News Flash

मराठी चित्रपटांची हिंदी ‘धडक’ किती फायद्याची?

गेल्या काही वर्षांमध्ये काही निवडक मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक झाले आहेत.

मराठी चित्रपटांची हिंदी ‘धडक’ किती फायद्याची?
काही निवडक मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक झाले आहेत.

हिट चित्रपटांचे हिंदी रिमेक झाले नाही तरच नवल! सिनेमाला भाषेचं बंधन नाही हे वाक्य रिमेकच्या बाबतीत एकदम प्रमाण मानून हॉलीवूडपासून टॉलीवूडपर्यंत प्रत्येक हिट चित्रपटाचा रिमेक हिंदीत झालाच पाहिजे, याकडे बॉलीवूडची मंडळी विशेष लक्ष ठेवून असतात, मग मराठी चित्रपटांकडे ते कसे दुर्लक्ष करतील? अर्थात रिमेकच्या बाबतीत बॉलीवूडला हॉलीवूड चित्रपट आणि दाक्षिणात्य चित्रपट जास्त जवळचे आणि यश मिळवून देणारे ठरले आहेत. मराठीच्या बाबतीत तिकीटबारीवर हिट ठरलेल्या चांगल्या चित्रपटांचे हिंदीत रिमेक करण्याची परंपराही तशी खूप जुनी आहे. अगदी पन्नास वर्षांपूर्वीही मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक झाले आहेत. मात्र त्यापैकी हिंदीत हिट ठरलेल्या चित्रपटांचे प्रमाण नाहीच्या बरोबरीचे आहे. मध्यंतरी मराठीचे हिंदी रिमेक झालेच नव्हते. आता मात्र ‘सैराट’ची हिंदीत थेट करण जोहर प्रॉडक्शनच्या माध्यमातून ‘धडक’ बसते आहे. दुसरीकडे नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘आपला मानूस’ हिंदीत आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यानिमित्ताने मराठी ते हिंदी रिमेक चित्रपटांचा घेतलेला हा आढावा..

गेल्या काही वर्षांमध्ये काही निवडक मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक झाले आहेत. त्यातही अनेकदा मराठीतले दिग्दर्शक स्वत:च आपले मराठी चित्रपट हिंदीत करताना दिसतात. गेल्या वर्षी अभिनेता श्रेयस तळपदेने त्याची निर्मिती असलेल्या ‘पोश्टर बॉईज’ या हिट चित्रपटाचा हिंदी रिमेक केला. मराठीत या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले होते, हिंदूीत मात्र ही धुरा स्वत: श्रेयसनेच पेलली. सनी देओल, बॉबी देओल, सोनाली कुलकर्णी आणि स्वत: श्रेयस यांनी त्यात मुख्य भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाने तिकीटबारीवर ११ कोटी रुपयांचा गल्ला गोळा करत बऱ्यापैकी यश कमावले. त्यानंतर या वर्षी लगेचच नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या मराठीतील सुपरडुपर हिट चित्रपटाचा रिमेक धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘धडक’ म्हणून प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या हिंदी अवतारात मात्र सगळेच चेहरे बदलले आहेत. अनेकदा मराठीत हिट असला तरी चित्रपट हिंदीत नेताना मूळ गोष्टीशी प्रामाणिक राहत ती देशभरातील जनतेला आपलीशी वाटेल असे त्याचे रूपांतरण करणे हेच मोठे आव्हान ठरते. ‘सैराट’ चित्रपटात नागराज मंजुळे यांनी जातीयवादाची समाजात पसरलेली मुळे किती खोलवर आहेत याचं चित्रण आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेतून केले होते. जातीयवादाचा डंख हा आपल्या संपूर्ण समाजालाच डसलेला असल्याने ही कथा देशातील कुठल्याही भागात दाखवली तरी प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तरीही हिंदीत ही गोष्ट लोकांसमोर आणताना दिग्दर्शकाने कथेची पाश्र्वभूमी बदलली आहे. राजस्थानमध्ये जिथे जातीयवाद, ऑनर किलिंगचे प्रमाण जास्त आहे त्या भागाचा आधार घेत ही कथा पडद्यावर येते आहे. त्याचे दिग्दर्शन शशांक खेतान याने केले आहे.

