मराठी चित्रपटांची वाढती संख्या ही या इंडस्ट्रीच्या प्रगतीची खूण असल्यासारखे चित्र निर्माण होते आहे खरे.. पण प्रत्यक्षात वर्षांला शंभर चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना आवडलेले आणि तिकीटबारीवर चाललेले चित्रपट किती, याचं गणित करायला गेलो तर हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याही चित्रपटांची नावे नजरेसमोर येत नाहीत. गेल्या वर्षी मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा  घटला  आणि शंभर चित्रपटाचं गणित ८८ चित्रपटांवर येऊन थांबलं. निश्चलीकरणाचा परिणाम इतर व्यवसायांप्रमाणेच मराठी चित्रपटांवरही झाला, हा तर्क ही मानायचा ठरवला तरी ती वर्षांखेरीच्या दोन महिन्यांमध्ये उपटलेली समस्या होती. मात्र त्याहीआधी अवघ्या पाच ते सहा चित्रपटांना आर्थिक यश कमावता आले ही बाब दुर्लक्ष करता येणारी नाही. मराठी चित्रपटांची वाढती संख्या ही नुसतीच सूज आहे, नव्या वर्षांत ही सूज उतरली पाहिजे, मराठी चित्रपटनिर्मिती करणाऱ्यांनी चित्रपटाच्या निर्मितीचे, प्रसिद्धीचे आणि वितरणाचे गणित समजून घेऊन वाटचाल केली तरच त्यांना आर्थिक यश साध्य होईल. अन्यथा, मराठी चित्रपटांचे ‘दशा’वतार याहीपुढे असेच सुरू राहतील, असे मत चित्रपट क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

गेल्या वर्षी ‘झी स्टुडिओज’च्या महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ या चित्रपटाने तिकीटबारीवर भरघोस कमाई करीत यशस्वी सुरुवात करून दिली. त्यानंतर पहिल्यांदाच शंभर कोटी रुपयांच्या जवळपास जाईल एवढी कमाई करीत नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने इतिहास रचला. मात्र ‘सैराट’ने एवढे कमावले म्हणजे निदान दर दहा चित्रपटांमागे एक-दोन चित्रपटांना तरी चांगली कमाई करता येईल, असे अजूनही मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक छातीठोकपणे सांगू शकत नाहीत. चित्रपटांची संख्या वाढूनही या क्षेत्राला सध्या आर्थिक समस्यांनी घेरले आहे. त्यामागचे कारण स्पष्ट करताना मुळात मराठी चित्रपटांच्या निर्मितीचा आकडा कमी झाला असेल तर मला जास्त आनंद  होईल, अशी स्पष्ट भूमिका अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतली आहे. मुळात, एवढय़ा चित्रपटांची आज गरजच नाही आहे ना.. वर्षांला ५२ आठवडे आहेत. त्यातले सणावाराचे किंवा पितृपक्ष वगैरे कारणाने टाळले जाणारे असे आणखी तीन-चार आठवडे सोडले तर चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी सगळ्यांकडेच ४० आठवडे फक्त उपलब्ध आहेत. म्हणजे आठवडय़ाला एक चित्रपट धरला तर चाळीस चित्रपट असायला हवेत. माझे तर म्हणणे आहे की आत्ताची परिस्थिती पाहता वर्षांला ३० मराठी चित्रपट आले तरच ते गुण्यागोविंदाने नांदू शकतील. त्याचं कारण असं आहे की, एकेका आठवडय़ाला दोन-दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले तर ते चालणारच नाहीत. त्या प्रत्येक आठवडय़ात फक्त मराठी चित्रपट नसतात, हिंदी-इंग्रजी चित्रपटही असतात. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर मराठीत चित्रपटांची संख्या वाढण्याची नाही तर दर्जेदार चित्रपट निर्मितीच गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

