नाटक-चित्रपटाच्या सेटवरची पहिलीच नजरानजर. पहिल्याच नजरेत प्रेमात पडणं, त्यानंतर नाटक-चित्रपटांनिमित्ताने होणाऱ्या भेटीगाठीतून फुलत जाणारे प्रेम. आणि प्रेमाचे लग्नात झालेले रूपांतर. ही आहे बहुतेक लोकप्रिय जोडय़ांची प्रेमकहाणी. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने आपल्या जोडीदाराबरोबरचे हे नाते कसे फुलत गेले याबद्दल मराठीतील अभिनेत्री प्रिया बापट, ईशा केसकर, पर्ण पेठे आणि भाडिपामधून लोकप्रिय झालेला सारंग साठय़े यांनी सांगितलेली त्यांच्या प्रेमाची गोष्ट.. चित्रपटसृष्टीत स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड, नाते टिकवण्यासाठी घेतलेली मेहनत आणि सुखदु:खाच्या प्रसंगातून फुलत जाणारे प्रेम यामुळे त्यांचे नाते अधिकच घट्ट होत गेले..

‘सहवासातून फुललेले प्रेम’

‘आभाळमाया’ या मराठी मालिकेच्या वेळेस आमची पहिली भेट झाली. तेव्हा मी आणि उमेश ओळखतही नव्हतो. नंतर एका मित्रामुळे परत आम्ही भेटायला लागलो. ‘वादळवाट’ या मालिकेच्या सेटवर दोघांनी एकमेकांचे नंबर घेतले. उमेशचे बरेचसे मित्र दादरला राहत असल्याने त्याचेही दादरला येणे-जाणे वाढले. नाटकानिमित्ताने आमच्या भेटीगाठी वाढल्या. आम्हाला दोघांनाही या क्षेत्रातील जोडीदार नको होता. परंतु, उमेशही अभिनय क्षेत्रात असल्याने त्याने माझ्या करिअरच्या गरजा समजून घेतल्या. मी अभ्यास करताना, महाविद्यालयात असताना तो नाटक-मालिकांत काम करत होता. कामाच्या अनिश्चित वेळा, यामुळे माझी चीडचीड होत होती. दोघांमध्ये खटके उडायचे. आधी मी आवड म्हणून अभिनय करत होते. मात्र पदव्युत्तर शिक्षणानंतर या क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. आमच्या नात्यालाही आम्ही बराच वेळ दिला. उमेश माझ्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा असल्याने आमच्यात जनरेशन गॅप होती. मी ज्या गोष्टी अनुभवते ते उमेशने आठ वर्षांपूर्वीच अनुभवलेल्या असतात. याचे फायदे आणि तोटेही आहेत. आमची फिरण्याची हक्काची ठिकाणे ठरलेली असायची. आम्ही राजाबाई टॉवर येथील रसवाल्याकडे उसाचा रस प्यायला जात असू. एकदा बसने प्रवास करताना एका मुलाने तुमचे लग्न होणार असे सांगितले. त्याची आम्हाला तेव्हा गंमत वाटली. एकदा तर घरी आईला मेंदी आणायला जाते असे सांगून उमेशला भेटायला गेले होते. मी बस स्थानकाजवळ त्याच्याशी बोलताना आईने पाहिले. अशा प्रेमाच्या चोऱ्या आईने खूप पकडल्या आहेत. लग्न झाल्यावर आम्ही जगभर भटकंती केली. आतापर्यंत अमेरिका, मलेशिया, लंडन, आर्यलड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, केरळ, हिमाचल प्रदेश येथे आम्ही भटकंती केली आहे.

प्रिया बापट</p>

‘समानतेचे नाते’

