News Flash

‘युद्ध’ ; हुतात्म्याच्या टाळूवरचे लोणीखाऊ

..आणि इथूनच सुरू होते- त्या २५ लाखांवर हक्क कुणाचा, याबद्दलची लढाई.

महादजी आपल्या पोटचा पोर असल्यानं त्याचे आई-वडील त्यावर आपला हक्क सांगतात.

देशासाठी युद्धात किंवा दहशतवाद्यांशी लढताना शहीद होणाऱ्या सैनिकाच्या पश्चात त्याच्या कुटुंबात मनुष्यस्वभावापायी काय काय रामायण घडू शकतं, याचं रोखठोक चित्रण करणारी ‘युद्ध’ ही राजन खान यांची अंगावर शहारे आणणारी कथा. युद्ध प्रत्यक्षातलं आणि मानवी वृत्ती-प्रवृत्तींतलं- अशी समांतर रचना या कथेत त्यांनी केलेली आहे. अथर्व स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेकरता दिग्दर्शक मिलिंद इनामदार यांनी तिचं नाटय़रूपांतर करून ती मंचित केली आहे.
गावातल्या महादजी या सैनिकाचं लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला सीमेवर अचानक युद्धास प्रारंभ झाल्यानं रजा रद्द करून माघारी बोलावलं जातं. नवरा-नवरीच्या अंगावरची हळदही उतरलेली नसताना त्यानं तडकाफडकी युद्धावर जाणं योग्य नव्हे, असं सांगून घरच्यांसकट सगळे गावकरी त्याला अडवू पाहतात. परंतु सरकारच्या आदेशापुढं काही करता येत नाही असं सांगून महादजी निघून जातो. दुर्दैवानं युद्धात तो धारातीर्थी पडतो. सगळ्या घरादारावर आभाळ कोसळतं. शहीद महादजीवर त्याच्या गावात संपूर्ण लष्करी इतमामानं अंत्यसंस्कार केले जातात. देशासाठी शहीद झालेल्या महादजीच्या पत्नीला सरकारकडून २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि जमीन देऊ केली जाते.
..आणि इथूनच सुरू होते- त्या २५ लाखांवर हक्क कुणाचा, याबद्दलची लढाई. महादजी आपल्या पोटचा पोर असल्यानं त्याचे आई-वडील त्यावर आपला हक्क सांगतात. महादजीची बायको सुरेखा हिचे आई-वडील आणि भाऊ यांचं त्या पैशांवर फक्त सुरेखाचाच हक्क असल्याचं मत असतं. लग्न झाल्या झाल्या विधवा झालेल्या तरुण सुरेखाचं भवितव्य उजाड झालेलं.. तशात पुढचं सारं आयुष्य तिला एकाकीपणे काढायचं असल्यानं तिनं ते पैसे इतर कुणाला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांचं ठाम म्हणणं असतं. महादजीच्या विवाहित बहिणी आणि त्यांचे नवरे- महादजी आमचाही कुणीतरी लागत होता, या आधारावर त्या पैशांवर आपलाही दावा ठोकतात. तिकडे गावचे विद्यमान सरपंच आणि माजी सरपंच महादजीवर गावाचाही हक्क होता असं म्हणत त्याचं स्मारक उभारण्याची घोषणा करतात. त्याच्या नावे गावात एक शाळा उभारावी असं माजी सरपंचांचं म्हणणं असतं. तर विद्यमान सरपंचांना शहीद महादजीचा जंगी पुतळा उभा करायचा असतो. त्यासाठी लागणाऱ्या निधीसाठी हे पैसे खर्च करावेत असं त्या दोघांचंही म्हणणं असतं. त्यावर महादजीचे निकटवर्तीय नातलग ‘या पैशाशी गावाचा काय संबंध?’ असा रोकडा सवाल उपस्थित करतात. या सगळ्यांचे दावे-प्रतिदावे यामुळे एकच कल्ला होतो. प्रत्येकजण आपलंच घोडं पुढं दामटायला बघतो. त्यासाठी डावपेच लढवू लागतो. त्याकरता परस्परांशी जणू युद्धच पुकारलं जातं. या सगळ्या गदारोळात महादजीची नववधू सुरेखा हिला मात्र काहीएक स्थान नसतं. तिला काय वाटतंय, तिचं काय म्हणणं आहे, हे कुणीच विचारीत नाही. सगळ्यांनी तिला गृहीत धरलेलं असतं. सरकारी अधिकारी मदतीचा चेक घेऊन येतो तेव्हा तर सर्वचजण हातघाईला येतात आणि त्यांच्यात एकच रणकंदन माजतं. त्या हाणामारीत अनेकजण जखमी होतात.
