रेश्मा राईकवार

एखादा विचार लोकप्रिय झाला की तो चित्रपटांतून पहिल्यांदा लोकांसमोर येतोच येतो. आणि तो लोकांनाही आवडला की अशा चित्रपटांची एक लाटच्या लाट येते. तशी आत्मचरित्रपटांची एकच लाट गेली कित्येक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टीत उसळते आहे. मात्र, सध्या मराठी आणि हिंदीतही ऐतिहासिक चित्रपटांचा त्यातही मराठेशाहीचा ज्वलंत इतिहास रेखाटण्याचा ध्यास घेतलेली मंडळी झपाटय़ाने काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हिंदीतही जे दोन ऐतिहासिक चित्रपट चर्चेत आहेत त्यांचे दिग्दर्शक मराठीच आहेत. पुढची तीन वर्षे तरी ऐतिहासिक चित्रपटांचा प्रभाव लोकांवर विशेषत: तरुणाईवर असणार आहे, असं मत ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘जावळी १६५९’ या दोन ऐतिहासिक चित्रपटांवर काम करणाऱ्या लेखक – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केलं.

अचानक मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून मराठेशाहीचा इतिहास मांडण्याचा विचार चित्रपटकर्मीच्या मनात का आला असावा? याचा विचार करताना लोकांना आपल्या इतिहासात रमायला आवडतंच. मराठेशाहीच्या इतिहासात तर छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे मावळे, संभाजी महाराज आणि अशा अनेक भारावून टाकणाऱ्या, आपल्या पराक्रमाने भल्याभल्यांना जेरीस आणणाऱ्या अनेक व्यक्तिरेखा आहेत. त्यांच्या गोष्टी ऐकायला, पाहायला लोकांना आवडतात. आणि हे प्रत्यक्षात दिसून आलं आहे, असं तरडे यांनी सांगितलं. गेल्यावर्षी जून महिन्यातच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘र्फजद’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पन्हाळा किल्ला काबीज करण्यासाठी कोंडाजी र्फजद यांच्या साथीने दिलेली झुंज या चित्रपटात दाखवण्यात आली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. पाठोपाठ ‘झी मराठी’वर झळकलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेनेही प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं. त्यामुळे या ऐतिहासिक व्यक्तिरेखांचा प्रभाव लोकांवर आहे आणि पुढची तीन वर्षे तरी ऐतिहासिक चित्रपटांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास प्रवीण तरडे यांनी व्यक्त केला.