‘एव्हरेस्ट’चे संजय छाब्रिया यांनीही चित्रपट निर्मात्यांनी वर्षांतले आठवडे आणि प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या लक्षात घेऊनच नियोजन झाले पाहिजे, अशी भूमिका घेतली. ५२ आठवडे आणि ऐंशी चित्रपट हे व्यस्त प्रमाणच आहे. त्यामुळे चित्रपट चांगला असो वा वाईट, त्याने फरक पडणार नाही. एका आठवडय़ात दोन चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्या दोन्ही चित्रपटांना फटकाच बसणार. त्यांनी गुंतवलेले पैसेही त्यांना परत मिळणार नाहीत. मराठी प्रेक्षक चित्रपट कितीही आवडले तरी आठवडय़ाला दोन चित्रपट बघू शकत नाहीत. त्यांना हिंदी चित्रपटही बघायचे असतात. त्यामुळे कमी पण दर्जेदार चित्रपट निर्मितीच हवी, असे प्रतिपादन त्यांनी केले. मराठी चित्रपटांसमोरची स्पर्धा आता जास्तच तीव्र झाली आहे. मराठीला हिंदीची स्पर्धा होती, आता हॉलीवूडपटांची स्पर्धा आहे. या वर्षी १७ बिग बजेट हॉलीवूडपट प्रदर्शित होत आहेत. शिवाय, मराठी प्रेक्षक हा नाटय़वेडा आहे. सध्या चाळीसएक नाटकं रंगभूमीवर सुरू आहेत आणि त्यांनाही प्रेक्षक आहेत. याचाच अर्थ काही प्रमाणात प्रेक्षक तिथेही विभागला गेलेला आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकून पैसे येतील अशा भ्रमात अनेक निर्माते असतात. मात्र या वर्षी ऐंशी चित्रपटांचे सॅटेलाइट हक्क विकले गेलेले नाहीत. चित्रपटांना उत्पन्नच नसेल तर या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचे कंबरडे मोडते, याकडे जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी लक्ष वेधले.

मराठी चित्रपटसृष्टी एके काळी ‘धूमधडाका’, ‘झपाटलेला’सारख्या चित्रपटांनी गाजवणाऱ्या दिग्दर्शक महेश कोठारे यांचं मत थोडं वेगळं आहे. त्यांच्या मते, मराठीत खूप चांगल्या विषयांवरचे चित्रपट बनतात. ‘किल्ला’ किंवा ‘एलिझाबेथ एकादशी’सारखे चित्रपट पूर्णपणे वेगळे विषय आणि त्यातल्या त्यात कमी बजेटमध्ये बनवले गेलेले आहेत, पण त्यांना ‘झी स्टुडिओ’सारख्या कॉर्पोरेट निर्मिती संस्थेचे पाठबळ मिळाल्याने त्यांची प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने झाली. चांगल्या चित्रपटाला एक तर ‘झी स्टुडिओज’ करते त्याप्रमाणे प्रसिद्धी करता आली पाहिजे नाही तर थोडे जास्त पैसे खर्च करून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणाऱ्या वाहिन्यांवरून तुमच्या चित्रपटांची प्रसिद्धी झाली पाहिजे. मी ‘धूमधडाका’ हा चित्रपट सुरुवातील एकाच चित्रपटगृहात प्रदर्शित केला, मग हळूहळू संख्या वाढवत नेली. आता तो फं डा उपयोगाचा नाही. ‘झपाटलेला २’साठी आम्ही ‘वायकॉम’बरोबर करार केला होता. आम्हाला ३०० शो मिळाले, त्यामुळे ओपनिंगच्याच आठवडय़ात सहा कोटींच्या आसपास आम्ही पोहोचू शकलो होतो, असा अनुभवही त्यांनी सांगितला.

गेली कित्येक वर्षे मराठी चित्रपट निर्मितीत असणाऱ्या नानूभाई जयसिंघानी यांच्या मते अजूनही मराठी चित्रपट निर्मिती ही एकेकटय़ा निर्मात्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे अर्थातच जे हौशी निर्माते येतात त्यांना कित्येकदा फसवले जाते. नव्याने येणाऱ्यांना चित्रपटांची फारशी माहिती नसल्याने पहिलाच चित्रपट त्यांचा ओव्हरबजेट होतो. आणि मग एकदा पैसे डुबले की ते पुन्हा चित्रपट निर्मितीकडे वळत नाहीत. हिंदीतील कॉर्पोरेट निर्माते मराठीकडे वळले आहेत. कॉर्पोरेट निर्मिती, वितरण ही भविष्यात मराठी चित्रपटांच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.