सखी आणि माझे नाते समान आहे. हे नाते समान ठेवणे रोमँटिक वाटते. सखीसोबत कोणतीही गोष्ट एकत्र करायला मला आवडते. जेवण बनवणे आणि सखीला खाऊ घालणे ही माझी सर्वात आवडीची गोष्ट आहे. सखीसोबत विविध भाज्या आणणे आणि त्याचे पदार्थ तयार करणे, जगभरातील चित्र आणि चित्रपट पाहणे मला मोहक वाटते. माझ्या आणि सखीत अनेक गोष्टींवरून मतभेद होतात. माझी गोष्ट सखीला पटवून देण्यात मला अतीव आनंद मिळतो. आपली गोष्ट आवडत्या व्यक्तीला पटवून देण्याची मजा काही औरच असते. आम्ही अनेकदा फिरण्याचे प्लॅन करतो. फिरताना त्या ठिकाणची प्रसिद्ध स्थळे शोधण्याचे काम सखी आणि पैशांची आर्थिक गणिते जु़ळवण्याचं काम मी करतो. आमच्या नात्याला घरातून पहिल्यापासूनच पाठिंबा मिळाला आहे. दोघांचे वडील नसल्याने आमच्या आईंनी नात्याला समजून घेतले. माझी आणि सखीची ओळख ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेच्या सेटवर झाली. सखी सध्या लंडनला शिकण्यासाठी गेली आहे. नात्यांमधील अंतर हा मुद्दा मला गौण वाटतो. आम्ही स्थिरस्थावर असताना सखीने पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा मी तिच्या निर्णयाला पूर्णत: पाठिंबा दिला. आजच्या काळात पिढय़ान्पिढय़ा नात्यांचे, लग्नाचे अर्थ बदलत आहेत. एकत्र माणूस म्हणून समृद्ध होणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. दोघांमधील अंतर कधीतरी त्रासदायकही वाटते मला वेळ मिळेल तेव्हा मी लंडनला जाण्याचा प्रयत्न करतो. सखीही येथे येते. लंडनला मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे प्रेम खुलेपणाने व्यक्त करता येते. आपल्या देशात संस्कृतीच्या नावाखाली समलिंगी अथवा भिन्नलिंगी व्यक्तींना प्रेम व्यक्त करता येत नाही, या गोष्टीला माझा विरोध आहे.

– सुव्रत जोशी

‘मैत्रीतून प्रेम फुलले’

२०१७ मध्ये ‘झी मराठी’वर हृषीची ‘काहे दिया परदेस’ तर माझी ‘जय मल्हार’ ही मालिका सुरू होती. झी मराठी गौरव सोहळ्यासाठी कलाकारांची नामांकने जाहीर झाली होती. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात नामांकने असलेल्या कलाकारांना बोलवण्यात आले होते. मी आणि हृषी तेथे पहिल्यांदा भेटलो. झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या नृत्याच्या सरावासाठी आम्ही एकत्र आलो होतो. मला त्याचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आवडली होती. त्याला मराठी येत नसल्याने हिंदीतच बोलायचो. मराठीतून हिंदीत कलाकार काम करतात. मात्र, हिंदीतून मराठीकडे वळण्याची त्याची गोष्ट मला भावली. तेव्हा बोलणे वाढल्यावर, विविध विषयांवर चर्चा होऊ लागली. भेटीगाठी वाढत गेल्या. साधारण एक वर्ष आम्हा दोघांच्यात निखळ मैत्री होती. एकदा ऑस्कर विजेता ‘ला ला लँड’ हा चित्रपट पहाण्यासाठी गेलो होतो. या चित्रपटात शेवटी नायक-नायिकांचे प्रेम पूर्णत्वास येत नाही, अशा आशयाची कथा आहे. एकच क्षेत्र, समान ध्येय आकांक्षा आणि विचार असलेल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मला वाटले. त्याने घेतलेली काळजी, समजूतदारपणा या गोष्टी मला आवडायला लागल्या. तो हिंदी भाषिक असल्याने मराठी शब्दाचे हिंदीत अर्थ समजावून सांगायला मजा येते. एकदा माझी झोपताना तंद्री लागली होती. तर तंद्री या शब्दाचा अर्थ त्याला सांगताना हसून हसून पुरेवाट झाली. माझ्यामुळे हृषीची मराठी आणि त्याच्यामुळे माझी हिंदी भाषा सुधारल्याचे ईशाने सांगितले.