अधिकारी चेक सुरेखाच्या हाती सुपूर्द करतो. तेव्हा ती पहिल्यांदाच आपलं तोंड उघडते. ‘मला या कुणाच्याही बरोबर राहायचं नाहीए. मग ती सासरची मंडळी असोत की माहेरची. या सर्वाना फक्त मला मिळणारा पैसा हवा आहे. माझी यापैकी कुणालाच काळजी नाही. तेव्हा यानंतर माझी मी स्वतंत्रपणे राहण्याचं ठरवलं आहे. माझं भवितव्य मीच ठरवेन. कुणाचीही मला गरज नाही,’ असं ती ठामपणे सर्वाना सांगते आणि त्या अधिकाऱ्यासोबत तिथून निघून जाते..
मानवी वृत्तीतील हिडिस क्रौर्याचं दर्शन घडवणारी ही कथा. लेखक राजन खान यांची धारदार उपरोधिक शैली त्यात ठायी ठायी प्रकट होते. मानवी स्वभावाचे नानाविध नमुने, त्यातले सूक्ष्म पदर त्यांनी या कथेत वास्तवदर्शीपणे उलगडले आहेत. यातलं प्रत्येक पात्र सजीव वाटतं. त्यांच्या मनात चाललेली खळबळ आणि तिचं प्रकट रूप, व्यक्त होण्याच्या नाना तऱ्हा त्यांनी इतक्या बारकाव्यानं रेखाटल्या आहेत, की या कथेचं नाटय़रूपांतर करण्याचा मोह मिलिंद इनामदार यांनाही आवरला नसावा. त्यांनी कथेचं अत्यंत सहज, सुलभ नाटय़रूपांतर केलेलं आहे. प्रत्येक प्रसंगाचं जेवढय़ास तेवढेपण त्यांना रूपांतरात कायम राखलं आहे. त्यामुळे हे रूपांतर ओघवतं आणि प्रत्ययकारी झालं आहे. या नाटय़रूपांतराचं प्रत्यक्ष मंचन करताना पात्रनिवडीतही त्यांनी हे कौशल्य दाखवलं आहे. बहुतांश पात्रं चपखल वाटतात, ती त्यामुळेच. पहिल्या लग्नाच्या प्रसंगापासूनच मानवी स्वभाव आणि वृत्ती-प्रवृत्तीचे रंगढंग त्यांनी लीलया दाखविले आहेत. मूळ कथेतले सूक्ष्म तपशील त्यांनी इथं जसेच्या तसे जिवंत केले आहेत. फक्त एक खटकलेली गोष्ट ही, की काही ठिकाणी विनोद ‘घडविण्याचा’ त्यांचा सोस रसभंग करतो. उपहास व उपरोधातून स्वाभाविकपणे प्रकटणारे विनोद यात जसे आहेत, तसे नाटकात येत असताना हे आणखी जास्तीचे हशे वसूल करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. हे काही विनोदी नाटक नव्हे, याची जाणीव मिलिंद इनामदार यांनी ठेवायला हवी होती. प्रत्येक पात्राला दिलेल्या वेगवेगळ्या लकबी आणि संवादोच्चारणाच्या पद्धती नाटकाच्या वास्तव रचनेशी सुसंगत होत्या. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतक्या इतक्या पात्रांना सुनियंत्रितपणे हाताळणं, हे केव्हाही आव्हानात्मकच. मिलिंद इनामदार या कसोटीत उतरले आहेत. नाटकाचा प्रारंभ मात्र काहीसा आंतरमहाविद्यालयीन एकांकिकेसारखा होतो. नंतर मात्र ते विषयाला थेट भिडतं.
उल्हेश खंदारे यांनी रंगभूषेतून आणि मीलन देसाई यांनी वेशभूषेतून प्रत्येक पात्राचं वेगळेपण ठाशीव केलं आहे. भूषण देसाईंच्या प्रकाशयोजनेतून प्रसंगांतली नाटय़पूर्णता अधोरेखित होते. मिलिंद येरम यांच्या पाश्र्वसंगीतानं नाटकाची मागणी पुरवली आहे.
यातल्या प्रत्येक कलाकारानं आपापल्या भूमिका चोख वठवल्या आहेत. विशेष उल्लेख करावा लागेल तो सुरेखा आणि महादजीच्या आई-वडिलांची भूमिका करणाऱ्या कलावंतांचा. आशीष शिर्के (सुरेखाचे वडील), मीलन देसाई (सुरेखाची आई), नामांतर कांबळे (महादजीचे वडील), गीता पालांडे (महादजीची आई), दोन्ही सरपंच- कृष्णा पवार आणि नारायण जांबोटकर, सचिन सोनावणे (रिक्षावाला जावई), लेखा राणे, शंभवी पाटील आणि सायली चावरकर (महादजीच्या बहिणी) यांच्यासह सर्वानीच भूमिकेचा आब यथातथ्य राखला आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2015 1:38 am

Web Title: article on marathi play 2
टॅग : Marathi Play
Next Stories
1 ‘मुंबई-पुणे-मुंबई’ची तिसरी कथाही पडद्यावर येणार
2 धनुष आणि ‘रांझना’ फेम आनंद राय पुन्हा एकत्र
3 फरहानची संगीतमय भेट!
Just Now!
X