आपला चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक निर्मात्याने आपल्या चित्रपटाबरोबरच दुसऱ्याचा चित्रपटही चांगल्या पद्धतीने प्रदर्शित होईल, याची काळजी घेतली पाहिजे. एकमेकांशी सामंजस्याने चर्चा करून प्रदर्शनाच्या तारखांचे नियोजन व्हायला हवे. आमचा चित्रपट ‘बघतोस काय, मुजरा कर’ ३ फेब्रुवारीला प्रदर्शित होतो आहे. त्यानंतर १० फेब्रुवारीला दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहेत, १७ फे ब्रुवारीलाही दोन मराठी चित्रपट म्हणजे संपूर्ण फेब्रुवारीत सहा ते सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर दुसरीकडे आता ‘झी स्टुडिओज’च्या ‘ती सध्या काय करते’नंतर एकही मोठा मराठी चित्रपट जानेवारीत नाही. हे नियोजन बदलले पाहिजे.  संजय छाब्रिया

मराठीत रोजच्यारोज चित्रपट निर्मिती करणारे जे निर्माते आहेत त्यांना कुठली कथा लोकांना आवडेल, याचे ज्ञान असते. शिवाय, किती बजेटमध्ये चित्रपट बनवायचा हा अनुभव गाठीशी असल्याने त्या आर्थिक शिस्तीतच चित्रपट निर्मिती केली जाते, जेणेकरून त्यांचं नुकसान होत नाही.  त्यांचे चित्रपटही चांगले चालतात. गेल्या वर्षी ‘नटसम्राट’, ‘सैराट’, ‘वायझेड’, ‘वजनदार’, ‘हाफ तिकीट’, ‘व्हेंटिलेटर’सारख्या चित्रपटांनी चांगली कमाई केली. हिंदीतून जे निर्माते आलेत त्यांनाही तिथल्या चित्रपटनिर्मितीचा अनुभव असल्याने त्यांना फारसे नुकसान सहन करावे लागणार नाही.  नानूभाई जयसिंघानी 

 

निर्मितीचे धडे घेऊनच या क्षेत्रात उतरा

सध्या मराठीची समस्या अशी आहे की, ‘सैराट’ने एवढे कमावले म्हणजे आपला चित्रपटही काही तरी कमावेल, अशी अटकळ बांधून अक्षरश: दोन ते तीन कोटींमध्ये चित्रपट बनवू म्हणून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. जेवढे चित्रपट निर्मितीत गुंतवले आहेत त्यापेक्षा एक-दोन कोटी रुपये जास्त मिळतील. त्यासाठी मग अनुदान आहे. शिवाय चित्रपटाचे सॅटेलाइट हक्कविकून पैसे येतील, गाण्यांचे हक्क आहेत. या सगळ्यातून गुंतवलेली रक्कम वसूल होईल आणि काही रक्कम हातात पडेल, एवढंच गणित करून चित्रपटांची निर्मिती केली जाते. प्रत्यक्षात, यात अनेक चित्रपट हे सी ग्रेडचे असल्याने त्यांना अनुदानच मिळत नाही. सॅटेलाइट हक्क किती चित्रपटांचे विकले जाणार? म्हणजे त्यातूनही पैसा मिळत नाही आणि मग चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीसुद्धा निर्मात्यांकडे पैसे उरत नाहीत. त्यांचे गुंतवलेले पैसे पाण्यात जातात. त्यामुळे चित्रपट निर्मितीत नव्याने उतरणाऱ्यांनी या क्षेत्रातील वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. एक चांगला व्यावसायिक चित्रपट बनवण्यासाठी चांगली गोष्ट, कलाकार, दिग्दर्शन आणि त्यासाठीची आर्थिक गुंतवणूक याची पूर्ण माहिती घेऊनच निर्मात्यांनी चित्रपट केले पाहिजेत.   महेश मांजरेकर