– ईशा केसकर

‘समंजस जोडीदार’

पुण्यात ‘आसक्त’ संस्थेतर्फे प्रायोगिक रंगभूमीवरील ‘झूम बराबर झूम’ नावाचे नाटक करत होतो. ‘मुरांबा’ चित्रपटाचा दिग्दर्शक वरुण नार्वेकर याने ते नाटक दिग्दर्शित केले होते. तेव्हा मी आणि आलोक प्रथम भेटलो.  ‘नाटक कंपनी’ आणि ‘आसक्त’ या संस्थांकडून काम करत नाटक करताना ओळखीचे रूपांतर मैत्रीत कधी झाले ते समजलेच नाही. नाटकाच्या निमित्ताने जास्त वेळ एकमेकांसोबत घालवायला लागलो. एकमेकांचा संवाद आणि सहवास यामुळे छोटय़ा छोटय़ा गोष्टी समजायला लागल्या. आम्ही दोघेही ठरवून कधी प्रेमात पडलो नसल्याचे पर्ण सांगते. मी कलाकार आणि आलोक दिग्दर्शक असल्याचा फायदा होतो. अभिनय क्षेत्रातील जोडीदार असल्याने असुरक्षितता, चांगल्या वाईट गोष्टी, स्वत:ला सिद्ध करण्याची धडपड यांची कल्पना दोघांनाही आहे. आलोक दिग्दर्शक असल्याने त्याचे काम त्याच्या हातात असते. मी कलाकार असल्याने माझं काम दुसऱ्यांवर अवलंबून असतं. आम्हाला फिरण्याची जास्त आवड आहे. नाटकाचे दौरे, चित्रपटानिमित्ताने अनेक ठिकाणी भटकंती झाली. अनेक चित्रपट महोत्सवांना एकत्र भेट दिली आहे. ‘कासव’ चित्रपटाच्या प्रदर्शना वेळेस मी, आलोक, मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे चीनला जाऊन आलो.

– पर्ण पेठे

‘मोगॅम्बोच्या येण्याने नाते घट्ट’

माझे आणि पॉलाचे व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवरही घट्ट नाते असल्याचे सारंग सांगतो. ‘टोरोंटो फिल्म फेस्टिव्हल’ला एका पार्टीमध्ये मी पॉलाला भेटलो होतो. नंतर मी आणि अनुषा एक कार्यक्रम करत असताना कॅनडाहून एक मुलगी येणार असल्याचे समजले. तिला जेव्हा भेटल्यावर कुठेतरी पाहिल्याचे आठवत होते. तिला आम्ही दोघे टोरोंटोला भेटल्याचे चक्क आठवत होते. ती आल्यावर आमची बोलण्याची सुरुवातच मजेदार झाली. मित्रांनी मला कॅनडाहून सारंगची फॅन आली आहे, अशी चिडवाचिडवी सुरू केली. तिला मराठी समजत नसल्याने मला पॉलाशी संवाद साधण्यास अडचण व्हायची. दोन दिवस बोलत नाही म्हटल्यावर तिने माझी जाम खेचली. पहिल्याच भेटीत मला ती आवडली होती. तिच्याशी बोलताना मराठीतून फ्लर्ट केलेलं अजून मला आठवतं. तिचे विचार, स्वभाव, काम करण्याची पद्धत आवडायला लागली. एकाच महिन्यात मी आणि पॉलाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघे आणि अनुषा पुण्यात घर घेऊन राहायला लागलो. याआधी घरी आई वडिलांना आमच्या नात्याविषयी सांगितले. आता सहा वर्ष एकत्र राहतो आहे. घरातील सगळ्या गोष्टी, कामे, घरखर्च विभागून घेतो. पॉला वयाच्या अठराव्या वर्षी जपानला फिरून आली आहे. ती कुठल्याही संस्कृ तीत लवकर मिसळून जाते. कॅनडामध्ये सरकार चित्रपट निर्मितीसाठी अर्थसहाय्य क रते. भारतातील चित्रपट निर्मिती, विविधता या गोष्टींमुळे पॉला भारतात आली. आशयाला भाषेचे बंधन नसते या मताची पॉला असल्याने मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याच्या दृष्टिकोन तिचा होता. भाडिपा (भारतीय डिजीटल पार्टी) हे तिचे बाळ आहे. कारण हे सुरू करण्याची संकल्पना तिची होती. आज भाडिपाला चार वर्षे झाली असून आमचे नाते सहा वर्षांचे झाले आहे. भाडिपाच्या सुरुवातीच्या काळात आर्थिक चणचण भासली. तेव्हा अनेक मित्रांनी मदत केली. मराठीतून इंग्रजीमध्ये पॉलाला गोष्टी सांगताना मजा येत होती. आमच्या घरात मोगॅम्बो नावाची मांजर आल्यावर आमचे नाते अधिकच घट्ट झाले.

– सारंग साठय़े (भाडिपा)