतात. अर्थात यात लेखकांचेही योगदान तितकेच आहे. पण शब्दांना चित्ररूप करणारा दिग्दर्शक त्या कलाकृतीचा खरा गुरू ठरत असतो. असेच अनेक कलाकृती आपल्या तालमीत घडवणारे मराठी कलासृष्टीतील काही दिग्गज ‘गुरू’ आज पौर्णिमेनिमित्त सांगत आहेत आपल्या गुरूविषयीच्या आठवणी..

संगीत किंवा नृत्य क्षेत्रात गुरू-शिष्य परंपरेला विशेष महत्त्व आहे. नाटक किंवा चित्रपट कला त्या मानाने बरीचशी मुक्त आहे. म्हणजे इथेही गुरू आहेत पण तो अमुक एक व्यक्तीच असेल असे नाही. अनुभवातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनेक गुरू घडत जातात. इथे गुरूची प्रतिमा ‘गुरू’ या अर्थाने परिपक्व नसली तरी आपल्यासोबत काम करणारी प्रत्येक व्यक्ती काही तरी शिकवून जात असते, मग ती वयाने वा अनुभवाने लहान असली तरीही.. अशीच भावना या मालिका-नाटक-चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या या दिग्गजांनी व्यक्त केली.

अजूनही शिकतोच आहे..

नाटकाचे संस्कार तसे आई-बाबा, मावशी सुधा करमरकर यांच्याकडून झालेच पण नाटकाचा खरा गुरू मला पुरुषोत्तम बेर्डे यांच्या रूपाने मिळाला. मी ठरवून नाटक केले नाही किंवा मी कोणत्या ‘ट्रेनिंग स्कूल’चा विद्यार्थी नाही. राज्य नाटय़ स्पर्धेत ‘देवस्की’ नावाचे नाटक मी केले होते त्याचे दिग्दर्शन बेर्डे यांनी केले होते. त्यावेळी त्यांची नाटक बसवण्याची पद्धत, एकमेकांशी होणारा संवाद यातून मला नाटक कळत गेले आणि लौकिकार्थाने ते माझे पहिले गुरू झाले. ते स्वत: डिझाइन क्षेत्रातले असल्याने नाटकाच्या दृश्यात्मक परिणामावर त्यांचा विशेष भर असायचा. ते स्वत: उत्तम वादक असल्याने संगीताची जाण आणि तितकेच साहित्यप्रेमी होते. मी स्वत: नाटक करू लागलो तेव्हा विजयाबाई आणि दुबेजींचे मार्गदर्शन मिळाले. नातेसंबंध दाखवताना त्यातला खरेपणा संवादाच्या मधल्या पोकळीतून कसा भरून काढायचा याचे तंत्र बाईंना अवगत होते. तर दुबेजी म्हणजे साहित्य आणि भाषेचा गाढा अभ्यास. नाटक करत राहा, त्याची प्रसिद्धी पाहू नका, असा उपदेश त्यांनी केला होता. रत्नाकर मतकरी, राजीव आणि अरुण नाईक या लेखकांनी माझ्या कामाला विशिष्ट वयात हवी असलेली दिशा दिली. डॉ. लागू, प्रभावळकर, विक्रम गोखले, भक्ती बर्वे, वंदना गुप्ते, राजन भिसे, सुमित राघवन, भरत जाधव आणि अशा असंख्य कलाकारांकडून मी शिकलो आणि आजही शिकतो आहे. मला समकालीन असणाऱ्या वामन केंद्रे यांच्याकडून शिस्त, चंद्रकांत कुलकर्णीकडून प्रेक्षकांना ‘सस्पेन्स आणि रिलॅक्स’ करत नाटक खेळवणे, कुमार सोहनी, बुद्धीसागर अशा प्रत्येकाचे गुण मी टिपले आहेत. प्रदीप मुळ्ये, शीतल तळपदे यांच्याकडून तांत्रिक बाबी तर अशोक पत्की यांच्याकडून संगीताचे धडे घेतले. ज्येष्ठ संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे काम अनुभवणे ही पर्वणी असायची. केदार शिंदे, संतोष पवार, मोहित टाकळकर, अलोक राजवाडे या मंडळींची कामे पाहून चकित व्हायला होते. नाटकाच्या निमित्ताने मला भारतभरातील अनेक दिग्गजांना भेटता आले.  शंभू मित्रा, बादल सरकार, सत्यजित रे आणि अशा अनेक व्यक्तींनी कलाकार नाही तर माणूस म्हणून माझ्यासमोर आदर्शवत प्रतिमा घडवल्या आहेत.