‘पोश्टर बॉईज’ हिंदीत करताना नसबंदीचा विषय कायम ठेवत दिग्दर्शक म्हणून श्रेयसनेही ती काळजी घेतली होती. कथेचं रूपांतरण करणं आणि हिंदीतील वातावरणाला साजेशा पद्धतीने ती सादर करणं ही रिमेकची गरज असते. ते भान अगदी दिग्दर्शक सतीश राजवाडेनेही ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हिंदीत करताना ठेवले होते. ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या नावाने प्रदर्शित झालेल्या रिमेकमध्ये शिव पंडित आणि पिया बाजपेयी यांच्या मुख्य भूमिका केल्या होत्या. सतीश राजवाडे यांनीच चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. मराठी चित्रपटांचे हिंदी रिमेक करण्याची परंपरा खूप जुनी आहे. आजवर मराठीतून हिंदी रिमेक झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरलेला चित्रपट म्हणून ‘मेरा साया’ या एकाच चित्रपटाचे नाव घ्यावे लागेल. ‘पाठलाग’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शक राज खोसला यांनी हिंदीत ‘मेरा साया’ नावाने केला. हा चित्रपट तुफान यशस्वी ठरला, मात्र हे यश बाकीच्या अनेक मराठी चित्रपटांच्या हिंदी रिमेकना मिळाले नाही, असे चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी सांगितले. फार आधी जे मराठी चित्रपट हिंदीत आले त्यामागे मुख्यत्वे तीन कारणे होती. त्या वेळी मधुसूदन कालेलकर, ग. रा. कामत आणि राम केळकर हे तिघेही चित्रपट लेखक-पटकथाकार म्हणून प्रसिद्ध होते. कालेलकर आणि कामत हिंदी चित्रपटांसाठीही कथा लिहीत होते. त्यामुळे त्यांची कथा असलेला मराठी चित्रपट यशस्वी झाला तर तो हिंदीतही केला जायचा. असे अनेक चित्रपट हिंदीत आले. ‘आम्ही जातो आमुच्या गावा’ हा चित्रपट हिंदीत ‘तीन चोर’ नावाने आला. ‘प्यासी आँखे’चे दिग्दर्शनही राम केळकर यांनीच केले होते. त्यानंतर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट हिंदीत ‘पिया का घर’ म्हणून आला. दुसरे म्हणजे मराठीतील दिग्दर्शकांनी त्यांचे हिट मराठी चित्रपट हिंदीत नेले. त्याच सचिन पिळगावकर यांनी ‘गंमत जंमत’ हिंदीत ‘प्रेम दिवाने’ म्हणून केला. तर महेश कोठारेंनी ‘माझा छकुला’ हा हिंदीत ‘मासूम’ म्हणून केला. असे अनेक मराठी चित्रपट हिंदीत आले पण त्यांना मराठीत जे यश मिळाले ते हिंदीत मिळाले नाही, असे ठाकूर यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपट हिंदीत जसेच्या तसे आले किंवा काही मराठी चित्रपटांपासून प्रेरणा घेत तेच विषय हिंदी चित्रपटांमध्ये दिसले. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट मराठीत तृप्ती भोईर यांनी केलेल्या ‘अगडबम’ चित्रपटावर बेतला होता असे सांगितले जाते. या चित्रपटाला हिंदीत चांगले यश मिळाले. मराठीत १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट हिंदीत २००९ साली ‘पेईंग गेस्ट’ नावाने आला. या चित्रपटात श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, आशीष चौधरी आणि वत्सल शेठ यांच्या मुख्य भूमिका होत्या. रोहित शेट्टीच्या २००८ साली प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल रिटर्न्‍स’ची कथाकल्पनाही १९८९ सालच्या ‘फेकाफेकी’ या मराठी चित्रपटावरून घेण्यात आली होती. प्रियदर्शन दिग्दर्शित ‘भागम्भाग’ या २००६ सालच्या चित्रपटाची कथा ही बऱ्यापैकी ‘बिनधास्त’ या चित्रपटावरून घेण्यात आली होती. दादा कोंडकेनी ‘तुमचं आमचं जमलं’ हा चित्रपट हिंदीत ‘तेरे मेरे बीच में’ नावाने आणला. मराठी चित्रपटांच्या हिंदी रिमेकची ही यादी खूप मोठी आहे. अगदी राजा गोसावींच्या चित्रपटापासून ते मग सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि आता सतीश राजवाडेपर्यंत अनेक दिग्दर्शकांचे हिट मराठी चित्रपट हिंदीत येऊन गेले आहेत. मात्र त्यापैकी यश मिळालेले चित्रपट फारच कमी आहेत. अनेकदा पटकथेच्या पातळीवरच हे चित्रपट फसलेले दिसतात. ‘यशस्वी चित्रपटांची नक्कल केली जाते मात्र मराठीतील कथा हिंदीला आपलीशी वाटेल का? त्याचा आत्मा तोच आहे का? याचा विचार होत नाही. ‘मुंबईचा जावई’ हा अगदी मराठी मध्यमवर्गीय माणसाची कथा होती ती हिंदीत मध्यमवर्गीय माणसाची मानसिकता तीच असेल असे नाही. त्यामुळे विषय चांगले असूनही ते हिंदीत फार चालले नाहीत हेच दिसून आले आहे. त्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत यशस्वी ठरतात त्याचे कारण त्या चित्रपटांमधील मसाला हिंदीत चालून जातो. मात्र ‘सदमा’सारखे जे वेगळ्या विषयांवरचे दाक्षिणात्य चित्रपट होते ते हिंदीत चालले नाहीत’, याकडे ठाकूर यांनी लक्ष वेधले. रिमेकच्या यशापयशाचं हे गणित येत्या काळात ‘धडक’ आणि ‘आपला मानूस’सारखे चित्रपट मोडून काढतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मराठी चित्रपट हिंदीत पोहोचला यापेक्षाही तो देशभरातील प्रेक्षकांना आपलासा वाटावा, यासाठी येत्या काळात दिग्दर्शक-पटकथाकार या सगळ्यांनाच जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत तरच हे चित्र बदललेले पाहायला मिळेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 1:51 am

Web Title: article on marathi movie remade in hindi
Next Stories
1 सगळं गमावण्याच्या भीतीने आयुष्यच बदललं..
2 इरफान खान या वर्षअखेरीस परतणार?
3 वेबवाला : चाचा विधायक ना शेंडा ना बुडखा
Just Now!
X