‘र्फजद’ चित्रपटाला ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळाला ते पाहिल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा ऐतिहासिक चित्रपट घेऊन येत आहेत. ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून पहिल्यांदाच शिवाजी महाराजांची युद्धनीती कशी होती, यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे. इतिहासात शिरून काही गोष्टी धुंडाळणं हे महत्त्वाचं असतं, मात्र सध्या इंटरनेटमागे पळत असलेली तरुण पिढी ते करताना दिसत नाही. शिवाजी महाराजांनी लढाया जिंकल्या, किल्ले बांधले एवढेच त्यांना माहिती असते मात्र त्यापलीकडे महाराजांनी पाटबंधारे असतील, कृषीविकास असेल त्याचाही उत्तम विचार केला होता. तिथपर्यंत कोणी पोहोचतच नाही. शिवाजी महाराजांचे चरित्र दोन तासांत मांडणे शक्य नाही. पण त्यांनी जे निर्माण केलं ते इतकं भव्य आणि प्रेरणायादी आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे. त्यांची युद्घनीती हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. गनिमी कावा म्हणून ओळखली जाणारी त्यांची युद्धनीती नेमकी कशी होती हे दाखवण्याचा प्रयत्न ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून केला जात असल्याचं दिग्पाल लांजेकर यांनी सांगितलं. एकीकडे मराठीत फत्तेशिकस्त, जावळी १६५९, सरसेनापती हंबीरराव आणि रवी जाधव दिग्दर्शित रितेश देशमुख अभिनीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील चरित्रपट येऊ घातले आहेत. त्याचवेळी हिंदीत ‘गड आला पण सिंह गेला’ म्हणून शिवाजी महाराजांनी ज्यांचा गौरव केला त्या नरवीर तानाजीची शौर्यकथा सांगणारा चित्रपट ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘तानाजी’ चित्रपटात अभिनेता अजय देवगण तानाजीच्या भूमिकेत दिसणार आहे, तर उदयभानाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. हिंदीत शिवाजी महाराजांची कथा सांगताना कलाकारांच्या निवडीपासून, भाषेपर्यंत अनेक आव्हानं होती का? यावर भाषा मराठी आहे की हिंदी याने फरक पडत नाही, असे ओम राऊत यांनी स्पष्ट के ले. तानाजी हे नरवीर होते. त्यांचा रुबाब, आभा पडद्यावर रंगवणारी व्यक्ती तितक्याच ताकदीची हवी. अशावेळी अजय देवगणसारख्या हिंदीतील सुपरस्टारची निवड केल्यानंतर त्या सुपरस्टारची ओळख, त्याचा अभिनय याची त्या व्यक्तिरेखेच्या भव्यतेशी सांगड घालत आपल्याला हवं ते त्या कलाकाराकडून काढून घेणं हे दिग्दर्शकीय कसब आहे. आणि ते करायला आपल्याला जास्त आवडतं, असं ओम राऊत यांनी सांगितलं. ‘तानाजी’ची कथा रंगवायची म्हणजे युद्ध आलेच, त्यामुळे जर्मनीतील अ‍ॅक्शन टीमकडून हे प्रसंग डिझाईन करण्यात आले आहेत. शिवाय, हिंदी कलाकारांबरोबरच इतर तांत्रिक, प्रॉडक्शन टीममध्येही तुर्की, जपानी तंत्रज्ञ असल्याने त्यांना इतिहासातील या गोष्टी बारकाव्यांसह समजावून सांगाव्याच लागल्या. याशिवाय, कलाकारांचे लुक्स, पीरिअड फिल्म असल्याने त्यापद्धतीच्या वातावरण निर्मितीसाठी व्हीएफएक्सचा योग्य वापर, या सगळ्यातून तानाजी साकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळात, ऐतिहासिक चित्रपट का करायचे आहेत, याबद्दलही या चित्रपटकर्मीच्या विचारात स्पष्टता असल्याचं दिसून येतं. शिवाजी महाराजांचा इतिहास, मावळ्यांच्या शौर्यकथा या एकाच पद्धतीने लोकांसमोर आल्या आहेत. त्यातही वरवरचा इतिहास जास्त आहे, मात्र खोलात शिरून हा इतिहास मांडण्याचा प्रयत्न झालेला नाही, असं या चित्रपटकर्मीचं म्हणणं आहे. ‘जावळी १६५९’ या चित्रपटात पहिल्यांदाच अफझलखानाला कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी त्याचं टप्प्याटप्प्याने मानसिक खच्चीकरण करून मारलं आहे हे दाखवण्यात येणार आहे. जावळीच्या खोऱ्यात अफझलखान येणं हे सहजी शक्य नव्हतं. त्याला जावळीपर्यंत आणण्यासाठी दोन महिने शिवाजी महाराजांचे प्रयत्न सुरू होते. लढाई म्हणजे केवळ शस्त्रास्त्रांनीच जिंकली जाते असं नाही. इतका मोठा अफझलखान आणि त्याचं एवढं भव्य सैन्य यांचा पाडाव मूठभर मावळ्यांनी कसा केला असेल? प्रचंड वजनाचा अफझलखान महाराजांनी मारला. महाराज किरकोळ चणीचे असते तर त्यांनी इतक्या सहजीने अफझलखान कसा मारला असता? असा खोलात विचार केल्यावर मग लक्षात येईल. ज्या व्यक्तीचं अवघं आयुष्य घोडय़ावर गेलं, असंख्य किल्ले ज्यांनी उभारले, त्यांची शारीरिक ताकद त्यांनी कशी कमावली असेल, हेही लक्षात घेतलं पाहिजे. पण तसं होत नाही. म्हणूनच आपल्या चित्रपटातून शिवाजी महाराज आणि एकंदरीत मराठेशाहीचा ज्वलंत इतिहासाची ताकद त्याचपद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तरडे यांनी सांगितले. संजय लीला भन्साळी यांच्याकडे काम के लेल्या तंत्रज्ञांची टीम ‘जावळी १६५९’वर काम करत असल्याची माहिती तरडे यांनी दिली.

मराठा साम्राज्य, मराठेशाही आणि अतुलनीय शौर्याने लिहिलेला मराठेशाहीचा इतिहास जगभर पोहोचलाच पाहिजे. मराठी माणूस हा या शौर्यासाठी, त्याच्या बुद्धिमत्तेसाठी, त्याच्या अभिजात संस्कृतीसाठी ओळखला गेला पाहिजे आणि तेच या चित्रपटातून साध्य करणार असल्याचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी सांगितले.

शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासाबरोबरच आणखी दोन महत्त्वाचे वेगळे विषय हिंदी आणि मराठी चित्रपटातून समोर येणार आहेत. पानिपतची लढाई ही आजवर चित्रपटातून समोर आलेली नाही. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत या चित्रपटातून ही कथा पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनन मुख्य भूमिकेत आहेत. तर मराठीत ‘बलोच’ हा आणखी एक वेगळा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. पानिपतच्या युद्धानंतर मराठे हरल्यानंतर त्यांचं काय झालं? हे प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच’ या चित्रपटात दिसणार आहे. सदाशिवराव भाऊ पेशवे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यात लढल्या गेलेल्या या घनघोर युद्धात मराठय़ांचा पराभव झाला. अब्दालीने जे मराठी सैनिक पकडून नेले त्यांचे पुढे काय झाले, यावर हा चित्रपट बेतलेला आहे.

एकापाठोपाठ एक अशा पद्धतीने येऊ घातलेल्या या सात हिंदी-मराठी चित्रपटांमधून मराठेशाहीचा धगधगता इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत होणार आहे. या चित्रपटांवर काम करणारे तरुण दिग्दर्शक, लेखक यांचा इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आणि त्याला व्हीएफएक्ससह अत्याधुनिक तंत्राची लाभलेली साथ आणि उत्तम कलाकारांची जोड यामुळे हे ऐतिहासिक चित्रपट रसिकांसाठी पर्वणी असणार यात शंका नाही. या चित्रपटांमागचे मनोरंजनाबरोबरच इतिहासाचे आजवर न दिसलेले पैलू तरुणाईपर्यंत पोहोचवण्याचा या चित्रपटकर्मीचा उद्देशही यात महत्त्वाचा ठरतो!