– विजय केंकरे

प्रत्येकाला द्रोणाचार्य प्राप्त होतील असे नाही..

आपल्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. माझ्या बाबतीत हे मला प्रकर्षांने जाणवते. घरात निम्न मध्यमवर्गीय परिस्थिती, शिक्षणाचा फारसा सोस नसलेल्या घरात माझा जन्म झाल्याने साहित्य आणि संस्कारांची पायाभरणी शिक्षकांनी केली. पुढे महाविद्यालयात नाटक करू लागलो तेव्हा गुरू कुणीच नव्हते. पण आपल्यापेक्षा वर्ष दोन वर्ष अनुभवी असल्याने मित्राकडून शिकत गेलो. त्यातूनच स्वावलंबन आमच्या अंगी रुजले. पुढे आम्ही मित्रमंडळीच एकमेकांचे गुरू झालो आहे ‘जिगीषा’ची उभारणी केली. गुरू नसला तरी आपल्या समकालीन मित्र-मैत्रिणी, नट, दिग्दर्शक हे आपल्याला अप्रत्यक्षरीत्या खूप काही शिकवत असतात. त्यात दिग्दर्शकाला लेखन, संगीत, वाद्य, तांत्रिक बाबी सगळ्याचे ज्ञान अवगत असणे अपेक्षित असल्याने त्याचे डोळे आणि कान सतत उघडे असावे लागतात. सुरुवातीच्या काळात सत्यदेव दुबे आणि विजया मेहता यांच्या कलाकृती पाहून मी बारकावे आत्मसात करत गेलो. पुढे त्यांचा प्रत्यक्ष सहवासही मिळाला. पण अजित दळवी आणि प्रशांत दळवी हे दोन मित्र मला खऱ्या अर्थाने गुरू म्हणून लाभले. त्यांच्या कलाकृती साकारताना वैचारिक बैठक, विषय, आशय यावर आम्ही एकत्र काम करत असू. गुरूला वयाची मर्यादा नसते नं अनुभवाची. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे. भरभरून दाद देणारा प्रेक्षकही गुरूच असतो.

– चंद्रकांत कुलकर्णी

शाळेतल्या बाई प्रेरणास्थानी

आज यशस्वी दिग्दर्शक झालो असलो तरी दिग्दर्शन म्हणजे काय हे देखील मला माहीत नव्हते. किंबहुना कलेशी माझा, माझ्या कुटुंबीयांचा आणि परिचितांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता. वडील मिल कामगार आणि घरची परिथिती बेताची असल्याने मी विज्ञान शाखेकडे जावे, अभियंता व्हावे असेच त्यांना वाटे. पण शाळेत असताना माझ्या शिक्षिका कुमुद डोके यांनी माझी चित्रकला पाहून त्यात करिअर करण्याचा सल्ला दिला. चित्रकलेच्या परीक्षाही मी त्यांच्या मार्गदर्शनाने उत्तीर्ण झालो. डोंबिवलीच्या ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिर‘मध्ये सुरू झालेला हा प्रवास दिग्दर्शकापर्यंत येऊन पोहोचला यामागे केवळ त्या आहेत.  जे. जे. इन्स्टिटय़ूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये मी प्रवेश घेतला. तिथून माझे आयुष्य बदलायला सुरुवात झाली. त्यांनतर जाहिरात क्षेत्रात बारा वर्ष काम करून मग मी दिग्दर्शनाकडे वळण्याचा विचार केला. पण चित्रपटात दिसणारे दृश्य कल्पनेत रंगवण्याचे धडेही त्यांनी मला दिले. म्हणून माझ्या कलाकृती काहीशा चित्रवत भासतात. आजही माझ्या कलाकृती, माझ्यावर छापून आलेला मजकू र त्या आवर्जून वाचतात आणि दाद देतात. एवढेच नव्हे तर परदेशी शिकणाऱ्या माझ्या मुलालाही त्यांचे मार्गदर्शन सुरू आहे. त्या स्वत: अजूनही चित्र रेखाटतात आणि त्यांच्या कामातून मला प्रेरणा मिळत जाते.

– रवी जाधव

विनय आपटे यांनी घडवलं

गुरूकडे पाहून शिकणारे दोन प्रकारचे शिष्य असतात एक प्रत्यक्ष तालमीत शिकलेला आणि दुसरा एकलव्यासारखा. कलासृष्टीत वावरताना काहीसे असेच शिकावे लागते. म्हणजे आपण ज्यांच्यासोबत काम करतो बऱ्याचदा तेच आपले गुरू होतात. माझ्या दिग्दर्शनाच्या प्रवासाची सुरुवात विनय आपटेंपासून झाली. त्यांनी मला घडवलं. दिग्दर्शनासोबतच लेखन, चित्रीकरण, प्रकाश, ध्वनी आणि सर्वच तांत्रिक बाजूंनी ते परिपूर्ण होते. त्यांच्यासोबत काम करताना कित्येक गोष्टी केवळ पाहून शिकता यायच्या. आज मी जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळे. ते माझे गुरू झाले, त्यांनी मला आत्मविश्वास दिला. हाच अनुभव मला ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांच्यासोबत काम करताना आला. त्यांच्या कलाकृतीत आपल्याला कमालीची अचूकता, नेटकेपणा, बारकावे पाहायला मिळतात. एखादे दृश्य हवे तसे साध्य झाल्याशिवाय ते पुढे जात नसत. यासोबतच मला अनेक अप्रत्यक्ष गुरू मिळाले. त्यांच्या कलाकृती पाहून मी माझ्या कामात बदल करत गेलो. श्याम बेनेगल, गुलजार, केतन मेहता, कुंदन शहा, शेखर कपूर अशा दिग्गज मंडळींचा त्यात समावेश आहे. नातेसंबंधांना अलवारपणे खुलवण्याचे तंत्र त्यांच्या दिग्दर्शनात होते. आजही त्यांच्या कलाकृतींतून शिकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

– मंदार देवस्थळी

रंगभूमी हीच आद्यगुरू..

रंगभूमी हीच माझी गुरू आहे आणि ती कायम राहील. लहान असताना आईने माझ्यातील कलेची आवड ओळखून मला बालनाटय़ शिबिरात घातले आणि कलेचा प्रवास सुरू झाला. पहिले संस्कार तिथेच झाले. पुढे महाविद्यालयात असताना अरुण मुकेश या आमच्या दिग्दर्शकांनी एकत्र येऊन काम करण्याचे महत्त्व शिकवले. व्यावसायिक नाटकात पाऊल टाकले तेव्हा देवेंद्र पेम आणि महेश मांजरेकर यांच्यासारखे गुरू मिळाले ज्यांनी नाटकाची शिस्त शिकवली. रसिकवर्ग हा आपल्यासाठी नाटय़गृहात येत असतो, त्यामुळे नाटक सादर करताना त्यात आपला शंभर टक्के सहभाग असायलाच हवा याची शिकवण ‘ऑल द बेस्ट’ नाटक करताना मिळाली. त्यानंतर आज वीस वर्षांनी ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या निमित्ताने विजू केंकरे यांनी मला पुन्हा रंगमंचावर काम करण्याची संधी दिली. पहिल्या प्रयोगाला प्रवेश घेताना पाय थरथरत होते पण प्रयोग यशस्वी करण्याचे सामर्थ्य या रंगभूमीने आणि पदोपदी भेटलेल्या माणसांनी दिले. हीच शिस्त आणि प्रेरणा घेऊन आजवर लेखन, दिग्दर्शन, संकलन, अभिनय करत आलो आहे. त्यामुळे मला जे प्राप्त झाले आहे ते या रंगभूमीने दिले असल्याने ती माझ्या गुरुस्थानी आहे.

– सतीश राजवाडे